Tuesday, 30 September 2025

सातारा, कास पठार.

 सह्याद्रीच्या कुशीत सातारा कास पठार -एक नंबर ट्रिप.


लहान मुलाला आईच्या कुशीत जायला आवडते अगदी तसंच मोठ्या माणसांना निसर्गाच्या कुशीत जायला आवडते.  माणूस हा निसर्गाचाच अंश असल्यामुळे तो निसर्गाकडे नेहमीच आकर्षित होत असतो .निसर्गात गेलं की माणसाला मायेची उब लाभते. महाराष्ट्रातील लोक निसर्गाच्या बाबतीत किती सुदैवी आहेत पहा. त्यांना महाराष्ट्राच्या पश्चिमला सह्याद्री तर उत्तरेला सातपुडा पर्वतांची रांग लाभलेली आहे. सह्याद्रीचा पश्चिम घाट म्हटलं की नजरेसमोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, हिलस्टेशन्स,समुद्र किनारे,नद्या,धरणे,अभयारण्ये,देवस्थाने, घाटरस्ते आणि कितीतरी ठिकाणे.सातारा जिल्ह्यातील असंच एक ठिकाण म्हणजे कास पठार,यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट. 


साताऱ्याचे पण सध्या पुणे निवासी आम्हा सर्वांचे मित्र विकी परदेशी सर यांच्या आले मना की,सर्वांची सातारा कास पठार ट्रिप एक नंबर घडवून आणायची.आमच्या सरांचे सगळे एक नंबर असते, साताऱ्यातील इतर मित्रमंडळी प्रकाश मुजुमदार, प्रताप देशमुख,अविनाश जाधव, महेश पवार, संदीप कोंडे, प्रशांत जाधव, विजय बाचूळकर, संदीप भुंजे, गणेश काटे, सुहास शिंदे, पोपट गडदे,अविनाश जगताप इ.यांनीही विकी सरांच्या कल्पनेला होकार दिला. बघता बघता होस्ट आणि गेस्टची संख्या बत्तीसवर जावून पोहोचली. विकी सरांचा ट्रिप आयटीनरी बनविण्यात एक नंबर आहे . सातारकरांनी रिसॉर्ट्सची पाहणी केली आणि सरांनी सगळ्यांना डायरेक्ट सातारा-बामणोली रस्त्यावरील फाळणी येथील 'लगोरी ' दी अर्बन नेस्ट फूड अँड स्टे बुक केल्याचे ,दोन दिवसांची आयटीनरी आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे सोबत घ्यावयाच्या आवश्यक साहित्याच्या यादीसह कळविले. मग काय ठरल्या दिवशी बावीस पुणेकर पाच, सहा कार्समधून सातारा सहलीला निघाले. सकाळी सगळे कैलास भेळला ब्रेकफास्टसाठी जमले.तिथं ब्रेकफास्टला आम्हाला धवल आपटे भेटले पण ते रात्रीच कझाकीस्थानला नवीन ट्रिपची आखणी करायला जाणार असल्यामुळे आमच्या सोबत येणार नसल्याचे सांगून निघून गेले.इथूनच आमच्या गप्पा,गोष्टी,ग्रुप फोटोजला सुरुवात झाली . 


विकी सरांनी साताऱ्यातले नियोजन जरा हटके केले होते.

सुरुवातीलाच आम्ही संदीप कोंडे यांच्या पुष्प कन्स्ट्रक्शन्सच्या साईटला भेट देवून त्यांच्या नवीन बांधकामाची पाहणी केली. तिथून सातारा एमआयडीसी मध्ये प्रशांत जाधव यांचे आर्ट इफेक्ट स्टुडिओ पहायला गेलो. त्यांच्याकडे CNC/ Laser cutting, LED signage, Print media, Digital display branding, Graphics design solutions, इ. प्रकारच्या सेवा दिल्या जातात.पुढचं युनिट होतं प्रताप देशमुख यांचे अश्वमेघ किचन अँड इंटिरियर्स. त्यानंतर विजय बाचूळकर यांच्या वृद्धी इन्व्हेस्टमेंट्सला भेट झाली. या दोघांच्या युनिटच्या नावावरूनच ते काय व्यवसाय करतात ते समजले असेल. बाचूळकरांनी प्रत्येकाला एक वस्तू भेट दिली. माणसांत गुंतवणूक केली की सर्व प्रकारची वृद्धी होते हेच त्यांनी दाखवून दिले.


दुपारी दीड नंतर आमचा सातारा-कास पठार प्रवास सुरु झाला. साताऱ्यातल्या बोगद्यापासून उजवीकडे वळालो आणि घाटरस्ता सुरु झाला. थोडं वर गेलं की, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या खाली दरीत  कन्हेर आणि उरमोडी धरणांचे जलाशये दिसतात . ही जलाशये आपलं  स्वागत करत आहेत असे भासते . थोडंच पुढे गेलो आणि गाड्या जेवणासाठी थांबल्या. उंबरकर नावाचे एक अवलिया खानसामा आहेत. त्याचं एक शेडवजा बांधकाम असलेलं घरगुती वाटावे असे हॉटेल आहे. इथं मोठमोठी लोकं खास जेवायला येतात असं आम्हाला सांगण्यात आलं. सातारकर मित्रांनी त्यांना मटण आणून दिले होते आणि उंबरकरांनी आमच्या ग्रुपसाठी खास मटणाच्या जेवणाचा बेत तयार ठेवला होता. खूप छान जेवण झाले.तिथं जवळच एक छान व्ह्यू  पॉईंट आहे. तिथून सातारा शहराचे आणि अजिक्यतारा किल्ल्याचे विहंगम दृष्य दिसते. गेल्या पाच-सात वर्षात सातारा शहरात बराच बदल घडल्याचे दिसले . भुयारी मार्ग, सतरा मजली गगनचुंबी इमारत,शॉपिंग मॉल. साताराच काय तर एकूणच जगभरात बदलाचा वेग फार वाढला आहे. हा वेग पाहुन माझ्या मनात विनाकारण लोळत पडणाऱ्या किंवा झोपा काढणाऱ्या माणसांच्या बाबतीत एक विचार आला. माणसांनी विनाकारण झोपायला नाही पाहिजे राव, कारण जागी असणारी माणसं फार बदल घडवत असतात. तुम्हांला जाग येते तोवर जगात खूप काही बदललेलं असतं. या व्ह्यू पॉईंटवर आम्ही बरेच फोटो काढले.


तिथून कासच्या दिशेने प्रवास सुरु झाला तसं वातावरण अचानक आल्हाददायक झाले . आमच्या रस्त्यावर ढग उतरले आणि तापमान एकदम डावून झाले. कास पठार वरूनच आम्ही कास तलावापाशी पोहोचलो. कास तलावाच्या सांडव्यावर कृत्रिम वॉटरफॉल तयार केला आहे. वॉटरफॉल मग तो कृत्रिम असो की नैसर्गिक माणसं त्याच्या प्रेमात पडतात हेच खरं. तिथं खूप गर्दी होती, त्यात थोडा पाऊस सुरु होता. लोक वॉटरफॉलच्या आणि पावसाच्या पाण्यात चिंब  होण्याचा आनंद घेत होते. 


साधारण पाच वाजता आम्ही 'लगोरी ' स्टे वर पोहोचलो होतो. गेल्याबरोबर चहा - पाणी झाले, रूम्स अ्लॉट झाल्या. तिथं लगोरी,भोवरा,टेबलटेनिस, कॅरम असे खेळ, लॉन,चिल्ड्रेन प्ले एरिया, कॅन्टीन अशा सुविधा आहेत. मग कोण टीटी, तर कोण कॅरम खेळायला लागले. लॉनवर एक फुटबॉल पडला होता आणि दोन्ही बाजूला दोन-दोन टायर टाकून गोलपोस्ट तयार केल्याचे दिसत होते. पाऊस पडल्यामुळे लॉन ओली होती,काही भागात शेवाळ आणि चिखल पण होता. हे बघून आमच्या ग्रुपला फुटबॉल खेळायची खुमखूमी आली. दोन टीम पाडल्या गेल्या,राज मुरकुटे आणि प्रवीण जावळकर गोल कीपर झाले तसा फुटबॉल गेम सुरु झाला. एकूणच लॉनचा अवतार बघता थोड्याच वेळात तो फुटबॉल नसून रग्बी फुटबॉल असल्याचे दिसायला लागले.संग्राम निम्हण, विनायक हजारे, सुरेश उनेचा,प्रल्हाद सायंभार  आणि मी तर  असला खेळ हे आपले काम नाही म्हणून प्रेक्षक होणे पसंत केले. प्रवीण जावळकर, विकी परदेशी, प्रवीण लांडे, शंतनू वाघमोडे,श्रीकांत आणि चेतन मते,सचिन कोळेकर, गोपी मानकर, प्रकाश मुजुमदार, अभिजित मुरकुटे,गणेश मोडक, अमोल मोडक, यांची शरीरयष्टी आजही खेळाडूसारखी आहे. पण प्रमोद धुरपदे, किरण पवार, राज मुरकुटे असे काही खेळाडू आहेत जे सरळ उभे राहिले तर त्यांना पायाजवळचा फुटबॉल दिसणार नाही.पण खेळायचा उत्साह दांडगा.काय तर म्हणे आम्ही विद्यार्थीदशेत असताना फुटबॉल खेळायचो. त्यांना फुटबॉल खेळताना बघणं फारच मनोरंजक होतं. विशेषतः किरण पवार यांना स्वतःला सावरत पायांच्या हालचाली करताना, फुटबॉलवर कंट्रोल ठेवताना पाहणं सुखद होतं . खेळताना यातलं कोण पडलं नाही ते विचारा.शंतनू वाघमोडे, प्रमोद धुरपदे,सचिन कोळेकर , विकी परदेशी,चेतन आणि श्रीकांत मते ,अभीजीत मुरकुटे ,राज मुरकुटे ,प्रवीण लांडे , गणेशमोडक ,प्रकाश मुजुमदार,सगळे नुसते रपारप पडत होते. फुटबॉल मारला तर पाठीवर पडत होते आणि आडवायला गेले तर पोटावर पडत होते. आशिष मानकरांची तर अशी स्ट्रॅटेजि होती की,खेळायचं कमी आणि नुसता आरडाओरडा करायचा. सुरुवातीला जावळकरांच्या टीमचे गोल होताना दिसले. पण राजच्या लक्षात आले की त्यांनी दोन टायर मधले आंतर कमी करून गोलपोस्ट लहान केला आहे.  मग त्यांनी पण गोलपोस्ट लहान केला. मग राजच्या टीमची गोल संख्या वाढली. खेळताना यांनी इतका दंगा,मजा,मस्ती केली की, पाहणाराला वाटावे हेच का ते ध्यान धारणा करणारे सहजयोगी आहेत. इतकी पडापडी होवूनही कोणाला दुखापत झाली नाही हे विशेष.अक्षय मोरेचे खेळ वगैरे संपल्यावर 'लगोरी'वर आगमन झाले. फोनाफोनी झाल्यावर ते फलटणहुन निघाले. आज ट्रिपला जायचंय हेच ते विसरले होते. पण नंतर त्यांनी ट्रिप एन्जॉय केली. 


रात्री मटण बिर्याणीचा बेत होता. साताऱ्यातले बशीर भाई खानसामा महाराज मटण बिर्याणी बनविण्यासाठी फेमस आहेत. आज त्यांना खास मटण बिर्याणी तयार करायला 'लगोरी'वर बोलावले होते.त्यामुळे हा बेत तर एकच नंबर झाला.


भल्या सकाळी सहा वाजता आम्ही कास पठारवरील रानफुले, फुलपाखरं पहायला निघालो. पार्किंग नंबर दोनवर गाड्या पार्क केल्या आणि शहाण्यासारखे गेट नंबर चारमधून 'कुमदिनी पुष्प लेकच्या' दिशेने चालायला सुरुवात केली.तिथे एकूण चार गेट आहेत. आमच्यापैकी काहीजण गेट नंबर एक मधून आत गेले. कास पठारची निर्मिती ज्वालामुखीजन्य  बसाल्ट खडकापासून झाली आहे. साधारणपणे दहा चौरस किमीच्या खडकाळ पठारावर पावसाळ्यात गवत, फुलझाडे वाढली की साडेआठसे प्रकारची फुले येतात. दोन-तीन महिन्यांचा हा सिझन असतो. सगळी फुले एकाच वेळी येतात असे नाही. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी फुलझाडे वाढतात तशी ती येतात. पाठरावर कुमदिनी,कंदील पुष्प, गवती दवबिंदू, कासा, टूथब्रश ऑर्किड, अंजनी, छोटी/मोठी सोनकी, पांढरा सापकांदा, सीतेची आसवे, इ.अशी शेकडो प्रकारची फुले येतात. इथं फुलांचे गालिछे , ताटवे पाहणे म्हणजे स्वर्गीय आनंद असतो. इथं येणारी काही फुलं तर दुर्मिळ प्रकारची आहेत.पुढं तीन, साडेतीन तास आम्ही फुलांच्या विश्वात विहार करत होतो. काहीजण फुलांचे तर काहीजण स्वतःचे फोटो काढत होते.


'लगोरी'वर जावून मस्त ब्रेकफास्ट केला आणि कोयना धरण जलाशयात नौकाविहार करण्यासाठी बोट क्लब असलेल्या मुनावळे गावी गेलो . बोटीने दीड तासाचा मस्त नौकाविहार सुरु झाला.कोयनेच्या एका तिरावर मुनावळे, बामणोली, शेंबडी, तापोळा ही बोट क्लब असलेली गावे तर दुसऱ्या तिरावर वासोटा किल्ला आणि कोयना अभयारण्य आहे.बोट चालक आम्हाला कोयना-कांदाटी-सोळसी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर घेवून गेला. लांबूनच त्यानं आम्हाला माजी सीएमचे दरे गाव दाखविले. त्यानं आम्हाला एक आगळीवेगळी माहिती दिली आणि कोयना अभयारण्यत असलेले खीरखंडी हे पाच, सहा घरांचे गाव दाखविले. या गावातील काही गावकऱ्यांनी पुनर्वसनास विरोध केला त्यामुळे हे लोक तिथेच वास्तव्यास आहेत.

मुलांसाठी गावात चौथी पर्यंत शाळा आहे. चौथीच्यापुढे मुलांना होडीने रोज अलीकडच्या तिरावरील शाळेत जावे लागते. विशेष म्हणजे या गावात निवडणूक मतदानकेंद्र असते. सध्या या जलाशयात एका पुलाचे काम चालू आहे. हा पुल झाल्यावर सातारा-कोकणातील खेडचे आंतर कमी होणार आहे. पात्रातील क्रिस्टल क्लीअर निळेशार पाणी, किनाऱ्यावर हिरवेगार जंगल,आकाशात ढगांची गर्दी,निसर्गातील शांतता आपल्याला निर्वीचार करते आणि आपण निसर्गाच्या कुशीत प्रेमाची उब अनुभवतो. 


'लगोरी'वर परतलो तर मटण,चिकन,फिशचे जेवण तयार होते. सातारकर मित्रांमुळे आमची खाण्याची चंगळ झाली.


संध्याकाळी सातारकरांचे आभार मानून आमचा परतीचा पुणे प्रवास सुरु झाला.प्रवीण जावळकार, विकी परदेशी, संग्राम निम्हण, विनायक हजारे, अमोल मोडक यांच्या कार्स आगे मागेच प्रवास करत होत्या. संग्राम निम्हण यांच्या गाडीत राज, किरण, सुरेश उनेचा यांच्यासह गप्पांच्या ओघात पुणे कधी आले ते समजले पण नाही.


प्रवासात आमची चर्चा सुरु होती आता पुढची एक नंबर ट्रिप कुठे काढायची.


लेखक - योगीराज देवकर, पुणे. 9307133134

Monday, 15 September 2025

आंतरराष्ट्रीय सहजयोगा रिसर्च अँड हेल्थ सेंटर.

 सूक्ष्म शरीर यंत्रणेचा (Subtle body system's) दैवी स्कॅनर-आंतरराष्ट्रीय सहजयोगा रिसर्च अँड हेल्थ सेंटर - सिबीडी- बेलापूर, नवी मुंबई.


जय श्री माताजी!


डॉक्टर्स स्थूल शरीराच्या बाबतीत ठराविक वयानंतर लोकांना रुटीन चेकअप करायला सुचवितात. यात ब्लड, युरीन टेस्ट, एक्सरे, सोनोग्राफी किंवा गरजेनुरूप स्कॅन असू शकतात. रिपोर्ट्स पाहुन स्थूल शरीराच्या आरोग्याचे निदान केले जाते.


जगात असा कुठे स्कॅनर आहे का, ज्याद्वारा  सूक्ष्म शरीर यंत्रणेचा स्कॅन केला जावू शकेल. 

हो आहे! 

हा स्कॅनर म्हणजे परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी यांनी मानवजातीस दिलेली अप्रतिम भेट आंतरराष्ट्रीय सहजयोगा रिसर्च अँड हेल्थ सेंटर - सिबीडी - बेलापूर, नवी मुंबई. इथं सूक्ष्म शरीर यंत्रणा स्कॅन होते असं म्हटलं तरी वावगे होणार नाही. या प्रकारचे हे जगातील वैशिष्ट्यपूर्ण सेंटर आहे जिथे प्रत्यक्ष श्री माताजींनी सांगितलेल्या फक्त चैतन्य लहरीच्या जाणीवेवर आधारित सहजयोगा  प्रॅक्टिसेस प्रमाणे उपचार केले जातात. 


इडा नाडी जास्त थंड झाली तर किंवा पिंगला नाडी जास्त उष्ण झाली तर मानवी सूक्ष्म शरीर यंत्रणा असंतुलित होते. अहंकार किंवा प्रतीअहंकार वाढतो, सु्षुमना नाडीवर दाब येतो, चक्रांवर बिघाड होतात . असं काही घडलं की, व्यक्तीचे आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. हे इतकं सूक्ष्म लेवलवर घडते की, प्रत्येक सहजयोग्याला हे बारकावे कळतीलच असे नाही.


म्हणून असे म्हणावेसे वाटते की, आपण स्थूल शरीराच्या बाबतीत जसे निरोगी असतानाच रुटीन चेकअप करत असतो अगदी तसेच चेकअप सूक्ष्म शरीराच्या बाबतीत पण हेल्थ सेंटरला जावून का करू नये .असे केले तर शरीर निरोगी राहण्यास सहाय्य तर होईलच पण महत्वाचे म्हणजे आध्यात्मिक प्रगती लवकर होईल. 


सहजयोगात महत्वाचे आहे ध्यान. ध्यानाने संतुलन प्राप्त होते , निर्वीचार ,निर्विकल्प स्थिती येते, आत्मविष्कार होतो, परमात्म्याशी योग घटित होतो. यासाठी दररोज दिवसातून किमान दोनदा दहा दहा मिनिटे निर्वीचार अवस्था लाभली आहे अशा स्थितीत ध्यान व्हायला हवे आहे. ध्यान घडतंच मुळात व्यक्ती संतुलित असेल तर. आध्यात्मिक प्रगतीसाठी श्री माताजींनी जसे दररोज ध्यान करायला सांगितले आहे तसेच संतुलन लाभण्यासाठी , ध्यान लागण्यासाठी पूरक ठरतील अशा क्लिअरन्स करिता गरजेनुसार करायला हव्यात अशा काही ट्रीटमेंट्स पण सांगितल्या आहेत. जशा की, मीठ- पाणी, जोडेपट्टी,कॅण्डल, आइस पॅक, घी- कापूर, सहस्त्रार मसाज,पेपर बर्निंग, थ्रेड नॉट बर्निंग, मटका,नाड्या व चक्र संतुलन व शुद्धीसाठी मंत्र व प्रार्थना,इ. हेल्थ सेंटरला गेलं की,तिथले डॉक्टर्स तुमच्या सूक्ष्म शरीर यंत्रणेचे व्हाब्रेशन्स पाहुन चेकअप करतात आणि तुम्हाला आवश्यक त्या सहजयोगा ट्रीटमेंट्स विनासायास मिळतात. इथे कोणतेही औपचारिक औषध दिले जात नाही.


मुळात हे हेल्थ सेंटर श्री माताजींनी स्वतः डिझाईन करून निर्माण केलेले आहे. इथे श्री माताजींची विश्रांतीची रूम , मेडिटेशन हॉल, OPD, IPD क्लिनिक हॉल्स, डॉरमेटरिज, प्रायव्हेट रूम्स, लायब्ररी, सहज मटेरील शॉप, स्टेज,बगीचा,कॅन्टीन अशा पुष्कळ सोई सुविधा उपलब्ध आहेत. त्याही एकदम वाजवी किंमतीत.नवी मुंबईत असूनही हेल्थ सेंटरच्या मागील भागात जंगल आहे. हेल्थ सेंटर मध्ये OPD ( आऊट डोअर पेशंट्स ) आणि IPD ( इन डोअर पेशंट्स )अशी सुविधा आहे . तुम्ही अर्धा/पूर्ण दिवस जावून उपचार घेऊ शकता किंवा तिथे काही दिवस राहून उपचार घेऊ शकता.


इथे OPD सेवा निशुल्क असते. पूर्ण दिवसासाठी प्रतिव्यक्ती 600 ₹ चार्जेस आहेत तर IPD  प्रतिव्यक्ती/ प्रतिदिन डॉरमेटरी 1000₹ आणि रूम 1500₹ आहे.एसी रूमसाठी थोडे जास्त. यात तीन वेळा चहा, ब्रेकफास्ट, दोन वेळचे जेवण , निवास याचा समावेश असतो. म्हणजे तुमचा पैसा तुमच्याच राहण्या- खाण्यावर खर्च होतो. इथं दिला जाणारा अजवाईन टी तर लाजबाब असतो. येथील चेकअप आणि सहजयोगा ट्रीटमेंट्स तर फ्री ऑफ कॉस्ट असतात. 


बरेच सहजयोगी असा विचार करतात की, हेल्थ सेंटरला कधी जावे? तिथे किती दिवस रहावे?सोबत काय घेवून जावे? तर प्रत्येक सहजयोग्याने निरोगी असतानाच हेल्थ सेंटरला वर्ष-दोन वर्षातून एकदा, किमान तीन-चार दिवसांसाठी जावे. कारण एक, दोन दिवस तर तुमची सर्विसिंग होण्यातच खर्च होतात, खरा अनुभव तर त्यानंतर सुरु होतो आणि शिवाय तीन दिवस राहिलात तर मटका ट्रीटमेंट घेता येते. हेल्थ सेंटरला वर्षभर भारतातल्या विविध राज्यातून आणि परदेशातून अनेक सहजयोगी येत असतात. विशेषतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत परदेशी सहजयोगी अधिक असतात. परदेशी सहजयोगी तर केवळ आध्यात्मिक उत्थानासाठी महिना, महिना इथे येवून राहतात. हेल्थ सेंटरमधील वास्तव्याबद्दल सहजयोगिनी भगिनींची प्रतिक्रिया तर त्या माहेरी आलेल्या आहेत अशी असते. आपण चौकशी करून तुलनेने जेव्हा गर्दी कमी असते तेव्हा बुकिंग करून जावे. स्वतः सोबत 'निर्मल विद्या ', 'निर्मल स्वरांजली ' ही पुस्तके ठेवावीत. मंत्र, भजने म्हणण्यासाठी पुस्तकांचा उपयोग होतो. आरामदायकपणासाठी सुती, सैल कपडे वापरावेत. एकदा का आपण हेल्थ सेंटरच्या कॅम्पस मध्ये गेलो की,पहाटे उठून ध्यान करणे , सकाळचा चहा,सकाळी 8 ते 9 ध्यान, 9 वाजता ब्रेकफास्ट, 11 पासून डॉक्टरांची IPD सुरु होते,डॉक्टरांनी सांगितलेल्या ट्रीटमेंट करणे,1वाजता दुपारचे जेवण,4 वाजता सामूहिकते सोबत मीठ- पाणी, जोडेपट्टी ट्रीटमेंट, 5 वाजता चहा, 6 ते 7 सायंकाळचे ध्यान, 8 वाजता रात्रीचे जेवण, झोपण्यापूर्वी मीठ - पाणी ट्रीटमेंट आणि ध्यान.  तिथे आपण पूर्णवेळ सहजयोगी झालेलो असतो. आपला दिवस कसा संपला ते समजत सुद्धा नाही. 


हेल्थ सेंटर बाबत एक गैरसमज आहे की, इथे आजारी पडल्यावरच जावे. तर असे नाही. 'Prevention is better than cure.' असे म्हणतात, त्याप्रमाणे आपण निरोगी असतानाच इथे जावे म्हणजे आपण आजारी पडण्याची शक्यता कमी होईल. विशेषतः युवाशक्ती समन्वयक, सहजयोग साप्ताहिक ध्यान केंद्र समन्वयक, सहजयोग प्रचार प्रसार टीमचे सहजयोगी सदस्य , विविध ठिकाणच्या सहजयोग ट्रस्टचे ट्रस्टीज, इ. यांनी जरूर इथे येवून ट्रीटमेंट घ्यावी. कारण अनुभव हीच खात्री असते.  त्यामुळे ते इतर सहजयोग्यांना हेल्थ सेटरचे महत्व आणि आध्यात्मिक लाभ याबद्दल खात्रीने सांगू शकतील.


सहजयोग्यांच्या संतुलन आणि क्लिअरन्स बद्दल श्री माताजी असे सांगतात की, सहजयोगी हे मेंटल लेवलच्या खूप वरती आहेत,त्यामुळे त्यांचे संतुलन, क्लिअरन्स हे स्पिरिच्यूअल लेवलवर होत असते.भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश हे इलेमेंट्स नाड्यांचे,चक्रांचे क्लिअरन्स करण्यात मुख्य भूमिका बजावतात. त्यासाठी समोर श्री माताजींचा फोटो असावा आणि फोटो समोर दिवा लावलेला असावा. श्री माताजींवर श्रद्धा, विश्वास असावा. आपण हे जाणतो की, कर्ता, करवीत्या श्री माताजी आहेत.तरीही माध्यम किंवा साधन म्हणून इथं कार्यरत असलेले,"जय श्री माताजी!" बोलून हसतमुखाने स्वागत करणारे सेक्युरिटी गार्ड्स,स्टाफ आणि डॉक्टर्स,

लिव्हर साठी उपयुक्त रुचकर, स्वाधीष्ठ डायट फूड वेळेवर पुरविणारे कॅन्टीन मधील शेफ आणि इथे सेवा देणारे डॉक्टर्स आणि सर्व कर्मचारी आलेल्या प्रत्येक साधकाला अगदी मनापासून सेवा देतात . इथे कार्यरत डॉक्टर्स आणि कर्मचारी सर्व सहजयोगीच आहेत आणि ते सहजयोग पद्धतीने चैतन्य लहरी आणि  प्रॅक्टिसेस द्वारा पंचतत्वावर आधारित उपचार करतात. 


यापूर्वी जर तुम्ही हेल्थ सेंटरला गेले असाल तर तुम्ही सेंटरमधील 

डॉक्टरांच्या सेवेचा अनुभव तुम्ही घेतला असेल. साधकांसाठी खूप कष्ट घेतात हे डॉक्टर्स. इथं काम करणारे डॉक्टर्स नोकरी नव्हे तर श्री माताजींचे कार्य आणि सेवा करतात असे त्यांचे योगदान पाहिले की जाणवते. 


इडा नाडी संतुलित, स्वच्छ असेल तर पवित्रता,मांगल्य,ममत्व,शुद्ध इच्छा,भावना,

विचारविवेक,आनंद,नवनिर्मिती,'स्व'चे अस्तित्व, इ.सूक्ष्मगुण प्राप्त होतात .

इडा नाडीचा अगदी सहज विचार केला तरी ही नाडी का खराब होते हे लक्षात येईल. श्री गणेशांच्या, श्री महाकालीच्या गुणांविरुद्ध वागले की,डाव्या मुलाधारावर दोष निर्माण होतो ,श्री गणेश तत्व खराब होते,स्वाधीष्ठानवर अशुद्ध इच्छा, विचार निर्माण होतात, मणिपूरवरील गुरुतत्व खराब होते, अनाहतवर आत्मतत्व बिघडते, डाव्या विशुद्धीवर अपराधीपणाची भावना वाढते,भीती वाटायला लागते,आज्ञावर प्रतिअहंकार वाढतो.मनुष्य भूतकाळात रमतो, आळशी बनतो,चिंता करतो,मग निराश होतो आणि शेवटी नैराश्याचा बळी ठरतो. असे हे तमोगुण वाढले की, मनुष्य स्वतःहून आजरांना निमंत्रण देतो.


पिंगला नाडी संतुलित, स्वच्छ असेल तर स्वाभिमान, प्रयत्न,कृती,निर्मिती,उद्योगी, बौद्धिक व शारीरिक कष्ट, कार्यक्षमता, लढाऊ वृत्ती, इ.सूक्ष्मगुण प्राप्त होतात.

आता हीच पिंगला नाडी असंतुलित कधी होते तर श्री कार्तिकेयांच्या, श्री महासरस्वतीच्या गुणांविरुद्ध वागले की,उजवे मुलाधार चक्र खराब होते,राक्षसी,पशु, आक्रमक,विचार वाढतात, लिव्हरची उष्णता वाढते आणि ती इतर  चक्रापर्यंत जाते,चक्र खराब होतात, मनुष्य अती क्रियाशील होतो, मर्यादांचा विसर पडतो,अहंकार वाढतो. रजोगुण वाढतात तसे काही आजार आपोआप तुमच्यामध्ये येतात.


इडा, पिंगला संतुलित, स्वच्छ झाल्या तर मनुष्य वर्तमानात राहतो,श्री महालक्ष्मी तत्व जागृत होते, सुषुम्ना नाडीचे सूक्ष्मगुण  धर्म, उत्क्रांती, 'स्व' च्या अस्तित्वाचा शोध,आत्मज्ञान, आत्मविष्कार, परमात्मा भेटीचा योग आणि सर्व चक्रांचे दैवी गुण प्राप्त होतात.मनुष्य जर असा सत्वगुणी झाला तर तो निरोगी तर होईलच पण संत पद प्राप्त करेल.


श्री माताजींनी लिहलेल्या पुस्तकात चक्र आणि पाकळ्यांची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे श्री माताजींनी प्रत्येक पाकळी आणि त्याखाली येणाऱ्या अवयवाचे नांव दिले आहे.


उदाहरणार्थ 

मुलाधार चक्र.(Pelvic plexus)

पेटल सब प्लेक्सस आणि नियंत्रित अवयव.

पाकळी एक - इन्फेरिअर हेमोरॉइडल : अवयव - गुदाशय (Rectum)

पाकळी दोन - व्हेसिकल: अवयव – मूत्राशय, वीर्यकोष (Vesiculae seminalis) आणि वीर्यवाहिनी (Vas deferens)

पाकळी तीन - प्रोस्टॅटिक : अवयव-  पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांमध्ये योनिचा भाग

पाकळी चार - युटेरिन: अवयव - स्त्रियांमध्ये गर्भाशय, गर्भाशयमुख (Cervix) आणि फलोपियन नलिका (Fallopian tubes), पुरुषांमध्ये वीर्यकोष (Vesiculae seminalis) आणि वीर्यवाहिनी (Vas deferens)


मुलाधार चक्र खराब झाले तर या शारीरिक अवयवांशी संबंधित आजार होवू शकतात. 


अशीच माहिती स्वाधीष्ठान, माणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा  सर्व चक्रा बाबत दिलेली आहे. अहो विशुद्धी चक्रावरील सोळा पाकळ्यांची नांवे आणि त्याखाली येणाऱ्या सोळा शारीरिक अवयवांची नांवे श्री माताजींनी दिली आहेत. किती हे अद्भूत ज्ञान आहे. विज्ञानाच्या पुढचे हे ज्ञान आहे.


सहजयोगी डॉक्टर्सना व्हाब्रेशन्स पाहुन चेकअप करताना तुमच्या कोणत्या चक्रावर पकड आहे, असंतुलनाचे कारण काय आहे,आजाराचे कारण काय आहे हे समजते आणि त्यासाठी काय ट्रीटमेंट करायला हवी ते समजते.  काही उपचार ते करतात काही उपचार करण्यासाठी तुम्हाला होमवर्क दिला जातो . मग काय तिथे बसून करत रहायचे स्वतःचे क्लिअरन्स.मुळात आपण सहजयोगी आहोत, सहजयोग थोडा समजून उमजून केला की, संतुलन, निर्वीचारता लाभते. खरंतर आपण आजारी पडण्याची वाट कशाला बघायला हवी, त्याआधीच हेल्थ सेंटर गेलात तर कधी आजारी पडण्याची वेळच येणार नाही.


हेल्थ सेंटर मध्ये येवून उपचार घेतल्या नंतर चिंताविकार, काळजी, अपराधीपणाची भावना, उच्च रक्तदाब, फिट्स, दमा, सांधेदुखी, हृदयविकार, डोकेदुखी, (पंडुरोग)रक्तक्षीणता, इ. आजार बरी झाल्याची हजारो उदाहरणे आहेत . नियमित सहजयोग करणारांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता दुरावते , सहजयोगात कर्करोग सारखा गंभीर आजार देखील बरा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.


श्री माताजींनी जगातल्या सर्व सहजयोग्यांसाठी हि सुविधा उभारलेली आहे.आदरणीय श्रीमती कल्पना दीदी आणि एलईटी मुंबईचे ट्रस्टीज्,स्वतः लक्ष घालून सेंटरचे व्यवस्थापन पाहतात.  तेव्हा अशा या श्री माताजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण  हेल्थ सेंटरला स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी नक्की भेट द्यावी आणि हो नवीन साधकांना ते सहजयोगात सहा महिने, वर्षभर स्थिर होईपर्यंत तिकडे जाण्याचा सल्ला देऊ नये. सहजयोगात स्थिरवले की मग त्यांना पण पाठवायला काही हरकत नाही.

अधिक माहितीसाठी 

International Sahajayiga Research and  Health Centre असे गूगल सर्च करा. 


जय श्री माताजी!

लेखक - सहजयोगी साधक - योगीराज देवकर. पुणे.