आभासी मुलं, वास्तव गेलं.
एक पिढी अशी होती जेव्हा पालक मुळगावी रहात होते आणि त्यांची मुलं नोकरी निमित्त शहरात.
पुढच्या पिढीत ही मुलं पालक बनून शहरात स्थिरावली आणि त्यांची मुलं नोकरी निमित्त परदेशात.
आता त्या पुढच्या पिढीची मुलं कुठे असतील ? तर कदाचित स्पेस स्टेशनवर जॉब करतील. एका पिढीला राज्य,देश ठेंगना वाटला , मुलांच्या पिढीला जग ठेंगनं वाटत आहे. त्या पुढच्या पिढीला आकाश ठेंगनं वाटेल .असं पिढी दर पिढी लोकांचे स्थलांतर आणि सो कॉल्ड प्रगती सुरु आहे.जग हे असे लहान झाले आहे आणि माणसं मात्र दुर दुर गेली आहेत.
आपल्यापेक्षा आपली मुलं नामवंत, यशवंत , कीर्तिमंत व्हावी आणि त्यांनी आपल्यापेक्षा अधिक चांगलं आयुष्य जगावं अशी प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. मुलांचे यश हे पालकांचा अभिमान आणि समाजातील मान, सन्मान वाढविते.
विविध अँप्समुळे चॅटिंग,ऑडिओ, व्हिडीओ कॉलिंग शक्य झाले आहे.हवं तेव्हा एकमेकांशी बोलता येत असल्यामुळे माणसं जवळपासच असल्याचा भास होतो. ही या आभासी विश्वाची देणगी आहे . इतकच नाही तर सध्याच एआयचा उपयोग करून कोणाचाही आवाज, चेहरा याचा बेमालूम उपयोग करून फॉल्स ऑडिओ, रील्स, फिल्म्स तयार केले जात आहेत. मला तर असं वाटतं की, उद्या लोकं हयात नसलेल्या आप्तांचे देखील रिल्स करतील किंवा त्यांच्याशी वर्च्युअली बोलतील. लोकं इहलोकी गेलेल्या लोकांच्या बाबतीत पण ते वर्च्युअली जिवंत असल्याचा भास निर्माण करतील. काय बाबा हे टेक्नॉलॉजिवाले लोकं काय करतील याचा भरोसा राहिलेला नाही.
तेव्हा खेड्यातल्या पालकांसाठी शहरातली मुलं आभासी झाली असतील, तर आता शरातल्या पालकांसाठी परदेशातली मुलं आभासी झाली आहेत.तेव्हा ठिकाणांमधील आंतर कमी होतं, प्रवासाचा वेळ आणि खर्चही कमी होता,त्यामुळे प्रत्यक्ष भेटी जास्त होत असत. आता आंतर, वेळ, खर्च वाढला आणि प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या आहेत.
सध्याची मुलं मग ती खेड्यातली असो की, शहरातली असो की, परदेशातली असो,जास्त वेळ सोशल मीडियावरच असतात आणि ऑनलाईनच भेटतात. सारखं सारखं फोनमध्ये काय असतं असं विचारलं तर म्हणतात, महत्वाचं काम चालू आहे, आमचं ऑफिस काम फोनवरच चालतं . सुट्टीत स्वतःच्या देशात सारखं सारखं काय यायचं असं म्हणत परदेशातूनच परदेशात फिरायला जातात.नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना भेटायला भारतात येतात तेव्हा घरी बॅगा टेकवतात तेवढाच काय तो त्यांचा पालकांना सहवास. सगळ्यांना वेळ देता यावा म्हणून गेट टुगेदर, पार्टी, करणे किंवा एखादी ट्रिप काढणे असे घडत असते. तेवढाच प्रियजणांचा मेळा.
त्याकाळी पालक शहरात मुलांकडे आले तर स्वतःच्या खेड्यातली साधी राहणी,काटकसरीपणा, मोकळंचोकळंपणा या विरुद्ध शहरी राहणीमान,सुधारणा,
शुद्ध भाषा आणि एकूणच क्रॉस कल्चरल पैलूमुळे
लाजरे बुजरे होवून जायचे .
आताचे पालक परदेशात मुलांकडे गेले तर स्वतःच्या शहरातली संस्कृती,परंपरा या विरुद्ध परदेशी भाषा, प्रगत तंत्रज्ञान,रुपयाच्या तुलनेतली महागाई आणि एकूणच क्रॉस कल्चरल पैलूमुळे संकोचून जातात .
तेव्हा गावच्या तुलनेत शहरात पालक अडाणी होते आता शहराच्या तुलनेत परदेशात पालक अडाणी आहोत. लोकांनी कितीही सुधारणा केली तरी आधीची आवृत्ती जुनी आणि पुढची आवृत्ती नवी हे असंच चालू आहे. दोन पिढ्यातला हा जनरेशन गॅप कधी भरून निघेल अशी सूतराम शक्यता नाही.
आभासावरुन सहज आठवले, मुलीने,सुनेने घरात खाद्य पदार्थ बनवावेत असं पालकांना वाटणे साहजिक आहे. पण पुन्हा ते इथे असले तरी वेळेअभावी हे घडत नाही. आता ही मुलं जगभर फिरत असतात .मग काय तर तिथं बनवलेल्या खाद्य पदार्थांचे फोटो पोस्ट करत असतात. या ऑनलाईन फोटोचे कौतुक केले जाते. जीभेला पाचकरस सुटल्याचा स्मायली पाहणारे पोस्ट करत असतात आणि "मला पण", "मला पण", म्हणत या आभासी दुनियेचा भाग होत असतात .
हल्ली सिंगल चाईल्ड आणि चौकोनी कुटुंबचा जमाना आहे.
मुलं लहान असतात तेव्हा आई त्यांच्या हवं-नकोची काळजी घेते. इथपर्यंत मुलांना आईच्या हातच्या खाद्यपदार्थांचे कौतुक असते. आता त्यांना देशविदेशातले पदार्थ समजलेले असतात. फास्टफूड,झोम्याटो,स्विगी त्यांच्या दिमतीला हजर आहे. त्यामुळे त्यांना घरचं खाणं आवडेनासे झाले आहे.
मुल परदेशातनं इथं आलं की, दिवसभर शहरभर याला भेट, त्याला भेट करत फिरतं, "आरे जरा घरात थांब, आम्हाला पण वेळ दे!", म्हटलं की, "इतके पैसे खर्च करून मी काय घरात थांबायला आलो आहे का?", असं म्हणतं . आता जिथं स्वतःच्या मुलाला घरात थांबवू शकत नाही तिथं दुसऱ्याच्या घरातनं इथं आलेल्या मुलीला कसं थांबवायचं. हेच तुझं सासर आहे हे तीच्या मनावर कसं बिंबवायचं.
पूर्वीच्या काळात सासर, माहेर आणि त्यामध्ये नोकरीचं शहर होतं.आता त्या शहराची जागा परदेशातल्या शहरानं घेतली आहे आणि पालकांचे मूळ घर मात्र भोंज्या झालं आहे.
पालकांना स्वावलंबन, कष्ट तर असं काही चिकटलं आहे की, ना त्यांना निवृत्ती आहे,ना त्यांना सुट्टी आहे. या आभासी जगात कधीतरी ही पोरं आपल्यासोबत रहायला येतील या आशेवर हसऱ्या मुखवट्याच्या चेहऱ्याने रहायचे आहे .
आजच्या या आभासी जगात मुलांना गूगल, एआय, ग्रोक, जेमिनी, चॅट जीपीटी असे अनेक ज्ञानी गुरु आहेत. अनुभवी, जास्त उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या प्रौढ पालकांनी काही सांगायचा,शिकवायचा प्रयत्न केलाच तर ते त्यांना आधीच माहित असतं, पण गंम्मत म्हणजे तसं वागायचं मात्र नसतं.
माणूस म्हणजे गुणदोषांचा पुतळा,देव नव्हे. माणसात गुण असो की दोष त्याचा मुख्य श्रोत कोण असणार तर साहजिकच आई - वडील आणि आधीच्या पिढीतील पूर्वज्यांचे संस्कार आणि सहवास . मित्र,साहित्य ही अफवा आहे. त्यामुळे मुलं आई - वडिला सारखी वागली तर धन्यच म्हणावे. त्यांच्या सारखी नाही वागली तर आश्चर्य समजावे. कारण मुलं रस्त्यावरच्या वाटसरू सारखी तर नक्कीच वागणार नाही ना. दुसऱ्याचे असो वा स्वतःचे,गुणांचं गुणगान गावं आणि दोषात सुधारणा करावी हे प्रत्यकाचं इप्सित असावं. आई-वडिलांची जुनी आवृत्ती सुद्धा शिकून शिकूनच इथपर्यंत आली आहे म्हणून समजून घ्यावं आणि टीका न करता मुलांनी त्यांची सुधारित आवृत्ती बनावं.
पूर्वी मुलं घरातल्या जेष्ठान्ना,आई वडिलांना आदरयुक्त घाबरायची , बायको नवऱ्याला आदरयुक्त घाबरायची, सुन सासू-सासऱ्याला आदरयुक्त घाबरायची.तेव्हा लोकं थोडीतरी एकमेकांवर अवलंबून असायची. आता अवलंबून असणं पण संपलं आहे, प्रत्यकजण स्वतंत्र झाला आहे. कोणच कोणाला घाबरेनासे झाले आहे. आदर नावापुरता उरला आहे किंवा हे चित्र उलटे झाले आहे.
आधुनुकतेच्या नावाखाली हा मुक्त स्वातंत्र्याचा विकास आहे म्हणायचे, की ऱ्हास आहे म्हणायचे.
जग मग ते प्रत्यक्ष असो वा आभासी, जग आहे त्यापेक्षा अधिक चांगले बनविणे हे शब्दशः मोबाईलमुळे ज्याच्या त्याच्या हाती आहे.
एक मात्र सत्य आहे, येताना एकटे आलो आहोत, जाताना प्रत्येकाला एकटेच जायचे आहे. पण जिवंतपणी मुलं,कुटुंबीय, नातेवाईक, मित्र,हितचिंतक इतका गोतावळा असताना जगात असे आभासी का जगावे लागत आहे? इथे असते वडिलोपार्जित प्रॉपर्टी किंवा शहरात एखादी सदनिका,पालक ते सांभाळण्यातच अडकतात. ते ना धड इकडचे ना तिकडचे होतात. मुलांना असे सांगावेसे वाटते की,
'भारत देश बदल रहा हैं l ' हे जर सत्य असेल तर भारतात पण Ease of leaving अनुभवता येईलच ना . बाळांनो तुम्ही खरंतर Non Residential Indian (NRI) आहात Non Returning Indians (NRI) बनू नका . पालकांना असं वाटतं की, मुलांनी लवकरात लवकर एकाचे दोन व्हावे आणि दोनाचे तीन,चार व्हावे. करिअरसाठी स्वतःच्या देशात यावे,कुटुंबाच्या जबाबदारीची धुरा सांभाळावी, पालकांना त्यांच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा त्यांना हवा तसा जगू द्यावं, हीच पालकांच्या वास्तव जीवनाची आस आहे.
आयुष्याच्या शेवटी अशी नको वेळ यायला की, आमची मुलं करिअरकरिता परदेशी राहिल्याने आमच्यासाठी आभासी राहिली आणि पालकांवर आभासी मुलं आणि वास्तव गेलं म्हणायची वेळ आली.
लेखक...
योगीराज देवकर.