Tuesday, 25 June 2024

वृक्षारोपण

 निर्मला फार्म- भाग आठ - वृक्षारोपण.


संतुलित पर्यावरणासाठी एक सोपा उपाय - प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात क्षेत्रफळाच्या तुलनेत किमान पाच ते दहा टक्के क्षेत्रावर जांभूळ, पळस, अर्जुन, बेहेडा अशी कोणत्याही प्रकारची स्थानिक झाडे लावावीत आणि जगवावीत.उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याकडे जर दहा एकर शेत जमीन असेल तर त्याने अर्धा ते एक एकर क्षेत्रावर देशी झाडे लावावीत.


किंवा शासनाने  फळबाग लागवड योजने सारखी एखादी योजना आणून शेतकऱ्यांना कडुनिंब, बाभळ अशा भारतीय पारंपारिक वृक्ष, स्थानिक वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे . बांधावरील झाडे वगळता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर पाच, दहा टक्के जंगल तयार करणे हाच या योजनेचा उद्धेश असावा.


शेतात एक चिंच झाड जेव्हा मोठे होते तेव्हा ते एक गुंठा क्षेत्र व्यापते. मी आमच्या शेतात एका ठिकाणी पन्नास आणि दुसऱ्या ठिकाणी पंच्चावन चिंच झाडे काही वर्षांपूर्वी लावली होती, त्यातली एकसष्ठ झाडे वाढली आणि मोठी झाली आहेत. उरलेली  तूटआळी झाली होती.म्हणजे त्या खड्ड्यात लावलेले झाड आले नव्हते. तूटआळी भरून काढायला उशीरच झाला पण यावर्षी पर्जन्यमान चांगले राहील असे ग्रहित धरून वृक्षारोपण केले आहे. यावेळी कृषी विज्ञान केंद्र,नर्सरी, बारामती येथून 'प्रतिष्ठान' व्हरायटीची कलमी रोपे घेतली. एक फूट उंचीचे रोप सत्तर रुपयास तर अडीच/तीन फूट उंचीचे रोप दीडशे रुपयास उपलब्ध आहे. चिंच झाडे मोठी झाल्यानंतरचा विषय म्हणजे चिंचा विक्री करणे . तर चिंचेचा व्यापार करणारे चिंच बागवान किंवा व्यापारी आहेत, ते दरवर्षी चिंचा विकत घ्यायला येतात. चिंचेच्या झाडाचा आकार आणि झाडाला किती फळ लागले आहे ते पाहुन प्रती झाड हजार ते तीन हजार पर्यंत किंमत ठरते आणि ते चिंचा झाडून घेऊन जातात.


रोपाचे झाड व्हायला पाच- दहा वर्षें लागतात, तोपर्यंत या चिंच बागेत आंतरपीक पण घेतले जाणार आहे. एकशेपाच चिंचेचा बाग जेव्हा बहरेल,मोठा होईल तेव्हा तो काय छान दिसेल आणि त्यामुळे तिथे पर्यावरणास अनकुल वातावरण निर्माण होईल या विचारानेच मला हायसे वाटत आहे.


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

सारं काही पाण्यासाठी.

 निर्मला फार्म -भाग सात - सारं काही पाण्यासाठी.

पार्ट वन -

आमच्या शेतात तीन विहिरी आहेत. एक- घरामागची विहीर. आम्ही ज्या वस्तीवर राहतो तेथील घराच्या मागे ही विहीर आहे म्हणून तीचे नाव 'घरामागची विहीर'.माझ्या जन्मापूर्वी ती खोदलेली होती . अगदी 80ज् पर्यंत विहीर माणसांमार्फत खोदली जात असे.म्हणजे पारेने सुरुंग खोदले जात असत, त्यात सुरुंगाची दारू भरली जात असे, सुरुंगाची वात माणूस पेटवून पायऱ्यावरून पळत विहिरी बाहेर येत असे, विहिरीतील माल माणसे पाटीने बाहेर काढत असत,सगळं काम लेबर ओरिएंटेड होते.ही विहीर आकाराने वीस बाय वीस फूट आहे . या विहिरीवर बैलांची मोट चालत असे.मोट चालविली जात असताना मी पाहिली होती.त्याकाळी या विहिरीवर वडवान, थारोळे होते. आता मोट, नाडा, सोल, वडवान,थारोळे,रहाट,इ. गोष्टी नामशेष झाल्या आहेत.आता तिथे केवळ  थारोळे, वडवान होतेचे अवशेष शिल्लक आहेत.पुढे या विहिरीवर किर्लोस्कर कंपनीचे इंजिन आले, तेही जावून त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर आली. आकार लहान, पाणी कमी म्हणून सध्या तिचा शेतासाठी फारसा उपयोग होत नव्हता. तरीही या विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटरची बिले मात्र मी नियमित भरत आलो आहे.यावेळी विचार केला तिचा आकार तेहतीस बाय तेहतीस फूट करू आणि शक्य झाल्यास खोली वाढवू. यामुळे पाण्याचे नवीन झरे सुरु झाले,पाणी वाढले तर आनंदच आहे.माणूस नेहमी आशेवर जगत असतो. विहिरीचा आकार मोठा करून त्यात उजनी लिफ्टचे पाणी सोडून पाण्याचा साठा करता येईल. या विहिरीवरुन ड्रीप इर्रीगेशन करून आठ, दहा एकर शेती कायम बागायती करता येईल.मुळात तीन पैकी एका विहिराच चांगले पाणी आहे. त्यामुळेच तर मला 2014 साली उजनी जलशयातून उपसा जलसिंचन योजना करावी लागली.उपलब्ध पाण्याचा पुरेपूर आणि योग्य वापर करायचा असेल तर ड्रीप इर्रीगेशन हाच उपाय आहे.


दुसऱ्या विहिरीचे नाव 'नवी विहीर'. माझ्या वडिलांनी 1971 मध्ये ती खोदली.ही विहीर तेहतीस बाय तेहतीस फूट असून हिला चांगले पाणी आहे. या विहिरीच्या दक्षिण,

पश्चिम, उत्तर बाजूच्या गट नंबर मधील शेजारच्या शेतकऱ्यांनी नवीन विहिरी खोदल्या आहेत परंतु याचा माझ्या विहिरीच्या पाण्यावर जराही परिणाम झाला नाही. माझ्या विहिरीच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत आहेत तसेच अखंड चालू ठेवल्याबद्दल मी परमेश्वराचा तसेच निसर्ग देवतेचा खूप खूप ऋणी आहे. या विहिरीला मी खास मालेगाव वरून माणसे बोलवून रिंग टाकून बांधून घेतले आहे.यावेळी या विहिरीतील गाळ काढायचे नियोजन होते पण विहिरीत पाणी जास्त असल्यामुळे ते शक्य झाले नाही.असल्या दुष्काळ आणि उन्हाळ्यात पाणी गाळ काढू देत नाही ही समाधानाचीच गोष्ट आहे.


तिसरी विहीरीचे नाव 'मोठी विहीर'. मी ती 2000 साली खोदली.या विहिरीचा आकार वीस बाय तीस मीटर आहे.म्हणजे मोठं शेततळं किंवा जलतरण तलाव.पण दुर्दैवाने खाली बत्तीस फुटावर एकमुखी पाषाण लागला त्यामुळे तीचे खोलीकरणाचे काम थांबवावे लागले.तीला उभे, आडवे बोर मारले आहेत पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. या विहिरीला पाऊस पडल्यापासून पुढे फेब्रुवारी, मार्च पर्यंत चांगले पाणी असते. गेल्या चोवीस वर्षात याविहिरीत बराच गाळ साठला होता. तो यावर्षी काढण्याचा निर्णय घेतला. स्टॉक आणि फेब्रुवारी, मार्च पर्यंत पाण्याचा योग्य उपयोग हा उद्धेश आहे.


थोडक्यात काय तर मोठ्या विहिरीचा गाळ काढणे आणि घरामागील विहीर मोठी करणे. कशासाठी तर पाण्यासाठी. कसे तर वाचा पार्ट टू...


पार्ट टू -

गाळ काढण्याचे काम 'यारी'ने केले जाते.एक तर हे काम उक्ते घेतले जाते. उक्ते म्हणजे या कामासाठी अंदाजे जो खर्च येईल तो किंवा जी रक्कम ठरेल ती द्या, मग काम पूर्ण करण्याची जबाबदारी यारी वाल्याची. दुसरं म्हणजे हे काम हजेरीत केले जाते. याच्या टर्मस आणि कंडिशनस पुढील प्रमाणे असतात.जिथे काम चालू आहे तिथून तुमच्या विहिरीवर यारी आणण्याचा खर्च, सहा- सात कामगार असतात, प्रत्येक मजुराची मजुरी 600₹ प्रमाणे आणि ऑपरेटर सह यारी भाडे दररोज 2000₹ प्रमाणे शेतकऱ्याला द्यावे लागते. दररोज काम सूरू होण्यापूर्वी विहिरीतील पाणी उपसा करण्याची जबाबदारी विहीर मालकाची. विहिरीत पाणी असल्यामुळे लेबर बसून राहिले तर मजुरी द्यावी लागेल,इ.अजून काही छुपे खर्च असू शकतात.


याशिवाय गाळ काढणे, विहीर खोदकाम करणे ही कामे मोठमोठ्या एक्सकॅव्हेटर मशीनने केली जातात. पोकलेन, ह्युंदाई, इ. कंपन्याचे एक्सकॅव्हेटर उपलब्ध आहेत.चाळीस, पन्नास, साठ फूट बूम आणि स्टिक असलेले एक्सकॅव्हेटर आहेत.मला नव्या आणि इतर दोन विहिरीसाठी हे दोन्ही पर्याय वापरावे लागणार होते. नव्या विहिरीचे पाणी निघत नसल्यामुळे यारी रद्द करावी लागली. इतर दोन विहिरीसाठी सतीश करे यांचे एक्सकॅव्हेटर सचिन डोंगरे यांच्या मार्फत तीन महिने आधीच रिजर्व केले होते.


22 मे रोजी मशीन उपलब्ध झाले आणि पाच वाजता मोठ्या विहिरीचा गाळ काढण्याचे काम सुरु झाले. यापूर्वीच्या कामापासून हे मशीन माझ्या शेतात आणण्याचा 6000₹ ट्रक ट्रॉली वाहतूक खर्च मला द्यावा लागला. मशीन ट्रॉली मधून उतरले की त्यांचे टाइम मीटर सूरू झाले. या टाइम मीटरचा रेकॉर्डसाठी फोटो घेतला. मे महिन्यात पन्नास फूट बूम,स्टिकच्या मशीनचे तासाचे भाडे मागणी जास्त असल्याने 3800,4000 ₹ तास प्रमाणे सांगतात. पण मी हे मशीन 3300₹ प्रमाणे आधीच बुक केलेले होते.तरीही मशीन शेतात यायच्या दिवशी सतीश करे यांनी भाडे 4000, 3800 सांगायला सुरुवात केली. अशा वेळी सचिन डोंगरे माझ्या मदतीला धावून आले. मला 3300 दर ठरलेला असताना दर वाढवून मागितला जातोय हे सचिन डोंगरे यांना सांगितल्याबरोबर त्यांनी सतीश करे यांना कॉन्फरेन्स कॉलवर घेतले आणि त्यांचा मैत्रीचा आणि व्यावसायिक संबंधचा हक्काने उपयोग करून माझ्यासाठी क्रेडिट वापरले. त्यांना योग्य शब्दात हे काम 3300 रुपये प्रमाणेच करावे लागेल असे सांगितले. शिवाय माझ्याबद्दल त्यांनी चांगले उदगार काढले. या मदतीबद्दल मी सचिन डोंगरे यांचा खूप आभारी आहे.


मोठ्या विहिरीचा गाळ काढण्यासाठी बारा तास लागले.


एखादा शेतकरी विहिरीतील गाळ काढणे,नवीन विहीर खोदने , पाईपलाईन करणे, लिफ्ट योजना राबवितो तेव्हा बऱ्याचदा शेतकऱ्याने सोसायटी मधून किंवा बँकेतून किंवा खाजगी यंत्रणेतून कर्ज घेतलेले असते.

मंत्र्यापेक्षा त्याच्या खाजगी सचिवाचाच रुबाब जास्त असतो. तसं अशा कामात एक्सकॅव्हेटर मशीन मालकापेक्षा मशीन ऑपरेटरचाच रुबाब जास्त असतो. एकतर माझी सर्व कामे जुनीच आहेत त्यात सुधारणा केल्या जात आहेत. पहिल्याच दिवशी मशीन ऑपरेटर मला म्हणे, साहेब काम सुरु करण्यापूर्वी पूजा नाही केली. पूजेत दक्षणा ठेवली जाते, ती तरी द्या. माझी चहा, पाण्याची तरी सोय करा. लोकं पूजेत हजार, दीडहजार रुपये ठेवतात, हजारीक रुपये चहा, पाण्याला देतात. याबद्दल मी थोडी नाराजी दाखविली तर मला म्हणे, " कसं आहे या कामाचं सगळं माझ्याच हातात असतं. काम हळू करायचं का वेगात करायचे. चांगलं करायचं का खराब करायचं. तुम्हाला मशीन मालकाला तासाप्रमाणे पैसे द्यावेच लागणार आहेत. पण हळू काम करून तास वाढवणं माझ्याच हातात आहे."

हे कसं होतंय पहा. वेगात काम करून हा मालकाचे आणि शेतकऱ्याचे तास कमी करणार आणि तोच वाचवलेला पैसा त्याला मिळावा अशी अपेक्षा बाळगणार . म्हणजे जो मालकाचा नाही होऊ शकत तो शेतकऱ्याचा काय होणार.मी हा विषय करे यांच्या बंधुच्या कानावर घातला तर ते म्हणाले द्या शंभरिक रुपये. दुसऱ्या दिवशी मी ऑपरेटरला शंभर रुपये दिले तर तो म्हणे, " फक्त शंभर. अहो लोकं हजार, दीडहजार देतात. मला खूष ठेवले तर मी मशीन वेगात चालवून तुमचा फायदा करून देईल." झालं मग हा माणूस माझ्याकडून रोज पैशाची अपेक्षा करत असे त्यामुळे मी त्याला दोनशे रुपयाचा रतीब घालत असे. पैसे मिळत नाहीत तो पर्यंत तो माझ्याकडे असं काही बदल्याच्या भावनेने बघायचा की विचारू नका. 

काम चांगलं झालं तर खुशीने बक्षीस देणारा मी माणूस आहे. हजार, दीडहजार बक्षीस देणे ही काही फार मोठी बाब नाही. मी माझ्या शेतात दगडं उचलणाऱ्या महिलांना हजार रूपये बक्षीस दिले. काय आनंद झाला होता त्या महिलांना. पण ऑपरेटरच्या अशा टिपिकल वागण्याची मला भयंकर चीड आली होती. एक जुनिअर मशीन ऑपरेटर होता. बकेटची पिन लूज झाली किंवा इतर तत्सम कामासाठी तो मशीन चालू ठेवून दुरुस्त करायचा. असा त्याने किमान अर्धा तास वाया घालवीला असेल.म्हणजे या पिन दुरुस्ती टाइम साठी मी पैसे मोजले आहेत.


ब्लास्टिंगच्या होलचा दर आता सिझन असल्यामुळे अडीच फूट होल सव्वाशे रुपये तर पाचफुट होल अडीचशे रुपये आहे. ऑफ सिझनला हा दर दहा, वीस रुपये कमी असतो. या मशीन मागे तीन ब्लास्टिंग करणारे ट्रॅक्टर होते. ते प्रामाणिकपणे पाच फूट होत मारतही असतील . त्यांची होल मारण्याची पद्धत अशी असे की, पहिला माणूस तीन फूट पारने अडीच फूट होत मारतो. दुसरा माणूस त्याच अडीच फूट होल मध्ये सहा फूट पार घालतो आणि ते होल पाच फूट करतो. किंवा कधी डायरेक्ट पाच फूट होल केले जात असे.विश्वास ठेवून मी ते काम पूर्णवेळ पहातही नव्हतो. दिवसाला ते शंभर, सव्वासे होल मारत असत. पण एकदा नेमकं असं झालं शेवटचे होल त्यांनी अडीच फूट मारले आणि दुसऱ्या माणसाने ते पाच फूट केले नाही. याबद्दल त्यांना विचारले तर म्हणे पाच मारणारच होतो पण ट्रॅक्टरचे डिझेल संपले म्हणून राहिले.आमच्या बोलण्याचा परिणाम म्हणून शेवटी त्यांनी ते होल बार न उडविताच सोडून दिले. त्यानंतर मग ते गेली वीस वर्षें कसे प्रामाणिकपणे हा व्यवसाय करत आहेत. अडीच फूट मारलं आणि पाच फूट सांगितलं असं कधीच झालं नाही. पण मी म्हणालो तुमचं शंभर टक्के खरंही असेल पण मी डोळ्यांनी पाहिले ते खरे समजायचे का तुम्ही सांगताय ते. मी त्यांच्यावर अविश्वास दाखयतोय असं समजून त्यांना वाईट वाटले असे त्यांनी बोलून दाखविले .रात्री सव्वाएक वाजता पण मी विहिरी बाहेर बसून मारले जात असलेले होल बघत असेल असे त्यांना वाटले नसेल.दुसऱ्यांदा अडीच फूट पार वापरलेली आणि होल अडीच फुटच ठेवलेले मी पाहिले ,असा प्रकार त्यांनी पाच, दहा होलच्या बाबतीत नक्की केला असेल. त्याबद्दल मी त्यांना विचारलं तरी हे लोकं त्यांचच कसं खरं असे बोलत होते. निगरगठ्ठ आहेत ही माणसं. शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशाची यांना जाणीव नाही.


22 आणि 26 रोजी रात्रंदिवस काम सुरु होते. दोन्ही रात्री मी शेतातच होतो. 23 रोजी तर मी 14 किलोमीटर चाललो.कष्ट,श्रमाचे काही नाही हो . पाणीप्रश्न मार्गी लागावा इतकच.


घरामागील विहीर मी मोठी केली. याकामासाठी 568 सुरुंग / होल उडवावे लागले आणि एक्सकॅव्हेटर मशीन 33 तास चालले.यामुळे विहिरीचे पाणी किती वाढले तर विशेष नाही .हे सारं काही पाण्यासाठी सुरु आहे. आशा आहे की भविष्यात या कामांचा फायदा होईल.

लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

शेणखत

 निर्मला फार्म-भाग सहा - सोनंखत शेणखत.

माझ्या वडीलांच्या काळात आमच्याकडे भरपूर प्रमाणात पशुधन होते. गाई,बैल,म्हैस यांचे वेगवेगळे गोठे होते. मेंढरांचा मोठा कळप आणि त्यांच्यासाठी वाडगे होते. वस्तीवर खूप कोंबडया होत्या. याचा परिणामस्वरूप दररोज शेणखत, कोंबडीखत, लेंड्या आणि जनावरांच्या गव्हानीमधील पालापाचोळा उकीरड्यावर जमा होत असे. वर्षभरात शेणखताचा उकीरडा आकाराने बराच मोठा तयार होत असे. खरंतर माझे वडील दरवर्षी शेणखत शेतात नेहून टाकत असत पण त्या उकीरड्याच्या आकारामानावरून रस्त्यावरून जाणारे येणारे लोक अशी चर्चा करायचे की, या शेतकऱ्याने एक दोन तरी वर्षें शेणखत उचललेले दिसत नाही. त्याकाळी पशुधनामुळे आणि शेणखतामुळे आमची शेती समृद्ध होती. शेतात गांडूळ, बेडूक, किडे मुंग्या, चिमण्या पासून ते घारी पर्यंतचे विविध प्रकारचे छोटे मोठे पक्षी दिसणे फार कॉमन होते. माझे वडील माझ्या मोठ्या भावाला असे म्हणायचे की, "तु ट्रॅक्टर खरेदी करू नकोस .एकदाका ते लोखंड शेतात आले की तुला ही बैलांची दावण कशाला पाहजे असे वाटायला लागेल ." पण पुढे आमच्या शेतात ट्रॅक्टर आला आणि वडील म्हणत होते तसेच झाले.


पूर्वीच्या काळातले देशी गाई बैलांचे शेणखत म्हणजे सोनं होतं. ज्वारी,गहू,साळ,मटकी,करडई,तुर,मका, हुलगा, खपली गहू, इ. बियाण्यांचे पारंपारिक, गावठी वाण होते. वर्षानुवर्षे घरचेच वाण पेरले जायचे. आजकाल कल्याण सोना गहू, मालदांडी ज्वारी, गुळभेंडी ज्वारी जिचा हुरडा फार चविष्ठ असायचा,असले पारंपारिक वाण आढळत नाहीत.


हरित क्रांतीमुळे त्या काळच्या शास्वत शेतीची घडी विस्कटली गेली. रासायनिक खते आली, हायब्रीड बियाणे आले, उत्पादन वाढले पण त्यांचा कस कमी झाला. आता या बदलाचे दुष्परिणाम आपण आजारांच्या स्वरूपात भोगत आहोत.


आता लोकं पुन्हा सेंद्रिय शेती, निसर्ग शेती, सहज कृषी कडे वळु लागली आहेत ही चांगली आणि आनंदाची बाब आहे. पण यासाठी पाहिजे असते शेणखत,गोमूत्र तेही देशी गाईगुरांचे. पण आता देशी गाईगुरे आहेत कोणाकडे?त्यामुळे अस्सल शेणखत उपलब्ध होत नाही.


प्रत्येकच शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आल्यामुळे पशुधन नष्ट झाले आहे.आता पशुधन आहे ते फक्त दुग्धव्यवसायापुरते. पण जे दुग्धव्यवसाय करतात त्यांच्याकडे जर्सी गाई असतात. शेतकरी कुटुंतल्या मुलाबाळासाठी चांगले दूध मिळावे म्हणून एकादी म्हैस पाळतो. विक्री मात्र जर्सीच्या दुधाची करतो. आता जे काही शेणखत मिळते ते या जर्सी गाईचे, एकदम पातळ ज्याची गोवरी तयार होत नाही. त्यालाच आता सोनंखत म्हणायची वेळ आली आहे. 


मी यावर्षी शेतात केळीची लागवड करणार आहे त्यामुळे बऱ्याच वर्षांनी मी शेणखत खरेदी केले आहे. थोडंथोडकं नाही तर एकरी चार ट्रॉली या प्रमाणात. दोन चाकी ट्रॉली शेणखताचा दर 3500 ते 4000₹ सांगतात आणि चार चाकी ट्रॉलीचा दुप्पट. दोन चाकी ट्रॉली भरायला मजूर 500 आणि शेतात विस्कटायला 500 रुपये घेतात. ट्रॅक्टर वाहतूक 600 रुपये. पण अंतरानुसार ही रक्कम बदलू शकते. म्हणजे प्रती दोन चाकी ट्रॉली हा खर्च किमान 5100₹ होतो आहे.


इतकी वर्षें रासायनिक खते वापरल्यामुळे शेतीचा कमी झालेला कस सुधारायचा असेल तर शेतात शेणखत टाकण्याशिवाय पर्याय नाही.


शेणखत ट्रॉलीत भरण्याची एक पद्धत आहे. शेणखत भरताना ट्रॉली सपाट लेवलला आली की एका माणसाने शेणखत तुडवायचे असते. तुडवत तुडवतच त्याने ट्रॉलीच्या मागील बाजूने सुरु करून पुढंपर्यंत शिग लावात ट्रॉली पूर्ण भरायची असते. असं केल्याने ट्रॉलीत जास्तीत जास्त खत बसते. बऱ्याचदा ट्रॉली भरणारे कामगार या कामास नकार देतात.कारण खत जास्त तुडवले तर खत मालकाला वाईट वाटते आणि कमी तुडवले तर खरेदी करणाराला वाईट वाटते. म्हणून ते म्हणतात एक तर घेणाराने ते स्वतः तुडवावे किंवा त्यासाठी वेगळा माणूस नेमावा. त्याला 500₹ रोजगार द्यावा लागतो आहे . ट्रॉली निट भरली नाही तर खत वाहतूक करताना रस्त्यात सांडते. यात देणारा आणि घेणारा दोघांचेही नुकसान होते.हे नुकसान टाळायचे असेल तर ट्रॉलीत खत व्यवस्थित भरावे. खत शेतात आल्यावर डम्पिंग ट्रॉलीने सरळ रेषेत पाच सहा ठिकाणी छोटे छोटे ढीग करून उतरविले जाते. त्यानंतर कामगारांकडून खत शेतात विस्कटले जाते. एकदा शेतात शेणखत टाकले तर पिकास त्याची मात्रा किमान दोन वर्षें चालू राहते. 


शेणखत सेंद्रीय खताचे काम करते, शेतीची सुपीकता सुधारते आणि गांडूळ आणि तत्सम जीवांची साखळी पूर्ववत करते.म्हणूनच शेणखताला सोनंखत म्हणावंसं वाटते.


रासायनिक खतात नायट्रोजन, फॉस्परस आणि पोट्याशियम (NPK) हे तीन घटक असतात. ते अलोपॅथी औषधाप्रमाणे पिकावर लगेच परिणाम दाखवितात. पण शेतातील गांडूळ आणि इतर सूक्ष्म जीवांची साखळी पूर्ण नष्ट होते.शेतीचा कस खालावतो. 


या वेळी दोन ट्रॅक्टरने खत वाहतूक केली एक नेहमीचा रणजित डोंगरे आणि दोन काका राखुंडे . मला चांगले खत उपलब्ध झाले ते भारत राखुंडे आणि अभी राखुंडे यांच्या गोठ्यात. खत विकणारा शेतकरी कसा असावा तर ट्रॉली भरताना कटकट न करणारा आणि ठरलेल्या पद्धती प्रमाणे ट्रॉली तुडवली जात असेल तर आक्षेप न घेणारा.या बाबतीत हे दोनही शेतकरी चांगले होते. खत भरणाऱ्या गणपत कदम यांच्या टोळीत डोंगरे, कदम असे एकूण पाच जण होते. ऊन आणि उकाड्यामुळे त्यांची कार्यक्षमता खूप कमी झाली होती.एरवी सकाळी सात ते बारा या वेळात दहा दहा ट्रॉली शेणखत भरू शकणारा हा ग्रुप दिवसात सहा,आठ ट्रॉली भरल्या तरी पूर्ण दमून जात होता. करा की दहा ट्रॉल्या पूर्ण असे म्हटले तर आता अजून काम केले तर लाकडंच गोळा करावी लागतील अशी एकदम स्मशानाचीच भाषा करायचे. पण हे त्यांची कार्यक्षमता पूर्ण संपल्याचे लक्षण असे. हा ग्रुप एकदम हसत खेळत, एकमेकांची टिंगल करत काम करायचा . यात एक नवनाथ कदम नावाचे उंच आणि धीप्पाड गृहस्थ होते. त्यांच्याकडे बघितलं तर त्यांनी न रागवताच भीती वाटावी अशी ही पर्सनॅलिटी. हा गृहस्थ ट्रॉलीतील शेणखत तुडवायला एकदम योग्य माणूस होता. पण ते म्हणायचे, "माझ्या वजनामुळेच कोणी खतवाला मालक मला ट्रॉली तुडवू देत नाही."


सेंद्रिय शेती म्हणजे उत्तम शेती. शेतकऱ्यांनी आता पुन्हा नैसर्गिक, सेंद्रिय प्रकारची शेती करायला हवी असे मला वाटते.


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

लिफ्ट करादे l

 निर्मला फार्म - भाग पाच - लिफ्ट करा दे l खाजगी उपसा जलसिंचन योजना.


'तेरी उंची शान हैं श्री माँ 

मेरी अर्जी मान ले श्री माँ 

तु हैं सबकुछ जानने वाली 

मैं हूं तेरा मानने वाला 


मुझ को भी तो लिफ्ट करा दे 

थोडी सी तो लिफ्ट करा दे l'


श्री माताजी निर्मला देवी मुझ को भी तो लिफ्ट करा दे l


अदनान सामी चे सॉंग आठवण्याचे आणि थोडा बदल करून लिहण्यामागचे कारण म्हणजे माझे लिफ्ट, म्हणजेच खाजगी उपसा जलसिंचन योजना.


लोणी देवकर मधील माझ्या शेतापासून भावडी या गावापाशी उजनी जलाशय फुल्ल कंडिशन (अधिक )मध्ये साडेसहा किलोमीटर आणि एमटी( वजा )कंडिशन मध्ये आठ किलोमीटर अंतरावर आहे. माझ्या शेतातून खडकवासला मुठा उजवा कालवा गेला आहे. या कालव्याची वाट पाहण्यात माझ्या वडिलाची हयात गेली.नियोजित वेळेपेक्षा किमान वीस वर्षें उशिरा कालवा निर्माण झाला पण या जास्त खोलीतून गेलेल्या कालव्यातून आमच्या शेतीला कधीच पाणी मिळाले नाही. त्यामुळे या कालव्याचे वर्णन फक्त MIDC आणि  आमच्या शेतीचे विभाजन करणारी रेषा इतकच करता येईल.शेतीला थोडंही बागायती न करणाऱ्या या कालव्याचा कायतो इतकाच फायदा झाला की,कमांड एरियातील किंवा कॅनॉलमुळे संभाव्य ओलीताखाली येणारी शेती MIDC ला जाण्यापासून वाचली. कालव्यामुळे शेत बागायत होणार ही आशा पूर्णपणे मावळल्यानंतर 2013 मध्ये पुतण्या अमोल देवकरने चार -पाच एकर शेती विकून साहस केले आणि स्वतःच्या शेतात उजनी जलाशयातून लिफ्ट(खाजगी उपसा जलसिंचन योजना )करून पाणी आणले आणि भावाचे संपूर्ण शेत बागायती झाले.आता अमोल माझ्या मागे लागला. तुम्हाला फायद्याची शेती करायची असेल तर लिफ्ट शिवाय पर्याय नाही. 1998 पासून मी थोडीफार विहीर बागायती आणि बरीच जिरायती अशी नुकसानीची शेती करत होतो,त्यामुळे एकतर मला शेतात अजून गुंतवणूक करायची तयारी नव्हती आणि लिफ्टच्या खर्चाचे आकडे ऐकून तर ही योजना मला माझ्या आवाक्यात वाटत नव्हती . पण अमोलने पाठपुरावा करणे काही सोडले नाही.


श्री माताजींची इच्छा असावी असे मानून 5 जानेवारी 2014 रोजी एका इंजिनिअरकडून लिफ्टचा सर्वे करून घेतला . मी आणि इंजिनिअरने भावडी ते लोणी देवकर पाईपलाईन ज्या मार्गांवरून करायची आहे त्या पूर्ण मार्गांवरून पायपीट केली. इंजिनिअरने एकूण हेड 13 LPS साठी 81 तर 18 LPS साठी 87 मीटर  आहे,त्यानुसार 6"(160mm) पाईपलाईन फेज एक करण्यासाठी 8 kg चे 52, 6kg चे 200 आणि 4 kg चे 800 पाईप,फेज दोन साठी 4kg चे 200 पाईप असे एकूण 1250 प्लस पाईप लागतील. LBH40, TMH60,AMH40,TMHSSMTASM10 यापैकी कोणताही एक पंप चालेल,16 एअरवॉल बसविणे आवश्यक आहेत,5" NRVolve वापरावा, सक्शन पाईप 4" करावा,डिलिव्हरी पाईप 2.5" ठेवावा,इतर इलेक्ट्रिक डिटेल्ससह प्लॅन आणि एस्टीमेट डिझाईन करून दिले. खर्चाचा एकूण अंदाज दिला पस्तीस लाख रुपये.


दुसऱ्या दिवशी सकाळी मी याबद्दल विचार करत होतो तोच अमोल हजर आणि म्हणाला, "आबा तुम्ही दोनशे पाईपची व्यवस्था करा. सिद्धेश्वर थोरात आणि संजय पवारच्या पाईपलाईनचे काम चालू आहे. ते लोणी देवकरला चारी सुरु करून भावडी हद्दीत पोहोचले आहेत. त्यांच्या शेवटच्या 200-250 पाईपचे चारीचे काम बाकी आहे. भावाडीतलेच काम त्रासदायक असते. तुमचे हे काम त्यांच्यासोबत होवून जाईल. मी त्यांना बोललो आहे आणि ते हो म्हणून तुमच्यासाठी थांबले आहेत . तुम्ही फक्त दोनशे पाईपची सोय करा.उरलेली लाईन तुम्हाला एकट्याला करावी लागेल." झालं माझं विचार आणि कृती चक्र सुरु झाले.


मी पुण्यात परत आलो. आता मला दोन महत्वाची कामे करायची होती ती म्हणजे उजनी धरणातून पाणी उचलण्यासाठी पाणी परवाना मिळविणे आणि लिफ्टसाठी भांडवल उभारणी करणे . दुसऱ्या एका इंजिनिअरने लिफ्टचे प्रपोजल तयार केले, गावानकाशे जोडले, त्यावर पाईपलाईनचा मार्ग दाखविला आणि आवश्यक कागदपत्रासह हे प्रपोजल उजनी धरण कार्यालयात सादर केले.


मी नातेवाईकांशी बोललो तर लगेच मला मदतीचा ओघ सुरु झाला. मी स्वतः काही पैशाची व्यवस्था करे पर्यंत मला हे पैसे वापरायला मिळणार होते. पुढे कर्ज काढून मी नातेवाईकांचे पैसे परत केले आणि हे काम पूर्ण केले.एखाद्या कामाचा जेव्हा योगच आलेला असतो तेव्हा सगळ्या गोष्टी अशा विनासायास जुळून येतात. लगेच पाईप खरेदी केले आणि आमचे फील्डवरील काम सुरु झाले.


आठ किलोमीटर लांबी असलेल्या या पाईपलाईनचे काम दोन टप्प्यात होणार होते. पहिला टप्पा लोणीदेवकर मधील माझे शेत ते भावडी मधील धरण फुल्ल कंडिशन मध्ये असते तो जुन्या चारीवरील स्पॉट आणि दुसरा जुन्या चारीवरील स्पॉट ते धरण एमटी( वजा) कंडिशन मध्ये असते तो नव्या चारीवरील स्पॉट. दुसऱ्या टप्प्यामध्ये सिद्धेश्वर थोरात आणि धनंजय चव्हाण आणि मी एका चारीतून एकत्र पाईपलाईन केली आहे. या स्पॉट एक आणि स्पॉट दोनच्या चारी म्हणजे नदीपात्रातील पाणी सर्व शेतकऱ्यांनी खर्च करून कॅनॉल सारखा चर काढून जवळ आणले आहे ती जागा.याच जागेवर अनुक्रमे पहिली आणि दुसरी इलेक्ट्रिक मोटर बसवली जाते. पाईपलाईनसाठी JCB ने आठ किलोमीटर इतक्या मोठ्या अंतराची तीन फूट खोलीची चारी खोदने, चारी खोदताना इतर शेतकऱ्यांच्या आडव्या येणाऱ्या पाईपलाईन वाचवीने आणि फुटल्याच तर भरून देणे,चारीत 6" पाईप फिट करणे,जागोजागी एअर  व्हॉल्व्ह बसविणे आणि पुन्हा ती चारी बुजविणे हे फार अवघड आणि परीक्षा पाहणारे काम होते. याला किमान पाच- सहा महिन्यांचा कालावधी लागणार होता. विशेष म्हणजे भावडी आणि लोणीदेवकर गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून ही चारी काढावी लागणार होती आणि पाईपलाईन टाकावी लागणार होती. या मार्गात चार ओढे आणि पुणे - सोलापूर हायवे पुलाखालून क्रॉस करावा लागणार होता.


असा एक नियम ऐकीवात आहे की, एखादा 7/12 जरी त्या शेतकऱ्याच्या नावावर असला तरी त्या जमिनी खाली फक्त अडीच फुट खोली पर्यंतच त्याचा अधिकार असतो. याचा अर्थ जमिनीच्या खाली अडीच फुटानंतर सरकारचा अधिकार सुरु होतो . त्यामुळे एक - कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतातून अडीच फूट खोलीखालून पाईप लाईन टाकायची असेल तर तो पाईपलाईन वाल्याची अडवणूक करू शकत नाही. दोन - शेतकरी चारी काढू देत नसेल तर आणि तरीही शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन टाकायची असेल तर त्यास तहसील कार्यालयातून परवानगी मिळते. पण त्यासाठी तहसील कार्यालयाकडे रीतसर अर्ज करावा लागतो आणि त्यासोबत या आठ किलोमीटर पाईपलाईनच्या मार्गात ज्या शेतकऱ्यांची शेते येतात त्या सर्वांचे सातबारे जोडावे लागतात. मग ही सरकारी यंत्रणा या मार्गाचा अभ्यास करून सर्व शेतकऱ्यांना पाईपलाईनचे काम होणार असल्याचे परिपत्रक काढते.आता फक्त कल्पना करा की, कर्ज काढून व्याजाचे मीटर चालू असताना पाईपलाईन करायची असेल तर असा सरकारकडे अर्ज करून परवानगी मिळायला किती वेळ, श्रम, पैसा आणि त्रास सहन करावा लागेल.सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हणतात ते उगीच नाही.त्यामुळे कोणताही शेतकरी सरकारी कार्यालयात अर्ज प्रकरण न करताच मार्गात येणाऱ्या शेतकऱ्यांचे सहकार्य मिळवूनच हे काम करतो. याचा अर्थ ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून त्याला पाईपलाईन करायची आहे त्या प्रत्येकाला त्याला भेटावे लागते आणि त्याची मनधरणी करावी लागते आणि मान्यता मिळवावी लागते. कोण चांगला शेतकरी भेटला तर सौजन्य दाखवून परवानगी देतो. अडवणूक करणारे भेटले तर कोण पैसे पाहिजेत म्हणून, कोण त्याच्या शेतातले दगड उचलावे लागतील,कोण त्याच्या शेतात काळी माती भरावी लागेल, शेतात पिक असेल तर कोण उसाची रोपे आणून द्यावी लागतील किंवा मका पेरून द्यावा लागेल, कोण जाता जाता त्याच्या शेतातले एखादे काम JCB मशीनने फुकट करून द्यावे लागेल, अशी काहीतरी अट घालून परवानगी देतात.याला ते नुकसान भरपाई असे म्हणतात. याचे चांगले वाईट अनुभव मला आले आहेत.हे अनुभव हा काही आपला मेन विषय नाही पण जाताजाता दोन तीन प्रसंग सांगतो.हेच लिहीत बसलो तर कादंबरी तयार होईल.


एक शेतकरी मला भेटला . त्यांच्या शेतात ऊसाचे पिक होते. ते म्हणाले हा सुरु ऊस गेला की तुम्ही माझ्या शेतातून चारी काढा. खोडवा ऊसाच्या शेतातून दोन सऱ्यामधून आम्ही JCB ने चारी काढली आणि त्यांच्या शेतातील माझे पाईपलाईनचे काम झाले. यात त्यांच्या पिकाचे थोडेफार नुकसानपण झाले. याबद्दल मी त्यांच्यासोबत बोलत होतो तर ते म्हणाले, " होऊद्याहो थोडसं नुकसान. त्यात काय एव्हढं. पण एखादा शेतकरी जर दुसऱ्या शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातून पाईपलाईन नेहू देत नसेल तर तो जातिवंत शेतकरीच नाही. " शाब्बास रे माझ्या शेतकरी भावा!


एका शेतकऱ्याने आमची अडवणूक केली होती. इतकेच पैसे पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांची मागणी जरा जास्तच अवास्तव होती. आम्ही त्यांच्या शेतात बैठकीला बसलो होतो . पण काही केल्या तो आकडा कमी करायला तयार नव्हता. मग मीच त्यांना उपरोधाने म्हणालो, " आपण इथे आमची पाईपलाईन तुमच्या शेतातून जावू देण्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील ही चर्चा करायला बसलो आहोत का तुमच्या शेताचा सौदा करायला बसलो आहोत." पण दुर्दैव, त्याला माझे उपरोधीक बोलणे समजले नाही. तो म्हणे, " पाईपलाईनची चर्चा करायला." शेवटी त्याने काही रक्कम कमी केली हे आमचे नशीब समजायचे.


एक काकू तर अशा भेटल्या की, आयुष्यात जणुकाही  एखाद्या देवकरचा बदला घेण्याचीच त्या वाट पहात होत्या. काय तर म्हणे, माझ्या पुतण्या आणि भावाने त्यांच्या मुलाच्या करिअरचे नुकसान केले आहे. आता मी तुम्हाला पैसे दिल्याशिवाय शेतातून पाईपलाईन करू देणार नाही. आम्ही जंग जंग पछाडले पण त्यांनी त्यांना हवी ती रक्कम घेऊनच मला परवानगी दिली. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. असो!


भावडीतला एक शेतकरी तर सगळ्यां पाईपलाईनवाल्यांना असा भेटतो जो त्याच्या शेतातून पाईपलाईन करू देण्यासाठी जी नुकसान भरपाई घेतो त्याला तो पाण्यासारखा लाभलेला पैशाचा झरा समजतो. धन्य आहे हा शेतकरी दादा.


भावडी गावात आम्हा तिघांना पैसे घेऊन परवानगी देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही साधारणपणे तीन लाख रुपये रक्कम मोजली.आता पण आमच्यामुळे तुमची शेती सुधारली अशी या गाववाल्यांची भावना आहे.लोणी देवकर गावाच्या हद्दीत मात्र मला कोणा शेतकऱ्याचा त्रास झाला नाही.


या कामात मला अनेक चांगले लोक भेटले, ज्यांनी मला आऊट ऑफ दी वे जाऊन मदत, मार्गदर्शन आणि सहकार्य केले. पाईपलाईनचा जवळचा, सोपा मार्ग सुचविला. कोणी इतर शेतकऱ्याला मदत देण्यासाठी समजावून सांगितले. यात पोपट डोंगरे, अमोल देवकर, अशा अनेक शेतकऱ्यांची नावे घ्यावी लागतील.माझा मुलगा अमेय याने देखील या कामाची देखरेख केली.या सर्वांचा मी आभारी आहे.


दहा वर्षांपूर्वी पंचवीस लाख रुपये फक्त पी व्ही सी पाईपचे बिल झाले. या चारीच्या मार्गात काही ठिकाणी खडक होता तो फोडण्यासाठी ब्लास्टिंग साठी तीस हजार रुपये खर्च झाला. JCB ने चारी काढायला दीड लाख रुपये लागले,तर ती परत बुजवायला चाळीस हजार रुपये लागले. पाईपलाईन जोडणारास एक लाख रुपये दिले. दोन इलेक्ट्रिक मोटरी, MSEB डीपी आणि कनेक्शन चार्जेस, खालील चारीवर सभासद होण्यासाठी पन्नास हजार द्यावे लागले,इतर खर्च,बघता बघता खर्च पस्तीस लाखाच्या पुढे कधी गेला ते समजले पण नाही. ज्या शेतकऱ्यांनी आणि हो अधिकाऱ्यांनी माझ्याकडून पैसे घेतले आहेत त्यांची माझ्या डायरीत नोंद आहे.


चारी काढण्याचे काम ज्यांनी केले ते सोमनाथ डोळे हे JCB चे चालक होते. एकदम एक्स्पर्ट चालक. जमिनीवर असं काही मशीन चालवायचे जसं काही सुरीने केक कापत आहेत. एकतर या माणसाने गावातल्या बहुतेक लोकांच्या पाईपलाईन केल्या आहेत. त्यामुळे या आठ किलोमीटर अंतरात कोणाची पाईपलाईन उभ्या, आडव्या कोठून गेली आहे हे त्यांना शंभर टक्के माहित होते. त्यामुळे शक्यतो ते कोणाची आडवी आलेली पाईपलाईन फुटू देत नव्हते. एका ठिकाणी तर एका रस्त्याखालून आठ पाईपलाईन गेल्या होत्या. त्या तर त्यांनी वाचविल्याच पण त्यांच्या खालून माझे पाईप आणायला अलगद जागा निर्माण केली. शाब्बास रे पठ्ठ्या! पाईपलाईन वाचविली की मी त्यांना बक्षीस देत असे. कारण पाईप फुटला तर होणारा खर्च जास्त होत असे.


आपली परिस्थिती आहे त्यापेक्षा चांगली व्हावी म्हणून श्री माताजी कडे 'मुझ को भी तो लिफ्ट करा दे  l'

म्हणत उजनी जलशयातून पाणी लिफ्ट केले याला आता दहा वर्षें होत आहेत.


लिफ्ट मुळे माझं शेत बागायत झाले. एक संकल्प पूर्ण झाला आणि भविष्याची तजबीज झाली असे वाटले.मी राहतो पुण्यात त्यामुळे माझी शेती मजुरावर अवलंबून राहते. इथेच राहणाऱ्या आणि स्वतः शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी लिफ्टचा जितका फायदा उचलला तितका मला घेता आला नाही. दरवर्षी शेतात विहीरी आणि लिफ्ट मिळून 15-16 एकर ऊस होवू लागला. भुसार पिके पण घेतली जावू लागली .यामुळे माझी ओळख बागायतदार शेतकरी अशी झाली आहे .परंतु या दहा वर्षात तीनदा दुष्काळ पडला.कधी बेभरवशाचा तर कधी प्रतिकूल निसर्ग हे शेतकऱ्यांचे मोठे संकट आहे. धरणातच पाणी कमी झाले तर शेतात कुठून येणार. त्या प्रत्येक वेळी पिकांना फटका बसला आणि नुकसान झाले.भावडीतील दुसऱ्या टप्प्यावरील चारी पाचशे मीटर लांब आणि दहा मीटर खोल आहे. या एकाच स्पॉटवर पंधरा वीस MSEB च्या DP आहेत. तीथे किमान दीडसे इलेक्ट्रिक मोटारी आहेत. उजनी जलाशयाच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावर असे किमान पन्नास स्पॉट असतील आणि हजारो इलेक्ट्रिक मोटरी असतील. पप्पू घाडगे, कुंडलिक घाडगे, धनंजय चव्हाण, सुनील घाडगे, हनुमंत जाधव, पोपट उचाळे, तात्या साळवे या शेतकरी मंडळींचा उल्लेख केल्याशिवाय भावडी चारी हा विषय पूर्णच होऊ शकणार नाही. मागील दुष्काळाच्या वेळी या मंडळींनी चारीवरील दीडशे शेतकऱ्याकडून काँट्रीब्युशन जमा करून या चारीची खोली तीन मीटरने वाढविली. यासाठी टोटल ब्लास्टिंग पद्धत वापरली गेली.पन्नास फुटी पोकलेन वापरले. स्वतःची शेती करत करत हे शेतकरी इतरांच्या शेतीच्या पाण्याची व्यवस्था देखील निस्वार्थीपणे पहात आहेत हे कौतुकास्पद आहे.आता पर्यंत सामुदायिक चारी खोदायला मी दोनदा काँट्रीब्युशन दिले आहे.  वर्षातून किमान एकदा तरी इलेक्ट्रिक मोटर जळते, वर्षभरात इलेक्ट्रिक मोटरी भरायला/ दुरुस्त करायला एका एकराचा नफा जातो. MSEB म्हणजे इलेक्ट्रिक मोटारिंची बिले किमान चार-पाच एकराचा नफा घेऊन जातात. इलेक्ट्रिक मोटारीस मीटर नसते, असले तरी कागदावर.मग बिल कसे आकारतात तर एका  MSEB डिस्ट्रिब्युशन सेंटर वरून किती युनिट वापरले गेले आहेत ते पाहिले जाते. समजा जर एक लाख युनिट वापरले असतील आणि त्या सेंटर अंतर्गत दोन हजार इलेक्ट्रिक मोटारी असतील तर एक लाख युनिट भागिले दोन हजार मोटारी अशी युनिटची सरासरी काढून दर तीन महिन्यांनी बिल पाठविले जाते. यात MSEB चा अजिबात तोटा होत नाही. मग तुमच्या विहिरीला पाणी आणि शेतात पीक असो किंवा नसो.तुम्ही इलेक्ट्रिक मोटर वापरा अगर वापरू नका. MSEB चे मीटर मात्र चालू राहते. मी नियमित वीज बिले भरतो.परंतु अशामुळेच अनेक शेतकरी वीजबिले भरत नाहीत. प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देणार असे राजकारणी सांगतात पण ग्रॉऊंड रिऍलिटी फार वेगळी आहे. इथे आठवड्यातील तीन दिवस दिवसा आणि तीन दिवस रात्री फक्त आठ तास थ्री फेजची लाईट असते. सध्या तर ती सहा तास आहे.रात्री 1.05 am ला लाईट येते. कशी शेती करायची शेतकऱ्याने. कोणीतरी लाईट सिंगल फेज असताना दोन वायर स्पार्क करून इलेक्ट्रिक मोटर चालू करण्याचा शोध लावला. याला ते चुटका असे म्हणत. हे फार धोकादायक काम होते.आता तर लाईट सिंगल फेज असतानाही मोटर चालू करण्यासाठी उत्पादने मिळत आहेत. याचे नामकरण पण चुटका असेच झाले आहे. MSEB आणि शासनाच्या नाकर्तेपणामुळे असली उत्पादने बाजारात फोफावली आहेत. मग MSEB च्या अधिकाऱ्यासोबत तोडपाणी करून खात्रीशीर सिंगल फेज सप्लाय मिळविला जातो.म्हणजे असं जुगाड करून चोवीस तास लाईट आहे तर मग असला गोरखधंदा चालवीण्यापेक्षा शासन आम्हाला चोवीस तास थ्री फेज लाईट का नाही देत .धरणाची पाणीपट्टी, जमिनीचा शेतसारा यात एकराचा नफा जातो. कर्जाचे हप्ते अजून एक एकराचा नफा गेला म्हणून समजा. पाईपलाईन नादुरुस्त होणे, लीक होणे ही एक फार मोठी समस्या आहे.  एकदा एका ओढ्यात पाच फूट पाण्यात लिकेज झाले होते , लिकेज काढायचा खर्च तीस हजार झाला . हो बरोबर वाचले तुम्ही, तीस हजार . एकदा एका आडमुठ्या शेतकऱ्याने मुद्दाम माझ्या पाईपलाईनवर विहीर खोदली, पाईपलाईन दुरुस्ती खर्च पंचवीस हजार. पाईप लाईन लिकेज काढणे हा तर दोन तीन लोकांचा व्यवसाय झाला आहे. लिकेज काढायचे त्यांचे एक टेरिफ कार्डच आहे. लिफ्टच्या मोटरी चालू- बंद करणे हा पण दोन तीन लोकांना व्यवसाय झाला आहे.म्हणजे मी किती एकर शेती या इलेक्ट्रिसियन, MSEB, शासन, बँका, दुरुस्ती व देखभाल यंत्रणा, यांच्यासाठी करत आहे पहा.वर्षाच्या शेवटी जे उत्पन्न आलेले दिसते त्यातले 80-90 टक्के बऱ्याचदा आधीच खर्च झालेले असतात.कधी कधी तर त्यापेक्षा जास्त. तीन वर्षें थोडा नफा आणि चौथ्या वर्षी दुष्काळ आणि तोटा असे आमचे शेतकऱ्यांचे दुष्टचक्र चालू आहे. दुर्दैवाने आजही जितकी विक्री तितका नफा असे समजणारे अडाणी शेतकरी आहेत. नुसती शेती फायद्यात करणे फार अवघड आहे. शेती फायद्यात रहायला काहीतरी जोडधंदा हवा. 

मी शेती बागायती केली त्यामुळे वरील सगळ्यांना त्यांचा त्यांचा शेअर मिळत आहे.आहे का नाही इतरांची मजा.


नफ्यात सगळे वाटेकरी असतात पण तोट्यात कोण सोबत करत नाही. कोणताही शेतकरी आवडतंय म्हणून आत्महत्या नक्कीच करत नसेल. 


मला इतकच वाटतं की, प्राथमिक सोयी सुविधा  ( Basic Infrastructure )असतील आणि निसर्गाची साथ असेल तर शेती फायद्याची आहे. यात काय येते तर धरणे आणि कालव्यांची साखळी, जलयुक्त शिवार, पाणी फौंडेशन सारख्या योजना,म्हणजे हक्काचं पाणी, खात्रीशीर वीज पुरवठा, मागेल त्याला सबसिडीसह विहिरीवर सोलर मोटर, बीन व्याजी पीक कर्ज, पिकाला हमी भाव, हवामानाची अचूक माहिती देणारी यंत्रणा , कोणती पिकं घ्यावीत याचे मार्गदर्शन,योग्य पीक विमा योजना,निसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई,इ. मग बघा आम्ही शेतकरी कशी फायद्यात शेती करतो ते. हे सर्व कोण करू शकते तर शासन किंवा NGOs. शेतकऱ्यांना शासकीय तिजोरीतून वर्षाला सहा,बारा हजार रुपये मतासाठी लाच देवून लाचार बनविण्याची काही गरज नाही. त्याला प्राथमिक सुविधा द्या तो खंबीर आहे कष्ट करायला.


शेतकऱ्यां इतका आशावादी प्राणी शोधून सापडणार नाही. तोटा झाला तरी त्याला आशा असतेच की, यावर्षी तरी फायदा होईल. सर्व शेतकरी बांधवांचा आशावाद शासनाने जिवंत ठेवावा अशी श्री माताजींकडे प्रार्थना.


श्री माताजी खूप कष्ट आहेत हो शेती कामात तेव्हा श्री माताजी थोडी सी तो लिफ्ट करा दे l


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

शेताचा कॉस्मेटिक चेंज.

 निर्मला फार्म- भाग चार - शेताचा कॉस्मेटिक चेंज.

माणसाला कसं केस कापले, दाढी केली तर बरं आणि हलकं हलकं वाटतं . तसंच काहीसं अधून मधून शेतालापण करावं लागतं.पूर्वी शेती विहीर बागायत होती तेव्हा विहिरीचेच पाणी शेतात खेळायचे त्यामुळे शेतात बाहेरून कोणतही नवीन तण येत नसे.आता उजनी जलशयातून लिफ्टने शेतात पाणी आणल्यामुळे टनटनी, कासल्या अशी कसलीही तणं शेतात बेमाप वाढत आहेत. ही तणं शेतातील अंतर्गत रस्ता म्हणू नका, बांध म्हणू नका सगळीकडे केस वेडेवाकडे वाढल्यासारखी वाढत आहेत. बांधावर वेड्या बाभळी तर शेतकऱ्यांच्या जणुकाही पाचवीलाच पूजलेल्या आहेत. दर तीन चार वर्षानंतर एकदातरी बांध, रस्ते, विहिरीच्या आजूबाजूची जागा JCB मशीन लावून साफ करावी लागते. याने शेत निर्मळ होते पण हा अनुउत्पादक ( Non productive ) खर्च मात्र होत राहतो.याला अजून एक पर्याय आहे तो म्हणजे शेतात पिकांना जसे तणनाशक फवारले जाते तसे पिकं सोडून जी रिकामी जागा आहे तिथे पण वेळीच फवारणे. 


तण,खुरटी झुडपे याचे नियंत्रण कसे करावे याची दोन उदाहरणे माझ्याकडे आहेत. एक- माझे मामा, ते कधीच त्यांच्या शेतात काँगेस गवत वाढू देत नसत. काँग्रेस गवताचे रोप दिसले की लगेच ते उपटले जात असे. रोप परिपक्व होऊ दिले तर त्याच्या हजार बिया शेतात पडतात आणि आपणच तितके राक्षस निर्माण करतो असे ते म्हणत. तेव्हा बी यायच्या आधीच तणाचा नायनाट करा आणि अनावश्यक झाडे, झुडपे वेळीच काढा असं ते म्हणत आणि करत असत. दोन - माझे वडील, ते नेहमी असे म्हणायचे की, "शेतमजूराने आणि शेतमालकाने शेतात फिरताना नेहमी विळा किंवा कुऱ्हाड सोबत ठेवावी. कुठं तण, अनावश्यक झुडुप दिसले तर ते वेळीच उपटता येते किंवा तोडता येते.शेतात फिरले की, शेत काम सांगतं.शेतात फिरा आणि शेत चांगले ठेवा."


पूर्वी शेतात काम करणाऱ्या मजुरांची संख्या जास्त असायची.आमच्याच कडे 10-12 सालकरी शेतात कामाला असत. त्यामुळे शेतातील बऱ्याच गोष्टी नियंत्रणात रहायच्या. हल्लीचे शेतमजूर तणं, पिकं याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे पण अशा अनुउत्पादक खर्चात भर पडते . 


काही वर्षांपूर्वी मी एक चूक केली होती. ती म्हणजे शेतात बांधावर कुंपण करावे म्हणून गजगा आणि मोगली एरंडाच्या बिया आणून लावल्या होत्या. गजगा तर इतका वाढतो की झाडाच्या आजूबाजूला 10-15 फूट जमीन व्यापतो. मोगली एरंडाची  झुडपे पण चांगलीच मोठी होतात आणि हे दोन्ही फार कमी पाण्यात येते. आता दर दोन तीन वर्षांनी मला ही झुडपे साफ करावी लागत आहेत. चुकीला माफी नाही.


मे महिन्यात सतरा तास JCB ने आणि साडेचार तास ट्रॅक्टरने लेवल काम करून शेतात स्वच्छता मोहीम राबविली आणि शेताचे बांध, रस्ते आणि विहिरीजवळचा परिसर स्वच्छ केला आणि बांध दुरुस्त केले. यासाठी शेतकऱ्याचे तीन मॅन डेज् खर्च झाले.अशा कामात JCB, ट्रॅक्टर वाल्याचा हमखास फायदा होतो. या काढलेल्या वेस्टचे ढीगरे तयार केले आणि दिले पेटवून. आता कोण म्हणेल की, या वेस्टचे काही वेगळे मॅनेजमेंट नसते का करता आले. तर आले असते ना, पण माझ्यासाठी हाच स्वस्त पर्याय होता. आता या कॉस्मेटिक चेंजमुळे शेत एकदम स्वच्छ, निर्मळ झाले आहे आणि छान सुंदर दिसत आहे. असा शेतात होणारा अनुउत्पादक  खर्च टाळता यायला हवा. अनावश्यक खर्च वाचवीने म्हणजे पैसे कमावनेच आहे. जून - जुलै मध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकासाठी शेत तयार झाले आहे.

लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

शेतमालाला किंमत मिळणे कठीण.

 निर्मला फार्म- भाग तीन - शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळणे कठीण आणि व्यापाऱ्याच्या श्रमाला मोल मिळणे पण कठीण .

पहिली बाजू...

माझ्या वडिलांच्या काळात आमच्या शेतावर उंबर,मेंदी,कडुनिंब, बाभळ, रामकट (सरळ वाढणारी बाभळ ) आंबा, जांभूळ, आपटा, बेल, बोर,चिंच,निलगिरी,अशी विविध प्रकारची झाडे होती. पुढे शेताच्या चार वाटण्या झाल्या,प्रत्येक भावाने स्वतःच्या शेतात सुधारणा केल्या. काळाच्या ओघात आणि शेती बागायती करण्याच्या रेट्यात त्यातली बरीचशी झाडे आता नष्ट झाली आहेत.

सध्या माझ्या शेतात चिंच,सागवान,नारळ, चिक्कू,कडुनिंब,बांबू, असे निवडक वृक्ष उपलब्ध आहेत.शिवाय काही ठिकाणी कुबाभळ वाढलेले आहेत. हे वृक्ष मोठे झाले आहेत.दोन ठिकाणी वेड्या/कुबाभळीच्या झाडा वरून लाईटच्या तारा गेल्या आहेत ,काही तारा तर झाडाच्या खोडात रुतलेल्या आहेत .काही ठिकाणी कडूनिंबाचे वटलेले वृक्ष उभे आहेत. जमिनीची मशागत करता येण्यासाठी आणि पिकं निट येण्यासाठी मोठ्या झाडांच्या खालील भागातील फांद्या काढणे,शेतातील वटलेले वृक्ष काढणे, तारा खालच्या वेड्या बाभळी काढणे आवश्यक झाले होते. शेतातील कुबाभळ/ वेड्या बाभळी काढायला कोणाच्या परवानगीची गरज नसते असे मला व्यापाऱ्याचे सांगितले.


माझा एक CCF (Retired )मित्र आहे. तो या कुबाभळ बद्दल असं म्हणाला होता की, " सध्या लोकं इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करत आहेत की, कडुनिंब, पिंपळ इ. सारखे वृक्ष शेतावर ठेवायला कोण तयारच नाही, म्हणून देवानेच कदाचित शाप म्हणून हा कुबाभळ किंवा वेडी बाभळ पृथ्वीवर पाठवली असेल. झाडं तोडणारे, पर्यावरणाचे नुकसान करणारे लोक या वेड्या बाभलीच्यासारख्या वृक्षाच्याच लायकीचे आहात. भोगा आता तुमच्या कर्माची फळं. "


मी विचार केला हा लाकूडफाटा काढून विकूया आणि दोन पैसे मिळवूया. ही वृक्षतोड नसून केवळ  झाडांच्या फांद्या, वेड्या बाभळी आणि वटलेले वृक्ष काढणे आहे. परिसरात पर्यावरणाचा समतोल रहावा यासाठी जून -जुलै मध्ये मी प्रतिष्ठान चिंच वाणाच्या पन्नास वृक्षाचे वृक्षारोपण करणार आहे. 


फांद्या काढणारे आणि विकत घेणारे व्यापारी आहेत. एकीकडे पर्यावरण, जंगल वाचवा मोहिमा चालू आहेत तर दुसरीकडे कंपन्यात बॉयलर, लाकडी खोकी निर्मिती ,घरात, हॉटेल्स मध्ये चुली आणि तंदूर , बेकऱ्या,इ. साठी मुबलक प्रमाणात लाकूडफाटा आणि कोळसा लागतो आहे, त्यामुळे वृक्षतोड सर्रास चालू आहे. MIDC लोणी देवकर जी आमच्या शेताला लागूनच आहे तिथे जळणासाठी लाकूडफाटा खरेदी करणाऱ्या दोन, तीन कंपन्या आहेत. तिथे पुतण्याने चौकशी केली तर समजले की असा जळावू लाकूडफाटा 3100₹ टन प्रमाणे विकत घेतला जातो. कंपन्याकडे रीतसर नोंदणी असलेले व्यापारी आहेत.जवळपासच्या दोन व्यापाऱ्यांसोबत बोलणी सुरु केली.

मी त्यांना विचारले, " तुम्ही हा लाकूडफाटा कुठे विकणार ?"तर उत्तर आले. "MIDC मधील कंपन्यात". दुसरा प्रश्न "किती रुपये टन प्रमाणे विकता?" उत्तर "2600₹ टन." तिसरा प्रश्न "मला किती भाव देणार?"उत्तर "800₹ टन."

इतका कमी दर का? तर म्हणाले, " झाडं कापणाऱ्या मेन कटरला 1000₹ आणि हेल्परला 600₹ रोज मजुरी द्यावी लागते ,( व्यापारी सांगतील ती माहिती आपण खरी समजायची .)त्यांना कामावर येण्या-जाण्याचा खर्च, कटींग मशीनला पेट्रोल, ऑइल लागते, कटिंग चेन लागतात, मशीन बिघडतात ते दुरुस्त करावे लागतात, ट्रॅक्टर वाहतूक,इ.विचारात घेतले तर आमचा प्रती टन 800₹ खर्च होतो . मग आम्हाला पण दोन पैसे नको का मिळायला."

म्हणजे गंम्मत बघा. कंपनी खरेदीचा दर 3100 असताना शेतकऱ्याला 2600₹ सांगितला जातो , त्यांचा खर्च + नफा 1800₹ सांगितला जातो , प्रत्येक्षात 2300₹ स्वतःकडे ठेवले जातात आणि ज्या शेतकऱ्याने इतके वर्ष सांभाळलेला माल आहे त्याला प्रती टन फक्त 800₹ देणार. म्हणजे केवळ 25%.काय हा अजब व्यवहार आहे.


मी म्हणालो, " कंपनीत तर माल 3100₹ ला घेतात." तर म्हणे, " नाही आमचा नाही घेत." "आरे तुम्ही पण तिथेच आणि तितक्यालाच विकणार आहात ना." मी म्हटले, "ठीक आहे मी ओळख वापरुन हा माल कंपनी त्यांच्या 3100₹ किमतीला घेईल असा प्रयत्न करतो . तुम्ही मला 50% म्हणजे 1550₹ टन भाव द्या."

मग त्यांनी बरीच कारणं पुढे केली. कंपनीत ट्रॅक्टरनं माल स्वीकारत नाहीत, बिल महिनाभराने मिळते,आमचं भांडवल अडकतं, इ. मग एक काम करा ना ,तुम्हीच आम्हाला 1800₹ टन प्रमाणे रोज रोख पैसे द्या आणि तुम्ही कंपनी कडून 3100₹  घ्या. भारीच,म्हणजे माझाच माल मीच रोज विकत घ्यायचा. यातून लवकर काही तोडगा निघत नव्हता.

शेवटी एक व्यापारी कमाल 1000₹ भाव द्यायला तयार झाला म्हणजे 32% तर दुसरा वाढता वाढता 1300₹ द्यायला तयार झाला. तो म्हणाला इतका दर तुम्हाला कोणच देऊ शकणार नाही. म्हणजे 42%.


झाडं कटिंग करायला एक तर इलेक्ट्रिक किंवा पेट्रोलवर चालणारे कटर लागतात. शेतकऱ्याकडे अशी साधने आणि अनुभवी मनुष्यबळ नसते. शेतकरी डायरेक्ट कंपनीला माल पाठवू शकत नाही.हॉटेल्स किंवा अन्य काही गरजवंत ठिकाणी तर असा माल 3200 ते 3300 टन प्रमाणे विकला जातो पण शेतकऱ्याला असे ग्राहक माहित नसतात.झाडाच्या फांद्या काढणे ही कधीतरीच घडणारी घटना आहे. त्यामुळे अशा कामासाठी शेतकऱ्याला व्यापाऱ्यावर अवलंबून रहावे लागते. व्यापारी प्रत्येक दिवशी सदर माल विकून 58% रक्कम कमवणार . 25% खर्च ग्रहित धरला तरी 33% निव्वळ नफा.

तर मग शेतकऱ्याच्या मालाला विक्री किंमतीच्या 50% किंमत मिळायला काय हरकत आहे? हेच तर आहे ना,सोयाबीन असो, तुर असो की, लाकूडफाटा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणे कठीण आहे.


दुसरी बाजू...

हे काम करायचे ठरल्यानंतर व्यापारी चार माणसांची टीम घेऊन हजर झाला. दोन कटर आणि दोन हेल्पर. दिवसाला साधारणपणे चार  टन माल कट करतील असे त्याचे म्हणणे होते. 

पहिल्याच दिवशी एक अडचण आली. वेड्या बाभळीचे दोन ताटवे इलेक्ट्रिक लाईनच्या खालीच वाढलेला होते. वेड्या बाभळीला वेड्या का म्हणतात ते या प्रसंगामूळे समजले. पण आता काढाव्या लागणार होत्या त्या वेड्या बाभळी. या वेड्या बाभळी काढण्यासाठी इलेक्ट्रिक लाईनच्या दोन पोल मधील तारांचा एक गाळा सोडविणे भाग होते. MSEB त फोन केला तर अधिकाऱ्याने तात्काळ हजर होवून सुखद धक्का दिला . येताना ते एक डमी वायरमन सोबत घेवून घेऊन आले होते. डमी वायरमनने या कामासाठी एक हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. मी म्हणालो, "थोडे कमी पैसे घ्या." तर म्हणे, "तुम्हाला म्हणून योग्यच सांगितले आहेत, हेच या व्यापाऱ्याला दोन हजार सांगितले असते." झाले मी गप्प झालो. मला वाटते हा डमी वायरमन प्रत्येकाला असेच सांगत असेल आणि हवे तितकेच पैसे आकारत असेल .एकीकडे मला एक टन लाकूडफाटा विकून 1300₹ मिळणार आणि हा डमी वायरमन थोड्या वेळात हजार रुपये घेऊन जाणार.या डमी वायरमनने  काही वेळातच 'तारा जमीपर', करून टाकल्या आणि वेड्या बाभळी कापल्या गेल्या. वेड्या बाभळी, झाडांच्या फांद्या कापताना एवढेच पाहिले की त्यावर कोणत्याही पक्षाचे घरटे नाही.बाभळी कापताना मला वाईट वाटले पण यापेक्षा काही वेगळा उपाय नव्हता.


एकवेळ पूर्ण झाड लवकर कापले जावू शकते पण झाडाच्या फांद्या काढायला फार वेळ लागतो. वेड्या बाभळी काढणे तर फार किचकट आणि वेळखाऊ काम. कामाचा कमी वेग आणि मशीनचे बदलावे लागणारे पार्ट्स अशा कारणांमुळे शेवटच्या दिवशी व्यापारी निराश दिसत होता. मग मीच त्यांना विचारले, काय हो, "आज चेहरा का पडला आहे." मग ते बोलू लागले'

"सहा दिवसात अंदाजे फक्त पंधरा टन माल तयार झाला आहे . फांद्या,वेड्या बाभळीमुळे दिवसाला चार टन लाकूड कटाई काम व्हायला पाहिजे होते तसे झाले नाही. रोज किमान तीन चार लिटर पेट्रोल, ऑइल लागले,कंपनीत जळावू लाकूडफाटा तुकडे तुकडे करून द्यावा लागतो,दीड ते दोन फुट तुकड्याचे माप असते,फांदी पेक्षा तिचे तुकडे करायला चारपट पेट्रोल खर्च होते, 2500₹ चे ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरले आहे,800₹ एक प्रमाणे कटरच्या तीन नव्या चेन आणाव्या लागल्या, एक हॅन्डल नवा आणला तो गरम होवून वितळला,काय परवडले या कामात? म्हणून तुम्हाला कोण 1000₹ पेक्षा जास्त भाव देत नव्हतं ."

मग मी त्यांचा व्यवसाय समजून घ्यायचा प्रयत्न केला.

हा व्यापारी कुबाभळी तोडून त्या लाकडापासून कोळसा तयार करतो. एखाद्या शेतात कुबाभळी फार वाढल्या तर शेतकऱ्याला JCB मशीन लावून स्वतः खर्च करून त्या काढाव्या लागतात. त्यापेक्षा हा व्यापारी तेच काम मोफत करतो आणि सर्व माल घेऊन जातो. या लाकडाची तो वीटभट्टी प्रमाणे भट्टी लावतो आणि त्यापासून कोळसा तयार करतो. एक टन लाकडापासून तीनशे किलो कोळसा तयार होतो. पुढे हा कोळसा 15 ते 16 हजार ₹ टन प्रमाणे हॉटेल्सला विकला जातो. ते सांगत होते सॉ मिलला दारा-खिडक्यांच्या चौकटी बनविण्यासाठी कडुनिंब, बाभूळ, रामकटचे लाकूड लागते. त्यांना आंब्याचेपण लाकूड लागते. फुर्निचरसाठी सागवान लाकूड लागते. सॉ मिल मध्ये लाकडाची जी किंमत असते त्यातली 40% रक्कम व्यापाऱ्यास मिळते, त्यातील जवळपास अर्धी रक्कम शेतकऱ्याला मिळते.म्हणजे 60:20:20%. म्हणजे इतकी वर्षें झाडं सांभाळून शेतकऱ्याला 20%, दोन-चार दिवसात झाडे तोडून व्यापाऱ्याला 20% आणि सॉ मिल मालक 60%. त्याचं पुढे फुर्निचर बनते तेव्हा तर सॉ मिल किंवा फुर्निचरवाला त्याच्या चार-पाच पट अधिक पैसे बनवितो.म्हणजे उद्योगात कच्या मालापासून उत्पादन तयार झाले की किती किंमत वाढते बघा.खरा फायदा सॉ मिल किंवा फुर्निचर तयार करणाराला होतो.

या सहा दिवसांचा मीही हिशेब केला तर व्यापाऱ्याला जेमतेम प्रतिदिन मजुरी इतकाच लाभ झाला होता. इतक्या उन्हातान्हात आणि शारीरिक कष्टा पुढे तो विशेष नव्हता असे जाणवले.मजुरी महागल्यामुळे मला नाही वाटत हे लोकं जंगलात जावून लाकडे कापत असतील. कारण त्यांना ती विकायला पण परवडत नसेल.

व्यापारी स्वतःच्या कामगारांबद्दल सांगत होता अहो या असल्या 40-42 तापमाणात दिवसात 4-5 लिटर पाणी प्यायले तर साधी थेंबभर लघवी सुद्धा होत नाही.फार त्रास होतो या कामात.


मग या कामात फायदा नक्की कोणाला झाला. एका कंपनीने लाकूडफाटा विकत घेणे ही एक छोटी ऍक्टिव्हिटी आहे पण ती किती जणांना रोजगार, पैसे देवून जाते पहा. शेतमालक, व्यापारी, मजूर,पेट्रोल पंप, वूडकटर सुट्टे सामान विक्रेते, पाणी जार विक्रेते, डमी वायरमन,पुढे फांद्या गोळा करायला जेसिबी इ.इतकच नाही तर कंपनीपण काही टॅक्स कापून घेणार.असा प्रत्येकजण स्वतःचा शेअर घेऊन गेला. शेवटी मलाही वाटले की, व्यापाऱ्याच्या श्रमाला पण योग्य मोल मिळणे कठीण आहे. 

लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

स्टोन पिक अप ड्राईव्ह

 निर्मला फार्म- भाग दोन - होऊदे खर्च.शेतात स्टोन पिक  अप ड्राईव्ह.

एप्रिल 2024 - दुष्काळ असल्यामुळे माझे 75% शेत  पडीक किंवा मोकळेच होते .शेतात पाण्याअभावी जेमतेम 25% क्षेत्रात पीक आहे. दुष्काळामुळे शेतीची पिकपूर्व मशागत करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. शेतात दगडांचे प्रमाण होते. प्रत्येक वेळी नांगरट,रोट्याव्हेटर, फणपाळी, पिकाची बांधणी, अशी शेताची कामे करताना हे दगड त्रासदायक ठरत असत. यावेळी ठरवलं हे सगळे दगड गोळा करून शेताबाहेर काढायचे. पण कसे?  अशा कामासाठी सध्या Stone pickup machine उपलब्ध झाले आहेत. मी ते मिळविण्याचा प्रयत्न केला पण परम चैतन्याचीच इच्छा असावी की, हे काम मजुरांना मिळावे. शिवाय सध्यातरी मशीनपेक्षा मजूर उपलब्ध असतील तर मजुरी खर्च कमी आहे. गावात ऊस लागवड करणाऱ्या टोळ्या आहेत पण ते या कामासाठी तयार झाले नाही. गावात बेलदार समाजाची काही कुटुंबे राहतात आणि त्यांच्या महिला शेतातील दगड उचलणे, शेणखत विस्कटने अशी कामे करतात अशी माहिती मला मिळाली. बेलदार समाज म्हणजे डोंगर फोडून बांधकामासाठी दगड तयार करणारा भटका समाज. गेली काही वर्षें ते लोणी देवकर गावात रहात आहेत. त्यांना भेटलो तर एक ट्रॅक्टर ढंम्पिंग ट्रॉली जी नॉर्मली 600₹ ला उचलतात तीच त्यांनी मला 900₹ सांगितली. शहरात राहतोय असं समजलं की माझ्यासारख्याला गावाकडे सगळेच असे चढे दर सांगतात आणि वेड्यात काढतात. निगोसिएशन करत 750₹ मग शेवटी 600₹ ढंम्पिंग ट्रॉली असा दर ठरला पण प्रत्येक्ष शेतात आल्यावर त्यांनी तो 650 ₹ केला. 12 एप्रिलला काम सुरु झाले. ट्रॅक्टर मालक आणि चालक नेहमीचाच रणजित डोंगरे. 350₹ एक खेप वाहतूक या प्रमाणे ठरले.

बेलदार समाजाच्या 4-5 महिला रोज सकाळी 8 वाजता कामावर येत असत आणि दुपारी 4 वाजेपर्यंत दररोज 4 ते 5 ट्रॉली दगड उचलत असत.खूप कष्टाचे काम त्या करत असत. मी कामाची देखरेख करण्यासाठी ट्रॅक्टरच्या मागेच फिरत असे. माझ्या दिवसभरात 8 ते 9 हजार स्टेप्स होत असत. त्यांच्या दीड किलोमीटर वरून कामाला येणे-जाणे विचारात घेता 17-18 हजार स्टेप्स नक्की होत असतील. दगड उचलताना उठबस करणे, वाकून काम करणे, उन्हाने तापलेले दगड उचलणे आणि रोज इतके चालणे. यातील दोन महिला तर 62 ते 65 वयाच्या होत्या. 19,20 तारखेला दगड उचलून उचलून या महिलांच्या हातांच्या बोटातून रक्त बाहेर आले. हे पाहुन मला फार वाईट वाटले आणि त्यांची दया आली. त्या म्हणाल्या, "काय करणार, हे दगड कापऱ्या कापऱ्या आहेत, गोल दगडाने रक्त नाही निघत, हातात घालायला मोजे पण नाहीत." मी म्हटले, "आता उपचार काय करणार?" तर म्हणे, "कसले उपचार, हे आपलं रोजचंच आहे." 21 तारखेला या महिला हाताला, बोटाला फडकं गुंडाळून काम करू लागल्या. मग मी पाच हातामोझे विकत आणले आणि त्यांना भेट दिले. भेट मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झालेला दिसला. रोज 37 ते 40 तापमाणात काम करणे,मानलच पाहिजे या महिलांना आणि त्यांच्या कष्टाला.किती हे काबाडकष्ट. परमेश्वराने अशा कष्टकऱ्यांचे आयुष्य सुखी करावे अशी प्रार्थना करतो.काम करताना या महिलांची एक खोड होती, ती म्हणजे शेतात जिथे विरळ दगड असतील तिथे त्यांचा प्रयत्न भरभर पुढे जाण्याच्या रहायचा.यामुळे शेतात काही छोटे दगड तसेच रहायची शक्यता निर्माण व्हायची. परंतु जिथे जास्त दगड असतील तिथे त्या आवडीने दगड उचलायच्या . कारण काय तर कमी वेळात ट्रॉली भरली गेली पाहिजे. एरवी त्या मराठीत बोलायच्या पण काही महत्वाचे बोलायचे असेल तर त्यांच्या बेलदारी, मारवाडी सारख्या भाषेत बोलायच्या. कारण काय तर मला कळायला नको.यात एक सारखी कुरकुर करणारी महिला होती. तिची भुणभुण असायची की, "आम्हाला सांगितले नारळा एव्हढे मोठे दगड उचलायचे आहेत, इथं तर बारीक दगड आहेत, अशा दगडाला आम्ही 700,800 रुपये ट्रॉली घेतो." तीचं नावच मी कुरकुरे ठेवलं होतं.विरल दगड असले की एक बुड्डी तर म्हणायची, "काय हे शेत,ना दगड ना फिगड आम्ही नुसते चकरा मारूनच मरायचो. गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगारू मेलं येरजाऱ्यानं अशी आमची गत झालीयं." गाढव हेच मुख्य वाहन असणाऱ्या बेलदारी समाजातील महिलेने ही म्हण वापरणे मला फार गमतीशीर वाटले. ही बुड्डी भयंकर ड्रॅमेबाज होती कमी दगड असलेल्या शेतात फिरायची वेळ आली की ही पार्टी सोडून जायचीच भाषा करायची,असल्या कामाचे आम्ही इतके पैसे घेतो म्हणत खोक्याचीच भाषा बोलायची नाहीतर चाललो आम्ही काम सोडून म्हणायची. माझी अस्वस्था मात्र बिचाऱ्या एखाद्या पक्ष प्रमुखासारखी व्हायची.विरळ , बारीक दगड उचलावे लागत असल्यामुळे माझी उपस्थिती आणि देखरेख त्यांना चांगलीच नकोशी झाली होती.

रणजित,तसं पाहिलं तर त्याचं काम ट्रॅक्टर चालवणे . सुरुवातीला शेतात महिलांना उचलता येणार नाही असा एक मोठा दगड दिसला .मग मी आणि महिलांनी रणजितला विनंती केली. "अरे रणजित उचल ना हा एक दगड." पुढे मोठा दगड दिसला की रणजितला काम सांगणे सुरु झाले. शेवटी महिलांची भीड इतकी चेपली की, मोठा दगड दिसला की महिला म्हणायच्या, " वो ड्रायव्हर दादा या खाली आणि उचला तो दगड." आधार म्हणून धरायला बोट दिले तर माणूस अवलंबून रहायला हात पकडतो तसे हे झाले होते. बिचारा रणजित.

माझ्या बद्दल विचाराल तर अशा उन्हाची मला सवय नव्हती. उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून मी शक्य ती सर्व काळजी घेत होतो. अहो दिवसभरात चार लिटर पाणी प्यायलो तर शंभर मिली सुद्धा लघवी होत नव्हती.काय ही उष्णता. बरं बायको पुण्यात आणि मी लोण्यात ( लोणी देवकर ) फोन झाला की कधी काळी अधिकारी असलेला तिचा नवरा काय करतोय तर दगड उचलायच्या कामाचे सुपरविजन करतोय म्हणून तिची बोलणी ऐकावी लागायची ते वेगळंच.

सदर काम 13 दिवस चालले. यासाठी 57 (वूमन)मॅन डेज् लागले.ड्राइवर आणि मी असे 26 मॅनडेज लागले.47 ट्रॉली दगड शेताबाहेर काढले आणि यासाठी 47000 हजार रुपये खर्च झाला. या वयस्कर दोन महिला कामाला फार चिवट आणि दिलेला शब्द पाळणाऱ्या होत्या. या तेरा दिवसात तीनदा असे घडले की, बाकी महिलांनी कामाला दांडी मारली पण या दोन म्हाताऱ्या हजर . शेवटी या दोघींना मी 1000₹ बक्षीस दिले. होऊद्या खर्च पण आता दगड, उट्या विरहित मातीदार, कसदार शेत पाहताना मिळणारा आनंद काही वेगळाच आहे. यानंतर शेतीची मशागत करणे सुलभ होईल आणि पिकं पण जोमदार येतील.

लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

वाटेकरी

 *निर्मला फार्म*-भाग एक -  *वाटेकरी भेटला.*

यापूर्वी माझ्या शेतात बलभीम चितारे, बाळू चितारे, सुरेश चवरे हे शेतमजूर वाटेकरी होवून गेले . सुरेश चवरेला शेतातून काढायचे ठरल्यानंतर मी जून -जुलै 23 पासून वाटेकरी शोधत होतो. पण काही केल्या योग्य शेतमजूर वाटेकरी भेटत नव्हता. माझी अवस्था अगदी नटसम्राट सारखी झाली होती.

कुणी वाटेकरी देता का, वाटेकरी? एका तुफानाला कुणी वाटेकरी देता का?

एक तुफान पाहुण्या रावळ्यांना सांगतंय, शेतकरी मित्रांना सांगतंय, व्हाट्सअँप मेसेजेस करतंय, शेतात इतकं सारं भांडवल गुंतवून शेती करायला शेतमजूर वाटेकरी शोधत हिंडतंय, शहरात म्हणू नका, खेड्यात म्हणू नका सगळीकडं नुसतं वाटेकऱ्याला धुंडतंय.

कुणी वाटेकरी देता का? वाटेकरी?

एका तुफानाला कुणी वाटेकरी देता का? 

खरंच वाटेकरी मिळणं अवघड झालंय की काय असे वाटायला लागले आहे.आठ, दहा मजूर भेटले पण जे अयोग्य होते त्यांना मी रिजेक्ट केले आणि योग्य वाटले त्यांच्या अटी जास्त होत्या.आता एक वाटेकरी नक्की केल्यावरही किमान 3-4 चांगल्या मजुरांचे फोन आले पण त्यांना आता उशीर झाला.


लोकांना आता कामं हवी आहेत पण उणाताणात, शेताची, जास्त कष्टाची कामे नको आहेत. लोकांना सगळं कसं झटपट हवं आहे. नेमकी शेती झटपट श्रीमंत करण्यात मोडत नाही.


कोणत्याही कामाची योग्य वेळ यावी लागते.परमेश्वरी परम चैतन्याने जाणले आणि मला योग्य वाटेकरी भेटला असे मी समजतो.


नाव - राजेंद्र बजरंग लोंढे. मुळगाव - हत्तीज, ता. बार्शी, जि. सोलापूर. माझा भाचा मनोजकुमार सुभाष पाटील याने ही मध्यस्थी केली.

2 एप्रिल 2024 ला  राजेंद्र लोंढे, त्यांच्या पत्नी हेमा, मुलगा कु. महादेव, मुलगी सारिका, तिच्या दोन मुलीसह हे कुटुंब माझ्या शेतावर डेरे दाखल झाले.

वाटेकरी नेमणे ही पण एक प्रक्रियाच आहे. वाटेकऱ्याला एक लाख रुपये उचल / ऍडव्हान्स रक्कम द्यावी लागली. शिवाय दरमहा घरखर्चाला ठराविक रक्कम द्यायची आहे. त्यांच्या लेबर वर्क या जबाबदारीसाठी पण भांडवल शेतमालकालाच गुंतवावे लागते. वाटेकऱ्याचा रीतसर पाच वर्षांचा नोटराईज करार केला आहे. यात वाटेकऱ्याची जबाबदारी म्हणजे सर्व प्रकारचे लेबर वर्क आणि बाकी जबाबदारी शेत मालकाची असते . वाट्याचे हिस्से म्हणाल तर नगदी पीक केल्यास वाटेकऱ्याला चौथा वाटा मिळेल आणि भुसार पीक केल्या तिसरा वाटा मिळेल. याचा अर्थ वाटेकरी केलेल्या पिकाचा तिसऱ्या किंवा चौथ्या भागाचा मालकच असतो. शेतीच्या पिकात खेळत्या भांडवलाची सायकल फार सावकाश चालते. आता हेच पहाना. सोयाबीन पीक चार महिने, तुर साडेपाच महिने, केळी बारा महिने, ऊस बारा आणि आडसाली असेल तर अठरा महिने. उद्योगात खेळते भांडवल सायकल वर्षात किमान 5 ते 6 वेळा फिरते आणि हॉटेल सारख्या व्यवसायात तर दररोज फिरते. म्हणजे हॉटेल मध्ये सकाळी 100₹ गुंतविले तर रात्री त्याचे किमान 120₹ झालेले असतात.  शेतीत भांडवल फार महिने अडकून पडते आणि वाटेकऱ्याला, शेतकऱ्याला 6,12,18 महिन्यानंतर पैसे मिळतात. तेही अनिश्चित.


तुम्ही 12th Fail सिनेमा पाहिला असेल. त्यात एक डायलॉग आहे. . UPSC परीक्षा देताना चाचणी परीक्षा द्या, पास झाले की, मेन परीक्षा द्या , ती पास झाली की, मुलाखत द्या . यात कुठल्याही लेव्हल वर फेल झालं तर , मग पुन्हा बॅक टू क्वेअर वन. मग पुन्हा रिस्टार्ट, रिस्टार्ट, रिस्टार्ट.


या वर्षी गंभीर दुष्काळामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतीची अवस्था पण अशीच बॅक टू क्वेअर वन झाली आहे.याला मी पण अपवाद नाही. मग काय पुन्हा एकदा रिस्टार्ट आहे.


खरंतर जे काही होतंय ते सारं काही परम चैतन्यच करत असतं आपण केवळ निमित्तमात्र किंवा माध्यम असतो.आपण फक्त त्या परमेश्वरी चैतन्याशी एकरूप व्हायचे. मग सगळं कसं सहज होत राहतं. याचा अर्थ असेल हरी तर देईल खाटल्यावरी असा नाही.आपण आपले कर्म करत रहायचे. आपण जमिनीत बी पेरतो. ते कधी काळ्या मातीत , कधी मुरमाड मातीत,तर कधी दगड धोंड्यात पडते.तरी त्याला अंकुर फुटतो, त्याचे रोप बनते, त्याचे झाड होते. हे होताना त्याला त्रास होत नसेल का? होत असेल ना. पण हे दैवी कार्य अगदी सहज घडते. तसं आपण देवाशी जोडलेले राहूया. आपली संकल्प सोडलेली सर्व कामे सहज होत राहतील .


परमेश्वराच्या कृपेत या वर्षी शेतात केळी,ऊस, सोयाबीन,तुर अशी पिके घ्यायची आहेत. केळीला ड्रीप करायचे आहे. पिकपूर्व बरीच कामे करायची आहेत.परमेश्वरानेच आपल्याला या भूमिका दिलेल्या आहेत. आता बघूया यात हा राजेंद्र लोंढे वाटेकरी ही भूमिका कशी पार पाडतात ते.मुळात मजुरी, सालकरी आणि वाटेकरी यात फरक आहे. मजुरी ही दैनंदिन असते. एक दिवस कामं केले की लगेच मजुरी मिळते. सालकरी म्हणजे वर्षाला साधारणपणे 1.2 ते 1.3लाख रुपये या प्रमाणे वर्षभर काम करावे लागते. वाटेकरी म्हणजे शेतात जी पिकं घेतली जातात त्याच्या नफ्यात करारप्रमाणे वाटा मिळतो. या प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी असते. राजेंद्र पूर्वी सालकरी होते आता वाटेकरी झाले आहेत . त्यांनी वाटेकरी म्हणून कष्ट केले तर चार पट अधिक आर्थिक लाभ होऊ शकतो. पण यासाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना खूप मानसिक बदल करावा लागेल. गाव बदललं की सहवास बदलतो. त्यांना चांगल्या लोकांचा सहवास ठेवावा लागेल.व्यसनी लोकं आणि व्यसनापासून दुर रहावे लागेल. शेतातले उत्पादन वाढावावे लागेल. 

कोणताही मजूर काम मिळेपर्यंत स्वतःची फार जोरदार जाहिरात करतो. मी एकरी इतके टन उसाचे उत्पादन काढेल,शेताचे कडे कोपरे स्वच्छ ठेवेल, पिकात तणतोडा दिसणार नाही,शेत एके शेत करेल, शेत सोडून उगाच इकडे, तिकडे बोंबलत फिरणार नाही, मला कसलंही व्यसन नाही,माझं इतक्या माणसाचं कुटुंब आहे सगळे शेतात कामं करतील,घरातल्यांनी कामं केली तर मजुरीचा पैसा बाहेर जात नाही हे मला माहित आहे ,मला मोटर,लाईट आणि पाईप लाईन कामातलं सगळं येत,इ. असंच सारं हे लोंढे पण बोललेले आहेत. त्यांच्या बोलण्यात आणि प्रत्येक्ष कामात काही फरक असायला नको इतकच वाटतं.कारण यावर्षीच्या नियोजनात वाटेकऱ्याची भूमिका फार महत्वाची आहे. बरं इतकं करून आपण या कुटुंबाला इकडे आणायचे आणि स्थानिक लोकं त्यांना MIDC त काम मिळेल,धुनी भांडी करा,दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करा असले सल्ले  देत असतात. या फॅमिलीला शेतात कामं करायला आणलेले आहे. काही कोटी रुपये किंमतीचे शेत आणि येथील सोयी साधने त्यांच्या ताब्यात दिली आहेत. त्यांनी शेतात काम, कष्ट करत रहावे अशी अपेक्षा आहे. माझ्या राजेंद्र आणि महादेव कडून खूप आशा, आकांक्षा आहेत. त्यांनी चांगले कामं केले तर आम्हा दोघांनाही अपेक्षित पैसा,यश, आनंद आणी समाधान मिळेलच की.

लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.