Wednesday 8 April, 2020

Your well-being एक पत्र

नमस्कार !

कसे आहात ? मजेत ना . असायलाच पाहिजे. आपल्या आयुष्याचा एक काळ असाच मजेचा आणि स्वावलंबनाचा होता. घरातला प्रत्येक सदस्य घरातले कोणते ना कोणते काम करायचा. हळूहळू आपल्याला सेवकांची सवय लागली आणि आपण परावलंबी तसेच आळशी झालो किंवा सुसाट वेगाने सो कॉल्ड प्रगतीच्या मागे लागलो.कोरोनाने आपल्याला ब्रेक लावला आहे आणि स्वावलंबी बनविले तसेच आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीत  जागरूक केले आहे . हेल्थ फर्स्ट. हेल्थ इज वेल्थ .इफ हेल्थ इज लॉस्ट, एवरीथिंग इज लॉस्ट. असे म्हणतात,तेव्हा आता आपण आरोग्यपूर्ण बनुया.

जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO) १९४८ मध्ये आरोग्याची खालीलप्रमाणे व्याख्या केलेली आहे.
' आरोग्य किंवा स्वास्थ्य म्हणजे शारीरिक,मानसिक किंवा बौद्धिक आणि सामाजिक सुस्थितीची पूर्ण अवस्था आहे आणि केवळ आजार किंवा रोगाचा अभाव नाही .'

शारीरिक स्वास्थ म्हणजे तब्बेत ठणठणीत असणे आणि कोणत्याही अवयवाशी निगडित कसलाही आजार नसणे. यासाठी जोर-बैठका, पुश अप्स, पुल अप्स, सूर्यनमस्कार,योगासने, असे पारंपरिक व्यायाम करा.

मानसिक स्वास्थ्य म्हणजे बौद्धिक तसेच भावनिक स्वास्थ्य.  सकारात्मक विचार,(positive)रचनात्मक विचार,(constructive)उत्पादक विचार सरणी ,(productive) जोपासा .  भावनिक स्वास्थ म्हणजे आनंद,आश्चर्य,दुःख,राग,भीती,तिरस्कार किंवा षडरिपु , अशा या स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्यांचे नियोजन करणे तसेच इतरांच्या भावना ओळखणे आणि त्यांचे नियोजन करणे,प्रेमाची आणि आनंदाची सदभावना जोपासणे.शुद्ध आणि सात्विक बना आणि आयुष्यात निराशेला थारा देऊ नका. यासाठी प्रेरक साहित्य वाचा , मानसशास्त्र, मानवशास्त्र, आध्यात्मिक पुस्तके वाचा. टीव्ही, डिजिटल मीडियावर चांगले सिनेमे,नाटके पहा. ध्यान करा.

सामाजिक स्वास्थ म्हणजे प्रत्येक सजीवाला (यात निसर्गातली सर्व सजीव सृष्टी आली )सुखाने जगता येईल असे सुरक्षित आणि पोषक सामाजिक वातावरण असणे.राज्यात,देशात,जगात सर्वत्र असे सामाजिक स्वास्थ्याचे, नागरिक शास्त्राचे भान असलेले नागरिक असणे. यासाठी स्वतःच्या अधिकाराबाबत सजग रहा आणि कर्तव्य पार पाडा. माणसे जोडा , सर्वांशी सुसंवाद करा.

पुढील काही दिवस  घरात बसावे लागणार आहे तेव्हा हा वेळ स्वतःसाठी, कुटुंबासाठी ,मित्र- हितचिंतकांसाठी,नातेवाईकांसाठी, देऊया आणि आरोग्यमय जीवन जगुया.

घरात रहा,सुरक्षित रहा, स्वतःचे आणि कुटुंबियांचे स्वास्थ्य जपा.

योगीराज देवकर.
www.motivationacademy.in