देवकर कुटुंबियां तर्फे शुभेच्छा पत्र...
आ.मा.श्री.कालिदास हरिश्चंद्र देवकर उर्फ आप्पा तुम्ही
लोणी देवकर गावाला आणि देवकर घराण्याला तुमच्या राजकीय, सामाजिक कार्य कर्तृत्वाने ओळख निर्माण केली आहे.
कै.हरिश्चंद्र उर्फ आण्णा आणि कै.हिराबाई उर्फ भाभी यांना कालिदास(आप्पा), पृथ्वीराज(बप्पा ), रत्नाकवी(बापू ), योगीराज(आबा ) ही चार मुलं आणि कै.मनोरमा(आक्का ) आणि सौ.शशिकला(ताई ) या दोन मुली अशी सहा अपत्य झाली.कै.मनोरमा (आक्का ) हे पहिले कन्यारत्न. कै. सुभाष आप्पासाहेब पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांनी पाटील घराण्याचा वारसा जपला आणि वाढवीला.कालिदास(आप्पा ) हे दुसरे अपत्य.दुसऱ्या भगिनी सौ. शशिकला( ताई ) यांचा श्री अरविंद संपतराव जामदार यांच्याशी विवाह झाला. त्यांनी जामदार घराण्याचा वारसा जपला आणि वाढविलेला आहे.
कालिदास आप्पा तुमचा जन्म 10/04/1945 रोजी झाला. तुम्ही वयाची 80 वर्षें पूर्ण करीत आहात. 80 वर्षाच्या आयुष्यात 80 गुणिले 12 म्हणजे 960 पौर्णिमा तसेच 32 अधिकमास महिन्यात 32 पौर्णिमा अशा 992 पौर्णिमा अनुभवल्या आहेत.81 व्या वर्षात 8 च महिन्यात तुमचे 1000 पौर्णिमांचे चंद्र दर्शन पूर्ण होणार आहे.तुमचे सहत्रचंद्र दर्शन हा तुमच्यासाठी आणि तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसाठी फार मोठा योग आहे.
सन 1967 मध्ये कालिदास आप्पा तुमची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द सुरु झाली. तुमच्या कारकिर्दीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे...
सुरुवातीलाच तुम्ही लोणी देवकर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन झाला आणि पुढे 25 वर्षें बिनविरोध चेअरमन पदी राहिलात .
सन 1975 मध्ये तुमची गावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आणि पुढे तुम्ही 1995 पर्यंत वीस वर्षें गावच्या सरपंच पदी विराजमान राहिलात .
त्याच काळात इंदापूर तालुका खरेदी- विक्री संघाचे चेअरमनपदही तुम्ही भूषविले.
सन 1984 पासून इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे सलग 15 वर्षें संचालक राहिलात.
पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे सलग 15 वर्ष संचालक राहिलात.
याचदरम्यान इंदापूर तालुका मार्केट कमिटीचे संचालक पदी पण राहिलात.
पुढे तुम्ही पुणे जिल्हा परिषदचे सदस्य झालात. आम्हा सर्वांसाठी ही खूप अभिमानाची बाब होती.
खरंतर तुमची राजकीय वाटचाल इतकी चांगली होती की, तुम्हाला इंदापूर तालुका पंचायत समिती सभापती पद, पुणे जिल्हा परिषद, अध्यक्ष पद मिळायला हवे होते.असो!
आता तुम्ही राजकीय कुस्ती सोडली होती परंतु गावाला तुमची पुन्हा गरज भासली म्हणून तुमच्या वयाच्या 76 व्या वर्षी गावकऱ्यांनी तुम्हाला पुन्हा सरपंच होण्याचा आग्रह केला आणि तुमची पुन्हा निवडही केली आहे. आजच्या राजकीय वाटमारीच्या वातावरणात ही विशेष उल्लेखनीय बाब ठरावी.
आपले वडील कै.आण्णा आणि आई कै.भाभी यांनी सर्व मुलांवर फार चांगले संस्कार केले. कै.भाभी कर्तव्यदक्ष गृहिणी होत्या.भावकी,गावकी चा आदर,पाहुणचार करण्यात आणि एकोपा ठेवण्यात त्यांचा हातभार होता. कै.आण्णा फार मोठा माणूस. त्याकाळात एक चांगला शेतकरी म्हणून पंचक्रोशीत त्यांचे नाव आणि दबदबा होता. 152 एकरांचा 7/12 देवकर कुटुंयाच्या नावावर होता. इतकी सर्व शेती ते एकटे सालकरी गड्यांच्या माध्यमातून करत होते. आजही भू दान चळवळ,खडकवासला कॉलनी आणि कालवा,MIDC ला दिलेली जमीन वगळता सर्व जमीन कुटुंबियांकडे आहे. असे हे भारदस्त आण्णा तुम्हाला नेहमी सांगायचे, "कालिदास, देवाने आपल्याला खूप काही दिले आहे. तुला सामान्य लोकांची सेवा करायची आहे. काम करताना आपले दोन पैसे खर्च झाले तरी होऊदे पण निस्वार्थपणे लोकांची सेवा कर." तुम्ही पण तसेच वागला म्हणून समाजात तुमचे नाव झालेले आहे.
तुमच्या या कार्यकाळात तुम्ही आमदार, खासदार, मंत्री यांच्या मदतीतून गावासाठी नळ पाणीपुरवठा योजना आणली. गावातील मुलांसाठी माध्यमिक हायस्कूल सुरु केले. गावातील प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेसाठी शासकीय फंडातून इमारती बांधून घेतल्या.
गावातील तरुणांना सहकारी,शासकीय क्षेत्रात नोकऱ्या मिळवून दिल्या.
गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आणली. त्यानंतरच्या कालावधीत गावात देना बँकेची म्हणजे आजची बँक ऑफ बडोदाची शाखा आणली.
सर्वसामान्यांच्या दळणवळणाच्या सेवेसाठी गावात टेलिफोन एक्सचेंज सुरू केले.
गावच्या सामाजिक उपक्रमात तुमचा सतत सहभाग राहिला आहे.
गावच्या गोरगरीब लोकांना शासनाच्या विविध योजनांचा तुम्ही लाभ मिळवून दिलेला आहे.
उजनी जलाशयाचा शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी गावात विद्युत महामंडळाचे केंद्र उपलब्ध केले.
गावात खडकवासला प्रकल्पाच्या कॉलनीला एकत्रित असताना आपली जमीन दिली. लोणी देवकर एमआयडीसी साठी पुढाकार घेतला आणि स्वतःची पुष्कळ जमीन पण एमआयडीसीला दिली. लोणी देवकर एमआयडीसी मुळे स्थानिकांना रोजगाराच्या, उद्योगाच्या शेकडो संधी तुमच्यामुळे उपलब्ध झाल्या.
गावात आरोग्य सेवा उपकेंद्र आणले.
ग्राम सचिवालय उभारले.
सद्यस्थितीत गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पेयजल योजनेचे काम मंजूर आहे.
या आणि अशा अनेक कामांमुळे तुम्ही जनमानसात लोकप्रिय आहात.
तुम्हाला तुमची पत्नी सौ. प्रकाशबाई (वहिनी) यांची मौलिक साथ लाभली. तुम्हा उभायतांची मुलं,नानासाहेब आणि विद्यासागर(तात्या ), सुना,वैशाली आणि नूतन, नातवंडे तन्वी, राजवीर आणि साईराज, असा तुमचा संसाररूपी वृक्षवेल बहरला आहे.देवकर कुटुंबीय, भावकी आणि गावकीची साथ लाभली म्हणून तुम्ही हे सर्व करू शकला हे नक्की.
देवकर कुटूंबातले कोण जर कधी तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेले तर एक अनुभव आम्हाला बऱ्याचदा आला आहे . एखादा अनोळखी माणूस आम्हाला विचारतो. "काय पाहुणे कुठून आलात तुम्ही?" आम्ही म्हणतो, "इंदापूर." त्यांचा पुढचा प्रश्न असतो, "प्रॉपर इंदापूर का?" आमचे उत्तर असते, "नाही, लोणी देवकर." मग त्यांचा पुढचा प्रश्न, "लोणी देवकर, मग कालिदास देवकरला ओळखता का?" आमचे उत्तर, "ते मोठे भाऊ आहेत माझे." मग काय त्या माणसाच्या चेहऱ्यावर चांगलाच आनंद तरळतो आणि आमची छाती अभिमानाने थोडी फुगते. ओळखीचे खूप मोठे जाळे तुम्ही विनलेले आहे.
वडील कै.आण्णा फार हुशार आणि धोरणी होते. अंकगणिताचे पाढे, पंचांग, पौराणिक माहिती, इ. त्यांना अगदी तोंडपाठ असायची.हिशेबाची वही ते मोडी लिपीत लिहायचे आणि सही पण मोडी लिपीतच करायचे,ते नेहमी म्हणायचे,"केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार l
शास्त्रग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार l
याचा उपयोग तुम्ही देशाटन, मैत्री, सभा, हुशारी साठी केला. फार फिरलात तुम्ही.
खा.शंकरराव भाऊ कडे गावातले कार्यकर्ते गेले की, ते त्यांना तुमच्याबद्दल हमखास विचारायचे," काय मग, कुठे गेलाय आज तुमचा नेता,पुण्याला का मुंबईला." कारण तुम्ही उटसूट पुण्या, मुंबईला जायचे. असच एकदा भाऊंनी विचारले तर कार्यकर्ते म्हणाले, "आज आमचा नेता दिल्लीला गेलाय भाऊ.' खा.भाऊ एकदम चकित,"आsss, दिल्लीला कशाला गेलाय." असं तुमचं असायचं, आज इथं तर उद्या तिथं. अगदी थायलंड, इंडोनेशिया पण फिरून झालं तुमचं.
आप्पा,तुम्ही तुमच्या कार्य कर्तृत्वाने गावाला आणि देवकरांना चांगली ओळख दिली आहे. यामुळे आम्हाला तुमचा अभिमान आहे.
तुमच्या आयुष्यात आलेल्या या सहत्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त तुमचे खूप खूप अभिनंदन आणि तुम्हाला शतकपूर्तीसाठी अनंत शुभेच्छा.
आपणांस कुटुंबियांच्या वतीने हे शुभेच्छा पत्र देताना आम्हाला खूप आनंद होत आहे.
आपले स्नेहांकित.
देवकर कुटुंबीय, लोणी देवकर.
शब्दांकन - योगीराज देवकर.
No comments:
Post a Comment