Thursday 16 July, 2020

अहंकार सोडा, माणसं जोडा.

नमस्कार !
*अहंकार सोडा , माणसं जोडा.*
Anthropology म्हणजे मानवशास्त्र. मानवाचा वर्तणूक,सामाजिक,सांस्कृतिक,नॉर्मस (चांगले वागण्याचे अलिखित प्रमाण.)मूल्ये यांचा भूतकाळ आणि वर्तमान काळातील अभ्यास. यात अनेक विशेष गुण (Distictions) सांगितले जातात. यावर आधारित जे प्रशिक्षण कार्यक्रम होतात त्यात यापैकीच एका distiction बद्दल बोलले जाते ते म्हणजे रॅकेट्स. म्हणजे खरे लपवायचे आणि  खोटे दाखवायचे.यालाच माणूस ढोंग करतो असे म्हणतात. आपले ढोंग आपणच ओळखून ते दूर करण्यासाठी याचा गुणाचा उपयोग केला जातो.
*ढोंग.*
आपल्यापैकी प्रत्येकात  एक ढोंग लपलेले असते. ढोंग म्हणजे काय तर आपली अनुत्पादक( unproductive behavior or actions.) वागण्याची पद्धत किंवा आपण करत असलेली कृती असते. यात आपण दुसऱ्यांविषयी  *जी खरी नाही* अशी तक्रार सतत करत असतो. आपण मात्र त्या तक्रारीला खरे मानत असतो आणि आपणच सतत बरोबर असे वागत असतो. अशा या वागण्यामुळे आपल्याला एका बाजूला काही फायदा किंवा लाभ होत असतो त्यामुळे वर्तणुकीचे हे चक्र अधिकच बळकट होते. आपल्या हे लक्षातच येत नाही की पुष्कळदा आपली तक्रार खोटी किंवा बोगस असते. कदाचित कधीतरी ती बरोबर,योग्य किंवा अगदी कायदेशीर सुद्धा असू शकेल.

पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला आपल्याला या वर्तणुकीची किंवा कृतीची भरमसाठ किंमत मोजावी लागत असते.

*तुम्ही ढोंगी आहात*, असे जर कोणी म्हटले तर ते तुम्हाला आवडणार पण नाही आणि मान्यही नसेल. तर मग हे ढोंग शोधायचे कसे.

तर ढोंग म्हणजे काय तर , *तुमचा वागण्याचा ठरलेला मार्ग + तुम्ही सतत नेटाने करत असलेली तक्रार*. अशी माणसं जबाबदार असणे टाळतात.

आपण ढोंगामुळे होणारे फायदे किंवा लाभ बघूया.
१)तुम्ही बरोबर,योग्य,खरे आणि इतर लोक चूक हे ठरविणे तुमच्याच हातात असते. तक्रारदार,वकील आणि न्यायाधीश सगळे तुम्हीच असता.
२) स्वतःच्या मताचे किंवा विचारांचे समर्थन केले जाते आणि दुसऱ्याला कमकुवत किंवा कमजोर केले जाते.
३)स्वतःची सत्ता गाजविता येते आणि दुसऱ्याची सत्ता नाकारली किंवा टाळली जाते.
४)स्वतःला जिंकता येते आणि इतरांना हरविता येते.

आता ढोंगाची मोजावी लागणारी किंमत पहा.खरं तर ही तुमच्या आनंदीपणाची किंमत असते.
१) एकमेकांमधील संबंध ( Interpersonal relations) खराब होतात. नातेसंबंध खराब होतात. प्रेम, करुणा, जिव्हाळा रहात नाही.
२) स्वतःला खरं व्यक्त करता येत नाही .
३) सहनशीलता , मानसिक सामर्थ्य कमी होते आणि स्वतःचे कल्याण आणि सुस्थिती अडचणीत येते.
४)तुम्ही स्वयंपूर्ण होऊ शकत नाही.
५) आपणच आपले समाधान हरवुन बसतो.

ढोंगाच्या मिळणाऱ्या लाभातच आपण अडकून पडायचे आहे का मोजावी लागणारी किंमत बघून जागे व्हायचे आहे हा खरा प्रश्न आहे. आपणच आपले ढोंग ओळखू शकतो .ढोंगासाठी मोठी किंमत मोजावी लागत असूनही ते आपण तसेच जागेवर कसे ठेवू शकतो याचा विचार करावा.

वर्तणूकीच्या या चक्रामध्ये व्यत्यय आणणे आणि ते बदलणे हा पर्याय तुम्ही स्वतःच निवडू शकता.
तुम्ही संवादाचा नवीन मार्ग शोधू शकता. तुम्ही आनंदी राहण्यासाठी सतत नवनवीन शक्यता निर्माण करु शकता. सुसंवादाचा नवीन मार्ग आणि प्रेम आणि करुणेच्या नवनवीन शक्यताच आपल्यासाठी जास्त महत्वाच्या आहेत.

*तुमच्या वर्तणुकीच्या पॅटर्न चा अभ्यास करा* - एका प्रसिद्ध अभिनेत्याला विचारले होते. तुम्ही फार तापट आणि रागीट स्वभावाचे आहात. तुमच्या सडेतोड बोलण्यामुळे बरेच लोक दुखावतात . याबद्दल तुमचे काय मत आहे. तर ते म्हणाले ,"असे होते हे मला माहित आहे. पण जायनाका दुखावली गेली तर,जी माणसे दुखावली जातात ती त्याच लायकीची असतात."
असला बेफिकिरपणा,
बेजबाबदारपणा तुम्हाला परवडणारा आहे का .
याच अभिनेत्याला साठीनंतर विचारले होते, आता तुमच्या वागण्या,बोलण्यात काही बदल झाला आहे का. तर ते म्हणाले ,"हो झाला आहे ना. पूर्वी रागावल्यावर मी मोठ्या आवाजात शिवी द्यायचो, आता हळू आवाजात देतो."

तुम्हीही जर असेच वागत-बोलत असाल तर होणाऱ्या लाभाचा आणि मोजाव्या लागणाऱ्या  किंमतीचा हिशोब तुम्हीच लावा.

सामाजिक झाड ( Community tree) अशी एक टर्म वापरली जाते. तुमचे आयुष्य हे जर एक झाड आहे असे मानले तर जन्म झाल्यापासून आतापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला भरपूर सामाजिक फांद्या फुटतात. जसे की, कुटुंबीय,शेजारी,गाववाले,शाळा- कॉलेज मित्र,शिक्षक,नातेवाईक, नोकरी-प्रोफेशन-उद्योग-व्यापरातले लोक,खेळ,
सहली,परदेश प्रवास, आवडीची क्षेत्र जसे की , सांगीतिक,सामाजिक,सेवाभावी,राजकीय,सांस्कृतिक,आध्यात्मिक क्षेत्र,छंद, पुढे मुलांमुळे निर्माण होणारा लोकसंग्रह,इ. अशा या प्रत्येक फांदीवर कितीतरी लोक जोडले गेलेले असतात. याचाच आपण नेटवर्क असे म्हणतो.
तुमच्या चांगल्या वागण्या-बोलण्यामुळे लोक जोडले जातात तर वाईट वागण्या-बोलण्यामुळे लोक तोडले जातात. केवळ तुमच्या उद्दामपणामुळे, विनाकारण तुम्हीच तुमच्या सामाजिक झाडाच्या किती फांद्या किंवा त्यावरील लोक दुखावले आहेत , नाराज केले आहेत, याचे आत्मपरीक्षण अधून मधून केले जावे.

*सतत तक्रारी किंवा प्रतिक्रियांची सवय*- तुमच्यात जे चांगले आहे त्याचा उपयोग तुम्ही इतरांना डॉमीनेट करण्यासाठी तर करत नाही ना. म्हणजे तुम्ही जर परफेक्टनिस असाल तर जे परफेक्ट नाहीत त्यांना सतत टोचून बोलायचे आणि पाणउतारा करायचा. दुसऱ्यांच्या  कामाबद्दल,
वागण्या-बोलण्याबद्दल,निर्णयाबद्दल तुम्ही सतत तक्रार तर करत नाही ना. सतत प्रतिक्रिया देऊन त्यांना हैराण तर करत नाही ना. तुमच्या तक्रारी, प्रतिक्रिया खऱ्या असतात का खोट्या. का उगीचच स्वतःचा अहंकार सुखावण्यासाठी तुम्ही असे वागता. तुम्हाला असे वागून खरंच आनंद मिळतो का अघोरी आनंद . तुमची वर्तणूक आणि कृती productive आहे का unproductive याचे आत्मपरीक्षण करायला हवे.

हे ढोंग म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अहंकार आहे. अहंकार सोडा आणि माणसं जोडा.

योगीराज देवकर.
लेखक आणि प्रेरक प्रशिक्षक.
www.motivationacademy.in