Thursday, 10 April 2025

कालिदास (आप्पा ) देवकर यांचा 80 वा वाढदिवस

 देवकर कुटुंबियां तर्फे शुभेच्छा पत्र...


आ.मा.श्री.कालिदास हरिश्चंद्र देवकर उर्फ आप्पा तुम्ही 

लोणी देवकर गावाला आणि देवकर घराण्याला तुमच्या राजकीय, सामाजिक कार्य कर्तृत्वाने ओळख निर्माण केली आहे.


कै.हरिश्चंद्र उर्फ आण्णा आणि कै.हिराबाई उर्फ भाभी यांना कालिदास(आप्पा), पृथ्वीराज(बप्पा ), रत्नाकवी(बापू ), योगीराज(आबा ) ही चार मुलं आणि कै.मनोरमा(आक्का ) आणि सौ.शशिकला(ताई ) या दोन मुली अशी सहा अपत्य झाली.कै.मनोरमा (आक्का ) हे पहिले कन्यारत्न. कै. सुभाष आप्पासाहेब पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांनी पाटील घराण्याचा वारसा जपला आणि वाढवीला.कालिदास(आप्पा ) हे दुसरे अपत्य.दुसऱ्या भगिनी सौ. शशिकला( ताई ) यांचा श्री अरविंद संपतराव जामदार यांच्याशी विवाह झाला. त्यांनी जामदार घराण्याचा वारसा जपला आणि वाढविलेला आहे.


कालिदास आप्पा तुमचा जन्म 10/04/1945 रोजी झाला. तुम्ही वयाची 80 वर्षें पूर्ण करीत आहात. 80 वर्षाच्या आयुष्यात 80 गुणिले 12  म्हणजे 960 पौर्णिमा तसेच 32 अधिकमास महिन्यात 32 पौर्णिमा अशा 992 पौर्णिमा अनुभवल्या आहेत.81 व्या वर्षात 8 च महिन्यात तुमचे 1000 पौर्णिमांचे चंद्र दर्शन पूर्ण होणार आहे.तुमचे सहत्रचंद्र दर्शन हा तुमच्यासाठी आणि तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसाठी फार मोठा योग आहे.


सन 1967 मध्ये कालिदास आप्पा तुमची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द सुरु झाली. तुमच्या कारकिर्दीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे...


सुरुवातीलाच तुम्ही लोणी देवकर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन झाला आणि पुढे 25 वर्षें बिनविरोध चेअरमन पदी राहिलात .

सन 1975 मध्ये तुमची गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आणि पुढे तुम्ही 1995 पर्यंत वीस वर्षें गावच्या सरपंच पदी विराजमान राहिलात .

त्याच काळात इंदापूर तालुका खरेदी- विक्री संघाचे चेअरमनपदही तुम्ही भूषविले.

सन 1984 पासून इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे सलग 15 वर्षें संचालक राहिलात.

पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे  सलग 15 वर्ष संचालक राहिलात.

याचदरम्यान इंदापूर तालुका मार्केट कमिटीचे संचालक पदी पण राहिलात.

पुढे तुम्ही पुणे जिल्हा परिषदचे सदस्य झालात. आम्हा सर्वांसाठी ही खूप अभिमानाची बाब होती.

खरंतर तुमची राजकीय वाटचाल इतकी चांगली होती की, तुम्हाला इंदापूर तालुका पंचायत समिती सभापती पद, पुणे जिल्हा परिषद, अध्यक्ष पद मिळायला हवे होते.असो!


आता तुम्ही राजकीय कुस्ती सोडली होती परंतु गावाला तुमची पुन्हा गरज भासली म्हणून तुमच्या वयाच्या 76 व्या वर्षी गावकऱ्यांनी तुम्हाला पुन्हा सरपंच होण्याचा आग्रह केला आणि तुमची पुन्हा निवडही केली आहे. आजच्या राजकीय वाटमारीच्या वातावरणात ही विशेष उल्लेखनीय बाब ठरावी.


आपले वडील कै.आण्णा आणि आई कै.भाभी यांनी सर्व मुलांवर फार चांगले संस्कार केले. कै.भाभी कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या.भावकी,गावकी चा आदर,पाहुणचार करण्यात आणि एकोपा ठेवण्यात त्यांचा हातभार होता. कै.आण्णा फार मोठा माणूस. त्याकाळात एक चांगला शेतकरी म्हणून पंचक्रोशीत त्यांचे नाव आणि दबदबा होता. 152 एकरांचा 7/12 देवकर कुटुंयाच्या नावावर होता. इतकी सर्व शेती ते एकटे सालकरी गड्यांच्या माध्यमातून करत होते. आजही भू दान चळवळ,खडकवासला कॉलनी आणि कालवा,MIDC ला दिलेली जमीन वगळता सर्व जमीन कुटुंबियांकडे आहे. असे हे भारदस्त आण्णा तुम्हाला नेहमी सांगायचे, "कालिदास, देवाने आपल्याला खूप काही दिले आहे. तुला सामान्य लोकांची सेवा करायची आहे. काम करताना आपले दोन पैसे खर्च झाले तरी होऊदे पण निस्वार्थपणे लोकांची सेवा कर." तुम्ही पण तसेच वागला म्हणून समाजात तुमचे नाव झालेले आहे.


तुमच्या या कार्यकाळात तुम्ही आमदार, खासदार, मंत्री यांच्या मदतीतून गावासाठी नळ पाणीपुरवठा योजना आणली. गावातील मुलांसाठी माध्यमिक हायस्कूल सुरु केले. गावातील प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेसाठी शासकीय फंडातून इमारती बांधून घेतल्या.

गावातील तरुणांना सहकारी,शासकीय क्षेत्रात नोकऱ्या मिळवून दिल्या.

गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आणली. त्यानंतरच्या कालावधीत गावात देना बँकेची म्हणजे आजची बँक ऑफ बडोदाची शाखा  आणली.

सर्वसामान्यांच्या दळणवळणाच्या सेवेसाठी गावात टेलिफोन एक्सचेंज सुरू केले. 

गावच्या सामाजिक उपक्रमात तुमचा सतत सहभाग राहिला आहे.

गावच्या गोरगरीब लोकांना शासनाच्या विविध योजनांचा तुम्ही लाभ  मिळवून दिलेला आहे. 

उजनी जलाशयाचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी गावात विद्युत महामंडळाचे केंद्र उपलब्ध केले.

गावात खडकवासला प्रकल्पाच्या  कॉलनीला एकत्रित असताना आपली जमीन दिली. लोणी देवकर एमआयडीसी साठी पुढाकार घेतला आणि स्वतःची पुष्कळ जमीन पण एमआयडीसीला दिली.  लोणी देवकर एमआयडीसी मुळे स्थानिकांना रोजगाराच्या, उद्योगाच्या शेकडो संधी तुमच्यामुळे उपलब्ध झाल्या.

गावात आरोग्य सेवा उपकेंद्र आणले.

ग्राम सचिवालय उभारले.

सद्यस्थितीत गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पेयजल योजनेचे काम मंजूर आहे.


या आणि अशा अनेक कामांमुळे तुम्ही जनमानसात लोकप्रिय आहात.


तुम्हाला तुमची पत्नी सौ. प्रकाशबाई (वहिनी) यांची मौलिक साथ लाभली. तुम्हा उभायतांची मुलं,नानासाहेब आणि विद्यासागर(तात्या ), सुना,वैशाली आणि नूतन, नातवंडे तन्वी, राजवीर आणि साईराज, असा तुमचा संसाररूपी वृक्षवेल बहरला आहे.देवकर कुटुंबीय, भावकी आणि गावकीची साथ लाभली म्हणून तुम्ही हे सर्व करू शकला हे नक्की.


देवकर कुटूंबातले कोण जर कधी तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेले तर एक अनुभव आम्हाला बऱ्याचदा आला आहे . एखादा अनोळखी माणूस आम्हाला विचारतो. "काय पाहुणे कुठून आलात तुम्ही?" आम्ही म्हणतो, "इंदापूर." त्यांचा पुढचा प्रश्न असतो, "प्रॉपर इंदापूर का?" आमचे उत्तर असते, "नाही, लोणी देवकर." मग त्यांचा पुढचा प्रश्न, "लोणी देवकर, मग कालिदास देवकरला ओळखता का?" आमचे उत्तर, "ते मोठे भाऊ आहेत माझे." मग काय त्या माणसाच्या चेहऱ्यावर चांगलाच आनंद तरळतो आणि आमची छाती अभिमानाने थोडी फुगते. ओळखीचे खूप मोठे जाळे तुम्ही विनलेले आहे.


वडील कै.आण्णा फार हुशार आणि धोरणी होते. अंकगणिताचे पाढे, पंचांग, पौराणिक माहिती, इ. त्यांना अगदी तोंडपाठ असायची.हिशेबाची वही ते मोडी लिपीत लिहायचे आणि सही पण मोडी लिपीतच करायचे,ते नेहमी म्हणायचे,"केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार l

शास्त्रग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार l 

याचा उपयोग तुम्ही देशाटन, मैत्री, सभा, हुशारी साठी केला. फार फिरलात तुम्ही.

खा.शंकरराव भाऊ कडे गावातले कार्यकर्ते गेले की, ते त्यांना तुमच्याबद्दल हमखास विचारायचे," काय मग, कुठे गेलाय आज तुमचा नेता,पुण्याला का मुंबईला." कारण तुम्ही उटसूट पुण्या, मुंबईला जायचे. असच एकदा भाऊंनी विचारले तर कार्यकर्ते म्हणाले, "आज आमचा नेता दिल्लीला गेलाय भाऊ.' खा.भाऊ एकदम चकित,"आsss, दिल्लीला कशाला गेलाय." असं तुमचं असायचं, आज इथं तर उद्या तिथं. अगदी थायलंड, इंडोनेशिया पण फिरून झालं तुमचं.


आप्पा,तुम्ही तुमच्या कार्य कर्तृत्वाने गावाला आणि देवकरांना चांगली ओळख दिली आहे. यामुळे आम्हाला तुमचा अभिमान आहे.


तुमच्या आयुष्यात आलेल्या या सहत्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला शतकपूर्तीसाठी अनंत शुभेच्छा.


आपणांस कुटुंबियांच्या वतीने हे शुभेच्छा पत्र देताना आम्हाला खूप आनंद होत आहे.


आपले स्नेहांकित.

देवकर कुटुंबीय, लोणी देवकर.

शब्दांकन - योगीराज देवकर.

Saturday, 5 April 2025

निर्मला नगरी -मालगुंड, गणपतीपुळे.

 आंतरराष्ट्रीय सहजयोग सेमिनार गणपतीपुळे विषयी श्री माताजींची अमृतवाणी....

💐💫🌟🎉🎊🌹🌈


मराठी अनुवाद , कृपया वाचा,सर्वांपर्यंत प्रसारित करा आणि 2024 गणपतीपुळे सेमिनारला या!


"...श्री माताजींचा गणपतीपुळेला येण्याचा एक विशेष उद्देश आहे . हे विश्रांतीयोग्य अतिशय सुंदर ठिकाण तर आहेच परंतु त्यांनी हे शोधले आहे की याठिकाणी चैतन्य आहे जे तुम्हाला अगदी सहज स्वच्छ करते ."

प.पू .श्री माताजी. ३१ डिसें १९८५.


"... गणपतीपुळेला एक विशेष अर्थ आहे कारण तो महागणेश आहे . गणेश जे मुलाधारात असतात  विराटात ते महागणेश बनतात, ते मस्तिष्कमधे असतात. याचे मुख्य मूळ आहे अबोधिता, श्री गणेश आणि तो गणपतीपुळेमध्ये महागणेश होतो. इथे तो पितृत्वाने घेरलेला आहे, समुद्राचे गुरुतत्व, त्यामुळे तो इथे गुरू बनतो .

  इथे श्री गणेश त्याच्या पूर्ण परिपक्व स्वरूपात आहे .त्यामुळे आपणसुद्धा आपल्यामध्ये महागणेश विकसित करतो ... 

  अष्टविनायकांमध्ये ( आठ स्वयंभू गणेश ) येथील महागणेश पिठाधिश आहेत, ( पिठांचा अधिपती ) जे या पिठावर बसलेले आहेत, जे आठ स्वयंभू गणेश्यांची काळजी घेतात, त्यांचे रक्षण करतात ."

प.पू.श्री माताजी. १ जाने १९८६.


"... गणपतीपुळे सेमिनार किंवा तुम्ही याला काहीही म्हणा, मला माहित नाही तुम्ही देव आणि देवी यांच्या पवित्र परिषदेला काय म्हणाल ,परंतु हा सेमिनार मला तसाच खूप सांकेतिक आहे ,कारण हा सर्व जगाचे प्रतिनिधित्व करतो.हा संपूर्ण जगाच्या समस्या आणि उपायांचे प्रतिनिधित्व करतो. ही अतिशय सुंदर कल्पना आहे,मला माहीत नाही ही माझ्या डोक्यात कशी उत्पन्न झाली आणि मी तुम्हा सर्वांना भेटण्यासाठी या प्रकारची सुरेख परिषद सुरू केली ."

प.पू. श्री माताजी. २४ डिसें १९९०.


"... लोक अष्टविनायकाला जातात परंतु या महागणपतीला जात नाहीत.त्यांना याची कल्पना नाही . मी रत्नागिरीहून परत येत होते आणि मी खरेच खूप मोठा तारा या मंदिराच्या वरील भागात पाहिला .इतरांना तो दिसत नव्हता हा एक  प्रश्नच होता , त्यावेळी कोणताही सहजयोगी तो पाहू शकला नाही. तर मी त्यांना म्हणाले, त्या ताऱ्याचा पाठलाग करूया. तो खूप मोठा ,अतिशय मोठा,पण इतर ताऱ्या सारखा नव्हता,अगदी मोठा, खूप असामान्य होता ,परंतु त्यांना तो दिसला नाही.मी म्हणाले काही हरकत नाही. मी त्यांना हातखंब्यापासून वळण्यास आणि दुसऱ्या रस्त्याने जाण्यास सांगितले आणि आम्ही त्याचा बरोबर पाठलाग गेला ... आम्ही जेव्हा गणपतीपुळ्याला पोहोचलो तेव्हा उजाडले होते आणि सुरेख स्पष्ट दिसू लागले होते. मी हे विसरू शकत नाही आणि त्या सूर्योदयाच्या प्रकाशात आत्ता आपण आहोत ते खूप सुंदर ठिकाण पाहिले आणि मी म्हणाले , हीच ती जागा आहे जिथे असायला हवे , जिथे आपण सर्व सहजयोग्यांना सुद्धा आणायला हवे. खरेतर तुम्हाला हे माहीत आहे की रवींद्रनाथ टागोर यांनी अगोदरच या ठिकाणचे वर्णन केलेले आहे, या ठिकाणी जगभरातून लोक येतील आणि हे भारताच्या सागरी किनाऱ्यावर  होईल, त्यांनी हे भाकीत केले होते. परंतु जसा आश्चर्यकारकपणे मी या जागेचा शोध लावला तो शोध, ज्या तीन श्रेष्ठ माणसांनी ख्रिसताचा शोध लावला तसाच खूप चकित करणारा आहे .

 हे ठिकाण खरेच खूप भाग्यवान आणि सुरेख चैतन्यमय आहे.मी या ठिकाणी दोन दिवस राहिले आणि मी ठरविले हेच ते ठिकाण आहे जिथे सेमिनार होतील ."

प.पू. श्री माताजी . २५ डिसें १९९९. गणपतीपुळे.


आंतरराष्ट्रीय सेमिनार आणि ख्रिसमस पूजा 2024 चे निमंत्रण .

  श्री माताजींच्या परम कृपेत गणपतीपुळे, मालगुंड येथे  'निर्मला नगरी,'  22 डिसें 2024 रोजी आपल्या स्वागतासाठी थाटात उभी आहे . गणपतिपुळे सेमिनारला असा हा दैवी पूर्वइतिहास आहे . एखादा सहजयोगी एकदा सेमिनारला आला की पुन्हा पुन्हा येत राहतो ते या जागेच्या महात्म्यामुळेच.

 श्री माताजींच्या पदस्पर्शाने  पावन झालेल्या या ठिकाणी प्रवेशद्वारातून प्रवेश केला की कल्पवृक्षांची दुतर्फा रांग,आमराई आणि बगीचा आपले स्वागत करतो .

कॅम्पसमधे पोहोचल्यावर सर्वप्रथम भेट द्यायला हवा तो याच वर्षी आत निर्माण केलेला मेडिटेशन हॉल,तिथे श्री माताजींचे दर्शन घ्यावे आणि ध्यानस्थ बसावे. कार्यालय, डॉरमेटरीज, सूट्स, कॅन्टीन,लॉकर, CCTV यंत्रणा, लाईट, आणि सर्वांत महत्त्वाचे सेमिनार आणि सेमिनार आणि पूजेसाठी  चैतन्यमय वातावरण असलेला भव्य स्टेज,पूजारूम,श्री माताजींची रूम आणि  सभागृह अशा एकएक वास्तु दृष्टीस पडतात.  

 हजारो सहजयोग्यांना सामावून घेतील असे टेन्ट्स, डायनिंग एरिया, प्रदर्शन जागा, पार्कींग, फिल्टरचे मुबलक स्वच्छ पाणी, टॉयलेट्स, इ. अश्या अनेक सोयी सुविधा तिथे उपलब्ध आहेत . यामुळे सर्वांची निवास आणि भोजनाची उत्तम व्यवस्था तर होतेच त्याशिवाय होणारा आध्यत्मिक योग म्हणजे सेमिनारचा कळसच ठरतो .एकूणच हा सर्व परिसर नयनरम्य आणि देखणा आहे . 

 निर्मल नगरी समोरच आहे सुरक्षित, शांत, स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्र किनारा, अरबी समुद्र जो सकाळ , संध्याकाळ आपल्याला स्वच्छ करण्यासाठी सेवेत असतो .

  श्री गणेश (मूलाधार),समुद्र (नाभी,भवसागर), ख्रिसमस पूजा( आज्ञा), श्री महागणेश(विराट) आणि साक्षात श्री आदिशक्ती श्री माताजी (सहस्रार )यांच्यामुळे जी परम चैतन्याची  ऊर्जा मिळते आणि आध्यत्मिक उत्थानाला गती लाभते ती केवळ अवर्णनीय . श्री माताजींचे शोधकार्य आणि या जागेला लाभलेले आशीर्वाद यामुळेच या जागेचे आध्यत्मिक महत्व निर्माण झालेले आहे .

  म्हणूनच वाटते ,प्रत्येक सहजयोगी, बाल युवा, युवा शक्ती-मुले,मुली आणि बंधू, भगिनींने गणपतीपुळे सेमिनारला हजेरी लावायलाच हवी आणि सामूहिकतेचा, आध्यात्मिक उन्नतीचा आनंद द्विगुणित करायलाच हवा आणि निरानंद मिळवायला हवा.

तुम्हीतर याच पण इतरांना पण निमंत्रित करा.

            जय श्री माताजी !💐🎊🎉🌟💫🌈🌹

जेनेरिक औषधे स्वस्थ.

 दवा इंडिया, जेनेरिक फार्मसीचे औषध ब्रँडेड औषधापेक्षा साडेसात पट स्वस्थ आहे .


दवा इंडिया, जेनेरिक फार्मसीच्या Rosuvastatin Tablets IP 10mg हा 50 टॅब्लेट्सचा बॉक्स 125₹ आहे. 


याच सेम Rosuvastatin Tablets IP, Rosumac 10mg  ब्रँडेडच्या फक्त 15 टॅब्लेट्सची स्ट्रीप 274₹ आहे. याचा अर्थ 50 टॅब्लेट्सची किंमत 912.50 ₹ आहे.


म्हणजे जेनेरिकची एक गोळी 2.50 ₹ आहे,तर ब्रँडेडच्या एक गोळी 18.25₹ आहे.


सदर टॅबलेट LDL (Low Density Lipoprotein ) साठी घेतली जाते. 


जेनेरिक औषधे आणि ब्रँडेडच्या औषधाचे कन्टेन्ट सारखेच असतात. तरी किंमत जास्त ठेवून औषध निर्माण करणाऱ्या ब्रँडेड कंपन्या असा *साडेसात पट* इतका भरमसाठ नफा कमवत आहेत. 


जेनेरिक औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि सरकारने नागरिकांमध्ये याविषयी  बरीच जाणीवजागृती केली आहे तरी लोकं जेनेरिक कडे वळत नाहीत. 


याविषयी अमीर खानने 'सत्यमेव जयते ' TV शो मध्ये एक एपिसोड केला होता. मध्यंतरी 'माझा कट्टा ' मध्ये एका तरुण उद्योजक मुलाची मुलाखत झाली आहे. हे दोन्ही कार्यक्रम YouTube वर उपलब्ध आहेत. 


लोकहो जागे व्हा.

ब्रँडेड औषधे खरेदी न करता जेनेरिक औषधे खरेदी करा आणि होणारे आर्थिक नुकसान टाळा.

राहुरी श्री माताजींचे माहेर.

 सहजयोग पद्धतीने कुंडलिनी शक्ती जागृती व आत्मसाक्षात्कार कार्यक्रम.

ठिकाण - श्रीरामपूर.

दिनांक - 18 आणि 20 एप्रिल 2025.

वेळ - सायंकाळी 6.30 वाजता. 


सहजयोग  प्रचार - प्रसार कार्याच्या निमित्ताने प.पू.श्री माताजींनी विश्वातील सहजयोगी साधकांना आत्मसाक्षात्काराची जी अनुभूती दिली आहे त्याबद्दल श्री माताजींना सहजयोग्यांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम.


राहुरी,श्रीरामपूर श्री माताजींचे माहेर म्हणजेच सहजयोग्यांचे आजोळ.


सहजयोगाच्या संस्थापिका श्री माताजी निर्मला देवी यांचे राहुरी,  श्रीरामपूरशी विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे. राहुरी हे श्री माताजींचे माहेर आहे. राजपरिवारातील केशवराव साळवे हे श्री माताजींचे आजोबा आणि सखुबाई या श्री माताजींच्या आजी . केशवराव साळवे हे शालिवाहन राजवंश, क्षेत्रीय घराण्याचे वंशज होते.यांच्याच पूर्वजात शालिवाहन नावाचा एक राजा होता. पैठण ही त्यांची राजभूमी होती. याच राजवंश घराण्याने शालिवाहन शक नावाच्या पंचांग कॅलेंडरची सुरुवात केली असा इतिहास सांगितला जातो. केशवराव साळवे यांचा राहुरी जवळ शिंगवे नाइक गावात एक वाडा होता. श्री माताजींच्या पूर्वज्यांचे  शिंगवे(श्री गांव ) सह राहुरी क्षेत्रावर शासन होते आणि हे साम्राज्य हैद्राबाद पर्यंत विस्तारलेले होते. श्री गांव शिंघवे नाइक या नावाने पण ओळखले जाते. हे गांव राहुरी रेल्वे स्टेशन पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे . केशवराव आणि सखुबाई यांचे पुत्र प्रसादराव साळवे हे श्री माताजींचे वडील आणि आईचे नांव कॉर्नलिया. श्री माताजींच्या आई कॉर्नलिया आणि आजी सखुबाई यांचा परिवार नंदगावचा. नंदगांव, शिंगवे नाइक ही दोन्ही गावे राहुरी तालुक्याच्या सीमेवर आहेत. त्यामुळे राहुरी हे श्री माताजींचे माहेर असे श्री माताजी आदराने सांगत असत.


श्री माताजींच्या सहजयोगाच्या महान योगदानामुळे आणि कर्तृत्ववान घराण्यामुळे पैठण, श्रीरामपूर, राहुरी, उज्जैन, छिंदवाडा, नागपूर, पुणे, कराची, लाहोर, वर्धा अशी अनेक शहरे इतिहासाच्या पानावर कोरली गेली आहेत.


श्रीमती सखुबाई यांना कौटुंबिक कलहामुळे मुलांबाळांना घेवून श्री गांव( शिंगवे ) सोडावे लागले ही अत्यंत दुर्दैवी घटना होती पण या साहसी, श्रेष्ठ, अन्यायाविरुद्ध युद्ध पुकारण्याची शक्ती, गहन पराक्रम, कुटुंबाप्रति प्रेम आणि करुणा,अशा गुणवत्ता असलेल्या सखुबाई पुढील पिढ्यांचे प्रेरणा स्रोत ठरल्या. त्यांच्याच माध्यमातून हे गुण त्यांच्या मुलांत आणि नातवंडात आले आहेत आणि यात श्री माताजींचे स्थान विशेष आहे.


कोणत्याही स्त्रीला स्वतःच्या माहेराबद्दल विशेष जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेम असतेच त्यात राहुरी  तर साक्षात श्री आदिशक्तीचे माहेर आहे. त्यामुळे श्री माताजी जगभर विहरल्या तरी त्यांचे चित्त माहेराकडे राहिले असे त्यांच्या श्रीरामपूर, राहुरी प्रेमावरून आढळते.


22-23 मार्च 1975 ला श्री माताजींनी राहुरी कृषी विद्यापीठात सहजयोग प्रचार कार्यक्रम केला होता. शिंगवे, नंदगाव या माहेरच्या गावासह मुसळवाडी, अवदगाव, तकलीमिया या गावांना सहजयोगात विशेष महत्वाचे स्थान आहे. मुसळवाडीत देवीने राहू रक्षासाला मुसळाने मारले होते म्हणून त्या गावचे नांव मुसळवाडी पडले. नंतर राक्षस ज्या गावातून ओरडत पळाला त्या गावचे नांव आरडगाव पडले असे श्री माताजी सांगत असत. राहुरी,श्रीरामपूर भागात नवनाथ रहात होते. साईबाबांची शिर्डी इथून जवळच आहे. यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या या भागाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.


1975 ते 1988 या कालावधीत दरवर्षी आरडगाव येथे श्री माताजींच्या साकार स्वरूपात पूजा झाल्या आहेत. 1982 मध्ये श्री माताजींनी मुसळवाडीत स्वयंभू एकादश रुद्र शिलान्यास केला. आज देशविदेशातील सहजयोगी साधक एकादश रुद्र दर्शन  आणि चैतन्याचा लाभ घेण्यासाठी मुसळवाडीला येतात. 


1987 मध्ये श्री माताजींनी सहजयोग आरडगाव आश्रमाची स्थापना केली. आज हा आश्रम निर्मला धाम आश्रम म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच वर्षी श्री माताजींनी आरडगाव मध्ये सहज महिला कल्याण सोसायटीची स्थापना केली होती.


1985 दरम्यान श्रीरामपूर मध्ये सहजयोग ध्यान केंद्र सुरु झाले. श्री माताजींनी राहुरी कृषी विद्यापीठात सहजयोग पद्धतीने शेती कशी करावी याचे प्रत्येक्षित दिले होते. आज तीच पद्धत *सहज कृषी* म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे पुणतांबा येथे इंग्लिश मेडीयम स्कूलची स्थापना झाली. श्री माताजी परदेशी सहजयोग्यांना महाराष्ट्रातील दैवी भूमी  आणि आध्यात्मिक वैशिष्ट्य असलेल्या ठिकाणांचे दर्शन व्हावे म्हणून महाराष्ट्र टूर आयोजित करत असत. या टूर मध्ये  राहुरी,आरडगावचा समावेश असे. श्री माताजींनी या भागात सहजयोग प्रचारसाठी बैलगाडीतून प्रवास केल्याची उदाहरणे आहेत . अस्तगांव, फत्याबद, श्रीरामपूर, लोणी प्रवरा, कोपरगाव, संगमनेर अशी अनेक शहरे आणि गावे श्री माताजींनी पिंजून काढली आहेत. या भागात श्री माताजींनी प्रचंड मेहनत घेवून परिसरातील नागरिकांच्या मनाची आध्यात्मिक मशागत केली आहे. आंतरराष्ट्रीय सहजयोग सेमिनार गणपतीपुळे येथे दरवर्षी सहज विवाह संपन्न होतात. सदर विवाह सोहळ्यात राहुरी, श्रीरामपूर भागातील शेकडो मुला मुलींची देश विदेशातील मुला मुलींशी लग्न झाली आहेत. दीडशे पेक्षा अधिक देशात सहजयोगी साधक सहजयोग प्रॅक्टिस करत असल्यामुळे आज सहजयोग आंतरराष्ट्रीय समुदाय झाला आहे.


महाराष्ट्र ही विश्वाची कुंडलिनी आहे. महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, नवनाथ, यांचा वारसा लाभलेला आहे. 


परमेश्वराच्या अस्तित्वाच्या शोधात असलेल्या श्रीरामपूर, राहुरी, अहिल्यानगर मधील नागरिकांसाठी कुंडलिनी जागृती आणि आत्मसाक्षातकाराचा हा कार्यक्रम एक पर्वणी आहे. 


जगभरातील नागरिकांची कुंडलिनी शक्ती जागृत व्हावी, त्यांना आत्मसाक्षात्कार लाभावा हाच तर श्री माताजींचा ध्यास आहे. तुमचा फायदा झाला, तुमची आध्यात्मिक प्रगती झाली तर श्री माताजींच्या घराण्याचा संघर्ष आणि त्याग सत्कारणी लागला असेच म्हणावे लागेल.


श्रीरामपूर मधील सहजयोग सामूहिकता महाराष्ट्रभर सहजयोगाचा  प्रचार प्रसार करण्यात अग्रेसर आहे.श्रीरामपूर मध्ये श्री माताजी एकोणीस वेळा येऊन गेलेल्या आहेत त्यामुळे श्रीरामपूरची भूमी श्री माताजींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव , अशोक नगर , फत्याबाद येथे श्री माताजींचे अनेक सार्वजनिक कार्यक्रम झालेले आहेत. श्रीरामपूर शहर आणि ग्रामीण भागात भरपूर सहजयोग सामूहिकता निर्माण झालेली आहे. श्रीरामपूर नगरपालिकेने दिलेल्या जागेत  प्रशस्त हॉल बांधून सध्या साप्ताहिक ध्यान केंद्र सुरु आहे. सदर केंद्रात  परम पूज्य श्री माताजी ज्या सिंहासनावर विराजमान झाल्या होत्या ते सिंहासन आहे.

तेव्हा सहजयोग कार्यकर्त्यांचे आग्रहाचे निमंत्रण स्वीकारून श्रीरामपूर मधील कार्यक्रमास नक्की उपस्थित रहावे ही विनंती.


जय श्री माताजी!

संकलक व लेखक - योगीराज देवकर.

सहजयोगी, पुणे.