Monday 1 June, 2020

लॉक डाउन मधील माझी कथा

लॉकडाउन मधील माझी कथा.
२२ मार्च २०२० रोजी Janata Curfew झाला त्यापाठोपाठ भारत लॉकडाऊन झाला आणि  स्वयंपाक व स्वच्छता घरकाम करणाऱ्या मावश्या कामाला येणे बंद झाल्या. त्यांच्या गैरहजेरीत स्वयंपाकाची जबाबदारी अनिता मॅडमने घेतली आणि स्वच्छतेची जबाबदारी माझ्याकडे आली.

मॅडमला स्वयंपाकाचा ३१ पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे त्या या कामात सुगरण आहेत. शिवाय मॅडमला बोलायला खूप खूप आवडते त्यामुळे त्यांच्या कामाची प्रसिद्धी सहजासहजी होतच आहे. माझा विषय निघालाच तर त्या म्हणतात यांना फक्त पाणी आणि दूध गरम करता येते, झालं ,संपला माझा स्वयंपाक घरातला रोल. तेव्हा मी विचार केला आपणच आपली कथा लिहावी.

घर स्वच्छता हा एक लहानसा शब्दप्रयोग असला तरी त्याच्या   Role & scope चा विचार केला तर त्यात पुष्कळ कामांचा समावेश होतो. घर झाडणे,पोछा मारणे,भांडी धुणे,शेगडी,ओटा,सिंक,बेसिन,मोरी,बाथरूम,टॉयलेट साफ करणे, टेबल टॉप पुसने, कपडे भिजवणे,वॉशिंग मशीन लावणे,कपडे वाळू घालणे आणि नंतर घड्या घालणे,पिण्याचे पाणी भरणे, कुंड्यांना पाणी घालणे,इ. लॉकडाउन ४.०,५.० वगैरे असा वाढत राहिला तर यात किचन ट्रॉलीज,किचन चिमणी,पंखे,खिडक्यांच्या काचा,आरशे, भिंतीवरील जळमटे,इ. अशी भर पडू शकते.

याशिवाय धोका पत्करून दळण टाकणे आणि आणणे,भाजीपाला,किराणा,मेडिकल अशी बाहेरची कामे पण असतात. यातली काही कामे दररोज असतात,काही दिवसात ३-४ वेळा( भांडी),काही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा,काही गरजेनुसार असतात.

कामवाल्या मावशीला इतकी कामे नसतात पण मी आता कामवाला मामा झालो आहे.

या लॉकडाउन मुळे भारतातील सेलेब्रिटीज वर स्वतःच्या मुलांचे केस कापण्याची वेळ आली आहे तिथे माझ्यासारख्या सामान्यांचे काय असा विचार करून समाधान मानण्याचे हे दिवस आहेत.

आपले शिक्षण कधी न कधी उपयोगाला येते असे म्हणतात ते अगदी खरे आहे. मी प्राथमिक शाळेत शिकत असताना संत गाडगेबाबांचा स्वच्छते विषयीचा एक धडा होता. त्यात झाडू मारताना तो ४५ अंशात धरावा असे शिकविले होते. त्याचा मला आता फायदा होत आहे.
सध्या मी माझे शिक्षण,अनुभव,कला-कौशल्ये,या सगळ्याचा ही जबाबदारी पार पाडण्यासाठी उपयोग करत आहे. याशिवाय  मॅडमचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण आहेच.
पोछा मारताना कडे,कोपरे आणि सोफा वगैरे हलवून मारला जातो. मॅडमला कामाची जराही देखरेख करावी लागत नाही आणि मॅडमने माझ्या कामाविषयी एकदाही तक्रार केलेली नाही.

अनुभव हा सर्वात मोठा गुरू असतो, जसे की ...
चहा,दुध,भाजीसाठी वापरलेले भांडी थोडावेळ भिजू द्यावीत ,म्हणजे सहज स्वच्छ होतात.
तेलकट,तुपकट भांडी स्वतंत्र धुणे म्हणजे इतर भांडी तेलकट होत नाहीत.
फ्राय पॅन सारखी भांडी रोज न धुता विसळून वापरली जातात,अन्यथा त्याचे कोटिंग निघून जाते आणि त्यासाठीचा स्क्रबर वेगळा असतो.
विम बार भिजत राहिला तर लवकर संपतो, तो कोरडा राहील असे पहावे.
सरफेस क्लीनर  डायल्यूट करून वापरावे, ते कॉनसनट्रेटेड असते.
टेरेस आणि घर पुसायचे कपडे वेगवेगळे असतात.
झाडू मारताना पुढे सरकायचे असते आणि पोछा मारताना मागे.
पुरेसे कपडे साठल्यानंतरच वॉशिंग मशीन लावावी. तसही वॉशिंग मशीनला सध्या फार काम नसते. कारण फॉर्मल कपड्यांचा वापर थांबलेला आहे.
खरंतर  लॉकडाउन मुळे बऱ्याच गोष्टी थांबलेल्या आहेत असे माझे निरीक्षण आहे. घराची बेल,दारावरचे कुलूप,चपला आणि बूट,लिफ्ट,दुचाकी,चारचाकी,फॉर्मल कपडे,कपडे इस्त्री करणे,दाढी करणे,महिलांचे नटने,कोणी आपल्या घरी येणे किंवा आपण कोणाकडे जाणे,तुम्ही कदाचित विसरले असाल...पण तुमच्या त्या नेहमीच्या खऱ्या जबाबदाऱ्या, आणि हो ते तुमचे व्हाट्सअप्प स्टेटस,इ.

काम चुकवायचा काही पळवाटा असू शकतात पण त्याचा शोध अजून मला लागलेला नाही.

इतके सगळे काम केल्याचे काही फायदे होतात. घरात संतुलन राहते .काम करत राहिल्याने वजन नियंत्रणात राहते. वेळ कसा जातो हे कळत नाही. आपण उगाचच बसून फुकटचे खात आहोत असली अपराधीपणाची भावना रहात नाही. घरात बसून का होईना पण आपण स्वच्छ भारत योजनेला हातभार लावत आहोत असे वाटते आणि झोप छान लागते.

असे सगळे असले तरी मॅडम म्हणतात तुमची स्वच्छता ही बाह्यातली असते. तुम्हाला hygiene, hygienic मधले काही कळत नाही. हे ऐकल्यावर असे वाटते की बायका IAS चे कसलेही फॉर्मल ट्रेनिंग नघेता IAS अधिकाऱ्यासारख्या कशा काय वागतात. त्या pampering technique, puncturing technique कुठे शिकलेल्या असतात. त्यांना सर्वंच विषयांचे ज्ञान कसे काय असते. त्यांचा आत्मविश्वास नेहमीच कसाकाय जास्त असतो.  चुकल्या तरी त्याच कशाकाय बरोबर असतात .दुसऱ्याच्या कामातून ISO इतकी दर्जेदार अपेक्षा कशी ठेवतात. हे मलाच काय सर्वांनाच पडलेले कोडे असावे.

बायको ही घरातली गृहलक्ष्मी,राजलक्ष्मी असते . घरातली ती गतिचलित (Kinetic) ऊर्जा असते. यातच याचे उत्तर असावे असे वाटते.

आपण उगीचच एखाद्या कामाला स्टेटस आहे का नाही असा विचार करतो. खरंतर कोणतेही काम तुम्ही जर उत्कृष्ट पद्धतीने पार पाडले तर तिथे दोनपैकी एक गोष्ट नक्कीच घडते. एकतर तुमच्या भूमिकेमुळे त्या कामाला प्रतिष्ठा मिळेल किंवा ते काम तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देईल.

मॉफ खरेदी करून माझे काम हलके करावे असे मॅडम अधून मधून बोलतात,पण आणतील तेव्हा खरे. आपल्याला काय आहे त्या साधनात काम करत रहायचे.

माझे काम एकूणच समाधानकारक चालले असावे असे मला मॅडमच्या वागण्या- बोलण्यातून जाणवते. हा लॉकडाउन जर असाच वाढत राहिला तर मला फक्त एकच भीती सतावत आहे. मॅडम सोसायटीतल्या इतरांकडे माझ्या कामाची शिफारस तर करणार नाहीत ना ?

मुळात मी एक लेखक , प्रेरक , प्रशिक्षक आहे हे मी तसेच तुम्ही पण विसरू नये म्हणून.
लक्षात असुद्या.
घरातच रहा , सुरक्षित रहा , जगाला प्रेरित करा आणि हो राहता ते घर तुमचेच आहे, घरात पडेल ते काम पण करा.
योगीराज देवकर.
www.motivationacademy.in