निर्मला फार्म-भाग सहा - सोनंखत शेणखत.
माझ्या वडीलांच्या काळात आमच्याकडे भरपूर प्रमाणात पशुधन होते. गाई,बैल,म्हैस यांचे वेगवेगळे गोठे होते. मेंढरांचा मोठा कळप आणि त्यांच्यासाठी वाडगे होते. वस्तीवर खूप कोंबडया होत्या. याचा परिणामस्वरूप दररोज शेणखत, कोंबडीखत, लेंड्या आणि जनावरांच्या गव्हानीमधील पालापाचोळा उकीरड्यावर जमा होत असे. वर्षभरात शेणखताचा उकीरडा आकाराने बराच मोठा तयार होत असे. खरंतर माझे वडील दरवर्षी शेणखत शेतात नेहून टाकत असत पण त्या उकीरड्याच्या आकारामानावरून रस्त्यावरून जाणारे येणारे लोक अशी चर्चा करायचे की, या शेतकऱ्याने एक दोन तरी वर्षें शेणखत उचललेले दिसत नाही. त्याकाळी पशुधनामुळे आणि शेणखतामुळे आमची शेती समृद्ध होती. शेतात गांडूळ, बेडूक, किडे मुंग्या, चिमण्या पासून ते घारी पर्यंतचे विविध प्रकारचे छोटे मोठे पक्षी दिसणे फार कॉमन होते. माझे वडील माझ्या मोठ्या भावाला असे म्हणायचे की, "तु ट्रॅक्टर खरेदी करू नकोस .एकदाका ते लोखंड शेतात आले की तुला ही बैलांची दावण कशाला पाहजे असे वाटायला लागेल ." पण पुढे आमच्या शेतात ट्रॅक्टर आला आणि वडील म्हणत होते तसेच झाले.
पूर्वीच्या काळातले देशी गाई बैलांचे शेणखत म्हणजे सोनं होतं. ज्वारी,गहू,साळ,मटकी,करडई,तुर,मका, हुलगा, खपली गहू, इ. बियाण्यांचे पारंपारिक, गावठी वाण होते. वर्षानुवर्षे घरचेच वाण पेरले जायचे. आजकाल कल्याण सोना गहू, मालदांडी ज्वारी, गुळभेंडी ज्वारी जिचा हुरडा फार चविष्ठ असायचा,असले पारंपारिक वाण आढळत नाहीत.
हरित क्रांतीमुळे त्या काळच्या शास्वत शेतीची घडी विस्कटली गेली. रासायनिक खते आली, हायब्रीड बियाणे आले, उत्पादन वाढले पण त्यांचा कस कमी झाला. आता या बदलाचे दुष्परिणाम आपण आजारांच्या स्वरूपात भोगत आहोत.
आता लोकं पुन्हा सेंद्रिय शेती, निसर्ग शेती, सहज कृषी कडे वळु लागली आहेत ही चांगली आणि आनंदाची बाब आहे. पण यासाठी पाहिजे असते शेणखत,गोमूत्र तेही देशी गाईगुरांचे. पण आता देशी गाईगुरे आहेत कोणाकडे?त्यामुळे अस्सल शेणखत उपलब्ध होत नाही.
प्रत्येकच शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर आल्यामुळे पशुधन नष्ट झाले आहे.आता पशुधन आहे ते फक्त दुग्धव्यवसायापुरते. पण जे दुग्धव्यवसाय करतात त्यांच्याकडे जर्सी गाई असतात. शेतकरी कुटुंतल्या मुलाबाळासाठी चांगले दूध मिळावे म्हणून एकादी म्हैस पाळतो. विक्री मात्र जर्सीच्या दुधाची करतो. आता जे काही शेणखत मिळते ते या जर्सी गाईचे, एकदम पातळ ज्याची गोवरी तयार होत नाही. त्यालाच आता सोनंखत म्हणायची वेळ आली आहे.
मी यावर्षी शेतात केळीची लागवड करणार आहे त्यामुळे बऱ्याच वर्षांनी मी शेणखत खरेदी केले आहे. थोडंथोडकं नाही तर एकरी चार ट्रॉली या प्रमाणात. दोन चाकी ट्रॉली शेणखताचा दर 3500 ते 4000₹ सांगतात आणि चार चाकी ट्रॉलीचा दुप्पट. दोन चाकी ट्रॉली भरायला मजूर 500 आणि शेतात विस्कटायला 500 रुपये घेतात. ट्रॅक्टर वाहतूक 600 रुपये. पण अंतरानुसार ही रक्कम बदलू शकते. म्हणजे प्रती दोन चाकी ट्रॉली हा खर्च किमान 5100₹ होतो आहे.
इतकी वर्षें रासायनिक खते वापरल्यामुळे शेतीचा कमी झालेला कस सुधारायचा असेल तर शेतात शेणखत टाकण्याशिवाय पर्याय नाही.
शेणखत ट्रॉलीत भरण्याची एक पद्धत आहे. शेणखत भरताना ट्रॉली सपाट लेवलला आली की एका माणसाने शेणखत तुडवायचे असते. तुडवत तुडवतच त्याने ट्रॉलीच्या मागील बाजूने सुरु करून पुढंपर्यंत शिग लावात ट्रॉली पूर्ण भरायची असते. असं केल्याने ट्रॉलीत जास्तीत जास्त खत बसते. बऱ्याचदा ट्रॉली भरणारे कामगार या कामास नकार देतात.कारण खत जास्त तुडवले तर खत मालकाला वाईट वाटते आणि कमी तुडवले तर खरेदी करणाराला वाईट वाटते. म्हणून ते म्हणतात एक तर घेणाराने ते स्वतः तुडवावे किंवा त्यासाठी वेगळा माणूस नेमावा. त्याला 500₹ रोजगार द्यावा लागतो आहे . ट्रॉली निट भरली नाही तर खत वाहतूक करताना रस्त्यात सांडते. यात देणारा आणि घेणारा दोघांचेही नुकसान होते.हे नुकसान टाळायचे असेल तर ट्रॉलीत खत व्यवस्थित भरावे. खत शेतात आल्यावर डम्पिंग ट्रॉलीने सरळ रेषेत पाच सहा ठिकाणी छोटे छोटे ढीग करून उतरविले जाते. त्यानंतर कामगारांकडून खत शेतात विस्कटले जाते. एकदा शेतात शेणखत टाकले तर पिकास त्याची मात्रा किमान दोन वर्षें चालू राहते.
शेणखत सेंद्रीय खताचे काम करते, शेतीची सुपीकता सुधारते आणि गांडूळ आणि तत्सम जीवांची साखळी पूर्ववत करते.म्हणूनच शेणखताला सोनंखत म्हणावंसं वाटते.
रासायनिक खतात नायट्रोजन, फॉस्परस आणि पोट्याशियम (NPK) हे तीन घटक असतात. ते अलोपॅथी औषधाप्रमाणे पिकावर लगेच परिणाम दाखवितात. पण शेतातील गांडूळ आणि इतर सूक्ष्म जीवांची साखळी पूर्ण नष्ट होते.शेतीचा कस खालावतो.
या वेळी दोन ट्रॅक्टरने खत वाहतूक केली एक नेहमीचा रणजित डोंगरे आणि दोन काका राखुंडे . मला चांगले खत उपलब्ध झाले ते भारत राखुंडे आणि अभी राखुंडे यांच्या गोठ्यात. खत विकणारा शेतकरी कसा असावा तर ट्रॉली भरताना कटकट न करणारा आणि ठरलेल्या पद्धती प्रमाणे ट्रॉली तुडवली जात असेल तर आक्षेप न घेणारा.या बाबतीत हे दोनही शेतकरी चांगले होते. खत भरणाऱ्या गणपत कदम यांच्या टोळीत डोंगरे, कदम असे एकूण पाच जण होते. ऊन आणि उकाड्यामुळे त्यांची कार्यक्षमता खूप कमी झाली होती.एरवी सकाळी सात ते बारा या वेळात दहा दहा ट्रॉली शेणखत भरू शकणारा हा ग्रुप दिवसात सहा,आठ ट्रॉली भरल्या तरी पूर्ण दमून जात होता. करा की दहा ट्रॉल्या पूर्ण असे म्हटले तर आता अजून काम केले तर लाकडंच गोळा करावी लागतील अशी एकदम स्मशानाचीच भाषा करायचे. पण हे त्यांची कार्यक्षमता पूर्ण संपल्याचे लक्षण असे. हा ग्रुप एकदम हसत खेळत, एकमेकांची टिंगल करत काम करायचा . यात एक नवनाथ कदम नावाचे उंच आणि धीप्पाड गृहस्थ होते. त्यांच्याकडे बघितलं तर त्यांनी न रागवताच भीती वाटावी अशी ही पर्सनॅलिटी. हा गृहस्थ ट्रॉलीतील शेणखत तुडवायला एकदम योग्य माणूस होता. पण ते म्हणायचे, "माझ्या वजनामुळेच कोणी खतवाला मालक मला ट्रॉली तुडवू देत नाही."
सेंद्रिय शेती म्हणजे उत्तम शेती. शेतकऱ्यांनी आता पुन्हा नैसर्गिक, सेंद्रिय प्रकारची शेती करायला हवी असे मला वाटते.
लेखक...
योगीराज देवकर.
Motivation Academy.
No comments:
Post a Comment