Monday, 5 August 2024

ठिबक सिंचन

 निर्मला फार्म-भाग अकरा -डुबुक सिंचन ते ठिबक सिंचन.


पूर्वी शेतात बैलांच्या माध्यमातून नांगरट करणे , पाळी घालणे, सरी सोडणे अशी कामे केली जात असत . ऊसाच्या पिकासाठी सरी तोडून प्रत्येक गुंठ्याचा एक वाफा तयार केला जात असे.अशा प्रकारे एका एकरात चालीस वाफे तयार केले जात असत.प्रत्येक वाफ्याची उंची एक ते सव्वा फूट असे.वाफ्याच्या सरीत ऊस लावला जात असे.दंडाने प्रत्येक वाफ्याला पाणी देण्यासाठी एक दारं(वाट) असे. एका वाफ्यात पाणी सोडले की ते पाणी प्रत्येक सरीतून नागमोडी वळणाने फिरत असे आणि वाफा पाण्याने भरला जात

असे. तीन, चार वाफ्यानंतर एक मोठा कट तयार केला जात असे.या कटाची उंची दोन ते अडीच फूट असे.ऊसाला पाणी देण्याची पद्धत म्हणजे पाण्याने वाफा गच्च भरणे असे. तेव्हा माझे वडील तर असे म्हणायचे की, "वाफ्यात इतके पाणी साठायला हवे की त्या पाण्यात घाघर पूर्ण भरली जायला पाहिजे." थोडक्यात पाणी पिकाला नव्हे तर शेताला पाजले जात असे आणि पाण्याचा अपव्यय होत असे. एकरातील एखादा वाफा पाण्याने पूर्ण भरला आहे का नाही हे शेतकरी कसे पाहत असे याचा किस्सा डॉ आप्पासाहेब पवार भाषणात रंगवून सांगत असत  तो असा,"शेतकरी ऊसा बाहेर उभा राहून अंदाजे त्या वाफ्यात एक छोटा दगड फेकत असे. दगड पाण्यात पडून 'डुबुक ' असा आवाज आला की समजायचे वाफा पाण्याने भरलेला आहे. मग तो पाण्याचं दारं मोडायला ऊसात जात असे."  यालाच गमतीनं ते 'डुबुक शेती(सिंचन)' असं म्हणत असत .


यात पुढे सुधारणा झाली आणि ऊस लागवडीसाठी वाफ्या ऐवजी सरळ सरीची पद्धत आली. यातही प्रत्येक सरीचे दार मोडले तर याला पिकाला 'हात दाऱ्यावर' पाणी देणे असे म्हणतात.या पद्धतीत पीकाला तुलनेने कमी पाणी लागते . आळशी शेतकरी, मजूर काय करतो तर एकदम तीन, चार सऱ्यावर पाणी सोडतो आणि बसतो कुठेतरी जाऊन, परत येतो तेव्हा चार सऱ्या भरून पाणी शेताबाहेर गेलेले असते.

शेतमजूराच्या दुर्लक्षामुळे  माझ्याच शेतातले पाणी सऱ्या भरून रिकाम्या शेतात आणि पुढे ओढ्याला गेल्याची उदाहरणे आहेत. ऊसाच्या शेतीत शेतकरी वारेमाफ पाण्याचा वापर करतात ही टीका बरोबर आहे ती यामुळेच.


'ठिबक सिंचन' म्हणजे टिप टिप किंवा थेंब,थेंब पाणी पाझरणे. या पद्धतीत पिकाला गरजे इतकेच पाणी दिले जाते. 80,90 च्या दशकात पद्मश्री कै.डॉ आप्पासाहेब पवार यांना ' ठिबक सिंचन 'चा प्रचार, प्रसार करून शेतकऱ्यांमध्ये ठिबक सिंचन विषयी जाणीव जागृती करताना मी पाहिलेले आणि ऐकलेले होते. ते इस्राईलला जाऊन आले होते. तिथली ठिबक सिंचन पद्धती आणि क्रांती त्यांनी पाहिलेली होती. ते शेतकऱ्यांचे प्रबोधन करत तेव्हा PVC पाईप,ड्रीपर,ल्याटरल, इ. साहित्य सोबत घेवून फिरत असत आणि ठिबक सिंचन कसे असते ते समजावून सांगत असत. कृषी विकास प्रतिष्ठान, बारामती ही त्यांची प्रगत शेतीची प्रयोगशाळा आणि शेतकऱ्यांसाठी प्रत्येक्षिक फार्म होता. आतापर्यंत या विषयाने प्रगतीचा बराच मोठा पल्ला गाठाला आहे. 


1999-2000 मध्ये मी शेतात टप्प्या टप्प्याने दहा एकर नेटाफिमचा ठिबक सिंचन संच बसवीला होता. श्री रामचंद्र घोळवे, भवानीनगर यांनी माझी सिस्टिम बसविली होती.त्यावेळचा माझा तो अनुभव चांगला होता. 


2014 साली उजनी जलशयातून लिफ्टने पाणी शेतात आणले आणि आता अजून खर्च नको म्हणून मी ड्रीप इर्रीगेशन पासून दुर राहिलो. पण आता पाण्याची बचत, पिकाची उत्पादकता,पाणी वितरणाची सुलभता आणि कमी मनुष्यबळात काम यासाठी मी पुन्हा ठिबक सिंचन कडे वळत आहे.


ड्रीप इर्रीगेशन करायचे म्हटले की, जैन इर्रीगेशन, महिंद्रा EPC, फिनोलेक्स, नेटाफिम, इ. पर्याय समोर येतात. मी सर्वांचे कोटेशन घेतले. मला नेटाफिमचा पूर्वीचा अनुभव चांगला होता त्यामुळे माझा कल नेटाफिम कडे होता. या सगळ्याच ISO मानांकन प्राप्त कंपन्या आहेत. त्यामुळे सर्वांची उत्पादने तुलनेने सारखीच असतात. फरक पडतो तो तांत्रिक सल्ला, कन्सेशन, संच जोडणी आणि विक्री पश्च्यात सेवा या मध्ये.डॉ चेतन पराडे यांनी 80 एकर  क्षेत्रावर नेटाफिम ड्रीप इर्रीगेशन सिस्टिम बसविली आहे. त्यांचा अनुभव,सल्ला आणि एकूणच विचार करून मी नेटाफिमची निवड केली. सर्वप्रथम मी श्री रामचंद्र घोळवे यांना संपर्क केला त्यांनी मला इंदापूर मधील शिव इर्रीगेशनचे श्री राहुल अनभुले यांचा संपर्क दिला. पुढे श्री सिद्धेश्वर माने, श्री रुपेश दाने माझ्या संपर्कात आले आणि पुढे बऱ्याच बैठका आणि चर्चे अंती हे काम निश्चित झाले.


शेतात ड्रीप इर्रीगेशन सिस्टिम बसवायची असेल तर प्रस्ताव तयार करण्यासाठी शेताचा 7/12, 8 अ, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खात्याचे डिटेल्स द्यावे लागतात. एजन्सी शेतकऱ्याचा प्रस्ताव  शासनाकडे ऑनलाईन सादर करण्याचे काम करते. शिव इर्रीगेशनने माझा प्रस्ताव 29/4/2024 रोजीच सादर केला आहे.अर्ज क्रमांक 242510012599036 आहे.


ड्रीप इर्रीगेशन केले तर शासनाकडून 80% सबसिडी मिळते असे सांगतात पण ही अफवा आहे . वेगवेगळ्या निकषामुळे शेतकऱ्यास 80% सबसिडी मिळत नाही. त्यातला एक निकष असा आहे की, दर साडेचार फुटावर एक ल्याटरल असावी असा आहे. मी केळी रोपे लागवड पाच बाय सात फुटावर करीत आहे. दर सात फुटावर दोन ल्याटरल असणार आहेत. याचा अर्थ दर साडेतीन फुटावर एक ल्याटरल असणार आहे. त्यामुळे प्रत्येक्षात साडेतीन फुटावर एक ल्याटरल असताना मला दर साडेचार फुटावर एक ल्याटरल आहे असे गृहीत धरून त्याप्रमाणे सबसिडी मिळेल. शिवाय सॅन्ड फिल्टरला एक विशिष्ट रक्कम मिळते ती टक्केवारीच्या प्रमाणात नसते. मी सॅन्डफिल्टर जवळच सात वोल्व बसविले आहेत. त्यामुळे मेन आणि सबमेन पाईपचा खर्च पण वाढला आहे जो त्यांच्या निकषात बसत नाही. यामुळे ड्रीप इर्रीगेशन सिस्टिमचा खर्च प्रती एकरी 80 हजार असताना मला एकरी 35 हजार रुपये सबसिडी मिळणार आहे असे मला सांगण्यात आले आहे. म्हणजे 43.75%. तीही सन 2024-25 मध्ये मार्च एन्ड पर्यंत कधीतरी मिळेल अशी आशा आहे . एकदा ही सिस्टिम बसवली तर तिचे आयुष्य आठ वर्षें असते . ऍसिड ट्रीटमेंट केली , डिस्क आणि सॅन्ड फिल्टर वेळोवेळी साफ केले, वोल्व आणि फिल्टरला ऊन, पाऊसापासून संरक्षण दिले तर हे आयुष्य दोन, चार वर्षांनी वाढू शकते. वरील खर्चाशिवाय चारी काढणे, ती बुजविणे, सॅन्ड फिल्टर साठी प्लॅटफॉर्म तयार करणे, इ.जास्तीचा खर्च मला स्वतःला करावा लागला आहे तो वेगळाच.


आपल्याला घर बांधायचे असेल तर आपण आर्किटेक्टला आपल्या गरजा सांगतो. वेळोवेळी बदल सुचवितो. तेव्हा कुठे आपल्या मनासारखे घर तयार होते.म्हणजे आपलेच ज्ञान,अनुभव, माहिती आर्किटेक्ट आपल्याला कागदावर उतरवून देतो आणि आपल्याकडून फी घेतो. अगदी तसच या ड्रीप इर्रीगेशन सिस्टिमवाल्यांचे पण आहे.


सर्वप्रथम विहिरीजवळ 10 बाय 12 चा दोन फूट उंचीचा प्लॅटफॉर्म तयार केला.पुढे शेड करायचे ठरल्यास सोईचे व्हावे म्हणून प्लॅटफॉर्मच्या चार कोपऱ्यात चार लोखंडी खांब बसविले आहेत. प्लॅटफॉर्मवर सॅन्डफिल्टर, सात वोल्व, व्हेन्चुरी, खते वितरण करणारी पाण्याची टाकी, इलेक्ट्रिक मोटरीचा स्टार्टर,इ. गोष्टी आहेत. सदर विहीर रिंग टाकून बांधलेली आहे. विहिरीवर इलेक्ट्रिक मोटारी पाण्यात सोडण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी रहाट नव्हता. तो तयार करून घेतला आणि फिक्स केला आहे.


सुरुवातीला शेतात मेन आणि सबमेन पाईपलाईन करण्यासाठी JCB लावून  चारी काढली. एजन्सीने चारित पाईप जोडले आणि प्लेन ल्याटरल जोडल्या  आणि नंतर इनर ड्रीपर लाईन जोडल्या आहेत.


आजच्या स्पर्धेच्या काळात इतर स्पर्धाकांना डावलून मी स्वतःच नेटाफिमला प्राधान्य दिले. याची जाणीव ठेवून त्यांच्याकडून मला बेस्टच सर्विस हवी होती. तरी काही उणीवा राहिल्या.


शेतातून पूर्व आणि पश्चिम दिशेला चार सबमेन लाईन टाकल्या आहेत. त्यापैकी दोन पाईपलाईन अर्ध्या आंतरापर्यंत जातात. आणि उरलेल्या दोन पाईपलाईन शेताच्या शेवट पर्यंत जातात. अर्ध्या आंतरापर्यंतच्या दोन सबमेनला प्लेन ल्यटरल साठी होल करायचे होते.उरलेल्या दोनला अर्ध्यापासून पुढे शेवट पर्यंत होल करायचे होते.यांनी काय केले तर पश्चिम दिशेला गेलेल्या चार पाईपपैकी अर्ध्यापर्यंत गेलेल्या दोन पाईपला मधे ठेवले आणि त्यास होल पाडले आहेत. परंतु पूर्व दिशेला अर्ध्यापर्यंत जाणारे दोन पाईप मधे न ठेवता बाहेर ठेवले आणि त्यास होल पाडले आहेत. याचा काय त्रास झाला तर ट्रॅक्टरने पूर्वेकडील पाईपलाईन बुजविताला ल्यटरल धरायला आम्हाला नाहक त्रास झाला .कारण ते चारपैकी बाहेरचे दोन पाईप होते . बुजवताना माती ल्याटरल वर पडत होती त्यामुळे ल्याटरल दबल्या जात होत्या. त्यातून पाणी बाहेर यायला त्रास होईल असे वाटत राहिले . चारी बुजवल्यानंतर प्लेन ल्यटरल दबली तर गेली नसेल ना या विचाराने मला रात्रभर झोप लागली नाही. याशिवाय शेतामध्ये याच अर्ध्यापर्यंत गेलेल्या सबमेन पाईपच्या काटकोनात दोन एन्ड कॅप बाहेर आल्या आहेत त्यात जास्त आंतर राहिले आहे.  त्यांनी पश्चिम आणि पूर्वेकडे  जाणाऱ्या दोन्ही पाईपलाईनला एकच लॉजिक लावायला हवे होते आणि ते काम एकसारखेच करायला हवे होते जे त्यांनी केले नाही. नेटाफिमवाले टेक्निकली साऊंड आहेत असे म्हणतात ना तर मग त्यांच्याकडून प्रत्येक गोष्ट दर्जेदारच अपेक्षित आहे.


चारी काढण्याचा उद्धेश असा असतो की, पाईप जमिनीत किमान दोन फूट खाली गाडला गेला पाहिजे . असे केले तर ते पाईप शेतात नांगरट केली तरी सुरक्षित राहतात. मला असे आढळले की, एन्ड कॅप जवळ चारित माती पडलेली होती, त्यामुळे सबमेन पाईप थोडे वर रहात होते.म्हणून मी त्यांच्या सहाय्यकास म्हटले की,ती पडलेली माती खोऱ्याने बाहेर काढा तर ते म्हणे, "ते आमचे काम नाही. आम्ही फक्त पाईप जोडणार." चारीत माती पडलेली असेल तर ती बाजूला न करताच पाईप जोडणे हे चुकीचे आहे.


शिव इर्रीगेशनने सॅन्डफिल्टर आणि वोल्व असेम्ब्ली मात्र फार छान केली आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मपाशी गेले की काहीतरी हायटेक गोष्ट केली आहे असे वाटते. शिव इर्रीगेशन तर्फे श्रीपूर येथील लोक असेम्ब्लीची कामे करायला येत होते. त्यांनी फार चांगली सेवा दिली. 


1 ऑगस्ट रोजी हे काम पूर्ण झाले आणि 2 ऑगस्ट रोजी नारळ फोडून ट्रायल झाली. चार, दोन ल्याटरल वगळता सर्व ल्याटरल मधून पाणी आले. सॅन्ड फिल्टरजवळ थोडी पाणी गळती आहे ती दुरुस्त केली जाईल. चला आता ड्रीप इर्रीगेशन सिस्टिम उभी राहिली आहे . आठवडे भरात केळी लागवड करायची आहे.


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy

No comments: