Wednesday, 4 September 2024

नवा गडी नवं राज्य

 निर्मला फार्म- भाग पंधरा - वाटेकरी पहिला अपात्र पळाला आणि दुसरा पात्र मिळाला.


एक लाख रुपये उचल, येण्याचा प्रवास खर्च, अग्रीमेंटचा खर्च, दीड महिन्यात घरखर्चासाठी पुन्हा उचल इतकं सगळं घेऊनही राजेंद्र बजरंग लोंढे हा वाटेकरी पळाला म्हणजे कसलीही पूर्व सूचना न देता काम सोडून निघून गेला आहे. या लोंढे बद्दल मी निर्मला फार्म,भाग एक मध्ये किती चांगले वर्णन लिहले होते ते तुम्ही वाचलेले आहे. माझा भाचा मनोज पाटीलच्या माहितील माणूस म्हणून मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला ही चूक झाली.राजेंद्रचा करार करण्यापूर्वी त्याची खरी माहिती काढण्यात मी कमी पडलो. मधुकर भोसले, चांडगाव, यांच्याकडून हाच राजेंद्र सहा महिन्यात पळून गेला होता, त्यांनी मला राजेंद्र हा वाटेकरी म्हणून अयोग्य माणूस आहे , तो सहा महिन्यात पळून जाईल असे सांगितले होते. पण मनोज पाटीलने  मला या सूचनेकडे दुर्लक्ष करा सांगितले होते. 

आता वाचा वस्तुस्थिती. 


कसलंही व्यसन नाही म्हणणारा हा प्राणी सकाळी उठल्यानंतर पहिला गावात दारू प्यायला जात होता. घर खर्चासाठी घेतलेले पैसे जुगार आणि मटका खेळायला लावत होता. थोड्याच अवधीत त्याने गावातल्या अयोग्य लोकांची संगत केली. तो शेतात कमी आणि बाहेरच बोंबलत फिरायचा. त्याच्या बायकोने शेतातले एकही काम धड केले नाही. एकच महिन्यानंतर त्याने प्लॅन करून बायको, मुलं गावी पाठवून दिली. आज येतील, उद्या परत येतील असे खोटं सांगत राहिला. तो धाधांत खोटे बोलायचा. कधी तो आजारी आहे म्हणून उचल मागायचा, तर एकदा वडील आजारी आहेत, आठ, दहा दिवसात कधीही मरतील, त्यांना दवाखान्यात भरती करायचे आहे, त्यांचा शेवट तरी चांगला व्हावा,तेव्हा त्यांच्या उपचारासाठी मला अजून उचल द्या म्हणून माझ्या मागे लागला होता. पण तोपर्यंत त्याचे बरेच प्रताप मला समजले होते. वडील वैरागला दवाखान्यात भरती केले आहेत म्हणून माझ्याकडून थोडे पैसे घेऊन तो गावी गेला. आता मात्र मी माझ्या भाच्याकडून माहिती घेतली आणि राजेंद्रच्या आईला फोन लावून परिस्थिती समजून घेतली. राजेंद्रने आईला माझा फोन आला तर काय खोटे बोलायचे हे  न शिकवल्यामुळे त्याचे बिंग फुटले. नाहीतर त्याच्या आईने पण नवरा ऍडमिट असल्याचे खोटे नाटक रंगविले असते.या खोट्यात त्याचे सगळे कुटुंब सामील होते. त्याचा मोबाईल मुलीने उचलला तर रॉंग नंबर सांगायची.त्याचे वृद्ध वडील घरात निट असताना केवळ पैशासाठी हा उलट्या काळजाचा माणूस वडिल शेवटच्या घटका मोजत असल्याचे सांगत होता. त्याने गावातील एकाजणाची मोटरसायकल अर्धे पैसे देवून विकत घेतली, उरलेले पैसे न देताच ती गाडी घेऊन हा गडी पसार झाला आहे. शेवटी माझा ऊस आणि इलेक्ट्रिक मोटर दोन्ही जाळले. असे विचारांचे दारिद्र असेल तर माणूस गरीबच राहणार हे वेगळं सांगायची गरज नाही.


इथून पळाल्यानंतर राजेंद्र बार्शी तालुक्यात एका शेतकऱ्याकडे राहणार होता. त्याच्यांकडून त्याला एक लाख उचल मिळणार होती. त्या शेतकऱ्याने याला प्रथम पन्नास हजारचा चेक दिला. मनोजने त्याच्याकडून हे पैसे मला मिळवून दिले. त्याला उरलेले पन्नास हजार पंधरा दिवसांनी मिळणार होते. पण पहिला चेक घेतल्यानंतर हा पठ्ठया त्या शेतकऱ्याकडे कामाला गेलाच नाही. म्हणजे त्याने त्या शेतकऱ्याला पण पन्नास हजाराला टोपी घातली आहे.


आता त्याने अजून एक नवा शेतकरी शोधला आहे. तो त्याला पाऊणेदोन लाख उचल देणार होता . ती उचल मिळाल्यानंतर मनोज मार्फत मला माझे उर्वरित पैसे मिळणार होते. तिथे  इसार पैसे घेऊन हा प्राणी पसार झाला आहे. अजून हा भामटा राजेंद्र लोंढे काय काय बनवाबनवी करेल याचा नेम नाही. 


तीन महिने झाले त्याच्याकडुन मला पन्नास हजार मिळालेले नाहीत. कायदेशीर करार असल्यामुळे मी त्याच्यावर दावा दाखल करू शकतो पण लोंढेच्या गावचे सोसायटीचे अध्यक्ष, मनोज पाटील मला माझे पैसे मिळवून द्यायला मदत करत असल्यामुळे मी निर्धास्त आहे. 


राजेंद्र लोंढेची आणि या प्रकारच्या मजुरांची वर्तणूक पाहुन माझा माणुसकी वरचा विश्वास उडत चालला आहे . इतकी बेजबाबदार, बेफिकीर, स्वार्थी, ढोंगी माणसे कशी काय असू शकतात ते कळत नाही.असो! आलीया भोगाशी असावे सादर.


नवा गडी, नवं राज्य.

24 जून 2024 पासून पुढील दहा वर्षाचा करार करून श्री पोपट नवनाथ दळवी. रा. बाभुळगांव, ता. माळशिरस, जि. सोलापूर हे त्यांची पत्नी वर्षा सह माझ्या शेतावर नवा वाटेकरी म्हणून रुजू झाले आहेत . त्यांना दोन मुलगे आहेत तनिष्क आणि प्रणव. दोघेही शिक्षण घेत आहेत. दळवी यांना सत्तर हजार उचल दिली आहे. राजेंद्रने दिलेल्या वाईट अनुभवामुळे एकदा दूध पोळले की माणूस ताक सुद्धा फुंकून पितो तसे माझे झाले आहे. त्यामुळे हा पोपट चांगला वागत आहे तरी मला चांगला अनुभव देईल का असा विचार मनात येणे स्वाभाविक आहे .


पोपट शेतावर आल्यापासून त्यांनी सात एकर खोडवा ऊसाला तणनाशक फवारणे, बारा एकर ओपन प्लॉटला तणनाशक फवारणे,दोन एकर तूर बियाणे डोबणे, आठ एकर ऊस लागणीत ऊसाच्या कांड्या औषधी मिश्रणात बुडवून ऊस लागवड करणाऱ्या टोळीला मदत करणे,ऊस पिकाला पाणी देणे, नव्या ऊस लागणीच्या शेतात बांधावर आणि रस्त्यावर तणनाशक फवारणे,सोयाबीनचे वाफे तयार करणे, खोडवा, सुरु ऊसाला खते टाकणे आणि बांधणीस मदत करणे, नव्या ऊस लागणीत तणनाशक फवारणे,ऊसातील गवत काढणे,केळी लागवडीत मदत करणे, केळी रोपांची देखभाल करणे, अशी कामे स्वतः आणि इतरांच्या मदतीने अपेक्षित वेळेत पूर्ण केली आहेत. जेमतेम चौथी शिकलेला हा माणूस (पोपट) नावाप्रमाणेच गोड गोड बोलतो. ते शेतीची, पिकांची, औषधांची माहितीअसलेले ,

कष्टाळू,मेहनती आहेत असे आढळते. हा माणूस जर टिकला तर चांगले काम करेल असे त्यांच्या वागण्या बोलण्यातून  आणि धावपळीतून जाणवत आहे. 


पोपट दळवी यांच्याकडे गावी स्वतःची थोडीफर प्रॉपर्टी आहे. तीपण भावाभावांच्या वादात. यांना पाच दहा हजार रक्कम उसनी हवी असेल तर त्यांचे कुटुंबातले लोक त्यांना द्यायला तयार नव्हते .सुरुवातीस त्यांचा नातेवाईक त्यांना जामीनदार रहायला तयार नव्हता. यालाच व्यवहारिक भाषेत माणसाची पत नसणे असे म्हणतात. मी प्रशिक्षण कार्यक्रमात नेहमी सांगतो की, पत ही घरापासून सुरु होते. घरातले,मित्र, गावातले, लोकं तुम्हाला पैसे द्यायला तयार नसतात आणि तुम्हाला वाटते बँकेने तुम्हाला कर्ज द्यावे. आपण व्यायाम करून जशी तब्बेत कमावतो तशी स्वतःची पत सचोटीने वागून, कार्यक्षमता वापरून कमवावी लागते.पत, प्रतिष्ठा कमवायला फार काळ लागतो, घालवायला थोडा वेळ  पुरेसा असतो . माणसाने होतकरू असावे होतकरू म्हणजे काहीतरी मोठं काम करायचं आहे किंवा भविष्याच्या दृष्टीने महत्वाचे, उपयुक्त असावे. असे वागले म्हणजे पत तयार होते.पण गंम्मत बघा,ज्यांना स्वतःच्या कुटुंबातले,नात्यातले, मित्र आर्थिक मदत करत नाहीत त्यांना अनोळखी शेतकऱ्याने पन्नास हजार, एक लाख उचल द्यावी असे वाटते.अडी अडचणीला मदतीला उभे रहावे असे वाटते. का?  गरज फक्त शेतकऱ्यालाच आहे का? बरं एखादा शेतकरी जेव्हा त्याची कोटीची जमीन आणि साधनसामग्री त्यांना उत्पादन काढण्यासाठी देतो,बिनव्याजी भांडवल पुरवितो , त्यांना अशी मदत करतो तेव्हा त्याची जाणीव यांनी ठेवायला नको का?  यापूर्वीच्या सुरेश चवरे या वाटेकऱ्यांसाठी मी आऊट ऑफ दी वे जावून बरीच मदत केली होती पण त्यांनी त्याची जाणीव ठेवली नाही. मला जशी वाटेकरी हवा ही गरज आहे तशी त्यांची पण काम हवं ही गरज हवी. टाळी एका हाताने नाही तर दोन हातांनी वाजते.  त्यामुळे गरज ही दोघांनाही समान हवी. तसं पाहिलं तर गुरख्याने गुरं राखायची सोडली म्हणून मालक गुरं पाळायची सोडत नाही. अगदी तसंच शेताचे पण आहे. जो वाटेकरी सोडून जातो त्याचीच संधी जाते.मजुरांना चांगलं वागविणारी ,

त्यांच्याशी चांगलं बोलणारी माणसं पण समाजात असतात हे या मजुरांना माहीतच नसावं. जरा चांगलं बोललं की ही माणसं डोक्यावर बसतात. या लोकांना जरा चांगला म्हटलं, जरा महत्व दिलं की, त्यांना वाटते तेच गाडी ओढत आहेत. शेत काम करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. हक्क,अधिकार आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नेमून दिलेले काम,कर्तव्य केले तर त्यांचा अहंकार वाढायची गरज नाही.काम करणे हे त्यांच्या रोलचा भाग आहे. आमच्या शेतावर वाटेकऱ्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य आणि जबाबदारी यापण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अधिकार व कर्तव्य. स्वातंत्र्य व जबाबदारी या दोन बाबी जरी पोपट ने पाळल्या तरी ते फार चांगले काम करतील. पोपट यांच्या वाटेकरी करारास  अशोक साळवे,भावडी हे जामीनदार राहिले आहेत.अजून एक जमेची बाजू म्हणजे पोपट दळवी माझे सहजयोगी बंधू डॉक्टर चेतन पराडे यांचा गाववाला आहे आणि चेतनचे पोपट बद्दलचे मत सकारात्मक आहे.ते अधून मधून पोपट बद्दल चौकशी करत असतात. 


पोपट यापूर्वी शेतमजूर राहिलेला आहे. त्यांना आठवड्याला पगार घ्यायची आणि खर्चायची सवय होती.त्यांना आता ती सवय मोडावी लागेल.त्यांना आता महिन्याला ऍडव्हान्स मिळतो. त्यांनी आता स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. इथून पुढची दहा वर्षें 2024 -25 ते 2034-35  हा फार मोठा कालावधी आहे . दहा वर्षें याच शेतावर टिकून रहायचा निर्णय, निर्धार त्यांना करावा लागेल . ऊस आणि केळी ही आमची नगदी पिके असणार आहेत त्यात ऊस एकरी किमान 70 ते 80 आणि केळी एकरी किमान 34 ते 35 टन उत्पादन घेण्याची आशा,आकांक्षा बाळगायला पाहिजे. शेतातले काम भले आणि आपण भले. त्यांनी हे शेत,पिके,काम आणि शेतमालक यांच्याशी एकनिष्ठ रहायला हवे, निष्ठा बाळगायला पाहिजे,निरव्यसनी, प्रामाणिक रहायला पाहिजे .त्यांना उत्पादन विक्री झाल्यावर त्यांचा वाटा मिळणार आहे, यासाठी पिकानुसार सहा महिने,वर्ष, दीड वर्ष लागते. त्यांना मी घर खर्चासाठी दरमहा पैसे देत आहे,शिवाय मजुरांवर वेळोवेळी होणारा खर्च देणार आहे. शेतकरी कर्ज काढून हे खर्च भागवीत असतो आणि वाटेकऱ्याला मात्र बिनव्याजी पैसे पूरवीत असतो. त्यामुळे त्यांना काटकसरीने संसार करण्याची शिस्त लावावी लागेल. ज्या कारणासाठी पैसे घेतले ते त्याच कारणासाठी वापरण्याची आर्थिक शिस्त लावावी लागेल . यावर्षी शेतीसाठी आकाश जाधव हे नातेवाईक मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करावी लागेल. या नवरा बायकोला हे शेत स्वतःचे आहे असे समजून मेहनत करावी लागेल.मेहनतीला पर्याय नाही. या पाच-सहा गोष्टी जर त्यांनी पाळल्या तर यश आणि पैसा निश्चित मिळणार आहे.


सदर शेती कार्यक्षम पद्धतीने करण्यासाठी राजेंद्र लोंढे अपात्र, अयोग्य होता आणि पोपट दळवी पात्र,योग्य असावा त्यामुळे परमेश्वरानेच हा बदल केला असावा असे मी मानतो. शेवटी जे होते ते भल्यासाठी होते असे म्हणतात ते खरे ठरावे. 


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

No comments: