Tuesday, 21 June 2011

प्रामाणिकपणाचे कौतुक:

मध्यंतरी जमीनीच्या मोजणीचे काम होते. अशा कामासाठी जेवढा खर्च ऑफिसिअल येतो त्यापेक्षा जास्त खर्च अनऑफिसिअल येतो असे या क्षेत्रात ऐकायला मिळते. अशा वातावरणात अपवाद आहेत.
श्री. बाळासाहेब भोसले, उप अधीक्षक, भूमी अभिलेख, इंदापूर. यांनी मला फोनवर सांगितले कि तुम्ही जमीन मोजणी साठी कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. कार्यालयातील कोणाबरोबरही आर्थिक डील करण्याची गरज नाही या कार्यालयामार्फत प्रामाणिकपणे तुमचे जमीन मोजणी चे काम पूर्ण केले जाईल तसे त्यांनी ते पूर्ण केलेही.
आपण जर भ्रष्टाचाराबद्दल बोलत असाल तर प्रामाणिकपणाच्या अनुभवाबद्दलही बोलावे.

Friday, 3 June 2011

प्रांजली निफाडकर विवाह

जागोजागी भेटत असते माझी मुलगी 
कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी
                 तिला न रुचते नटणे-बिटणे, तरी नेहमी 
                  परीसारखी सुंदर दिसते माझी मुलगी
कर्जाचा हा डोंगर थोडा हलण्यासाठी
मुलासारखे राबत असते माझी मुलगी
                 घरी यायला मला जरासा उशीर होता
                आईसोबत जागत बसते माझी मुलगी
गळ्यात माझ्या घास उतरण्या 'नाही' म्हणतो
अवती भवती जेव्हा नसते माझी मुलगी
                 आठवते मज माझी आई अशीच होती
                 जेव्हा माझे डोळे पुसते माझी मुलगी
तिला न्यायला राजकुमारा उशिरा ये तू
अजून मजला अल्लड दिसते माझी मुलगी

अखेर ०३/०६/२०११ रोजी चि. सुशांत हा राजकुमार आला आणि चि. सौ. कां. प्रांजली प्रसिद्ध कवी श्री. आणि सौ. प्रदीप निफाडकर यांच्या मुलीशी विवाह करून घेऊन गेला. वधु वरास लग्ना निमित्त हार्दिक शुभेच्छा.

सांगा जगायचे कसे

'सांगा जगायचे कसे' शिवराज गोर्ले यांचे पुस्तक वाचले. हा गोर्ले यांच्या पुस्तकांचे वाचक आणि लेखक यांच्या मधील पत्रव्यवहार आहे. वाचकांना त्यांच्या आयुष्यात गंभीर समस्या भेडसावत आहेत. त्या समस्या कशा सोडविता येतील, त्या कशा काल्पनिक आहेत, विचार विवेकाने त्यावर कशी मात करता येईल याचे गोर्ले यांचे विवेचन अप्रतिम आहे. गोर्ले यांच्या पुस्तकांनी समस्या ग्रस्त वाचकांना अगदी आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्याचे उदात्त कार्य केलेले आहे.