Friday 9 June, 2023

श्री नितीन साने फॅक्टरी व्हिजिट

 *Omega Sinto Sane Foundry Machinery Pvt Ltd. Pirangut, Pune.*


उद्योजक श्री नितीन साने यांचे वडील नगरला फिरोदिया फौंडरीत नोकरीत होते. तिथे त्यांनी सॅन्ड आणि तिचा पुनःवापरचा अभ्यास केला आणि त्यांनी असा विचार केला की, आपणच हा व्यवसाय का सुरु करू नये आणि पिरंगुट मध्ये साने फौंडरी मशीनरीची सुरुवात झाली. पुढे नितीन साने मेकॅनिकल इंजिनीअर झाले आणि त्यांनी या व्यवसायाची भरभराट केली आणि आता त्यांचा मुलगा सिद्धार्थ तिसरी पिढी रोबोट्रिक्स मध्ये एमएस करून त्यांना जॉईन झाला आहे. अशा एका जगभर नावारूपाला आलेल्या उद्योगाला Entrepreneurs' International Club मुळे भेट देण्याचा योग आला. श्री साने त्यांच्या उद्योगाच्या प्रगतीचा रोमांचक प्रवास समजून घेताना सर्वांनाच खूप आनंद झाला.


1991-92 ला देशात जागतिकरणाचे वारे वाहू लागले. अनेक परदेशी कंपन्या भारतात आल्या त्यामुळे डिझाईन, क्वालिटी, मार्केट शेअर, प्राईस अशा सगळ्याच फ्रंटवर स्पर्धा सुरु झाली. अशावेळी त्यांना ओमेगा कंपनी सोबत 50:50 भागीदारी करण्याचा योग आला याचीही मोठी सुरस कथा त्यांनी आम्हाला सांगितली.


Chemically bounded sand चा वापर सुरु झाला होता अशावेळी ओमेगाचे foundry equipments आणि machinery निर्माण करण्यात technical know-how, designs, product quality सर्वच पातळ्यावर फार सहाय्य झाले. सध्या Sinto या जापनीज् कंपनीने ओमेगाचे नव्वद टक्के शेअर्स घेतले आहेत त्यामुळे साने ओघानेच सिंटो कंपनीशी जोडले गेले आहेत. याशिवाय गार्गी ही फौंडरी केमिकल उत्पादक कंपनी साने ग्रुपच्या मार्केटिंगचे काम करते त्यामुळे ओमेगा सिंटो साने कंपनीला मुबलक ऑर्डर्स मिळत आहेत.


Chemically bounded sand equipments & foundry machinery निर्माण करणाऱ्या या कंपनीचे Sand mixer, Mould handling equipment, Core making machinery, Shakeouts, Sand reclamation plant, Coating plants असे बरेच प्रॉडक्ट्स आहेत. ते नवीन फौंडरी लेआऊट डिझाईन आणि एक्सपान्शन अशा टर्न की प्रकल्प उभारणीचे कामही करतात. त्यांना लेझर कटिंगचे आऊटसोर्स करावे लागते.


56 म्हटले की, आपल्याला आठवेल अबतक  छप्पन सिनेमा किंवा 56 इंच छाती पण इथे ओमेगा सिंटो साने कंपनीने 56 देशात त्यांचा ग्राहकवर्ग तयार केला आहे. भारतात त्यांच्या 3500 समाधानी ग्राहक कंपन्या आहेत.


पिरंगुट येथे 40000 आणि 10000 चौ.फु. च्या दोन कंपन्या. कोथरूड मध्ये उपर मकान नीचे दुकान असे 2000 चौ.फु.ऑफिस. अशा विस्तारलेल्या कंपनीला भेट देवून समाधान वाटले.

योगीराज देवकर.

9403733901

www.motivationacademy.in

श्री एस पी रानडे उर्फ तात्या

 आदरणीय श्री सुरेश परशुराम रानडे सर.


मिटकॉन चे पहिले व्यवस्थापकीय संचालक. बहुतेकांना मिस्टर एस पी रानडे म्हणून परिचित तर जवळच्या लोकांचे तात्या. आदरणीय श्री सुरेश परशुराम रानडे सरांनी 31 मार्च 2023 रोजी वयाची नव्वद वर्षें पूर्ण केली आहेत.आ.तात्यांना वाढदिवसा निमित्त आणि पुढील दशाकाच्या आरोग्यपूर्ण जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.


नोव्हेबर 1985 मध्ये मिटकॉन ली.मध्ये ट्रेनर मोटिव्हेटर पदी सिलेक्शन्स झालेली माझी तिसरी बॅच. माझ्या बॅच मध्ये सुनील चांडक, राजकुमार फटाटे, अरुण गाट आणि सुभाष कारले हे ट्रेनर्स होते. तेव्हाच रानडे सरांचा पहिल्यांदा परिचय झाला. पुढे तीन वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी ट्रेनर म्हणून जडणघडण झाली. ऑक्टोबर 1988 नंतर आम्हा सर्व ट्रेनर्सची रवानगी MCED मध्ये झाली होती.आम्हाला Entrepreneurship Trainers Training Program करिता EDII अहमदाबादला पाठविले होते.तिथेही ते ट्रेनर्सना भेटण्यासाठी आणि मार्गदर्शन करायला आले होते.


मला आणि सुनील चांडकला पहिला डेमो 'उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम' ठाणे शहरात करायचा होता. इथं आमचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुरु झाले. मी एक साधे फोल्डर घेऊन फिरायचो. सर कुठूनतरी एका सेमिनारहुन आले होते.तिथे त्यांना एक छान ऑफिस बॅग मिळाली होती त्यांनी ती मला भेट दिली आणि इथून पुढे ऑफिस बॅग वापरत जा असा सल्ला दिला . आम्ही ऑफिस फाइल्स तयार केलेल्या नव्हत्या हे लक्षात आल्यावर त्यांनी एकजणाला ऑफिस फाइल्स विकत आणायला लावल्या. कोणकोणत्या विषयासाठी फाईल लागतील त्यानुसार त्यावर नावे लिहायला लावली.अगदी कागदांना स्टेपलर पिन कशी मारावी, कागदाला पेपर पर्पोरेटरने होल कसे करावेत, इतक्या बारीकसारीक गोष्टी त्यांनी आम्हाला शिकविल्या.ते म्हणायचे प्रत्येक काम चांगलं करायचं एक शास्त्र असते.तसा मला नीटनीटकेपणा आवडायचाच पण सरांमुळे त्यात भर पडली.


मी आणि सुनील चांडक ठाण्यात गोखले रोडवरील एका सोसायटीत रहात होतो . मिटकॉनचा एम डी असलेला हा माणूस एकदा चक्क आमच्या खोलीवर आला होता,याचे आम्हाला फार आश्चर्य वाटले होते. तसे ते पुण्यात आपटे रोडवर बंगल्यात रहायचे पण त्यांचा भांडुपला राम रतन त्रिवेदी रोडवर एक फ्लॅट होता. तिथे असल्यावर ते आम्हाला संध्याकाळी तिकडे बोलवायचे, सोसायटीत कट्ट्यावर बसून आमच्याशी गप्पा मारायचे, फारच उशीर झाला तर बाहेर डिनरला घेऊन जायचे. हेतू एकच असायचा आमच्यातला ट्रेनर घडविणे. महाराष्ट्रात गुजरात प्रमाणे उद्योजकता विकास करायचा हे त्यांचे स्वप्न होते आणि आम्ही ट्रेनर्स त्या स्वप्नाचे माध्यम होतो. 


एकदा इंडस्ट्रिज असोसिएशन, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये त्यांचे एक व्याख्यान होते. तिथे ते आम्हाला घेऊन गेले होते. उद्योजकता विकासाचा प्रचार प्रसार कसा करायचा याचा तो धडा होता. दुसऱ्या दिवशी एका रोटेरिअन उद्योजकाने त्यांना भेटायला बोलावले होते. तो माणूस पूर्णवेळ इंग्लिश मध्ये बोलला पण रानडे सर मात्र त्यांच्याशी मराठीत बोलले. याबद्दल त्यांना विचारले तर ते म्हणाले, "त्यांना मराठी समजते तर मग इंग्रजीत का बोलायचे आणि ठाण्या मुंबईत असला तरी आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांसाठी काम करायचे आहे.मातृभाषेत लोकांना जास्त चांगले समजते."


त्या काळात Entrepreneurship Development विषयावरील साहित्य इंग्लिश मध्ये उपलब्ध होते. सरांचे म्हणणे होते की, महाराष्ट्रातील लोकांमध्ये जर उद्योजकता रुजवायची असेल तर हे साहित्य मराठीत भाषांतरित करणे आवश्यक आहे. पुढे मी अनेक पेपर्स, नोट्स मराठीत करण्याचे काम केले.


तात्या बऱ्याचदा डेक्कन क्विनने प्रवास करायचे एकदा चर्चा करण्यासाठी त्यांनी आम्हाला कल्याणला येऊन व्हीटीचे फर्स्ट क्लासचे तिकीट काढून ते बसलेल्या बोगीत भेटायला बोलावले होते. ठरल्यानुसार डेक्कन क्विन मधून आमचा कल्याण - व्हीटी (आत्ताचे सि एस टी ) प्रवास सुरु झाला. सर म्हणाले, "या भेटीसाठी आपला बराच खर्च होत आहे. आपल्या हातात आता मिटिंग साठी सव्वा तास वेळ आहे. आता आपण इतकी उपयुक्त चर्चा करू की मीटिंगच्या खर्चापेक्षा पाच पट अधिक फायदा व्हायला पाहिजे." Effectiveness, efficiency, input v/s output चे हे उत्तम उदाहरण होते. व्हीटी ला उतरून ते त्यांच्या कामाला मुंबईत गेले आणि आम्ही आमच्या कामासाठी ठाण्याला परतलो.


सर आम्हाला नेहमी सांगायचे की," Trainer must be X plus something. तुमचा ट्रेनी जर X असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तच असले पाहिजे. कायम अभ्यास करत रहा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहितच हवी असे नाही तर ती कोणाला माहित आहे हे तरी तुम्हाला माहित हवे."


एकदा एका ट्रेनर ने त्यांच्याकडे दुसऱ्या एका ट्रेनरची चुगली केली होती. तेव्हा सर म्हणाले होते की," एकतर तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय तो इथे हजर नाही.जे काही बोलायचे ते समोरासमोर बोला.दुसरे असे की, ज्या अर्थी त्याच्या गैरहजेरीत तुम्ही त्याच्याबद्दल बोलताय तसेच तुम्ही माझ्या गैरहजेरीत माझ्याबद्दलही बोलाल. हा तुमचा स्वभाव दिसतोय.याला बॅक बायटिंग म्हणतात. हे पहिले आणि शेवटचे, यापुढे असे बॅक बायटिंग करायचे नाही."


मी बोलताना, लिहताना माझी ओळख वाय एच देवकर अशी करायचो. सर म्हणाले, "माझं ठीक आहे रे सुरेश परशुराम ऐवजी मी एस पी रानडे लिहतो. तुझे नाव किती छान आहे योगीराज. नेहमी योगीराज हरिश्चंद्र देवकर पूर्ण नावाचा वापर कर."


सर मराठी, इंग्लिश मध्ये उत्तम भाषणे करायचे. एकदा मी म्हणालो, सर, तुम्ही फार छान भाषण करता. मी बऱ्याचदा भाषण करताना तुमची कॉपी करतो. तर सर म्हणाले,"मी छान बोलतो ते मला माहित आहे रे. आता तुम्ही छान भाषण करायला शिका. कोणाची कॉपी करू नका. प्रत्येकाची स्वतःची अशी एक खास शैली असते. आता तुझी स्वतःची भाषणाची शैली तयार कर."


काही ट्रेनर्स सरांच्या खूप पुढं पुढं करायचे. सरांना खूष करायचा प्रयत्न करायचे. तेव्हा सर म्हणायचे मला माहित आहे तुम्ही चांगले आहात. पण मी तुम्हाला चांगलं म्हणावं म्हणून काम करू नका. ज्यांच्यासाठी तुम्ही काम करत आहात ना त्या प्रशिक्षणार्थिंनी तुम्हाला चांगलं म्हणावं असे काम करा. थोडक्यात बॉस ने नव्हे तर ग्राहकाने चांगलं म्हणावं असे काम करा.


एक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे पाच-सहा महिन्यांचा कार्यकाळ असायचा. तेव्हा एखाद्या जिल्ह्यात हा कार्यक्रम होणे म्हणजे काहीतरी नावीन्यपूर्ण, वैशिष्ठपूर्ण घडत आहे असे वातावरण होते. आता माझे ठाणे, पुणे,नांदेड चे कार्यक्रम पूर्ण होऊन माझा रत्नागिरी येथे चौथा कार्यक्रम सुरु होता. त्या कार्यक्रमाचा Achievement Motivation Training (AMT) गणपतीपुळे येथे झाला होता. त्या काळी महाराष्ट्रात मनोहर नाडकर्णी सोडले तर AMT घेणारे कोणी नव्हते. हा AMT घ्यायला EDII अहमदाबाद वरून रमेश दवे सर आले होते. त्यांचा AMT चालू असताना मी 20-25 पानांच्या नोट्स काढल्या. त्यांनी पाहिल्यावर मी त्यांना सांगितले की, मला AMT ट्रेनर व्हायचे आहे. ते म्हणाले या 20-25 पानांनी काय होणार. आता लगेच माझा सिंधुदुर्गच्या कार्यक्रमासाठी पुढचा AMT इथेच होणार आहे त्यात तु तीन दिवस शब्द न शब्द लिहून काढ. मी त्यांचे ऐकले आणि खरंच शंभर पेक्षा जास्त पानांच्या नोट्स काढल्या. नंतर त्यावर आधारित AMT Trainers Manual तयार केले. ते जेव्हा मी रानडे सरांना दाखविले तेव्हा ते प्रचंड खूष झाले आणि म्हणाले, "तु फार मोठं काम केलेलं आहे. आता सांग मी तुझ्यासाठी काय करू." मी म्हणालो मला प्रत्येक्ष AMT घ्यायला परवानगी द्या. त्यांनी मला गावात मित्रांना एकत्र करून AMT घ्यायला सुचविले. थोडक्यात उंदरांवर प्रयोग करतात तसे हे होते. मग मी लोणी देवकर या गावात माझ्या मित्रांना एकत्र करून माझा पहिला वहिला AMT यशस्वी केला आणि मी AMT ट्रेनर बनलो. पुढे मी महाराष्ट्रात शेकडो AMT घेऊन इतिहास घडविला ते अनेकांना माहित आहे. पण माझ्या या कार्याचा पाया रानडे सरांमुळे तयार झाला  होता.


पुढे माझ्या पहिल्या 'उद्योजकता ' पुस्तकाची संहिता तयार झाली . रानडे सरांनीच कॉन्टीनेंटल प्रकाशन कडे माझ्या पुस्तकाची शिफारस केली होती . माझी कॉन्टी्नेंटल प्रकाशनचे श्री अनिरुद्ध कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली आणि पुढे आमचे खूप छान सूर जुळले.माझे पहिले पुस्तक प्रकाशित झाले आणि मी खऱ्या अर्थाने लेखक झालो . माझे पहिले पुस्तक रानडे सर आणि बारामतीचे बहुप्रेरित आप्पासाहेब पवार यांना अर्पण केलेले आहे.रानडे सर "उद्योग संधी, शोधा म्हणजे सापडेल", असं ते नेहमी म्हणत असत . तेच माझ्या दुसऱ्या पुस्तकाचे टायटल आहे.


कुठंलाही नवीन पुस्तक वाचलं, नवीन माहिती समजली की, सर आम्हाला बोलवून सांगत असत. ते म्हणायचे," आरे तुम्ही फार नशीबवान आहात रे. जी माहिती समजायला मला 52 वर्षें लागली ती तुम्हाला ती तुम्हाला वयाच्या 24व्या वर्षी समजत आहे रे. याचा सगळ्यांना फायदा होऊद्या."


नोकरीत चांगला बॉस मिळायला नशीब लागते असे म्हणतात. माझं नशीब चांगलं होतं की, मला रानडे सर बॉस म्हणून लाभले. या माणसाला माणूस कसा घडवायचा हे शास्त्र समजलेलं आहे. उद्योजकता विकास हे त्याचं पहिलं प्रेम होतं आणि कन्सल्टन्सी दुसरं. त्यामुळे तुलनेनं ते ट्रेनिंग ला जास्त वेळ द्यायचे.


आपल्याकडे काही लोकं नोकरी झोकून देऊन करतात अगदी स्वतःचं, घरचं कार्य असल्यासारखं. वेळ, काळ, भुक, तब्बेतीचं भानही ठेवत नाहीत. त्यांना कुणी टार्गेट द्यायची गरजच नसते, तेच स्वतःचे टार्गेट ठरवितात. अशी लोकं नोकरी वेतनासाठी नाही तर आनंद आणि समाधानासाठी करतात.माझ्या आई वडिलांचे संस्कार आणि रानडे सरांची शिकवण यामुळे मीही अशीच नोकरी केली.रानडे सरांनी स्वतःच्या कार्याने मिटकॉनला सामाजिक चेहरा मिळवून दिला. माझ्या बॅचच्या ट्रेनर्सने देखील त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आपापल्यापरीने महाराष्ट्राच्या उद्योजकता विकासात खारीचा वाटा उचलला आणि त्यांनी जसं आम्हाला घडवलं तसं आम्ही जुनिअर्सना घडविण्याचा प्रयत्न केला.


श्री सुरेश परशुराम रानडे सर उर्फ तात्या तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने शतक पूर्ण करण्यासाठी आभाळभर शुभेच्छा.


योगीराज हरिश्चंद्र देवकर.