Tuesday, 25 June 2024

शेतमालाला किंमत मिळणे कठीण.

 निर्मला फार्म- भाग तीन - शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळणे कठीण आणि व्यापाऱ्याच्या श्रमाला मोल मिळणे पण कठीण .

पहिली बाजू...

माझ्या वडिलांच्या काळात आमच्या शेतावर उंबर,मेंदी,कडुनिंब, बाभळ, रामकट (सरळ वाढणारी बाभळ ) आंबा, जांभूळ, आपटा, बेल, बोर,चिंच,निलगिरी,अशी विविध प्रकारची झाडे होती. पुढे शेताच्या चार वाटण्या झाल्या,प्रत्येक भावाने स्वतःच्या शेतात सुधारणा केल्या. काळाच्या ओघात आणि शेती बागायती करण्याच्या रेट्यात त्यातली बरीचशी झाडे आता नष्ट झाली आहेत.

सध्या माझ्या शेतात चिंच,सागवान,नारळ, चिक्कू,कडुनिंब,बांबू, असे निवडक वृक्ष उपलब्ध आहेत.शिवाय काही ठिकाणी कुबाभळ वाढलेले आहेत. हे वृक्ष मोठे झाले आहेत.दोन ठिकाणी वेड्या/कुबाभळीच्या झाडा वरून लाईटच्या तारा गेल्या आहेत ,काही तारा तर झाडाच्या खोडात रुतलेल्या आहेत .काही ठिकाणी कडूनिंबाचे वटलेले वृक्ष उभे आहेत. जमिनीची मशागत करता येण्यासाठी आणि पिकं निट येण्यासाठी मोठ्या झाडांच्या खालील भागातील फांद्या काढणे,शेतातील वटलेले वृक्ष काढणे, तारा खालच्या वेड्या बाभळी काढणे आवश्यक झाले होते. शेतातील कुबाभळ/ वेड्या बाभळी काढायला कोणाच्या परवानगीची गरज नसते असे मला व्यापाऱ्याचे सांगितले.


माझा एक CCF (Retired )मित्र आहे. तो या कुबाभळ बद्दल असं म्हणाला होता की, " सध्या लोकं इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करत आहेत की, कडुनिंब, पिंपळ इ. सारखे वृक्ष शेतावर ठेवायला कोण तयारच नाही, म्हणून देवानेच कदाचित शाप म्हणून हा कुबाभळ किंवा वेडी बाभळ पृथ्वीवर पाठवली असेल. झाडं तोडणारे, पर्यावरणाचे नुकसान करणारे लोक या वेड्या बाभलीच्यासारख्या वृक्षाच्याच लायकीचे आहात. भोगा आता तुमच्या कर्माची फळं. "


मी विचार केला हा लाकूडफाटा काढून विकूया आणि दोन पैसे मिळवूया. ही वृक्षतोड नसून केवळ  झाडांच्या फांद्या, वेड्या बाभळी आणि वटलेले वृक्ष काढणे आहे. परिसरात पर्यावरणाचा समतोल रहावा यासाठी जून -जुलै मध्ये मी प्रतिष्ठान चिंच वाणाच्या पन्नास वृक्षाचे वृक्षारोपण करणार आहे. 


फांद्या काढणारे आणि विकत घेणारे व्यापारी आहेत. एकीकडे पर्यावरण, जंगल वाचवा मोहिमा चालू आहेत तर दुसरीकडे कंपन्यात बॉयलर, लाकडी खोकी निर्मिती ,घरात, हॉटेल्स मध्ये चुली आणि तंदूर , बेकऱ्या,इ. साठी मुबलक प्रमाणात लाकूडफाटा आणि कोळसा लागतो आहे, त्यामुळे वृक्षतोड सर्रास चालू आहे. MIDC लोणी देवकर जी आमच्या शेताला लागूनच आहे तिथे जळणासाठी लाकूडफाटा खरेदी करणाऱ्या दोन, तीन कंपन्या आहेत. तिथे पुतण्याने चौकशी केली तर समजले की असा जळावू लाकूडफाटा 3100₹ टन प्रमाणे विकत घेतला जातो. कंपन्याकडे रीतसर नोंदणी असलेले व्यापारी आहेत.जवळपासच्या दोन व्यापाऱ्यांसोबत बोलणी सुरु केली.

मी त्यांना विचारले, " तुम्ही हा लाकूडफाटा कुठे विकणार ?"तर उत्तर आले. "MIDC मधील कंपन्यात". दुसरा प्रश्न "किती रुपये टन प्रमाणे विकता?" उत्तर "2600₹ टन." तिसरा प्रश्न "मला किती भाव देणार?"उत्तर "800₹ टन."

इतका कमी दर का? तर म्हणाले, " झाडं कापणाऱ्या मेन कटरला 1000₹ आणि हेल्परला 600₹ रोज मजुरी द्यावी लागते ,( व्यापारी सांगतील ती माहिती आपण खरी समजायची .)त्यांना कामावर येण्या-जाण्याचा खर्च, कटींग मशीनला पेट्रोल, ऑइल लागते, कटिंग चेन लागतात, मशीन बिघडतात ते दुरुस्त करावे लागतात, ट्रॅक्टर वाहतूक,इ.विचारात घेतले तर आमचा प्रती टन 800₹ खर्च होतो . मग आम्हाला पण दोन पैसे नको का मिळायला."

म्हणजे गंम्मत बघा. कंपनी खरेदीचा दर 3100 असताना शेतकऱ्याला 2600₹ सांगितला जातो , त्यांचा खर्च + नफा 1800₹ सांगितला जातो , प्रत्येक्षात 2300₹ स्वतःकडे ठेवले जातात आणि ज्या शेतकऱ्याने इतके वर्ष सांभाळलेला माल आहे त्याला प्रती टन फक्त 800₹ देणार. म्हणजे केवळ 25%.काय हा अजब व्यवहार आहे.


मी म्हणालो, " कंपनीत तर माल 3100₹ ला घेतात." तर म्हणे, " नाही आमचा नाही घेत." "आरे तुम्ही पण तिथेच आणि तितक्यालाच विकणार आहात ना." मी म्हटले, "ठीक आहे मी ओळख वापरुन हा माल कंपनी त्यांच्या 3100₹ किमतीला घेईल असा प्रयत्न करतो . तुम्ही मला 50% म्हणजे 1550₹ टन भाव द्या."

मग त्यांनी बरीच कारणं पुढे केली. कंपनीत ट्रॅक्टरनं माल स्वीकारत नाहीत, बिल महिनाभराने मिळते,आमचं भांडवल अडकतं, इ. मग एक काम करा ना ,तुम्हीच आम्हाला 1800₹ टन प्रमाणे रोज रोख पैसे द्या आणि तुम्ही कंपनी कडून 3100₹  घ्या. भारीच,म्हणजे माझाच माल मीच रोज विकत घ्यायचा. यातून लवकर काही तोडगा निघत नव्हता.

शेवटी एक व्यापारी कमाल 1000₹ भाव द्यायला तयार झाला म्हणजे 32% तर दुसरा वाढता वाढता 1300₹ द्यायला तयार झाला. तो म्हणाला इतका दर तुम्हाला कोणच देऊ शकणार नाही. म्हणजे 42%.


झाडं कटिंग करायला एक तर इलेक्ट्रिक किंवा पेट्रोलवर चालणारे कटर लागतात. शेतकऱ्याकडे अशी साधने आणि अनुभवी मनुष्यबळ नसते. शेतकरी डायरेक्ट कंपनीला माल पाठवू शकत नाही.हॉटेल्स किंवा अन्य काही गरजवंत ठिकाणी तर असा माल 3200 ते 3300 टन प्रमाणे विकला जातो पण शेतकऱ्याला असे ग्राहक माहित नसतात.झाडाच्या फांद्या काढणे ही कधीतरीच घडणारी घटना आहे. त्यामुळे अशा कामासाठी शेतकऱ्याला व्यापाऱ्यावर अवलंबून रहावे लागते. व्यापारी प्रत्येक दिवशी सदर माल विकून 58% रक्कम कमवणार . 25% खर्च ग्रहित धरला तरी 33% निव्वळ नफा.

तर मग शेतकऱ्याच्या मालाला विक्री किंमतीच्या 50% किंमत मिळायला काय हरकत आहे? हेच तर आहे ना,सोयाबीन असो, तुर असो की, लाकूडफाटा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणे कठीण आहे.


दुसरी बाजू...

हे काम करायचे ठरल्यानंतर व्यापारी चार माणसांची टीम घेऊन हजर झाला. दोन कटर आणि दोन हेल्पर. दिवसाला साधारणपणे चार  टन माल कट करतील असे त्याचे म्हणणे होते. 

पहिल्याच दिवशी एक अडचण आली. वेड्या बाभळीचे दोन ताटवे इलेक्ट्रिक लाईनच्या खालीच वाढलेला होते. वेड्या बाभळीला वेड्या का म्हणतात ते या प्रसंगामूळे समजले. पण आता काढाव्या लागणार होत्या त्या वेड्या बाभळी. या वेड्या बाभळी काढण्यासाठी इलेक्ट्रिक लाईनच्या दोन पोल मधील तारांचा एक गाळा सोडविणे भाग होते. MSEB त फोन केला तर अधिकाऱ्याने तात्काळ हजर होवून सुखद धक्का दिला . येताना ते एक डमी वायरमन सोबत घेवून घेऊन आले होते. डमी वायरमनने या कामासाठी एक हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. मी म्हणालो, "थोडे कमी पैसे घ्या." तर म्हणे, "तुम्हाला म्हणून योग्यच सांगितले आहेत, हेच या व्यापाऱ्याला दोन हजार सांगितले असते." झाले मी गप्प झालो. मला वाटते हा डमी वायरमन प्रत्येकाला असेच सांगत असेल आणि हवे तितकेच पैसे आकारत असेल .एकीकडे मला एक टन लाकूडफाटा विकून 1300₹ मिळणार आणि हा डमी वायरमन थोड्या वेळात हजार रुपये घेऊन जाणार.या डमी वायरमनने  काही वेळातच 'तारा जमीपर', करून टाकल्या आणि वेड्या बाभळी कापल्या गेल्या. वेड्या बाभळी, झाडांच्या फांद्या कापताना एवढेच पाहिले की त्यावर कोणत्याही पक्षाचे घरटे नाही.बाभळी कापताना मला वाईट वाटले पण यापेक्षा काही वेगळा उपाय नव्हता.


एकवेळ पूर्ण झाड लवकर कापले जावू शकते पण झाडाच्या फांद्या काढायला फार वेळ लागतो. वेड्या बाभळी काढणे तर फार किचकट आणि वेळखाऊ काम. कामाचा कमी वेग आणि मशीनचे बदलावे लागणारे पार्ट्स अशा कारणांमुळे शेवटच्या दिवशी व्यापारी निराश दिसत होता. मग मीच त्यांना विचारले, काय हो, "आज चेहरा का पडला आहे." मग ते बोलू लागले'

"सहा दिवसात अंदाजे फक्त पंधरा टन माल तयार झाला आहे . फांद्या,वेड्या बाभळीमुळे दिवसाला चार टन लाकूड कटाई काम व्हायला पाहिजे होते तसे झाले नाही. रोज किमान तीन चार लिटर पेट्रोल, ऑइल लागले,कंपनीत जळावू लाकूडफाटा तुकडे तुकडे करून द्यावा लागतो,दीड ते दोन फुट तुकड्याचे माप असते,फांदी पेक्षा तिचे तुकडे करायला चारपट पेट्रोल खर्च होते, 2500₹ चे ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरले आहे,800₹ एक प्रमाणे कटरच्या तीन नव्या चेन आणाव्या लागल्या, एक हॅन्डल नवा आणला तो गरम होवून वितळला,काय परवडले या कामात? म्हणून तुम्हाला कोण 1000₹ पेक्षा जास्त भाव देत नव्हतं ."

मग मी त्यांचा व्यवसाय समजून घ्यायचा प्रयत्न केला.

हा व्यापारी कुबाभळी तोडून त्या लाकडापासून कोळसा तयार करतो. एखाद्या शेतात कुबाभळी फार वाढल्या तर शेतकऱ्याला JCB मशीन लावून स्वतः खर्च करून त्या काढाव्या लागतात. त्यापेक्षा हा व्यापारी तेच काम मोफत करतो आणि सर्व माल घेऊन जातो. या लाकडाची तो वीटभट्टी प्रमाणे भट्टी लावतो आणि त्यापासून कोळसा तयार करतो. एक टन लाकडापासून तीनशे किलो कोळसा तयार होतो. पुढे हा कोळसा 15 ते 16 हजार ₹ टन प्रमाणे हॉटेल्सला विकला जातो. ते सांगत होते सॉ मिलला दारा-खिडक्यांच्या चौकटी बनविण्यासाठी कडुनिंब, बाभूळ, रामकटचे लाकूड लागते. त्यांना आंब्याचेपण लाकूड लागते. फुर्निचरसाठी सागवान लाकूड लागते. सॉ मिल मध्ये लाकडाची जी किंमत असते त्यातली 40% रक्कम व्यापाऱ्यास मिळते, त्यातील जवळपास अर्धी रक्कम शेतकऱ्याला मिळते.म्हणजे 60:20:20%. म्हणजे इतकी वर्षें झाडं सांभाळून शेतकऱ्याला 20%, दोन-चार दिवसात झाडे तोडून व्यापाऱ्याला 20% आणि सॉ मिल मालक 60%. त्याचं पुढे फुर्निचर बनते तेव्हा तर सॉ मिल किंवा फुर्निचरवाला त्याच्या चार-पाच पट अधिक पैसे बनवितो.म्हणजे उद्योगात कच्या मालापासून उत्पादन तयार झाले की किती किंमत वाढते बघा.खरा फायदा सॉ मिल किंवा फुर्निचर तयार करणाराला होतो.

या सहा दिवसांचा मीही हिशेब केला तर व्यापाऱ्याला जेमतेम प्रतिदिन मजुरी इतकाच लाभ झाला होता. इतक्या उन्हातान्हात आणि शारीरिक कष्टा पुढे तो विशेष नव्हता असे जाणवले.मजुरी महागल्यामुळे मला नाही वाटत हे लोकं जंगलात जावून लाकडे कापत असतील. कारण त्यांना ती विकायला पण परवडत नसेल.

व्यापारी स्वतःच्या कामगारांबद्दल सांगत होता अहो या असल्या 40-42 तापमाणात दिवसात 4-5 लिटर पाणी प्यायले तर साधी थेंबभर लघवी सुद्धा होत नाही.फार त्रास होतो या कामात.


मग या कामात फायदा नक्की कोणाला झाला. एका कंपनीने लाकूडफाटा विकत घेणे ही एक छोटी ऍक्टिव्हिटी आहे पण ती किती जणांना रोजगार, पैसे देवून जाते पहा. शेतमालक, व्यापारी, मजूर,पेट्रोल पंप, वूडकटर सुट्टे सामान विक्रेते, पाणी जार विक्रेते, डमी वायरमन,पुढे फांद्या गोळा करायला जेसिबी इ.इतकच नाही तर कंपनीपण काही टॅक्स कापून घेणार.असा प्रत्येकजण स्वतःचा शेअर घेऊन गेला. शेवटी मलाही वाटले की, व्यापाऱ्याच्या श्रमाला पण योग्य मोल मिळणे कठीण आहे. 

लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

No comments: