निर्मला फार्म- भाग चार - शेताचा कॉस्मेटिक चेंज.
माणसाला कसं केस कापले, दाढी केली तर बरं आणि हलकं हलकं वाटतं . तसंच काहीसं अधून मधून शेतालापण करावं लागतं.पूर्वी शेती विहीर बागायत होती तेव्हा विहिरीचेच पाणी शेतात खेळायचे त्यामुळे शेतात बाहेरून कोणतही नवीन तण येत नसे.आता उजनी जलशयातून लिफ्टने शेतात पाणी आणल्यामुळे टनटनी, कासल्या अशी कसलीही तणं शेतात बेमाप वाढत आहेत. ही तणं शेतातील अंतर्गत रस्ता म्हणू नका, बांध म्हणू नका सगळीकडे केस वेडेवाकडे वाढल्यासारखी वाढत आहेत. बांधावर वेड्या बाभळी तर शेतकऱ्यांच्या जणुकाही पाचवीलाच पूजलेल्या आहेत. दर तीन चार वर्षानंतर एकदातरी बांध, रस्ते, विहिरीच्या आजूबाजूची जागा JCB मशीन लावून साफ करावी लागते. याने शेत निर्मळ होते पण हा अनुउत्पादक ( Non productive ) खर्च मात्र होत राहतो.याला अजून एक पर्याय आहे तो म्हणजे शेतात पिकांना जसे तणनाशक फवारले जाते तसे पिकं सोडून जी रिकामी जागा आहे तिथे पण वेळीच फवारणे.
तण,खुरटी झुडपे याचे नियंत्रण कसे करावे याची दोन उदाहरणे माझ्याकडे आहेत. एक- माझे मामा, ते कधीच त्यांच्या शेतात काँगेस गवत वाढू देत नसत. काँग्रेस गवताचे रोप दिसले की लगेच ते उपटले जात असे. रोप परिपक्व होऊ दिले तर त्याच्या हजार बिया शेतात पडतात आणि आपणच तितके राक्षस निर्माण करतो असे ते म्हणत. तेव्हा बी यायच्या आधीच तणाचा नायनाट करा आणि अनावश्यक झाडे, झुडपे वेळीच काढा असं ते म्हणत आणि करत असत. दोन - माझे वडील, ते नेहमी असे म्हणायचे की, "शेतमजूराने आणि शेतमालकाने शेतात फिरताना नेहमी विळा किंवा कुऱ्हाड सोबत ठेवावी. कुठं तण, अनावश्यक झुडुप दिसले तर ते वेळीच उपटता येते किंवा तोडता येते.शेतात फिरले की, शेत काम सांगतं.शेतात फिरा आणि शेत चांगले ठेवा."
पूर्वी शेतात काम करणाऱ्या मजुरांची संख्या जास्त असायची.आमच्याच कडे 10-12 सालकरी शेतात कामाला असत. त्यामुळे शेतातील बऱ्याच गोष्टी नियंत्रणात रहायच्या. हल्लीचे शेतमजूर तणं, पिकं याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे पण अशा अनुउत्पादक खर्चात भर पडते .
काही वर्षांपूर्वी मी एक चूक केली होती. ती म्हणजे शेतात बांधावर कुंपण करावे म्हणून गजगा आणि मोगली एरंडाच्या बिया आणून लावल्या होत्या. गजगा तर इतका वाढतो की झाडाच्या आजूबाजूला 10-15 फूट जमीन व्यापतो. मोगली एरंडाची झुडपे पण चांगलीच मोठी होतात आणि हे दोन्ही फार कमी पाण्यात येते. आता दर दोन तीन वर्षांनी मला ही झुडपे साफ करावी लागत आहेत. चुकीला माफी नाही.
मे महिन्यात सतरा तास JCB ने आणि साडेचार तास ट्रॅक्टरने लेवल काम करून शेतात स्वच्छता मोहीम राबविली आणि शेताचे बांध, रस्ते आणि विहिरीजवळचा परिसर स्वच्छ केला आणि बांध दुरुस्त केले. यासाठी शेतकऱ्याचे तीन मॅन डेज् खर्च झाले.अशा कामात JCB, ट्रॅक्टर वाल्याचा हमखास फायदा होतो. या काढलेल्या वेस्टचे ढीगरे तयार केले आणि दिले पेटवून. आता कोण म्हणेल की, या वेस्टचे काही वेगळे मॅनेजमेंट नसते का करता आले. तर आले असते ना, पण माझ्यासाठी हाच स्वस्त पर्याय होता. आता या कॉस्मेटिक चेंजमुळे शेत एकदम स्वच्छ, निर्मळ झाले आहे आणि छान सुंदर दिसत आहे. असा शेतात होणारा अनुउत्पादक खर्च टाळता यायला हवा. अनावश्यक खर्च वाचवीने म्हणजे पैसे कमावनेच आहे. जून - जुलै मध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकासाठी शेत तयार झाले आहे.
लेखक...
योगीराज देवकर.
Motivation Academy.
No comments:
Post a Comment