निर्मला फार्म- भाग दोन - होऊदे खर्च.शेतात स्टोन पिक अप ड्राईव्ह.
एप्रिल 2024 - दुष्काळ असल्यामुळे माझे 75% शेत पडीक किंवा मोकळेच होते .शेतात पाण्याअभावी जेमतेम 25% क्षेत्रात पीक आहे. दुष्काळामुळे शेतीची पिकपूर्व मशागत करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. शेतात दगडांचे प्रमाण होते. प्रत्येक वेळी नांगरट,रोट्याव्हेटर, फणपाळी, पिकाची बांधणी, अशी शेताची कामे करताना हे दगड त्रासदायक ठरत असत. यावेळी ठरवलं हे सगळे दगड गोळा करून शेताबाहेर काढायचे. पण कसे? अशा कामासाठी सध्या Stone pickup machine उपलब्ध झाले आहेत. मी ते मिळविण्याचा प्रयत्न केला पण परम चैतन्याचीच इच्छा असावी की, हे काम मजुरांना मिळावे. शिवाय सध्यातरी मशीनपेक्षा मजूर उपलब्ध असतील तर मजुरी खर्च कमी आहे. गावात ऊस लागवड करणाऱ्या टोळ्या आहेत पण ते या कामासाठी तयार झाले नाही. गावात बेलदार समाजाची काही कुटुंबे राहतात आणि त्यांच्या महिला शेतातील दगड उचलणे, शेणखत विस्कटने अशी कामे करतात अशी माहिती मला मिळाली. बेलदार समाज म्हणजे डोंगर फोडून बांधकामासाठी दगड तयार करणारा भटका समाज. गेली काही वर्षें ते लोणी देवकर गावात रहात आहेत. त्यांना भेटलो तर एक ट्रॅक्टर ढंम्पिंग ट्रॉली जी नॉर्मली 600₹ ला उचलतात तीच त्यांनी मला 900₹ सांगितली. शहरात राहतोय असं समजलं की माझ्यासारख्याला गावाकडे सगळेच असे चढे दर सांगतात आणि वेड्यात काढतात. निगोसिएशन करत 750₹ मग शेवटी 600₹ ढंम्पिंग ट्रॉली असा दर ठरला पण प्रत्येक्ष शेतात आल्यावर त्यांनी तो 650 ₹ केला. 12 एप्रिलला काम सुरु झाले. ट्रॅक्टर मालक आणि चालक नेहमीचाच रणजित डोंगरे. 350₹ एक खेप वाहतूक या प्रमाणे ठरले.
बेलदार समाजाच्या 4-5 महिला रोज सकाळी 8 वाजता कामावर येत असत आणि दुपारी 4 वाजेपर्यंत दररोज 4 ते 5 ट्रॉली दगड उचलत असत.खूप कष्टाचे काम त्या करत असत. मी कामाची देखरेख करण्यासाठी ट्रॅक्टरच्या मागेच फिरत असे. माझ्या दिवसभरात 8 ते 9 हजार स्टेप्स होत असत. त्यांच्या दीड किलोमीटर वरून कामाला येणे-जाणे विचारात घेता 17-18 हजार स्टेप्स नक्की होत असतील. दगड उचलताना उठबस करणे, वाकून काम करणे, उन्हाने तापलेले दगड उचलणे आणि रोज इतके चालणे. यातील दोन महिला तर 62 ते 65 वयाच्या होत्या. 19,20 तारखेला दगड उचलून उचलून या महिलांच्या हातांच्या बोटातून रक्त बाहेर आले. हे पाहुन मला फार वाईट वाटले आणि त्यांची दया आली. त्या म्हणाल्या, "काय करणार, हे दगड कापऱ्या कापऱ्या आहेत, गोल दगडाने रक्त नाही निघत, हातात घालायला मोजे पण नाहीत." मी म्हटले, "आता उपचार काय करणार?" तर म्हणे, "कसले उपचार, हे आपलं रोजचंच आहे." 21 तारखेला या महिला हाताला, बोटाला फडकं गुंडाळून काम करू लागल्या. मग मी पाच हातामोझे विकत आणले आणि त्यांना भेट दिले. भेट मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झालेला दिसला. रोज 37 ते 40 तापमाणात काम करणे,मानलच पाहिजे या महिलांना आणि त्यांच्या कष्टाला.किती हे काबाडकष्ट. परमेश्वराने अशा कष्टकऱ्यांचे आयुष्य सुखी करावे अशी प्रार्थना करतो.काम करताना या महिलांची एक खोड होती, ती म्हणजे शेतात जिथे विरळ दगड असतील तिथे त्यांचा प्रयत्न भरभर पुढे जाण्याच्या रहायचा.यामुळे शेतात काही छोटे दगड तसेच रहायची शक्यता निर्माण व्हायची. परंतु जिथे जास्त दगड असतील तिथे त्या आवडीने दगड उचलायच्या . कारण काय तर कमी वेळात ट्रॉली भरली गेली पाहिजे. एरवी त्या मराठीत बोलायच्या पण काही महत्वाचे बोलायचे असेल तर त्यांच्या बेलदारी, मारवाडी सारख्या भाषेत बोलायच्या. कारण काय तर मला कळायला नको.यात एक सारखी कुरकुर करणारी महिला होती. तिची भुणभुण असायची की, "आम्हाला सांगितले नारळा एव्हढे मोठे दगड उचलायचे आहेत, इथं तर बारीक दगड आहेत, अशा दगडाला आम्ही 700,800 रुपये ट्रॉली घेतो." तीचं नावच मी कुरकुरे ठेवलं होतं.विरल दगड असले की एक बुड्डी तर म्हणायची, "काय हे शेत,ना दगड ना फिगड आम्ही नुसते चकरा मारूनच मरायचो. गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगारू मेलं येरजाऱ्यानं अशी आमची गत झालीयं." गाढव हेच मुख्य वाहन असणाऱ्या बेलदारी समाजातील महिलेने ही म्हण वापरणे मला फार गमतीशीर वाटले. ही बुड्डी भयंकर ड्रॅमेबाज होती कमी दगड असलेल्या शेतात फिरायची वेळ आली की ही पार्टी सोडून जायचीच भाषा करायची,असल्या कामाचे आम्ही इतके पैसे घेतो म्हणत खोक्याचीच भाषा बोलायची नाहीतर चाललो आम्ही काम सोडून म्हणायची. माझी अस्वस्था मात्र बिचाऱ्या एखाद्या पक्ष प्रमुखासारखी व्हायची.विरळ , बारीक दगड उचलावे लागत असल्यामुळे माझी उपस्थिती आणि देखरेख त्यांना चांगलीच नकोशी झाली होती.
रणजित,तसं पाहिलं तर त्याचं काम ट्रॅक्टर चालवणे . सुरुवातीला शेतात महिलांना उचलता येणार नाही असा एक मोठा दगड दिसला .मग मी आणि महिलांनी रणजितला विनंती केली. "अरे रणजित उचल ना हा एक दगड." पुढे मोठा दगड दिसला की रणजितला काम सांगणे सुरु झाले. शेवटी महिलांची भीड इतकी चेपली की, मोठा दगड दिसला की महिला म्हणायच्या, " वो ड्रायव्हर दादा या खाली आणि उचला तो दगड." आधार म्हणून धरायला बोट दिले तर माणूस अवलंबून रहायला हात पकडतो तसे हे झाले होते. बिचारा रणजित.
माझ्या बद्दल विचाराल तर अशा उन्हाची मला सवय नव्हती. उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून मी शक्य ती सर्व काळजी घेत होतो. अहो दिवसभरात चार लिटर पाणी प्यायलो तर शंभर मिली सुद्धा लघवी होत नव्हती.काय ही उष्णता. बरं बायको पुण्यात आणि मी लोण्यात ( लोणी देवकर ) फोन झाला की कधी काळी अधिकारी असलेला तिचा नवरा काय करतोय तर दगड उचलायच्या कामाचे सुपरविजन करतोय म्हणून तिची बोलणी ऐकावी लागायची ते वेगळंच.
सदर काम 13 दिवस चालले. यासाठी 57 (वूमन)मॅन डेज् लागले.ड्राइवर आणि मी असे 26 मॅनडेज लागले.47 ट्रॉली दगड शेताबाहेर काढले आणि यासाठी 47000 हजार रुपये खर्च झाला. या वयस्कर दोन महिला कामाला फार चिवट आणि दिलेला शब्द पाळणाऱ्या होत्या. या तेरा दिवसात तीनदा असे घडले की, बाकी महिलांनी कामाला दांडी मारली पण या दोन म्हाताऱ्या हजर . शेवटी या दोघींना मी 1000₹ बक्षीस दिले. होऊद्या खर्च पण आता दगड, उट्या विरहित मातीदार, कसदार शेत पाहताना मिळणारा आनंद काही वेगळाच आहे. यानंतर शेतीची मशागत करणे सुलभ होईल आणि पिकं पण जोमदार येतील.
लेखक...
योगीराज देवकर.
Motivation Academy.
No comments:
Post a Comment