Tuesday, 25 June 2024

लिफ्ट करादे l

 निर्मला फार्म - भाग पाच - लिफ्ट करा दे l खाजगी उपसा जलसिंचन योजना.


'तेरी उंची शान हैं श्री माँ 

मेरी अर्जी मान ले श्री माँ 

तु हैं सबकुछ जानने वाली 

मैं हूं तेरा मानने वाला 


मुझ को भी तो लिफ्ट करा दे 

थोडी सी तो लिफ्ट करा दे l'


श्री माताजी निर्मला देवी मुझ को भी तो लिफ्ट करा दे l


अदनान सामी चे सॉंग आठवण्याचे आणि थोडा बदल करून लिहण्यामागचे कारण म्हणजे माझे लिफ्ट, म्हणजेच खाजगी उपसा जलसिंचन योजना.


लोणी देवकर मधील माझ्या शेतापासून भावडी या गावापाशी उजनी जलाशय फुल्ल कंडिशन (अधिक )मध्ये साडेसहा किलोमीटर आणि एमटी( वजा )कंडिशन मध्ये आठ किलोमीटर अंतरावर आहे. माझ्या शेतातून खडकवासला मुठा उजवा कालवा गेला आहे. या कालव्याची वाट पाहण्यात माझ्या वडिलाची हयात गेली.नियोजित वेळेपेक्षा किमान वीस वर्षें उशिरा कालवा निर्माण झाला पण या जास्त खोलीतून गेलेल्या कालव्यातून आमच्या शेतीला कधीच पाणी मिळाले नाही. त्यामुळे या कालव्याचे वर्णन फक्त MIDC आणि  आमच्या शेतीचे विभाजन करणारी रेषा इतकच करता येईल.शेतीला थोडंही बागायती न करणाऱ्या या कालव्याचा कायतो इतकाच फायदा झाला की,कमांड एरियातील किंवा कॅनॉलमुळे संभाव्य ओलीताखाली येणारी शेती MIDC ला जाण्यापासून वाचली. कालव्यामुळे शेत बागायत होणार ही आशा पूर्णपणे मावळल्यानंतर 2013 मध्ये पुतण्या अमोल देवकरने चार -पाच एकर शेती विकून साहस केले आणि स्वतःच्या शेतात उजनी जलाशयातून लिफ्ट(खाजगी उपसा जलसिंचन योजना )करून पाणी आणले आणि भावाचे संपूर्ण शेत बागायती झाले.आता अमोल माझ्या मागे लागला. तुम्हाला फायद्याची शेती करायची असेल तर लिफ्ट शिवाय पर्याय नाही. 1998 पासून मी थोडीफार विहीर बागायती आणि बरीच जिरायती अशी नुकसानीची शेती करत होतो,त्यामुळे एकतर मला शेतात अजून गुंतवणूक करायची तयारी नव्हती आणि लिफ्टच्या खर्चाचे आकडे ऐकून तर ही योजना मला माझ्या आवाक्यात वाटत नव्हती . पण अमोलने पाठपुरावा करणे काही सोडले नाही.


श्री माताजींची इच्छा असावी असे मानून 5 जानेवारी 2014 रोजी एका इंजिनिअरकडून लिफ्टचा सर्वे करून घेतला . मी आणि इंजिनिअरने भावडी ते लोणी देवकर पाईपलाईन ज्या मार्गांवरून करायची आहे त्या पूर्ण मार्गांवरून पायपीट केली. इंजिनिअरने एकूण हेड 13 LPS साठी 81 तर 18 LPS साठी 87 मीटर  आहे,त्यानुसार 6"(160mm) पाईपलाईन फेज एक करण्यासाठी 8 kg चे 52, 6kg चे 200 आणि 4 kg चे 800 पाईप,फेज दोन साठी 4kg चे 200 पाईप असे एकूण 1250 प्लस पाईप लागतील. LBH40, TMH60,AMH40,TMHSSMTASM10 यापैकी कोणताही एक पंप चालेल,16 एअरवॉल बसविणे आवश्यक आहेत,5" NRVolve वापरावा, सक्शन पाईप 4" करावा,डिलिव्हरी पाईप 2.5" ठेवावा,इतर इलेक्ट्रिक डिटेल्ससह प्लॅन आणि एस्टीमेट डिझाईन करून दिले. खर्चाचा एकूण अंदाज दिला पस्तीस लाख रुपये.


दुसऱ्या दिवशी सकाळी मी याबद्दल विचार करत होतो तोच अमोल हजर आणि म्हणाला, "आबा तुम्ही दोनशे पाईपची व्यवस्था करा. सिद्धेश्वर थोरात आणि संजय पवारच्या पाईपलाईनचे काम चालू आहे. ते लोणी देवकरला चारी सुरु करून भावडी हद्दीत पोहोचले आहेत. त्यांच्या शेवटच्या 200-250 पाईपचे चारीचे काम बाकी आहे. भावाडीतलेच काम त्रासदायक असते. तुमचे हे काम त्यांच्यासोबत होवून जाईल. मी त्यांना बोललो आहे आणि ते हो म्हणून तुमच्यासाठी थांबले आहेत . तुम्ही फक्त दोनशे पाईपची सोय करा.उरलेली लाईन तुम्हाला एकट्याला करावी लागेल." झालं माझं विचार आणि कृती चक्र सुरु झाले.


मी पुण्यात परत आलो. आता मला दोन महत्वाची कामे करायची होती ती म्हणजे उजनी धरणातून पाणी उचलण्यासाठी पाणी परवाना मिळविणे आणि लिफ्टसाठी भांडवल उभारणी करणे . दुसऱ्या एका इंजिनिअरने लिफ्टचे प्रपोजल तयार केले, गावानकाशे जोडले, त्यावर पाईपलाईनचा मार्ग दाखविला आणि आवश्यक कागदपत्रासह हे प्रपोजल उजनी धरण कार्यालयात सादर केले.


मी नातेवाईकांशी बोललो तर लगेच मला मदतीचा ओघ सुरु झाला. मी स्वतः काही पैशाची व्यवस्था करे पर्यंत मला हे पैसे वापरायला मिळणार होते. पुढे कर्ज काढून मी नातेवाईकांचे पैसे परत केले आणि हे काम पूर्ण केले.एखाद्या कामाचा जेव्हा योगच आलेला असतो तेव्हा सगळ्या गोष्टी अशा विनासायास जुळून येतात. लगेच पाईप खरेदी केले आणि आमचे फील्डवरील काम सुरु झाले.


आठ किलोमीटर लांबी असलेल्या या पाईपलाईनचे काम दोन टप्प्यात होणार होते. पहिला टप्पा लोणीदेवकर मधील माझे शेत ते भावडी मधील धरण फुल्ल कंडिशन मध्ये असते तो जुन्या चारीवरील स्पॉट आणि दुसरा जुन्या चारीवरील स्पॉट ते धरण एमटी( वजा) कंडिशन मध्ये असते तो नव्या चारीवरील स्पॉट. दुसऱ्या टप्प्यामध्ये सिद्धेश्वर थोरात आणि धनंजय चव्हाण आणि मी एका चारीतून एकत्र पाईपलाईन केली आहे. या स्पॉट एक आणि स्पॉट दोनच्या चारी म्हणजे नदीपात्रातील पाणी सर्व शेतकऱ्यांनी खर्च करून कॅनॉल सारखा चर काढून जवळ आणले आहे ती जागा.याच जागेवर अनुक्रमे पहिली आणि दुसरी इलेक्ट्रिक मोटर बसवली जाते. पाईपलाईनसाठी JCB ने आठ किलोमीटर इतक्या मोठ्या अंतराची तीन फूट खोलीची चारी खोदने, चारी खोदताना इतर शेतकऱ्यांच्या आडव्या येणाऱ्या पाईपलाईन वाचवीने आणि फुटल्याच तर भरून देणे,चारीत 6" पाईप फिट करणे,जागोजागी एअर  व्हॉल्व्ह बसविणे आणि पुन्हा ती चारी बुजविणे हे फार अवघड आणि परीक्षा पाहणारे काम होते. याला किमान पाच- सहा महिन्यांचा कालावधी लागणार होता. विशेष म्हणजे भावडी आणि लोणीदेवकर गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून ही चारी काढावी लागणार होती आणि पाईपलाईन टाकावी लागणार होती. या मार्गात चार ओढे आणि पुणे - सोलापूर हायवे पुलाखालून क्रॉस करावा लागणार होता.


असा एक नियम ऐकीवात आहे की, एखादा 7/12 जरी त्या शेतकऱ्याच्या नावावर असला तरी त्या जमिनी खाली फक्त अडीच फुट खोली पर्यंतच त्याचा अधिकार असतो. याचा अर्थ जमिनीच्या खाली अडीच फुटानंतर सरकारचा अधिकार सुरु होतो . त्यामुळे एक - कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतातून अडीच फूट खोलीखालून पाईप लाईन टाकायची असेल तर तो पाईपलाईन वाल्याची अडवणूक करू शकत नाही. दोन - शेतकरी चारी काढू देत नसेल तर आणि तरीही शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन टाकायची असेल तर त्यास तहसील कार्यालयातून परवानगी मिळते. पण त्यासाठी तहसील कार्यालयाकडे रीतसर अर्ज करावा लागतो आणि त्यासोबत या आठ किलोमीटर पाईपलाईनच्या मार्गात ज्या शेतकऱ्यांची शेते येतात त्या सर्वांचे सातबारे जोडावे लागतात. मग ही सरकारी यंत्रणा या मार्गाचा अभ्यास करून सर्व शेतकऱ्यांना पाईपलाईनचे काम होणार असल्याचे परिपत्रक काढते.आता फक्त कल्पना करा की, कर्ज काढून व्याजाचे मीटर चालू असताना पाईपलाईन करायची असेल तर असा सरकारकडे अर्ज करून परवानगी मिळायला किती वेळ, श्रम, पैसा आणि त्रास सहन करावा लागेल.सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हणतात ते उगीच नाही.त्यामुळे कोणताही शेतकरी सरकारी कार्यालयात अर्ज प्रकरण न करताच मार्गात येणाऱ्या शेतकऱ्यांचे सहकार्य मिळवूनच हे काम करतो. याचा अर्थ ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून त्याला पाईपलाईन करायची आहे त्या प्रत्येकाला त्याला भेटावे लागते आणि त्याची मनधरणी करावी लागते आणि मान्यता मिळवावी लागते. कोण चांगला शेतकरी भेटला तर सौजन्य दाखवून परवानगी देतो. अडवणूक करणारे भेटले तर कोण पैसे पाहिजेत म्हणून, कोण त्याच्या शेतातले दगड उचलावे लागतील,कोण त्याच्या शेतात काळी माती भरावी लागेल, शेतात पिक असेल तर कोण उसाची रोपे आणून द्यावी लागतील किंवा मका पेरून द्यावा लागेल, कोण जाता जाता त्याच्या शेतातले एखादे काम JCB मशीनने फुकट करून द्यावे लागेल, अशी काहीतरी अट घालून परवानगी देतात.याला ते नुकसान भरपाई असे म्हणतात. याचे चांगले वाईट अनुभव मला आले आहेत.हे अनुभव हा काही आपला मेन विषय नाही पण जाताजाता दोन तीन प्रसंग सांगतो.हेच लिहीत बसलो तर कादंबरी तयार होईल.


एक शेतकरी मला भेटला . त्यांच्या शेतात ऊसाचे पिक होते. ते म्हणाले हा सुरु ऊस गेला की तुम्ही माझ्या शेतातून चारी काढा. खोडवा ऊसाच्या शेतातून दोन सऱ्यामधून आम्ही JCB ने चारी काढली आणि त्यांच्या शेतातील माझे पाईपलाईनचे काम झाले. यात त्यांच्या पिकाचे थोडेफार नुकसानपण झाले. याबद्दल मी त्यांच्यासोबत बोलत होतो तर ते म्हणाले, " होऊद्याहो थोडसं नुकसान. त्यात काय एव्हढं. पण एखादा शेतकरी जर दुसऱ्या शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातून पाईपलाईन नेहू देत नसेल तर तो जातिवंत शेतकरीच नाही. " शाब्बास रे माझ्या शेतकरी भावा!


एका शेतकऱ्याने आमची अडवणूक केली होती. इतकेच पैसे पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांची मागणी जरा जास्तच अवास्तव होती. आम्ही त्यांच्या शेतात बैठकीला बसलो होतो . पण काही केल्या तो आकडा कमी करायला तयार नव्हता. मग मीच त्यांना उपरोधाने म्हणालो, " आपण इथे आमची पाईपलाईन तुमच्या शेतातून जावू देण्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील ही चर्चा करायला बसलो आहोत का तुमच्या शेताचा सौदा करायला बसलो आहोत." पण दुर्दैव, त्याला माझे उपरोधीक बोलणे समजले नाही. तो म्हणे, " पाईपलाईनची चर्चा करायला." शेवटी त्याने काही रक्कम कमी केली हे आमचे नशीब समजायचे.


एक काकू तर अशा भेटल्या की, आयुष्यात जणुकाही  एखाद्या देवकरचा बदला घेण्याचीच त्या वाट पहात होत्या. काय तर म्हणे, माझ्या पुतण्या आणि भावाने त्यांच्या मुलाच्या करिअरचे नुकसान केले आहे. आता मी तुम्हाला पैसे दिल्याशिवाय शेतातून पाईपलाईन करू देणार नाही. आम्ही जंग जंग पछाडले पण त्यांनी त्यांना हवी ती रक्कम घेऊनच मला परवानगी दिली. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. असो!


भावडीतला एक शेतकरी तर सगळ्यां पाईपलाईनवाल्यांना असा भेटतो जो त्याच्या शेतातून पाईपलाईन करू देण्यासाठी जी नुकसान भरपाई घेतो त्याला तो पाण्यासारखा लाभलेला पैशाचा झरा समजतो. धन्य आहे हा शेतकरी दादा.


भावडी गावात आम्हा तिघांना पैसे घेऊन परवानगी देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही साधारणपणे तीन लाख रुपये रक्कम मोजली.आता पण आमच्यामुळे तुमची शेती सुधारली अशी या गाववाल्यांची भावना आहे.लोणी देवकर गावाच्या हद्दीत मात्र मला कोणा शेतकऱ्याचा त्रास झाला नाही.


या कामात मला अनेक चांगले लोक भेटले, ज्यांनी मला आऊट ऑफ दी वे जाऊन मदत, मार्गदर्शन आणि सहकार्य केले. पाईपलाईनचा जवळचा, सोपा मार्ग सुचविला. कोणी इतर शेतकऱ्याला मदत देण्यासाठी समजावून सांगितले. यात पोपट डोंगरे, अमोल देवकर, अशा अनेक शेतकऱ्यांची नावे घ्यावी लागतील.माझा मुलगा अमेय याने देखील या कामाची देखरेख केली.या सर्वांचा मी आभारी आहे.


दहा वर्षांपूर्वी पंचवीस लाख रुपये फक्त पी व्ही सी पाईपचे बिल झाले. या चारीच्या मार्गात काही ठिकाणी खडक होता तो फोडण्यासाठी ब्लास्टिंग साठी तीस हजार रुपये खर्च झाला. JCB ने चारी काढायला दीड लाख रुपये लागले,तर ती परत बुजवायला चाळीस हजार रुपये लागले. पाईपलाईन जोडणारास एक लाख रुपये दिले. दोन इलेक्ट्रिक मोटरी, MSEB डीपी आणि कनेक्शन चार्जेस, खालील चारीवर सभासद होण्यासाठी पन्नास हजार द्यावे लागले,इतर खर्च,बघता बघता खर्च पस्तीस लाखाच्या पुढे कधी गेला ते समजले पण नाही. ज्या शेतकऱ्यांनी आणि हो अधिकाऱ्यांनी माझ्याकडून पैसे घेतले आहेत त्यांची माझ्या डायरीत नोंद आहे.


चारी काढण्याचे काम ज्यांनी केले ते सोमनाथ डोळे हे JCB चे चालक होते. एकदम एक्स्पर्ट चालक. जमिनीवर असं काही मशीन चालवायचे जसं काही सुरीने केक कापत आहेत. एकतर या माणसाने गावातल्या बहुतेक लोकांच्या पाईपलाईन केल्या आहेत. त्यामुळे या आठ किलोमीटर अंतरात कोणाची पाईपलाईन उभ्या, आडव्या कोठून गेली आहे हे त्यांना शंभर टक्के माहित होते. त्यामुळे शक्यतो ते कोणाची आडवी आलेली पाईपलाईन फुटू देत नव्हते. एका ठिकाणी तर एका रस्त्याखालून आठ पाईपलाईन गेल्या होत्या. त्या तर त्यांनी वाचविल्याच पण त्यांच्या खालून माझे पाईप आणायला अलगद जागा निर्माण केली. शाब्बास रे पठ्ठ्या! पाईपलाईन वाचविली की मी त्यांना बक्षीस देत असे. कारण पाईप फुटला तर होणारा खर्च जास्त होत असे.


आपली परिस्थिती आहे त्यापेक्षा चांगली व्हावी म्हणून श्री माताजी कडे 'मुझ को भी तो लिफ्ट करा दे  l'

म्हणत उजनी जलशयातून पाणी लिफ्ट केले याला आता दहा वर्षें होत आहेत.


लिफ्ट मुळे माझं शेत बागायत झाले. एक संकल्प पूर्ण झाला आणि भविष्याची तजबीज झाली असे वाटले.मी राहतो पुण्यात त्यामुळे माझी शेती मजुरावर अवलंबून राहते. इथेच राहणाऱ्या आणि स्वतः शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी लिफ्टचा जितका फायदा उचलला तितका मला घेता आला नाही. दरवर्षी शेतात विहीरी आणि लिफ्ट मिळून 15-16 एकर ऊस होवू लागला. भुसार पिके पण घेतली जावू लागली .यामुळे माझी ओळख बागायतदार शेतकरी अशी झाली आहे .परंतु या दहा वर्षात तीनदा दुष्काळ पडला.कधी बेभरवशाचा तर कधी प्रतिकूल निसर्ग हे शेतकऱ्यांचे मोठे संकट आहे. धरणातच पाणी कमी झाले तर शेतात कुठून येणार. त्या प्रत्येक वेळी पिकांना फटका बसला आणि नुकसान झाले.भावडीतील दुसऱ्या टप्प्यावरील चारी पाचशे मीटर लांब आणि दहा मीटर खोल आहे. या एकाच स्पॉटवर पंधरा वीस MSEB च्या DP आहेत. तीथे किमान दीडसे इलेक्ट्रिक मोटारी आहेत. उजनी जलाशयाच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावर असे किमान पन्नास स्पॉट असतील आणि हजारो इलेक्ट्रिक मोटरी असतील. पप्पू घाडगे, कुंडलिक घाडगे, धनंजय चव्हाण, सुनील घाडगे, हनुमंत जाधव, पोपट उचाळे, तात्या साळवे या शेतकरी मंडळींचा उल्लेख केल्याशिवाय भावडी चारी हा विषय पूर्णच होऊ शकणार नाही. मागील दुष्काळाच्या वेळी या मंडळींनी चारीवरील दीडशे शेतकऱ्याकडून काँट्रीब्युशन जमा करून या चारीची खोली तीन मीटरने वाढविली. यासाठी टोटल ब्लास्टिंग पद्धत वापरली गेली.पन्नास फुटी पोकलेन वापरले. स्वतःची शेती करत करत हे शेतकरी इतरांच्या शेतीच्या पाण्याची व्यवस्था देखील निस्वार्थीपणे पहात आहेत हे कौतुकास्पद आहे.आता पर्यंत सामुदायिक चारी खोदायला मी दोनदा काँट्रीब्युशन दिले आहे.  वर्षातून किमान एकदा तरी इलेक्ट्रिक मोटर जळते, वर्षभरात इलेक्ट्रिक मोटरी भरायला/ दुरुस्त करायला एका एकराचा नफा जातो. MSEB म्हणजे इलेक्ट्रिक मोटारिंची बिले किमान चार-पाच एकराचा नफा घेऊन जातात. इलेक्ट्रिक मोटारीस मीटर नसते, असले तरी कागदावर.मग बिल कसे आकारतात तर एका  MSEB डिस्ट्रिब्युशन सेंटर वरून किती युनिट वापरले गेले आहेत ते पाहिले जाते. समजा जर एक लाख युनिट वापरले असतील आणि त्या सेंटर अंतर्गत दोन हजार इलेक्ट्रिक मोटारी असतील तर एक लाख युनिट भागिले दोन हजार मोटारी अशी युनिटची सरासरी काढून दर तीन महिन्यांनी बिल पाठविले जाते. यात MSEB चा अजिबात तोटा होत नाही. मग तुमच्या विहिरीला पाणी आणि शेतात पीक असो किंवा नसो.तुम्ही इलेक्ट्रिक मोटर वापरा अगर वापरू नका. MSEB चे मीटर मात्र चालू राहते. मी नियमित वीज बिले भरतो.परंतु अशामुळेच अनेक शेतकरी वीजबिले भरत नाहीत. प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देणार असे राजकारणी सांगतात पण ग्रॉऊंड रिऍलिटी फार वेगळी आहे. इथे आठवड्यातील तीन दिवस दिवसा आणि तीन दिवस रात्री फक्त आठ तास थ्री फेजची लाईट असते. सध्या तर ती सहा तास आहे.रात्री 1.05 am ला लाईट येते. कशी शेती करायची शेतकऱ्याने. कोणीतरी लाईट सिंगल फेज असताना दोन वायर स्पार्क करून इलेक्ट्रिक मोटर चालू करण्याचा शोध लावला. याला ते चुटका असे म्हणत. हे फार धोकादायक काम होते.आता तर लाईट सिंगल फेज असतानाही मोटर चालू करण्यासाठी उत्पादने मिळत आहेत. याचे नामकरण पण चुटका असेच झाले आहे. MSEB आणि शासनाच्या नाकर्तेपणामुळे असली उत्पादने बाजारात फोफावली आहेत. मग MSEB च्या अधिकाऱ्यासोबत तोडपाणी करून खात्रीशीर सिंगल फेज सप्लाय मिळविला जातो.म्हणजे असं जुगाड करून चोवीस तास लाईट आहे तर मग असला गोरखधंदा चालवीण्यापेक्षा शासन आम्हाला चोवीस तास थ्री फेज लाईट का नाही देत .धरणाची पाणीपट्टी, जमिनीचा शेतसारा यात एकराचा नफा जातो. कर्जाचे हप्ते अजून एक एकराचा नफा गेला म्हणून समजा. पाईपलाईन नादुरुस्त होणे, लीक होणे ही एक फार मोठी समस्या आहे.  एकदा एका ओढ्यात पाच फूट पाण्यात लिकेज झाले होते , लिकेज काढायचा खर्च तीस हजार झाला . हो बरोबर वाचले तुम्ही, तीस हजार . एकदा एका आडमुठ्या शेतकऱ्याने मुद्दाम माझ्या पाईपलाईनवर विहीर खोदली, पाईपलाईन दुरुस्ती खर्च पंचवीस हजार. पाईप लाईन लिकेज काढणे हा तर दोन तीन लोकांचा व्यवसाय झाला आहे. लिकेज काढायचे त्यांचे एक टेरिफ कार्डच आहे. लिफ्टच्या मोटरी चालू- बंद करणे हा पण दोन तीन लोकांना व्यवसाय झाला आहे.म्हणजे मी किती एकर शेती या इलेक्ट्रिसियन, MSEB, शासन, बँका, दुरुस्ती व देखभाल यंत्रणा, यांच्यासाठी करत आहे पहा.वर्षाच्या शेवटी जे उत्पन्न आलेले दिसते त्यातले 80-90 टक्के बऱ्याचदा आधीच खर्च झालेले असतात.कधी कधी तर त्यापेक्षा जास्त. तीन वर्षें थोडा नफा आणि चौथ्या वर्षी दुष्काळ आणि तोटा असे आमचे शेतकऱ्यांचे दुष्टचक्र चालू आहे. दुर्दैवाने आजही जितकी विक्री तितका नफा असे समजणारे अडाणी शेतकरी आहेत. नुसती शेती फायद्यात करणे फार अवघड आहे. शेती फायद्यात रहायला काहीतरी जोडधंदा हवा. 

मी शेती बागायती केली त्यामुळे वरील सगळ्यांना त्यांचा त्यांचा शेअर मिळत आहे.आहे का नाही इतरांची मजा.


नफ्यात सगळे वाटेकरी असतात पण तोट्यात कोण सोबत करत नाही. कोणताही शेतकरी आवडतंय म्हणून आत्महत्या नक्कीच करत नसेल. 


मला इतकच वाटतं की, प्राथमिक सोयी सुविधा  ( Basic Infrastructure )असतील आणि निसर्गाची साथ असेल तर शेती फायद्याची आहे. यात काय येते तर धरणे आणि कालव्यांची साखळी, जलयुक्त शिवार, पाणी फौंडेशन सारख्या योजना,म्हणजे हक्काचं पाणी, खात्रीशीर वीज पुरवठा, मागेल त्याला सबसिडीसह विहिरीवर सोलर मोटर, बीन व्याजी पीक कर्ज, पिकाला हमी भाव, हवामानाची अचूक माहिती देणारी यंत्रणा , कोणती पिकं घ्यावीत याचे मार्गदर्शन,योग्य पीक विमा योजना,निसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई,इ. मग बघा आम्ही शेतकरी कशी फायद्यात शेती करतो ते. हे सर्व कोण करू शकते तर शासन किंवा NGOs. शेतकऱ्यांना शासकीय तिजोरीतून वर्षाला सहा,बारा हजार रुपये मतासाठी लाच देवून लाचार बनविण्याची काही गरज नाही. त्याला प्राथमिक सुविधा द्या तो खंबीर आहे कष्ट करायला.


शेतकऱ्यां इतका आशावादी प्राणी शोधून सापडणार नाही. तोटा झाला तरी त्याला आशा असतेच की, यावर्षी तरी फायदा होईल. सर्व शेतकरी बांधवांचा आशावाद शासनाने जिवंत ठेवावा अशी श्री माताजींकडे प्रार्थना.


श्री माताजी खूप कष्ट आहेत हो शेती कामात तेव्हा श्री माताजी थोडी सी तो लिफ्ट करा दे l


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

No comments: