Thursday, 22 August 2024

सोयाबीन पिकात नुकसान.

 निर्मला फार्म-भाग तेरा - भुसार पिक सोयाबीन आणि नुकसान.

फुले संगम, फुले किमया हे सोयाबीनचे चांगले वाण आहेत अशी माहिती श्री निबे सर KVK दहीगांव यांनी मला दिली होती. फुले संगमचे बियाणे कृषी विज्ञान केंद्र, बारामती मध्ये उपलब्ध  झाले. बियाण्याची तीस किलोची एक बॅग असते. दर होता नव्वद रुपये किलो होता . 


सोयाबीन दोन इंच बाय अठरा इंच असे पेरले जाते. म्हणजे बियाणे पेरताना सरळ लाईन मध्ये प्रत्येक दोन इंचावर एक बी पडतो आणि दोन लाईन मधील अंतर अठरा इंच असते. असे बियाणे पेरले तर एकरी वीस किलो बियाणे लागते. मला ट्रॅक्टरचे जे पेरणी अवजार उपलब्ध होते त्यावर दोन इंच बाय बारा इंच किंवा चोवीस इंच असे सेटिंग करता येत होते. मी KVK, बारामती मधील श्री गावडे सरांना ही समस्या सांगितली तर ते म्हणाले खरंतर 2*18 इंच हेच योग्य प्रमाण आहे. पण हे शक्य नसेल तर 2*24 वर पेरणी करा. पण ही पेरणी विरळ होईल. 

अशा प्रकारामुळे वापस्यानुसार दोन एकर प्लॉट 2*24 पेरला होता.  वाटले तसेच झाले प्लॉट विरळ उगवला.


सोयाबीन पेरणी होईपर्यंत या प्लॉटवर फार खर्च झाला होता . शेतकऱ्यासाठी पिकपूर्व मशागतीचा भाग म्हणून उन्हाळ्यात शेत एकदा नांगरणे आणि पहिला पाऊस झाला की वापसा आल्यावर फणपाळी करणे हे कॉमन आहे. मी हे केले होते पण पिक करण्यापूर्वी सतत पावसाची रिमझिम सुरु राहिली त्यामुळे शेतात तण फार वाढले होते . शेतात ओल असल्यामुळे ट्रॅक्टरने मशागत करता येत नव्हती. मग बाया लावून धोत्रा, कासल्या असे मोठे तण उपटले , मोकळ्या शेताला तणनाशक फवारले , तण मरून उभे राहते किंवा आडवे पडते मग त्याचे तुकडे करण्यासाठी ट्रॅक्टरने रोट्याव्हेटर मारला , मग शेत पुन्हा फणले आणि शेवटी पेरणी केली यामुळे अनुउत्पादक खर्च फार वाढला . 


पेरणी झाली की लगेच पंधरा दिवसात तणनाशक फवारावे लागणार म्हणून तणनाशक पण आणले होते. सोयाबीन पिक करायला मनुष्यबळ जास्त लागते.विशेषतः जेव्हा पिक तयार होते तेव्हा. 


सोयाबीन उगवलेल्या शेतात पारव्यांचे थवे च्या थवे येत होते आणि बिया किंवा अंकुर आलेल्या बिया खात होते आणि पिकाचे नुकसान करत होते . शेतात ओल असल्यामुळे सोयाबीन उगवून आले होते , ओलीमुळे पाणी दिले नाही, पण ते द्यायला पाहिजे होते . एकतर 24 इंचावर पेरणी, आणि पक्षी यामुळे सोयाबीन फार विरळ उगवले होते . आता हे पिक मोडावे लागणार आहे. तणनाशक परत करता येईल पण पाच एकर सोयाबीन करायचे होते म्हणून आणलेले बियाणे पण अंगावर पडले आहे. एकूण काय तर आर्थिक नुकसान.

यावर्षीच्या पिकातले हे अपयश आहे .


काय काय चुकले. 1)बियाणे KVK बारामती मधून न घेता इंदापूर मधील दुकानातून घ्यायला हवे होते. राहिलेले परत करता आले असते. 2) पेरणी 2*18 इंच वरच करायला हवी होती. 3) पेरणी झाल्यावर शेतात ओल होती तरी पाणी द्यायला हवे होते. 4) पारवे पक्षी शेतात नुकसान करणार नाहीत हे पहायला हवे होते. 5) वाटेकऱ्याने पाणी, पक्षी याकडे दुर्लक्ष केले. 6) मनुष्यबळ कमी असताना असले भुसार पिक करायला नको होते. 7) पेरणी सोबत खत टाकले ते टाकायला नको होते.


शेतकऱ्यांना अशी भुसार पिके परवडत नाहीत. खाया पिया कुछ नहीं और 35 हजार का नुकसान हो गया l आता पिक मोडायला खर्च होणार आहे तो वेगळाच. भुसार पिकाचा असा अनुभव मला यापूर्वी पण आला होता. शेतात भुसार पिक करणे म्हणजे खिशातले पैसे खर्च करून ग्राहकाला धान्य पुरविणे आहे. तरीही क्षेत्र उपलब्ध आहे म्हणून मी पुन्हा तीच चूक केली असेच म्हणावे लागेल.


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

Monday, 19 August 2024

केळी लागवड

 निर्मला फार्म-भाग चौदा - केळी लागवड .


प.पू.श्री माताजींच्या कृपेत यावर्षी शेतात केळीचे पिक करायचे हे 2023 डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ठरले होते. केळीचे पिक करण्याचे कारण होते ऊसाचे पिक साखर कारखान्यास पाठविण्यास होणारा त्रास.ऊस तोडणाऱ्या टोळीच्या अपेक्षा दरवर्षी वाढतच चालल्या आहेत.

ऊस तोडणी कामगारांना साखर कारखान्याकडून पैसे मिळतात. तेच काम करण्यासाठी ऊस तोडणी कामगार शेतकऱ्याकडून एकरी एक-दोन ते चार-पाच हजार रुपये मागतात, टोळीला एखादे जेवण अपेक्षित करतात,ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ड्राइव्हरला खेपेला दोनशे, अडीचशे रुपये आणि जेवणाचा डबा द्यावा लागतो .बरं इतकं सगळं करूनही ते ऊसाचा फड सलग तोडतील याचा भरोसा नाही. माझ्याच शेतातून हे लोक फड अर्धवट ठेवून दुसऱ्या शेतकऱ्याकडे गेल्याची उदाहरणे आहेत. असे का? याची कारणे साखर कारखाना अधिकारी, कारखान्यास ट्रॅक्टर आणि टोळी पुरवणारी एजन्सी, टोळीचा ठेकेदार, गरजवंत शेतकरी,इ. कोणही असू शकतो.सहकारी साखर कारखाने खाजगी झाल्याचे हे दुष्परिणाम आहेत.कारखान्यातील अधिकाऱ्यांना हे सर्व प्रकार माहित आहे पण ते लेबर आणि एजन्टना सांभाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करतात. दुसरं कारण पिक बदल. किती वर्ष शेतात तेच तेच पिक घ्यायचे. या शिवाय केळीच्या पिकात ऊसापेक्षा खर्च जास्त असला तरी फायदा पण जास्त आहे .


जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच जय विजय ऍग्रो, इंदापूरचे श्री जयकुमार शिंदे यांच्याकडे जैन उद्योग समूह जळगाव यांच्याकडील  G9  टीश्यू  कल्चर व्हरायटीची केळी रोपे बुक केली होती. 15 जुलै ही रोपे मिळण्याची तारीख होती पण प्रत्येक्षात 7 ऑगस्ट रोजी रोपे शेतावर आली. रोपे उरतवून घेण्यासाठी रणजित आणि त्याचे वडील दादासाहेब डोंगरे यांची खूप मदत झाली.पोपट आणि त्याची पत्नी तर मदतीला होतेच. रोपे आल्यानंतर ती या वातावरणास जुळवून घेण्यासाठी 4 -6 दिवस वाड्यासमोरच ठेवली आणि नंतर 12,13 आणि 16ऑगस्ट रोजी रोपांची लागण पूर्ण झाली .


शेतात केळी रोपे लावण्याच्या विविध पद्धती आहेत. ओळीने साडेपाच बाय साडेपाच, पाच बाय सात ,चार बाय आठ फूट इ. मी पाच बाय सात फुटावर केळी लागवड केली आहे. या पद्धतीत एका एकरात 1244 रोपे लागतात. रोपाची किंमत 18.75 ₹ आहे.रोपांच्या बुकिंग साठी 6 ₹ घेतले गेले होते आणि रोपे येण्यापूर्वी पूर्ण रक्कम भरावी लागली होती . केळीची सुरु आणि खोडवा अशी दोन पिके घेतली जातात. काही शेतकरी तिसरे किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पण पीक घेतात. नॉर्मली एकरामागे 100 रोपे जास्त मागविली जातात. रोपे खराब झाली तर शिल्लक असावीत म्हणून जास्त रोपे मागविली जातात. वापरली गेली तर ठीक नाहीतर ऐनवेळी इतर शेतकऱ्यास हवी असतील तर विकायची पद्धत आहे.


हल्ली केळी लागवडीत बरीच सुधारणा झाली आहे. शेतात एकरी किमान चार ट्रॉली शेणखत बेडवर टाकले जाते. अकलूज भागात दीड रुपयास एक रोप याप्रमाणे लागवड करणाऱ्या टीम्स आहेत. या टीम प्रवास खर्च पण घेतात. लागवड करताना प्रथम सात फुटावर ल्याटरल सरळ केल्या जातात, सबमेन लाईन पासून अडीच फूट अंतरावर दोरी लावली जाते आणि मग दर पाच फुटावर दोरी लावून थोडेसे निंबोळी खत आणि थायमेंट टाकून मार्किंग केले जाते आणि केळी रोप लावले जाते यामुळे उभ्या आडव्या लाईन मध्ये रोपे सरळ रेषेत दिसतात. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दुसऱ्याच दिवशी Drenching ( पातळ औषधाने रोप भिजविणे.) केले जाते.शेणखत विस्कटणाऱ्या, खुरपण करणाऱ्या पुरुष, महिलांच्या टीम आहेत. शेतातली कामे करण्यासाठी स्वतःकडे मनुष्यबळ नसेल तर हरकत नाही पण तुमच्याकडे पैसा पाहिजे.प्रत्येक प्रकारचे काम करायला यंत्रणा उपलब्ध आहे.अकलूज येथील शंकर पाटोळे यांच्या टीमने छान केळी लागवड केली आहे.श्री नितीन रानडे लागवडीच्या दिवशी शेतावर आले होते. त्यांनी ट्रॅक्टर चालवून केळी रोपे वाहतूक करण्याचा आणि शेतात मदतीचा आनंद घेतला. ऊसापेक्षा केळीचे पिक तसे खर्चिक आणि नाजूक पिक आहे त्यामुळे आकाश जाधवच्या सल्लामसलतीने केळी पिक घेतले जाणार आहे.


पोपट दळवी कुटुंबाचा यात महत्वाचा रोल राहणार आहे. सुदैवाने पोपटला केळी पिकाचा अनुभव आणि जान आहे. ही तर सुरुवात आहे. केळी हे बारा महिन्याचे पीक आहे. अजून बरीच कामे, करावी लागणार आहेत .


यावर्षी हा घाट घातला आहे. आता निसर्ग देवता, शाखंभरी देवता,ऋतंभरा प्रज्ञा देवता,ग्राम देवता, पंचमहाभूत(भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश) यासह प्रकाश आणि चैतन्य देवता यांनी प्रसन्न होवून आमच्यावर  कृपा करावी अशी मी प्रार्थना करतो. शेतकरी सुखी तर जग सुखी.


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy

Thursday, 8 August 2024

नगदी पिक ऊस

 निर्मला फार्म- भाग बारा - नगदी पिक ऊस.

शेतकऱ्यांना हमखास दोन पैसे मिळवून देणारे नगदी पिक म्हणजे - ऊस. ऊसाचे पिक करायला इतर पिकांच्या तुलनेत कष्ट कमी लागतात. यावर्षी ऊसाची आडसाली लागण करण्यासाठी आठ एकर क्षेत्र नांगरून तयार ठेवले होते. 15 जुलै दरम्यान जी ऊस लागवड केली जाते ते पिक 18 महिने शेतात राहते त्याला आडसाली ऊस म्हणतात. डिसेंबर महिन्यात जर ऊस लागवड केली तर ते पिक 12 महिने शेतात राहते त्याला सुरु किंवा एकसाली ऊस म्हणतात. यावर्षी इंदापूर तालुक्यात सुदैवाने जून महिन्यातच बऱ्यापैकी पाऊस झाला.तीव्र दुष्काळामुळे पहिल्यांदाच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लिफ्टचे पाणी बंद झाले होते.त्यामुळे शेतकऱ्यांची खोडवा, निडवा ऊसाची पिके अडचणीत आली होती. ऊसाचे पिक एकदा शेतात लावले की ते पुन्हा पुन्हा घेता येते. दुसऱ्या वर्षी पुन्हा उगवणाऱ्या ऊसाला खोडवा म्हणतात तर तिसऱ्या वर्षीच्या ऊसाला निडवा म्हणतात. या वर्षी वेळेवर आणि गरज होती तेव्हा आलेल्या पावसामुळे आमच्या शेतात उभा असलेल्या खोडवा ऊस पिकाला अक्षरशः जीवदान मिळाले याकरिता मी वरूण देवता,परमेश्वराचे  हृदयापासून आभार मानतो. पाऊस झाल्यामुळे शेतात तण वाढले होते त्यामुळे वापसा होताच शेत दोनदा फणले आणि ऊसासाठी सरी सोडली.


शेतातील रस्त्यावर आणि बांधावर तण वाढले होते त्यामुळे वाटेकरी पोपट दळवी यांनी ऊस लावण्याआधीच त्यावर राऊंड अप औषध फवारणी केली . असा स्वतः पुढाकार घेऊन वेळेवर कामे केली तर शेत स्वच्छ, तण विरहित राहील आणि पिकाची उत्पादकता वाढायला नक्कीच मदत होईल.


ऊस पिकाला कमी कष्ट लागतात म्हणण्याचे कारण असे की, ऊसाची नांगरट, फनपाळी, सरी सोडणे ही कामे ट्रॅक्टरवाला एजन्सी करते . ऊस लागवड मजुरांची टोळी करते.ऊसाचा बुजवटा आणि बांधणी ट्रॅक्टरवाला एजन्सी करते . शेवटी ऊस तोडणी आणि वाहतूक साखर कारखाण्याची यंत्रणा करते . तणनाशक फवारणे, खते टाकणे, इलेक्ट्रिक मोटर देखभाल व दुरुस्ती करणे आणि पिकाला पाणी देणे इतकेच काम शेतकऱ्याला करावे लागते.जो शेतकरी ही सर्व कामे वेळेवर करतो त्याला ऊसाचे सरासरी वजन चांगले भेटते. एका एकरात ऊसांची संख्या साधारणपणे चाळीसहजार असते. एक ऊस जर एक किलोचा झाला तर ऊसाचे वजन चाळीस टन भरते. एक ऊस दीड किलोचा झाला तर ऊसाचे वजन साठ टन भरते आणि दोन किलोचा झाला तर 80 टन भरते. एका एकर क्षेत्रात 100 टन किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादन घेणारे महाराष्ट्रात काही शेतकरी आहेत. परंतु हेही लक्षात घ्या की,संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण ऊसाच्या वजनाची सरासरी फक्त पस्तीस ते चाळीस इतकीच आहे.


लोणी देवकर गावातील ऊस लाडवड करणाऱ्या टोळीने एकरी ऊस लागवडीचा दर तीनच वर्षात पाच वरून सहा आणि या वर्षी सहा वरून सात हजार रुपये केला आहे. भावडीतली टोळी साडेसहा हजार रुपये सांगत आहे. उक्ते काम करणारे शेतमजूर कामाची काय वाट्टेल ती किंमत मागायला लागले आहेत. शेतकऱ्याला हा नपरवडणारा दर आहे. आरे बाबांनो! शेतात फार नफा नाही रे होत, याची थोडी तरी जाणीव ठेवा. शेवटी तुम्हीपण शेतकरीच आहात ना. हेच काम वरकुटे बुद्रुक गावातील मजुरांची टोळी पाच हजार प्रमाणे करत असल्याचे सासऱ्यांनी मला सांगितले त्यामुळे वरकुटे बुद्रुक येथील शिवाजी सोनवणे यांना हे काम दिले. आता लोणीत येऊन सोनवणे यांनी पण बिघडू नये म्हणजे चांगले होईल. ऊस लागणीच्या कामात पाण्याच्या पाटाच्या बाजूची म्हणजे माथ्याला आणि पायथ्याला सरी तोडली जाते,पाण्याचा पाट तयार केला जातो. जिथे बियाणे उपलब्ध आहे तिथे  ऊस तोडला जातो , ऊस वाहनात भरला आणि जिथे ऊस लावायचा आहे तिथे आणून उतरविला जातो. नंतर ऊसाचे तुकडे करून ऊस बियाणे सरीत अंथरून लावले जाते. ऊसाच्या प्रत्येक कांडीवर किंवा टिपरीवर एक डोळा असतो. एक डोळा किंवा दोन डोळे किंवा तीन डोळे अशी पण ऊस लावण्याची पद्धत आहे. एक डोळा एक फूट अंतरावर लावला जातो. काही शेतकरी कांडीला कांडी जोडून म्हणजे दोन कांड्यात जराही अंतर न ठेवता ऊस लावतात याला टक्कर असे पण म्हणतात. कांडी जमिनीत लावताना ऊसाचा डोळा डावीकडे किंवा उजवीकडे राहील असे पाहिले जाते. कारण डोळा जर खालील बाजूला राहिला तर अंकुर वर यायला त्रास होतो आणि वर राहिला तर त्याला उन्हाचा त्रास होतो. आमच्या भागात 86032 किंवा 265 या वाणाचा ऊस मोठ्या प्रमाणावर लावला जातो. 86032 ला रिकव्हरी चांगली मिळते म्हणून साखर कारखाना हा ऊस खुशीने नेहतो. तर 265 ला वजन चांगले मिळते, त्यामुळे शेतकरी खूष असतो .यावर्षी आमच्या शेतात स्वतःचे बियाणे नव्हते त्यामुळे सासऱ्यांकडून 86032 वाणाचे बियाणे विकत घेतले. ऊस बियाण्याचा दर गुंठ्यावर ठरला जातो. एक गुंठा ऊस बियाण्याचा दर सहा हजार रुपये आहे .रणजित डोंगरेने ट्रॅक्टरने बियाणे वाहतूक केली आणि 9 जुलै 2024 रोजी प्रत्येक्ष ऊस लागवड सुरु झाली आणि 14 जुलै रोजी पूर्ण झाली.


ऊस बियाण्यावरील बुरशी किंवा रोगराई नष्ट व्हावी म्हणून सदर बियाणे औषधाच्या मिश्रणात बुडवून मग शेतात लावले जाते.यासाठी बावसकर टेकनॉलॉजिचे -जर्मीनेटर हे औषध वापरले आहे. या औषधाची एक लिटरची बाटली 400 रुपयांस मिळते. बॅरल मध्ये पाणी भरणे, औषधाचे मिश्रण तयार करणे, त्यात ऊसाच्या कांड्या बुडविणे ही कामे ऊस लागवड टोळीचे लोक करत नाहीत. त्यामुळे दळवी नवरा बायकोने हे काम केले.

शेतातले तण तर शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेले आहे असे वाटते. ऊसाला पहिले दोन पाणी अंबवणी, निंबवणी दिले की तणनाशके फवारणी करावी लागणार आहे. यासाठी 1) Weedmar 2) Diurex 3) Tata metri 100gm लागले .


ऊस लागवडीपासूनच पोपटचा उत्साह वाढलेला आहे. दिवस रात्र काम करण्याची या माणसाची तयारी आहे. ते म्हणतात शेतात मला फार करमते. अशी शेतीची आवड असेल तर काम आनंद देते. 

यावर्षी आवश्यक ते सर्व प्रयत्न करून एकरी ऊसाचे टनेज् किमान 70 ते 80 राहील असा प्रयत्न केला जाणार आहे.


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

Monday, 5 August 2024

ठिबक सिंचन

 निर्मला फार्म-भाग अकरा -डुबुक सिंचन ते ठिबक सिंचन.


पूर्वी शेतात बैलांच्या माध्यमातून नांगरट करणे , पाळी घालणे, सरी सोडणे अशी कामे केली जात असत . ऊसाच्या पिकासाठी सरी तोडून प्रत्येक गुंठ्याचा एक वाफा तयार केला जात असे.अशा प्रकारे एका एकरात चालीस वाफे तयार केले जात असत.प्रत्येक वाफ्याची उंची एक ते सव्वा फूट असे.वाफ्याच्या सरीत ऊस लावला जात असे.दंडाने प्रत्येक वाफ्याला पाणी देण्यासाठी एक दारं(वाट) असे. एका वाफ्यात पाणी सोडले की ते पाणी प्रत्येक सरीतून नागमोडी वळणाने फिरत असे आणि वाफा पाण्याने भरला जात

असे. तीन, चार वाफ्यानंतर एक मोठा कट तयार केला जात असे.या कटाची उंची दोन ते अडीच फूट असे.ऊसाला पाणी देण्याची पद्धत म्हणजे पाण्याने वाफा गच्च भरणे असे. तेव्हा माझे वडील तर असे म्हणायचे की, "वाफ्यात इतके पाणी साठायला हवे की त्या पाण्यात घाघर पूर्ण भरली जायला पाहिजे." थोडक्यात पाणी पिकाला नव्हे तर शेताला पाजले जात असे आणि पाण्याचा अपव्यय होत असे. एकरातील एखादा वाफा पाण्याने पूर्ण भरला आहे का नाही हे शेतकरी कसे पाहत असे याचा किस्सा डॉ आप्पासाहेब पवार भाषणात रंगवून सांगत असत  तो असा,"शेतकरी ऊसा बाहेर उभा राहून अंदाजे त्या वाफ्यात एक छोटा दगड फेकत असे. दगड पाण्यात पडून 'डुबुक ' असा आवाज आला की समजायचे वाफा पाण्याने भरलेला आहे. मग तो पाण्याचं दारं मोडायला ऊसात जात असे."  यालाच गमतीनं ते 'डुबुक शेती(सिंचन)' असं म्हणत असत .


यात पुढे सुधारणा झाली आणि ऊस लागवडीसाठी वाफ्या ऐवजी सरळ सरीची पद्धत आली. यातही प्रत्येक सरीचे दार मोडले तर याला पिकाला 'हात दाऱ्यावर' पाणी देणे असे म्हणतात.या पद्धतीत पीकाला तुलनेने कमी पाणी लागते . आळशी शेतकरी, मजूर काय करतो तर एकदम तीन, चार सऱ्यावर पाणी सोडतो आणि बसतो कुठेतरी जाऊन, परत येतो तेव्हा चार सऱ्या भरून पाणी शेताबाहेर गेलेले असते.

शेतमजूराच्या दुर्लक्षामुळे  माझ्याच शेतातले पाणी सऱ्या भरून रिकाम्या शेतात आणि पुढे ओढ्याला गेल्याची उदाहरणे आहेत. ऊसाच्या शेतीत शेतकरी वारेमाफ पाण्याचा वापर करतात ही टीका बरोबर आहे ती यामुळेच.


'ठिबक सिंचन' म्हणजे टिप टिप किंवा थेंब,थेंब पाणी पाझरणे. या पद्धतीत पिकाला गरजे इतकेच पाणी दिले जाते. 80,90 च्या दशकात पद्मश्री कै.डॉ आप्पासाहेब पवार यांना ' ठिबक सिंचन 'चा प्रचार, प्रसार करून शेतकऱ्यांमध्ये ठिबक सिंचन विषयी जाणीव जागृती करताना मी पाहिलेले आणि ऐकलेले होते. ते इस्राईलला जाऊन आले होते. तिथली ठिबक सिंचन पद्धती आणि क्रांती त्यांनी पाहिलेली होती. ते शेतकऱ्यांचे प्रबोधन करत तेव्हा PVC पाईप,ड्रीपर,ल्याटरल, इ. साहित्य सोबत घेवून फिरत असत आणि ठिबक सिंचन कसे असते ते समजावून सांगत असत. कृषी विकास प्रतिष्ठान, बारामती ही त्यांची प्रगत शेतीची प्रयोगशाळा आणि शेतकऱ्यांसाठी प्रत्येक्षिक फार्म होता. आतापर्यंत या विषयाने प्रगतीचा बराच मोठा पल्ला गाठाला आहे. 


1999-2000 मध्ये मी शेतात टप्प्या टप्प्याने दहा एकर नेटाफिमचा ठिबक सिंचन संच बसवीला होता. श्री रामचंद्र घोळवे, भवानीनगर यांनी माझी सिस्टिम बसविली होती.त्यावेळचा माझा तो अनुभव चांगला होता. 


2014 साली उजनी जलशयातून लिफ्टने पाणी शेतात आणले आणि आता अजून खर्च नको म्हणून मी ड्रीप इर्रीगेशन पासून दुर राहिलो. पण आता पाण्याची बचत, पिकाची उत्पादकता,पाणी वितरणाची सुलभता आणि कमी मनुष्यबळात काम यासाठी मी पुन्हा ठिबक सिंचन कडे वळत आहे.


ड्रीप इर्रीगेशन करायचे म्हटले की, जैन इर्रीगेशन, महिंद्रा EPC, फिनोलेक्स, नेटाफिम, इ. पर्याय समोर येतात. मी सर्वांचे कोटेशन घेतले. मला नेटाफिमचा पूर्वीचा अनुभव चांगला होता त्यामुळे माझा कल नेटाफिम कडे होता. या सगळ्याच ISO मानांकन प्राप्त कंपन्या आहेत. त्यामुळे सर्वांची उत्पादने तुलनेने सारखीच असतात. फरक पडतो तो तांत्रिक सल्ला, कन्सेशन, संच जोडणी आणि विक्री पश्च्यात सेवा या मध्ये.डॉ चेतन पराडे यांनी 80 एकर  क्षेत्रावर नेटाफिम ड्रीप इर्रीगेशन सिस्टिम बसविली आहे. त्यांचा अनुभव,सल्ला आणि एकूणच विचार करून मी नेटाफिमची निवड केली. सर्वप्रथम मी श्री रामचंद्र घोळवे यांना संपर्क केला त्यांनी मला इंदापूर मधील शिव इर्रीगेशनचे श्री राहुल अनभुले यांचा संपर्क दिला. पुढे श्री सिद्धेश्वर माने, श्री रुपेश दाने माझ्या संपर्कात आले आणि पुढे बऱ्याच बैठका आणि चर्चे अंती हे काम निश्चित झाले.


शेतात ड्रीप इर्रीगेशन सिस्टिम बसवायची असेल तर प्रस्ताव तयार करण्यासाठी शेताचा 7/12, 8 अ, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचे डिटेल्स द्यावे लागतात. एजन्सी शेतकऱ्याचा प्रस्ताव  शासनाकडे ऑनलाईन सादर करण्याचे काम करते. शिव इर्रीगेशनने माझा प्रस्ताव 29/4/2024 रोजीच सादर केला आहे.अर्ज क्रमांक 242510012599036 आहे.


ड्रीप इर्रीगेशन केले तर शासनाकडून 80% सबसिडी मिळते असे सांगतात पण ही अफवा आहे . वेगवेगळ्या निकषामुळे शेतकऱ्यास 80% सबसिडी मिळत नाही. त्यातला एक निकष असा आहे की, दर साडेचार फुटावर एक ल्याटरल असावी असा आहे. मी केळी रोपे लागवड पाच बाय सात फुटावर करीत आहे. दर सात फुटावर दोन ल्याटरल असणार आहेत. याचा अर्थ दर साडेतीन फुटावर एक ल्याटरल असणार आहे. त्यामुळे प्रत्येक्षात साडेतीन फुटावर एक ल्याटरल असताना मला दर साडेचार फुटावर एक ल्याटरल आहे असे गृहीत धरून त्याप्रमाणे सबसिडी मिळेल. शिवाय सॅन्ड फिल्टरला एक विशिष्ट रक्कम मिळते ती टक्केवारीच्या प्रमाणात नसते. मी सॅन्डफिल्टर जवळच सात वोल्व बसविले आहेत. त्यामुळे मेन आणि सबमेन पाईपचा खर्च पण वाढला आहे जो त्यांच्या निकषात बसत नाही. यामुळे ड्रीप इर्रीगेशन सिस्टिमचा खर्च प्रती एकरी 80 हजार असताना मला एकरी 35 हजार रुपये सबसिडी मिळणार आहे असे मला सांगण्यात आले आहे. म्हणजे 43.75%. तीही सन 2024-25 मध्ये मार्च एन्ड पर्यंत कधीतरी मिळेल अशी आशा आहे . एकदा ही सिस्टिम बसवली तर तिचे आयुष्य आठ वर्षें असते . ऍसिड ट्रीटमेंट केली , डिस्क आणि सॅन्ड फिल्टर वेळोवेळी साफ केले, वोल्व आणि फिल्टरला ऊन, पाऊसापासून संरक्षण दिले तर हे आयुष्य दोन, चार वर्षांनी वाढू शकते. वरील खर्चाशिवाय चारी काढणे, ती बुजविणे, सॅन्ड फिल्टर साठी प्लॅटफॉर्म तयार करणे, इ.जास्तीचा खर्च मला स्वतःला करावा लागला आहे तो वेगळाच.


आपल्याला घर बांधायचे असेल तर आपण आर्किटेक्टला आपल्या गरजा सांगतो. वेळोवेळी बदल सुचवितो. तेव्हा कुठे आपल्या मनासारखे घर तयार होते.म्हणजे आपलेच ज्ञान,अनुभव, माहिती आर्किटेक्ट आपल्याला कागदावर उतरवून देतो आणि आपल्याकडून फी घेतो. अगदी तसच या ड्रीप इर्रीगेशन सिस्टिमवाल्यांचे पण आहे.


सर्वप्रथम विहिरीजवळ 10 बाय 12 चा दोन फूट उंचीचा प्लॅटफॉर्म तयार केला.पुढे शेड करायचे ठरल्यास सोईचे व्हावे म्हणून प्लॅटफॉर्मच्या चार कोपऱ्यात चार लोखंडी खांब बसविले आहेत. प्लॅटफॉर्मवर सॅन्डफिल्टर, सात वोल्व, व्हेन्चुरी, खते वितरण करणारी पाण्याची टाकी, इलेक्ट्रिक मोटरीचा स्टार्टर,इ. गोष्टी आहेत. सदर विहीर रिंग टाकून बांधलेली आहे. विहिरीवर इलेक्ट्रिक मोटारी पाण्यात सोडण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी रहाट नव्हता. तो तयार करून घेतला आणि फिक्स केला आहे.


सुरुवातीला शेतात मेन आणि सबमेन पाईपलाईन करण्यासाठी JCB लावून  चारी काढली. एजन्सीने चारित पाईप जोडले आणि प्लेन ल्याटरल जोडल्या  आणि नंतर इनर ड्रीपर लाईन जोडल्या आहेत.


आजच्या स्पर्धेच्या काळात इतर स्पर्धाकांना डावलून मी स्वतःच नेटाफिमला प्राधान्य दिले. याची जाणीव ठेवून त्यांच्याकडून मला बेस्टच सर्विस हवी होती. तरी काही उणीवा राहिल्या.


शेतातून पूर्व आणि पश्चिम दिशेला चार सबमेन लाईन टाकल्या आहेत. त्यापैकी दोन पाईपलाईन अर्ध्या आंतरापर्यंत जातात. आणि उरलेल्या दोन पाईपलाईन शेताच्या शेवट पर्यंत जातात. अर्ध्या आंतरापर्यंतच्या दोन सबमेनला प्लेन ल्यटरल साठी होल करायचे होते.उरलेल्या दोनला अर्ध्यापासून पुढे शेवट पर्यंत होल करायचे होते.यांनी काय केले तर पश्चिम दिशेला गेलेल्या चार पाईपपैकी अर्ध्यापर्यंत गेलेल्या दोन पाईपला मधे ठेवले आणि त्यास होल पाडले आहेत. परंतु पूर्व दिशेला अर्ध्यापर्यंत जाणारे दोन पाईप मधे न ठेवता बाहेर ठेवले आणि त्यास होल पाडले आहेत. याचा काय त्रास झाला तर ट्रॅक्टरने पूर्वेकडील पाईपलाईन बुजविताला ल्यटरल धरायला आम्हाला नाहक त्रास झाला .कारण ते चारपैकी बाहेरचे दोन पाईप होते . बुजवताना माती ल्याटरल वर पडत होती त्यामुळे ल्याटरल दबल्या जात होत्या. त्यातून पाणी बाहेर यायला त्रास होईल असे वाटत राहिले . चारी बुजवल्यानंतर प्लेन ल्यटरल दबली तर गेली नसेल ना या विचाराने मला रात्रभर झोप लागली नाही. याशिवाय शेतामध्ये याच अर्ध्यापर्यंत गेलेल्या सबमेन पाईपच्या काटकोनात दोन एन्ड कॅप बाहेर आल्या आहेत त्यात जास्त आंतर राहिले आहे.  त्यांनी पश्चिम आणि पूर्वेकडे  जाणाऱ्या दोन्ही पाईपलाईनला एकच लॉजिक लावायला हवे होते आणि ते काम एकसारखेच करायला हवे होते जे त्यांनी केले नाही. नेटाफिमवाले टेक्निकली साऊंड आहेत असे म्हणतात ना तर मग त्यांच्याकडून प्रत्येक गोष्ट दर्जेदारच अपेक्षित आहे.


चारी काढण्याचा उद्धेश असा असतो की, पाईप जमिनीत किमान दोन फूट खाली गाडला गेला पाहिजे . असे केले तर ते पाईप शेतात नांगरट केली तरी सुरक्षित राहतात. मला असे आढळले की, एन्ड कॅप जवळ चारित माती पडलेली होती, त्यामुळे सबमेन पाईप थोडे वर रहात होते.म्हणून मी त्यांच्या सहाय्यकास म्हटले की,ती पडलेली माती खोऱ्याने बाहेर काढा तर ते म्हणे, "ते आमचे काम नाही. आम्ही फक्त पाईप जोडणार." चारीत माती पडलेली असेल तर ती बाजूला न करताच पाईप जोडणे हे चुकीचे आहे.


शिव इर्रीगेशनने सॅन्डफिल्टर आणि वोल्व असेम्ब्ली मात्र फार छान केली आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मपाशी गेले की काहीतरी हायटेक गोष्ट केली आहे असे वाटते. शिव इर्रीगेशन तर्फे श्रीपूर येथील लोक असेम्ब्लीची कामे करायला येत होते. त्यांनी फार चांगली सेवा दिली. 


1 ऑगस्ट रोजी हे काम पूर्ण झाले आणि 2 ऑगस्ट रोजी नारळ फोडून ट्रायल झाली. चार, दोन ल्याटरल वगळता सर्व ल्याटरल मधून पाणी आले. सॅन्ड फिल्टरजवळ थोडी पाणी गळती आहे ती दुरुस्त केली जाईल. चला आता ड्रीप इर्रीगेशन सिस्टिम उभी राहिली आहे . आठवडे भरात केळी लागवड करायची आहे.


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy

साग वृक्षतोड कहाणी

निर्मला फार्म-भाग दहा- शेतातील सागवान वृक्षतोड अधुरी कहाणी .


या कहाणीची सुरुवात सन 1999-2000 सालापासून होते. तेव्हा मी वनराई संस्थेच्या संपर्कात होतो. मुंढव्यातील कोद्रे नावाचे एक अधिकारी वनराईत होते. त्यांच्याच मदतीने मी सागवानची रोपे मिळवली आणि शेताच्या बांधावर लावली. यातील शंभरपेक्षा जास्त वृक्ष सध्या वाढ झालेले आहेत.तेव्हा सातबारावर त्यांची नोंद  केली होती. आता हे वृक्ष मोठे झाले आहेत. पंचवीस वर्षानंतर या सागवान वृक्षाचे इल्ड घेण्याची वेळ आली आहे असे मला वाटले होते.


सर्वप्रथम मी वन परीक्षेत्र कार्यालय इंदापूरला भेट दिली. तेथील अधिकाऱ्याने सागवान वृक्ष तोडीस परवानगी मिळविण्यासाठी अर्ज करा, त्यासोबत सातबारा ज्यामध्ये सागाच्या झाडांचा उल्लेख असेल, नसल्यास तलाठी यांचा दाखला आणि गांव गट नकाशा जोडा असे सांगितले.अर्जाला 10₹ रेव्हेन्यू स्टॅम पेपर लावण्यास सांगितले.माझ्या सातबारावर पूर्वी साग झाडांची असलेली नोंद तलाटी भाऊसाहेब यांनी कमी केलेली होती. मग तलाठी कार्यालयाकडून दाखला मिळविण्यासाठी दोन आठवडे प्रयत्न केले पण तलाठी भाऊसाहेब लोकसभा निवडणूकीच्या कामात व्यस्त. शेवटी त्यांच्या स्टाफने पीकपाणी, वृक्ष नोंद केली आणि माझे अर्जाचे काम मार्गी लागले.


23 एप्रिल 2024 रोजी अर्ज दाखल केला आहे. अर्ज घेताना त्यांनी मला सांगितले की, लवकरच आमचा अधिकारी तुमच्या शेताला व्हिजिट करेल. तेव्हा तुम्ही अधिकाऱ्यांस देण्यासाठी दोन गोष्टी तयार ठेवा. एक - कोणत्याही नर्सरीची कोणत्याही प्रकारची उदाहरणार्थ आंबा, चिक्कू 240 झाडांची रोपे बुक केले असल्याची पावती आणि दोन - 120 सागवान वृक्ष कापल्यानंतर तुम्ही शेतात 240 झाडांचे वृक्षारोपण करणार आहात याचे 100₹ स्टॅम्प पेपरवर हमीपत्र लिहून देण्यासाठी 100₹ चा स्टॅम्प पेपर.हा स्टॅम्प पेपर पण मी घेतला होता.


मीच त्यांना विचारले तुमच्या माहितीत सागवान खरेदी करणारे कोण व्यापारी आहेत का? त्यांनी हो म्हणून लगेच अकलूज येथील एका व्यापाऱ्यास फोन लावला. त्यांना माझ्याकडील साग झाडांची माहिती दिली . त्यांचा नंबर मला आणि माझा त्यांना देवून एकदम तत्पर सेवा दिली. वर मला म्हणाले बघा तुमचा व्यवहार ठरतोय का. जर ठरला तर तो व्यापारीच या परवानग्या आणि जे काही मॅनेज करायचे ते करेल. तुम्हाला काही धावपळ करावी लागणार नाही. मी विचारले मला काय मॅनेज करावे लागणार आहे. तर ते म्हणाले अहो सुरुवातीला तुम्हाला वृक्ष तोड परवानगी घ्यावी लागते, त्यानंतर वाहतूक परवानगी  घ्याव्या लागते. आमच्या अधिकाऱ्याच्या शेताला व्हिजिट होतात. प्रत्येक वेळी हे प्रस्ताव परवानगीसाठी पुणे कार्यालयात पाठवावे लागतात. हे सर्व वेळेत करायचे असेल तर तुमची किती धावपळ होईल.


थोड्याच वेळात मला त्या व्यापाऱ्याचा फोन आला.झाडं कुठं आहेत? किती आहेत?किती मोठी आहेत? कवळ्यात बसतात का? मी म्हणालो तुम्ही पहायला याल का? तर म्हणाले नाही, तुम्हीच झाडांचे फोटो पाठवा. 


मी त्यांना सागवान लाकडाचा दर विचारला तर म्हणाले 11000₹ टन. मी म्हटले सागवान दर तर घनफुटावर असतो ना? ते म्हणाले आम्ही टनावरच घेतो.

मी जेव्हा ही झाडे लावली तेव्हा मला सांगण्यात आले होते की, वीस, पंचवीस वर्षानंतर ही झाडे घन फुटावर विकली जातील. मी यू ट्यूब वर काही व्हिडीओ पाहिले तर त्यात सध्या सागाचा घनफुटाचा दर 2500 ते 5000₹ इतका सांगत होते . याचा अर्थ माझ्या चांगली वाढ झालेल्या एकाएका झाडाची विक्री किंमत किमान 40 ते कमाल 60 हजार ₹ व्हायला हवी आहे.


एक व्यापारी तर मला म्हणे मी तुम्हाला जास्तीत जास्त 18000₹ टन प्रमाणे भाव मिळवून देतो. 

एक नासिकचा व्यापारी आहे. बोला मला किती कमिशन देता.


पुण्यातील एका सॉमिल मालकाने मला सागाच्या फ़ांद्याला 8000₹ टन आणि खोडला 18000₹ टन असा दर सांगितला होते .


साग रोपे खरेदी करताना किंवा लावण्यापूर्वी फार छान आकर्षक माहिती दिली जाते पण विक्रीची वेळ येते तेव्हा खरी वस्तुस्थिती कळते. म्हणजे नर्सरी वाल्याची कमाई होते आणि शेवटी शेतकरी हवालदिल होतो.


आता अर्जाचा पाठपुरावा म्हणून मी वन विभागातील अधिकाऱ्यांस मोबाईल फोन लावले.पण नो रिप्लाय. माझे मिसकॉल पाहुन रिप्लायचे सौजन्य नाही. मी सादर केलेल्या अर्जावर त्यांनी स्वतःहून किती दिवसात कार्यवाही करावी असा काहीतरी नियम असेल ना अशी माझी भाभडी समजूत आहे . जवळपास गेल्या तीन महिन्यात मला या कार्यालयातून ना कोणाचा फोन आला, ना कोणा अधिकाऱ्याने माझ्या शेताला भेट दिली. मी मला वन विभागाकडून गांधीजींना अपेक्षित असलेल्या 'ग्राहकांप्रमाणे' सेवा मिळेल याची वाट पहात आहे आणि ते कदाचित 'गिराईक' म्हणून माझी वाट पहात असावेत असा हा प्रकार वाटतो आहे . लोणीतील एका शेतकऱ्याला साग विक्रीचा फारसा चांगला अनुभव आलेला नव्हता . एका व्यापाऱ्यांने पण मला चांगल्या अनुभवाची अपेक्षा करू नका असे सांगितले. सागवृक्ष कापल्यानंतर त्यांची लगेच वेळेवर वजन करून वाहतूक होणे आवश्यक असते कारण शेतकऱ्याला वजनावर पैसे मिळणार असतात. हे लगेच घडलं तर शेतकऱ्याचा फायदा आणि जितका उशीर तितका व्यापाऱ्याचा फायदा. यासाठीच तर वृक्षतोड आणि वाहतूक दोन्ही परवाने त्वरित मिळणे गरजेचे असते.


माझ्या अर्जाला आता तीन महिने होत आले आहेत. हे काम उन्हाळ्यात होणे अपेक्षित होते. परवाने मिळायला अशी टाळाटाळ होत असेल तर सध्यातरी आपली साग वृक्षतोड रद्द.


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

पाहिले पिक तूर

निर्मला फार्म- भाग नऊ -लाभsss- रिस्टार्ट मधील पहिले पीक - तूर .


माझ्या वडिलांच्या काळात आमच्या शेतावर  भानुदास आण्णा तोंडे नावाचे एक सालकरी होते. त्याकाळी शेतावर ज्वारीचे खळे तयार केले जात असे. ज्वारीची रास आदूली या मापाने मोजून पोती भरण्याचे काम हे भानुदास आण्णा करत असत. पोत्यात पहिले आदूलीचे माप टाकले की ते 'एक' ऐवजी 'लाभsss' असे म्हणत असत आणि मग पुढे दोन, तीन... असे मोजत असत. आदूली म्हणजे आजचे अडीच किलो, दोन आदूल्या म्हणजे एक पायली. पायली म्हणजे आजचे पाच किलो. वीस पायल्या भरल्या की शंभर किलोचे पोते भरले जात असे. आठ पायल्याचा एक मण आणि अडीच मणाचा एक क्विंटल असे माप होते. हे आदूली, पायली ही मापे काही भागात यापेक्षा वेगळीपण होती. मला त्यांचे मोजणे फार लाभदायक आणि वृद्धिंकारक वाटत असे. हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आमचा , 2024 वर्षाचा लाभदायक रिस्टार्ट तूरीच्या लागवडीने केला आहे आणि आमची धान्यांची रास पण तशीच मोठी रहावी. 


उन्हाळ्यात शेत नांगरलेले होते आणि तूर लावण्यापूर्वी दोनदा फणले. नंतर सात फुटावर सरी काढली.

मला तूरीची 'बी डी एन 2013-41 गोदावरी' या वाणाचे बियाणे हवे होते. इंदापूर मधील व्यापाऱ्यांकडे हा वाण मिळाला नाही. कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे तूरीची 'अश्लेषा' हा वाण मिळाला . 200 रूपये प्रती किलो. एका एकरासाठी फक्त एक किलो बियाणे लागते. दोन फूट बाय सात फूट ओळीत दर दोन फुटावर तूरीच्या दोन बिया हाताने डोबल्या जातात. 29 जून 2024 रोजी वाटेकरी पोपट दळवी नवरा-बायकोने तूरीची लागण केली आहे. पिक जेव्हा मोठे होईल तेव्हा ते एकरभर क्षेत्र व्यापून टाकेल . मी चिंचेच्या बागेत तूरीचे आंतर पिक घेतले आहे.अगोदर पाऊस पडून गेलेला होता, त्यामुळे वापसा झाला की तूर लावली आणि नंतर दोन दिवसातच पुन्हा पाऊस झाला. तूर छान उगवली आहे. 


मेहुणे मेहुणे मेहुण्याचे पाहुणे...यावर्षी मेव्हण्याचा मुलगा हक्काचा आकाश बिभीषण जाधव यांस शेतातील पिकांकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. आकाश Bsc Agriculture Biotechnology + PGDM आहे. त्यांना विविध पिके, पिकांचे आजार, पिकांची औषधे  आणि खते याबद्दल चांगली माहिती आणि अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी सगळी पिके घेतली जाणार आहेत. 


तण उगवले की Hachiman 175 ml हे तणनाशक फवारायचे आहे. तूर थोडी मोठी झाली की,

18.46.00

10.26.26

24.24.00

14.35.14 हे खत आणि वाढीसाठी 

Humic हे खत टाकण्याचे नियोजन आहे. तूर 45 आणि 60 दिवसाची झाली की तिचे शेंडे खुडले जातात, त्यामुळे पिकाला बहार येण्यास मदत होते.


यावर्षीचे पहिलेच पिक 'लाभsss' म्हटल्याप्रमाणे लाभदायक ठरेल असा विश्वास आहे.


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.