सहजयोग पद्धतीने कुंडलिनी शक्ती जागृती व आत्मसाक्षात्कार कार्यक्रम.
ठिकाण - श्रीरामपूर.
दिनांक - 18 आणि 20 एप्रिल 2025.
वेळ - सायंकाळी 6.30 वाजता.
सहजयोग प्रचार - प्रसार कार्याच्या निमित्ताने प.पू.श्री माताजींनी विश्वातील सहजयोगी साधकांना आत्मसाक्षात्काराची जी अनुभूती दिली आहे त्याबद्दल श्री माताजींना सहजयोग्यांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम.
राहुरी,श्रीरामपूर श्री माताजींचे माहेर म्हणजेच सहजयोग्यांचे आजोळ.
सहजयोगाच्या संस्थापिका श्री माताजी निर्मला देवी यांचे राहुरी, श्रीरामपूरशी विशेष जिव्हाळ्याचे नाते आहे. राहुरी हे श्री माताजींचे माहेर आहे. राजपरिवारातील केशवराव साळवे हे श्री माताजींचे आजोबा आणि सखुबाई या श्री माताजींच्या आजी . केशवराव साळवे हे शालिवाहन राजवंश, क्षेत्रीय घराण्याचे वंशज होते.यांच्याच पूर्वजात शालिवाहन नावाचा एक राजा होता. पैठण ही त्यांची राजभूमी होती. याच राजवंश घराण्याने शालिवाहन शक नावाच्या पंचांग कॅलेंडरची सुरुवात केली असा इतिहास सांगितला जातो. केशवराव साळवे यांचा राहुरी जवळ शिंगवे नाइक गावात एक वाडा होता. श्री माताजींच्या पूर्वज्यांचे शिंगवे(श्री गांव ) सह राहुरी क्षेत्रावर शासन होते आणि हे साम्राज्य हैद्राबाद पर्यंत विस्तारलेले होते. श्री गांव शिंघवे नाइक या नावाने पण ओळखले जाते. हे गांव राहुरी रेल्वे स्टेशन पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे . केशवराव आणि सखुबाई यांचे पुत्र प्रसादराव साळवे हे श्री माताजींचे वडील आणि आईचे नांव कॉर्नलिया. श्री माताजींच्या आई कॉर्नलिया आणि आजी सखुबाई यांचा परिवार नंदगावचा. नंदगांव, शिंगवे नाइक ही दोन्ही गावे राहुरी तालुक्याच्या सीमेवर आहेत. त्यामुळे राहुरी हे श्री माताजींचे माहेर असे श्री माताजी आदराने सांगत असत.
श्री माताजींच्या सहजयोगाच्या महान योगदानामुळे आणि कर्तृत्ववान घराण्यामुळे पैठण, श्रीरामपूर, राहुरी, उज्जैन, छिंदवाडा, नागपूर, पुणे, कराची, लाहोर, वर्धा अशी अनेक शहरे इतिहासाच्या पानावर कोरली गेली आहेत.
श्रीमती सखुबाई यांना कौटुंबिक कलहामुळे मुलांबाळांना घेवून श्री गांव( शिंगवे ) सोडावे लागले ही अत्यंत दुर्दैवी घटना होती पण या साहसी, श्रेष्ठ, अन्यायाविरुद्ध युद्ध पुकारण्याची शक्ती, गहन पराक्रम, कुटुंबाप्रति प्रेम आणि करुणा,अशा गुणवत्ता असलेल्या सखुबाई पुढील पिढ्यांचे प्रेरणा स्रोत ठरल्या. त्यांच्याच माध्यमातून हे गुण त्यांच्या मुलांत आणि नातवंडात आले आहेत आणि यात श्री माताजींचे स्थान विशेष आहे.
कोणत्याही स्त्रीला स्वतःच्या माहेराबद्दल विशेष जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेम असतेच त्यात राहुरी तर साक्षात श्री आदिशक्तीचे माहेर आहे. त्यामुळे श्री माताजी जगभर विहरल्या तरी त्यांचे चित्त माहेराकडे राहिले असे त्यांच्या श्रीरामपूर, राहुरी प्रेमावरून आढळते.
22-23 मार्च 1975 ला श्री माताजींनी राहुरी कृषी विद्यापीठात सहजयोग प्रचार कार्यक्रम केला होता. शिंगवे, नंदगाव या माहेरच्या गावासह मुसळवाडी, अवदगाव, तकलीमिया या गावांना सहजयोगात विशेष महत्वाचे स्थान आहे. मुसळवाडीत देवीने राहू रक्षासाला मुसळाने मारले होते म्हणून त्या गावचे नांव मुसळवाडी पडले. नंतर राक्षस ज्या गावातून ओरडत पळाला त्या गावचे नांव आरडगाव पडले असे श्री माताजी सांगत असत. राहुरी,श्रीरामपूर भागात नवनाथ रहात होते. साईबाबांची शिर्डी इथून जवळच आहे. यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या या भागाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
1975 ते 1988 या कालावधीत दरवर्षी आरडगाव येथे श्री माताजींच्या साकार स्वरूपात पूजा झाल्या आहेत. 1982 मध्ये श्री माताजींनी मुसळवाडीत स्वयंभू एकादश रुद्र शिलान्यास केला. आज देशविदेशातील सहजयोगी साधक एकादश रुद्र दर्शन आणि चैतन्याचा लाभ घेण्यासाठी मुसळवाडीला येतात.
1987 मध्ये श्री माताजींनी सहजयोग आरडगाव आश्रमाची स्थापना केली. आज हा आश्रम निर्मला धाम आश्रम म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच वर्षी श्री माताजींनी आरडगाव मध्ये सहज महिला कल्याण सोसायटीची स्थापना केली होती.
1985 दरम्यान श्रीरामपूर मध्ये सहजयोग ध्यान केंद्र सुरु झाले. श्री माताजींनी राहुरी कृषी विद्यापीठात सहजयोग पद्धतीने शेती कशी करावी याचे प्रत्येक्षित दिले होते. आज तीच पद्धत *सहज कृषी* म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे पुणतांबा येथे इंग्लिश मेडीयम स्कूलची स्थापना झाली. श्री माताजी परदेशी सहजयोग्यांना महाराष्ट्रातील दैवी भूमी आणि आध्यात्मिक वैशिष्ट्य असलेल्या ठिकाणांचे दर्शन व्हावे म्हणून महाराष्ट्र टूर आयोजित करत असत. या टूर मध्ये राहुरी,आरडगावचा समावेश असे. श्री माताजींनी या भागात सहजयोग प्रचारसाठी बैलगाडीतून प्रवास केल्याची उदाहरणे आहेत . अस्तगांव, फत्याबद, श्रीरामपूर, लोणी प्रवरा, कोपरगाव, संगमनेर अशी अनेक शहरे आणि गावे श्री माताजींनी पिंजून काढली आहेत. या भागात श्री माताजींनी प्रचंड मेहनत घेवून परिसरातील नागरिकांच्या मनाची आध्यात्मिक मशागत केली आहे. आंतरराष्ट्रीय सहजयोग सेमिनार गणपतीपुळे येथे दरवर्षी सहज विवाह संपन्न होतात. सदर विवाह सोहळ्यात राहुरी, श्रीरामपूर भागातील शेकडो मुला मुलींची देश विदेशातील मुला मुलींशी लग्न झाली आहेत. दीडशे पेक्षा अधिक देशात सहजयोगी साधक सहजयोग प्रॅक्टिस करत असल्यामुळे आज सहजयोग आंतरराष्ट्रीय समुदाय झाला आहे.
महाराष्ट्र ही विश्वाची कुंडलिनी आहे. महाराष्ट्राला संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, नवनाथ, यांचा वारसा लाभलेला आहे.
परमेश्वराच्या अस्तित्वाच्या शोधात असलेल्या श्रीरामपूर, राहुरी, अहिल्यानगर मधील नागरिकांसाठी कुंडलिनी जागृती आणि आत्मसाक्षातकाराचा हा कार्यक्रम एक पर्वणी आहे.
जगभरातील नागरिकांची कुंडलिनी शक्ती जागृत व्हावी, त्यांना आत्मसाक्षात्कार लाभावा हाच तर श्री माताजींचा ध्यास आहे. तुमचा फायदा झाला, तुमची आध्यात्मिक प्रगती झाली तर श्री माताजींच्या घराण्याचा संघर्ष आणि त्याग सत्कारणी लागला असेच म्हणावे लागेल.
श्रीरामपूर मधील सहजयोग सामूहिकता महाराष्ट्रभर सहजयोगाचा प्रचार प्रसार करण्यात अग्रेसर आहे.श्रीरामपूर मध्ये श्री माताजी एकोणीस वेळा येऊन गेलेल्या आहेत त्यामुळे श्रीरामपूरची भूमी श्री माताजींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव , अशोक नगर , फत्याबाद येथे श्री माताजींचे अनेक सार्वजनिक कार्यक्रम झालेले आहेत. श्रीरामपूर शहर आणि ग्रामीण भागात भरपूर सहजयोग सामूहिकता निर्माण झालेली आहे. श्रीरामपूर नगरपालिकेने दिलेल्या जागेत प्रशस्त हॉल बांधून सध्या साप्ताहिक ध्यान केंद्र सुरु आहे. सदर केंद्रात परम पूज्य श्री माताजी ज्या सिंहासनावर विराजमान झाल्या होत्या ते सिंहासन आहे.
तेव्हा सहजयोग कार्यकर्त्यांचे आग्रहाचे निमंत्रण स्वीकारून श्रीरामपूर मधील कार्यक्रमास नक्की उपस्थित रहावे ही विनंती.
जय श्री माताजी!
संकलक व लेखक - योगीराज देवकर.
सहजयोगी, पुणे.
No comments:
Post a Comment