निर्मला फार्म- भाग आठ - वृक्षारोपण.
संतुलित पर्यावरणासाठी एक सोपा उपाय - प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात क्षेत्रफळाच्या तुलनेत किमान पाच ते दहा टक्के क्षेत्रावर जांभूळ, पळस, अर्जुन, बेहेडा अशी कोणत्याही प्रकारची स्थानिक झाडे लावावीत आणि जगवावीत.उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याकडे जर दहा एकर शेत जमीन असेल तर त्याने अर्धा ते एक एकर क्षेत्रावर देशी झाडे लावावीत.
किंवा शासनाने फळबाग लागवड योजने सारखी एखादी योजना आणून शेतकऱ्यांना कडुनिंब, बाभळ अशा भारतीय पारंपारिक वृक्ष, स्थानिक वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे . बांधावरील झाडे वगळता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर पाच, दहा टक्के जंगल तयार करणे हाच या योजनेचा उद्धेश असावा.
शेतात एक चिंच झाड जेव्हा मोठे होते तेव्हा ते एक गुंठा क्षेत्र व्यापते. मी आमच्या शेतात एका ठिकाणी पन्नास आणि दुसऱ्या ठिकाणी पंच्चावन चिंच झाडे काही वर्षांपूर्वी लावली होती, त्यातली एकसष्ठ झाडे वाढली आणि मोठी झाली आहेत. उरलेली तूटआळी झाली होती.म्हणजे त्या खड्ड्यात लावलेले झाड आले नव्हते. तूटआळी भरून काढायला उशीरच झाला पण यावर्षी पर्जन्यमान चांगले राहील असे ग्रहित धरून वृक्षारोपण केले आहे. यावेळी कृषी विज्ञान केंद्र,नर्सरी, बारामती येथून 'प्रतिष्ठान' व्हरायटीची कलमी रोपे घेतली. एक फूट उंचीचे रोप सत्तर रुपयास तर अडीच/तीन फूट उंचीचे रोप दीडशे रुपयास उपलब्ध आहे. चिंच झाडे मोठी झाल्यानंतरचा विषय म्हणजे चिंचा विक्री करणे . तर चिंचेचा व्यापार करणारे चिंच बागवान किंवा व्यापारी आहेत, ते दरवर्षी चिंचा विकत घ्यायला येतात. चिंचेच्या झाडाचा आकार आणि झाडाला किती फळ लागले आहे ते पाहुन प्रती झाड हजार ते तीन हजार पर्यंत किंमत ठरते आणि ते चिंचा झाडून घेऊन जातात.
रोपाचे झाड व्हायला पाच- दहा वर्षें लागतात, तोपर्यंत या चिंच बागेत आंतरपीक पण घेतले जाणार आहे. एकशेपाच चिंचेचा बाग जेव्हा बहरेल,मोठा होईल तेव्हा तो काय छान दिसेल आणि त्यामुळे तिथे पर्यावरणास अनकुल वातावरण निर्माण होईल या विचारानेच मला हायसे वाटत आहे.
लेखक...
योगीराज देवकर.
Motivation Academy.
No comments:
Post a Comment