*मानवाची चौथी गरज* :
अब्राहम मास्लो (Abraham Maslow) यांनी *प्रतिष्ठा / आत्मसन्मानाची गरज* (Esteem Needs) ही मानवी गरजांची चौथी पातळी मानली आहे.
स्वतःबद्दल आदर,आत्मविश्वास,यशाची जाणीव,इतरांकडून मानसन्मान व प्रतिष्ठा मिळण्याची गरज.
*प्रतिष्ठा / आत्मसन्मानाची गरज:* (Esteem Needs):
माणसाला फक्त जगणे पुरेसे नसते;
त्याला स्वतःबद्दल आदर वाटावा,
आणि इतरांकडून मान्यता मिळावी अशी तीव्र गरज असते. आपण माननीय असावे,सन्माननीय असावे ही माणसाची मानसिक गरज आहे.हीच गरज म्हणजे प्रतिष्ठेची / आत्मसन्मानाची गरज.
या गरजेचे त्यांनी दोन स्तर सांगितले आहेत आणि त्यांना समजावण्यासाठी त्यांनी Deficit Needs (*अभावजन्य गरजा*) व Being Needs (*अस्तित्वजन्य गरजा*) ही संकल्पना वापरली आहे.
*कमी प्रतीची प्रतिष्ठा*; (Lower Esteem Needs):
याला मास्लोने Deficit Need (अभावजन्य गरज) असे म्हटले आहे.
त्याचे स्वरूप असे असते :
माणसाला इतरांकडून मान्यता मिळावी, मान सन्मान व्हावा , प्रसिद्धी मिळावी, पद, प्रतिष्ठा लाभावी ,लोकांनी आपले कौतुक करावे,समाजात आपले स्थान, ओळख निर्माण व्हावी असे वाटते .
*या कमी प्रतीच्या प्रतिष्ठेची वैशिष्ट्ये :*
ही गरज बाह्य घटकांवर अवलंबून असते,
इतरांनी मान- सन्मान दिला नाही तर आत्मविश्वास ढासळतो,
ही गरज अपूर्ण राहिली तर अभाव,असुरक्षितता, न्यूनगंड ,अपराधीपणा निर्माण होतो,
म्हणून याला Deficit Need म्हणतात —
कारण काहीतरी कमी आहे, ती कमतरता भरून काढण्यासाठी माणूस धडपडतो.
उदाहरण :
“लोक मला मान देत नाहीत.”,
“माझे कौतुक झाले नाही.”,
“माझे पद कमी आहे.”
"माझ्या शब्दाला किंमत नाही."
*जास्त प्रतीची प्रतिष्ठा*; (Higher Esteem Needs):
याला मास्लोने Being Need (अस्तित्वजन्य गरज) असे म्हटले आहे.
याचे स्वरूप असे असते :
स्वतःबद्दल आत्मसन्मान,
स्वतःच्या क्षमतांवर विश्वास,स्वावलंबन,
अंतःप्रेरणेवर आधारित समाधान,स्वतःच्या तत्वांची, मूल्यांची जाणीव असणे.
*या जास्त प्रतीच्या प्रतिष्ठेची वैशिष्ट्ये* :
ही गरज आतून उत्पन्न होते,इतरांच्या मतावर अवलंबून नसते,मान- सन्मान नाही मिळाला तरी व्यक्ती स्थिर,तटस्थ व संतुलित राहते,
आत्मविश्वास व शांती निर्माण होते,
म्हणून याला Being Need म्हणतात —
कारण व्यक्ती आपण जे आहोत त्यातच पूर्णत्व अनुभवते.
उदाहरण :
“मी योग्य प्रयत्न केले, तेवढे मला पुरेसे आहे”,
“लोक मान देओ वा न देओ, माझा आत्मसन्मान स्थिर आहे”.
मास्लोचा सूक्ष्म संदेश,
मास्लो म्हणतो —
" खरी आत्मसन्मानाची पातळी तेव्हाच येते,
जेव्हा माणूस Deficit Need मधून Being Need कडे प्रवास करतो."
म्हणजेच,
"बाह्य प्रतिष्ठेपासून अंतर्गत आत्मसन्मानाकडे जाणे
ही मानवी विकासाची खरी दिशा आहे. खरा आनंद,खरं समाधान आतमध्ये आहे,बाहेर नाही."
असे लोक आत्मशोध, आत्मप्रकाश, आत्मसाक्षात्कारच्या दिशेने प्रवास करतात.
योगीराज देवकर.
क्रमशः
No comments:
Post a Comment