सह्याद्रीच्या कुशीत सातारा कास पठार -एक नंबर ट्रिप.
लहान मुलाला आईच्या कुशीत जायला आवडते अगदी तसंच मोठ्या माणसांना निसर्गाच्या कुशीत जायला आवडते. माणूस हा निसर्गाचाच अंश असल्यामुळे तो निसर्गाकडे नेहमीच आकर्षित होत असतो .निसर्गात गेलं की माणसाला मायेची उब लाभते. महाराष्ट्रातील लोक निसर्गाच्या बाबतीत किती सुदैवी आहेत पहा. त्यांना महाराष्ट्राच्या पश्चिमला सह्याद्री तर उत्तरेला सातपुडा पर्वतांची रांग लाभलेली आहे. सह्याद्रीचा पश्चिम घाट म्हटलं की नजरेसमोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, हिलस्टेशन्स,समुद्र किनारे,नद्या,धरणे,अभयारण्ये,देवस्थाने, घाटरस्ते आणि कितीतरी ठिकाणे.सातारा जिल्ह्यातील असंच एक ठिकाण म्हणजे कास पठार,यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट.
साताऱ्याचे पण सध्या पुणे निवासी आम्हा सर्वांचे मित्र विकी परदेशी सर यांच्या आले मना की,सर्वांची सातारा कास पठार ट्रिप एक नंबर घडवून आणायची.आमच्या सरांचे सगळे एक नंबर असते, साताऱ्यातील इतर मित्रमंडळी प्रकाश मुजुमदार, प्रताप देशमुख,अविनाश जाधव, महेश पवार, संदीप कोंडे, प्रशांत जाधव, विजय बाचूळकर, संदीप भुंजे, गणेश काटे, सुहास शिंदे, पोपट गडदे,अविनाश जगताप इ.यांनीही विकी सरांच्या कल्पनेला होकार दिला. बघता बघता होस्ट आणि गेस्टची संख्या बत्तीसवर जावून पोहोचली. विकी सरांचा ट्रिप आयटीनरी बनविण्यात एक नंबर आहे . सातारकरांनी रिसॉर्ट्सची पाहणी केली आणि सरांनी सगळ्यांना डायरेक्ट सातारा-बामणोली रस्त्यावरील फाळणी येथील 'लगोरी ' दी अर्बन नेस्ट फूड अँड स्टे बुक केल्याचे ,दोन दिवसांची आयटीनरी आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे सोबत घ्यावयाच्या आवश्यक साहित्याच्या यादीसह कळविले. मग काय ठरल्या दिवशी बावीस पुणेकर पाच, सहा कार्समधून सातारा सहलीला निघाले. सकाळी सगळे कैलास भेळला ब्रेकफास्टसाठी जमले.तिथं ब्रेकफास्टला आम्हाला धवल आपटे भेटले पण ते रात्रीच कझाकीस्थानला नवीन ट्रिपची आखणी करायला जाणार असल्यामुळे आमच्या सोबत येणार नसल्याचे सांगून निघून गेले.इथूनच आमच्या गप्पा,गोष्टी,ग्रुप फोटोजला सुरुवात झाली .
विकी सरांनी साताऱ्यातले नियोजन जरा हटके केले होते.
सुरुवातीलाच आम्ही संदीप कोंडे यांच्या पुष्प कन्स्ट्रक्शन्सच्या साईटला भेट देवून त्यांच्या नवीन बांधकामाची पाहणी केली. तिथून सातारा एमआयडीसी मध्ये प्रशांत जाधव यांचे आर्ट इफेक्ट स्टुडिओ पहायला गेलो. त्यांच्याकडे CNC/ Laser cutting, LED signage, Print media, Digital display branding, Graphics design solutions, इ. प्रकारच्या सेवा दिल्या जातात.पुढचं युनिट होतं प्रताप देशमुख यांचे अश्वमेघ किचन अँड इंटिरियर्स. त्यानंतर विजय बाचूळकर यांच्या वृद्धी इन्व्हेस्टमेंट्सला भेट झाली. या दोघांच्या युनिटच्या नावावरूनच ते काय व्यवसाय करतात ते समजले असेल. बाचूळकरांनी प्रत्येकाला एक वस्तू भेट दिली. माणसांत गुंतवणूक केली की सर्व प्रकारची वृद्धी होते हेच त्यांनी दाखवून दिले.
दुपारी दीड नंतर आमचा सातारा-कास पठार प्रवास सुरु झाला. साताऱ्यातल्या बोगद्यापासून उजवीकडे वळालो आणि घाटरस्ता सुरु झाला. थोडं वर गेलं की, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या खाली दरीत कन्हेर आणि उरमोडी धरणांचे जलाशये दिसतात . ही जलाशये आपलं स्वागत करत आहेत असे भासते . थोडंच पुढे गेलो आणि गाड्या जेवणासाठी थांबल्या. उंबरकर नावाचे एक अवलिया खानसामा आहेत. त्याचं एक शेडवजा बांधकाम असलेलं घरगुती वाटावे असे हॉटेल आहे. इथं मोठमोठी लोकं खास जेवायला येतात असं आम्हाला सांगण्यात आलं. सातारकर मित्रांनी त्यांना मटण आणून दिले होते आणि उंबरकरांनी आमच्या ग्रुपसाठी खास मटणाच्या जेवणाचा बेत तयार ठेवला होता. खूप छान जेवण झाले.तिथं जवळच एक छान व्ह्यू पॉईंट आहे. तिथून सातारा शहराचे आणि अजिक्यतारा किल्ल्याचे विहंगम दृष्य दिसते. गेल्या पाच-सात वर्षात सातारा शहरात बराच बदल घडल्याचे दिसले . भुयारी मार्ग, सतरा मजली गगनचुंबी इमारत,शॉपिंग मॉल. साताराच काय तर एकूणच जगभरात बदलाचा वेग फार वाढला आहे. हा वेग पाहुन माझ्या मनात विनाकारण लोळत पडणाऱ्या किंवा झोपा काढणाऱ्या माणसांच्या बाबतीत एक विचार आला. माणसांनी विनाकारण झोपायला नाही पाहिजे राव, कारण जागी असणारी माणसं फार बदल घडवत असतात. तुम्हांला जाग येते तोवर जगात खूप काही बदललेलं असतं. या व्ह्यू पॉईंटवर आम्ही बरेच फोटो काढले.
तिथून कासच्या दिशेने प्रवास सुरु झाला तसं वातावरण अचानक आल्हाददायक झाले . आमच्या रस्त्यावर ढग उतरले आणि तापमान एकदम डावून झाले. कास पठार वरूनच आम्ही कास तलावापाशी पोहोचलो. कास तलावाच्या सांडव्यावर कृत्रिम वॉटरफॉल तयार केला आहे. वॉटरफॉल मग तो कृत्रिम असो की नैसर्गिक माणसं त्याच्या प्रेमात पडतात हेच खरं. तिथं खूप गर्दी होती, त्यात थोडा पाऊस सुरु होता. लोक वॉटरफॉलच्या आणि पावसाच्या पाण्यात चिंब होण्याचा आनंद घेत होते.
साधारण पाच वाजता आम्ही 'लगोरी ' स्टे वर पोहोचलो होतो. गेल्याबरोबर चहा - पाणी झाले, रूम्स अ्लॉट झाल्या. तिथं लगोरी,भोवरा,टेबलटेनिस, कॅरम असे खेळ, लॉन,चिल्ड्रेन प्ले एरिया, कॅन्टीन अशा सुविधा आहेत. मग कोण टीटी, तर कोण कॅरम खेळायला लागले. लॉनवर एक फुटबॉल पडला होता आणि दोन्ही बाजूला दोन-दोन टायर टाकून गोलपोस्ट तयार केल्याचे दिसत होते. पाऊस पडल्यामुळे लॉन ओली होती,काही भागात शेवाळ आणि चिखल पण होता. हे बघून आमच्या ग्रुपला फुटबॉल खेळायची खुमखूमी आली. दोन टीम पाडल्या गेल्या,राज मुरकुटे आणि प्रवीण जावळकर गोल कीपर झाले तसा फुटबॉल गेम सुरु झाला. एकूणच लॉनचा अवतार बघता थोड्याच वेळात तो फुटबॉल नसून रग्बी फुटबॉल असल्याचे दिसायला लागले.संग्राम निम्हण, विनायक हजारे, सुरेश उनेचा,प्रल्हाद सायंभार आणि मी तर असला खेळ हे आपले काम नाही म्हणून प्रेक्षक होणे पसंत केले. प्रवीण जावळकर, विकी परदेशी, प्रवीण लांडे, शंतनू वाघमोडे,श्रीकांत आणि चेतन मते,सचिन कोळेकर, गोपी मानकर, प्रकाश मुजुमदार, अभिजित मुरकुटे,गणेश मोडक, अमोल मोडक, यांची शरीरयष्टी आजही खेळाडूसारखी आहे. पण प्रमोद धुरपदे, किरण पवार, राज मुरकुटे असे काही खेळाडू आहेत जे सरळ उभे राहिले तर त्यांना पायाजवळचा फुटबॉल दिसणार नाही.पण खेळायचा उत्साह दांडगा.काय तर म्हणे आम्ही विद्यार्थीदशेत असताना फुटबॉल खेळायचो. त्यांना फुटबॉल खेळताना बघणं फारच मनोरंजक होतं. विशेषतः किरण पवार यांना स्वतःला सावरत पायांच्या हालचाली करताना, फुटबॉलवर कंट्रोल ठेवताना पाहणं सुखद होतं . खेळताना यातलं कोण पडलं नाही ते विचारा.शंतनू वाघमोडे, प्रमोद धुरपदे,सचिन कोळेकर , विकी परदेशी,चेतन आणि श्रीकांत मते ,अभीजीत मुरकुटे ,राज मुरकुटे ,प्रवीण लांडे , गणेशमोडक ,प्रकाश मुजुमदार,सगळे नुसते रपारप पडत होते. फुटबॉल मारला तर पाठीवर पडत होते आणि आडवायला गेले तर पोटावर पडत होते. आशिष मानकरांची तर अशी स्ट्रॅटेजि होती की,खेळायचं कमी आणि नुसता आरडाओरडा करायचा. सुरुवातीला जावळकरांच्या टीमचे गोल होताना दिसले. पण राजच्या लक्षात आले की त्यांनी दोन टायर मधले आंतर कमी करून गोलपोस्ट लहान केला आहे. मग त्यांनी पण गोलपोस्ट लहान केला. मग राजच्या टीमची गोल संख्या वाढली. खेळताना यांनी इतका दंगा,मजा,मस्ती केली की, पाहणाराला वाटावे हेच का ते ध्यान धारणा करणारे सहजयोगी आहेत. इतकी पडापडी होवूनही कोणाला दुखापत झाली नाही हे विशेष.अक्षय मोरेचे खेळ वगैरे संपल्यावर 'लगोरी'वर आगमन झाले. फोनाफोनी झाल्यावर ते फलटणहुन निघाले. आज ट्रिपला जायचंय हेच ते विसरले होते. पण नंतर त्यांनी ट्रिप एन्जॉय केली.
रात्री मटण बिर्याणीचा बेत होता. साताऱ्यातले बशीर भाई खानसामा महाराज मटण बिर्याणी बनविण्यासाठी फेमस आहेत. आज त्यांना खास मटण बिर्याणी तयार करायला 'लगोरी'वर बोलावले होते.त्यामुळे हा बेत तर एकच नंबर झाला.
भल्या सकाळी सहा वाजता आम्ही कास पठारवरील रानफुले, फुलपाखरं पहायला निघालो. पार्किंग नंबर दोनवर गाड्या पार्क केल्या आणि शहाण्यासारखे गेट नंबर चारमधून 'कुमदिनी पुष्प लेकच्या' दिशेने चालायला सुरुवात केली.तिथे एकूण चार गेट आहेत. आमच्यापैकी काहीजण गेट नंबर एक मधून आत गेले. कास पठारची निर्मिती ज्वालामुखीजन्य बसाल्ट खडकापासून झाली आहे. साधारणपणे दहा चौरस किमीच्या खडकाळ पठारावर पावसाळ्यात गवत, फुलझाडे वाढली की साडेआठसे प्रकारची फुले येतात. दोन-तीन महिन्यांचा हा सिझन असतो. सगळी फुले एकाच वेळी येतात असे नाही. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी फुलझाडे वाढतात तशी ती येतात. पाठरावर कुमदिनी,कंदील पुष्प, गवती दवबिंदू, कासा, टूथब्रश ऑर्किड, अंजनी, छोटी/मोठी सोनकी, पांढरा सापकांदा, सीतेची आसवे, इ.अशी शेकडो प्रकारची फुले येतात. इथं फुलांचे गालिछे , ताटवे पाहणे म्हणजे स्वर्गीय आनंद असतो. इथं येणारी काही फुलं तर दुर्मिळ प्रकारची आहेत.पुढं तीन, साडेतीन तास आम्ही फुलांच्या विश्वात विहार करत होतो. काहीजण फुलांचे तर काहीजण स्वतःचे फोटो काढत होते.
'लगोरी'वर जावून मस्त ब्रेकफास्ट केला आणि कोयना धरण जलाशयात नौकाविहार करण्यासाठी बोट क्लब असलेल्या मुनावळे गावी गेलो . बोटीने दीड तासाचा मस्त नौकाविहार सुरु झाला.कोयनेच्या एका तिरावर मुनावळे, बामणोली, शेंबडी, तापोळा ही बोट क्लब असलेली गावे तर दुसऱ्या तिरावर वासोटा किल्ला आणि कोयना अभयारण्य आहे.बोट चालक आम्हाला कोयना-कांदाटी-सोळसी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर घेवून गेला. लांबूनच त्यानं आम्हाला माजी सीएमचे दरे गाव दाखविले. त्यानं आम्हाला एक आगळीवेगळी माहिती दिली आणि कोयना अभयारण्यत असलेले खीरखंडी हे पाच, सहा घरांचे गाव दाखविले. या गावातील काही गावकऱ्यांनी पुनर्वसनास विरोध केला त्यामुळे हे लोक तिथेच वास्तव्यास आहेत.
मुलांसाठी गावात चौथी पर्यंत शाळा आहे. चौथीच्यापुढे मुलांना होडीने रोज अलीकडच्या तिरावरील शाळेत जावे लागते. विशेष म्हणजे या गावात निवडणूक मतदानकेंद्र असते. सध्या या जलाशयात एका पुलाचे काम चालू आहे. हा पुल झाल्यावर सातारा-कोकणातील खेडचे आंतर कमी होणार आहे. पात्रातील क्रिस्टल क्लीअर निळेशार पाणी, किनाऱ्यावर हिरवेगार जंगल,आकाशात ढगांची गर्दी,निसर्गातील शांतता आपल्याला निर्वीचार करते आणि आपण निसर्गाच्या कुशीत प्रेमाची उब अनुभवतो.
'लगोरी'वर परतलो तर मटण,चिकन,फिशचे जेवण तयार होते. सातारकर मित्रांमुळे आमची खाण्याची चंगळ झाली.
संध्याकाळी सातारकरांचे आभार मानून आमचा परतीचा पुणे प्रवास सुरु झाला.प्रवीण जावळकार, विकी परदेशी, संग्राम निम्हण, विनायक हजारे, अमोल मोडक यांच्या कार्स आगे मागेच प्रवास करत होत्या. संग्राम निम्हण यांच्या गाडीत राज, किरण, सुरेश उनेचा यांच्यासह गप्पांच्या ओघात पुणे कधी आले ते समजले पण नाही.
प्रवासात आमची चर्चा सुरु होती आता पुढची एक नंबर ट्रिप कुठे काढायची.
लेखक - योगीराज देवकर, पुणे. 9307133134
No comments:
Post a Comment