Friday, 17 January 2025

मी गणपतीपुळे सेमिनार किचन बोलत आहे.

 मी *गणपतीपुळे सेमिनार किचन 2024* बोलत आहे...


प.पू.श्री माताजी याच कर्त्या, करावीत्या आणि उपभोगत्या आहेत. लाईफ इटरनल ट्रस्ट मुंबई आणि सहजयोगी सर्वश्री प्रवीण जावळकर, गोपी मानकर, आशिष मानकर, गोविंद जाधव, सचिन कोळेकर, अभिजित मुरकुटे,     शंतनू वाघमोडे तसेच किचन कमिटी टीमचे सर्व मेंबर्स माझे केवळ निमित्तमात्र  चालक आणि वाहक आहेत.डायनिंग साठी एक वेगळी सपोर्ट कमिटी असते यात मुंबई, ठाणे, अहिल्यानगर, श्रीरामपूर, इ.येथील सहजयोगी मदतीला असतात. आयत्यावेळी अगदी कोणत्याही राज्यातील सहजयोगी येऊन श्रमदान करतात.


आंतरराष्ट्रीय सहजयोग सेमिनार आणि पूजा मध्ये एका बाजूला असतो आध्यात्मिक उन्नतीचा ज्ञान यज्ञ आणि दुसऱ्या बाजूला असतो  हा अन्न यज्ञ.गणपतीपुळे सेमिनार 2024 मध्ये मी तुमच्या सेवेत होते आणि तिथे पार पडलेला अन्न यज्ञ तुम्ही अनुभवला असेल.बहुतांश सहजयोगी भोजनाचा आस्वाद घेत भोजनाचे कौतुक करतात तेव्हा मला धन्य झाल्यासारखे वाटते.


गणपतीपुळे सेमिनार किचन हे उचलून गेलेल्या लग्नासारखे असते. केवळ प.पू.श्री माताजींचे आशीर्वाद आहेत म्हणून तात्पुरते इन्फ्रास्ट्रकचर उभारूनही माझे हे किचन कर्तव्य सुरळीतपणे पार पडते.


6000 सहजयोग्यांना 5-6 दिवस दररोज वेळेवर चहा, नाष्टा, दोन वेळचे भोजन देणे हे खूप मेहनतीचे काम आहे.खानसामा महाराज आणि त्यांची दीडशे कर्मचाऱ्यांची टीम, सहजयोगी किचन कमिटीची सर्व टीम तुमच्या क्षुधाशांती साठी शब्दश: अहोरात्र झटत असते. म्हणून मी आशा करते की, तुम्ही माझे मनोगत वाचाल आणि ऐकाल 

...


ऑक्टोबर महिन्यात गणपतीपुळे सेमिनार प्री हवन झाले की, माझ्या कमिटीचे मेंबर्स माझ्या जागेची पाहणी करतात. वाढलेले गवत काढणे, जागेची लेवल करणे, कर्मचाऱ्यांच्या संडास, बाथरूमची डागडुजी करणे, मेगा इंडियन किचन आणि डायनिंग,  फॉरेन किचन आणि डायनिंग ,सिनियर सिटीझन डायनिंग ,कर्मचारी आणि कमिटी मेंबर्ससाठी टेन्ट उभारणे,याचा प्लॅन तयार करतात आणि मग प्रत्यक्ष कामाची सुरुवात होते . माझे काम कोण एक केटरर करत नाही तर सहजयोग्यांनी सहजयोग्यांसाठी तयार केलेली ही एक माझी कमिटी असते.


कमिटी मेंबर्स पुण्यात एकामागे एक बऱ्याच मीटिंग घेतात. मिटिंगमध्ये मागील वर्षी आलेल्या फीडबॅकचा विचार करणे, यावर्षीच्या संभाव्य संख्येचा अंदाज घेणे, खर्चाचे बजेट विचारात घेणे,स्वयंपाकी महाराज ठरविणे, मागील वर्षीच्या भोजनाच्या मेनूचा विचार करून यावर्षीचा मेनू ठरविणे, यावर्षीच्या तारखांना कोणते वार आहेत ते पाहणे कारण सेमिनारच्या सुरूवातीला सोडून सुट्ट्या असतील तर एक दिवस आधीच गर्दी होते,अशा लहानसहान गोष्टीवर चर्चा होते.


चहा, कॉफी, डेअरी प्रॉडक्ट्स,भाज्या,नाष्टा व भोजन मेनू, इ. मटेरिअलची यादी तयार केली जाते आणि मग सुरुवात होते ती प्री खरेदी पासून.


चपाती,रोटी,पुरी साठी लागणारा गहू खरेदी केला जातो आणि हे दळण क्वालिटी होण्यासाठी गहू below 40 degree temperature ला दळला जातो. अशा प्रकारे मोठे दळण तयार करणे हे खूप वेळखाऊ काम असते. कच्चा माल खरेदी करून शेंगदाणा चटणी, लोणची आणि भाज्यांसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या ग्रेव्ही तयार करून घेतल्या जातात.


सेमिनार पूर्वी किराणा सामान खरेदी होते, मग ही तयार पिठं, चटण्या, लोणची, रेडिमेड ग्रेव्ही, किराणा सामान, तेल, तूप, इत्यादीचा ट्रक पुण्यात लोड करून गणपतीपुळेला येतो. त्यानंतर नियोजन असते ते लागणाऱ्या ताज्या भाज्या,फळे, दूध, दही, क्रीम, खवा,बर्फ,ब्रेड,अंडी, चिकन, मटण,इ. नाशवंत पदार्थ्यांचे . अशी डेअरी उत्पादने, ताज्या भाज्या जसजशा लागतात तसतशा मागवल्या जातात. किचन मध्ये लागणाऱ्या या गोष्टी रत्नागिरीत मिळत नाहीत म्हणून त्या पुणे, कोल्हापूर वरून मागवाव्या लागतात.


सेमिनारच्या एक आठवडा आधीच volunteers Kitchen   सुरु होते. सर्व कमिट्या विचारात घेता पहिल्या दिवशी पन्नास volunteers पासून सुरु होणारी ही संख्या सेमिनार पूर्वी तीनशे पर्यंत जाते. हे सेमिनार पूर्व Volunteers Kitchen म्हणजे भरपूर काम,धमाल आणि मस्ती असते. अशी ही धमाल Volunteer बनून तुम्ही पण कधीतरी अनुभवा.


किचन कामगारांच्या सुख सोईसाठी माझे बरेच मॅकनाईझेशन झाले आहे. किचन मध्ये भलामोठा डिश वॉशर आहे, पिठ लावायचे मशीन आहे, भाज्या कटिंग मशीन आहे, कच्चा माल व तयार अन्न पदार्थ वाहतुकीसाठी ट्रॉलीज आहेत, पर्मनंट तंदूर तयार केले आहेत,सर्व शेगड्यांना एकसारखा गॅस सप्लाय व्हावा यासाठी गॅस बँक सिस्टिम तयार केली आहे, माझ्या कमिटीला सर्व सहजयोग्यांना चहा पाजण्याची भारी हौस आहे. तुम्ही पाहिलेलेच आहे की, चहाच्या टाक्या आणि चहाची चक्क पाईपलाईन उभारलेली आहे. किती चहा प्यायचा ते तुम्हीच ठरवा. पूर्वी माझ्या ताफ्यात ऑटोमॅटिक चपाती मेकिंग मशीन सुद्धा होते. किचन मध्ये तयार केले जाणारे सर्व पदार्थ hygienic conditions मध्ये तयार केले जातात. किचन स्वच्छ करताना जो राडारोडा पाण्यासोबत वाहून जातो त्याने ड्रेनेज लाईन चोकअप होवू नये म्हणून खास ग्रीस सेपरेटर उभारला आहे. या ग्रीस सेपरेटर मुळे फक्त खराब पाणी ड्रेनेज मधून वाहून जाते  राडारोडा आणि अगदी पाण्यावर तरंगणारे तेल  वाहून जावू नये म्हणून सेपरेट करून गोळा केले जाते आणि या खराब तेल, कचऱ्याची वेस्ट मॅनेजमेंटच्या खड्ड्यात विल्हेवाट लावली जाते. किचन परिसरात असलेले ग्रीस सेपरेटर,डिश वॉशर एरिया,वेस्टेजचा खड्डा, टॉयलेट, बाथरूम यामध्ये दुर्गंधी पसरू नये म्हणून वेळोवेळी केमिकल फवारले जाते. शेवटी वेस्ट मॅनेजमेंटच्या खड्ड्यात तयार झालेले शेंद्रीय खत निर्मला नगरीतील झाडांना टाकले जाते. 


यावर्षी तुम्ही ब्रेकफास्टला शेवयाचा उपमा, ब्रेड-मिसळ, साबुदाणा खिचडी,उपमा आणि चहा, फळे यांची चव चाखली आहे. भोजनासोबतच्या मिठाईत गुलाबजाम, दुधी हलवा,मोहनथाल, आम्रखंड, जिलेबी, शिरा, शेवयाची खीर, मूग हलवा या पदार्थांचा आस्वाद घेतला आहे.  मर्यादित असलेली ही स्वीट डिश कोणी जास्त मागितली तरी देण्यात येत होती. तरी काही सहजयोग्यांना प्रश्न पडतो की, स्वीट डिश रिफील काउंटरवर का नाही दिली जात? आता काय उत्तर द्यायचे अशा प्रश्नाला.भोजनाचा मेनू तर विचारपूर्वक केला जातो. कारण तो तर मेन कोर्स आहे. चपाती, रोटी, पुरी, एक सुकी भाजी, एक रस्सा भाजी, डाळ, भात, कढी, खिचडी, मठ्ठा, मिठाई, चटणी, लोणचं, पापड, फरसाण,इ. फॉरेन किचन मध्ये परदेशी सहजयोग्यांसाठी अंडी, चिकन, मटण, फळे असा बेत असतो. 'ॐ त्वमेव साक्षात श्री अन्नपूर्णा साक्षात श्री आदी शक्ती माताजी श्री निर्मला देवो नमो नमः ', असा मंत्र म्हणून अशी भरलेली थाळी खाऊन तुमचे पोट भरले असेल तरी मन भरले नसेल हे नक्की.


तुम्ही सुज्ञ सहजयोगी आहात. तुम्हाला हे माहित आहे की, हे केवळ भोजन नसून श्री माताजींचा प्रसाद, महाप्रसाद आहे. म्हणूनच तर आपण म्हणतो ना,'अन्न हे पूर्ण ब्रह्म.' पुढे येईल त्या अन्नाचा योग्य तो मान राखला पाहिजे आणि आदराने त्याची चव चाखली पाहिजे. प्रसाद असो की अन्न ते पोटभर खावे पण वाया घालवू नये.


सेमिनारला येणाऱ्या सहजयोग्यांना किचनची आतली बाजू दिसत नाही. त्यांना दिसते ती फक्त बाहेरची बाजू आणि डायनिंग एरिया. तुम्ही लाईन मध्ये येता, प्रसाद घेता आणि बाहेर पडता. 


जेष्ठ सहजयोग्यांच्या सोईसाठी Senior Citizens Dining Hall उभारला जातो. मला माहित आहे इतकी दक्षता घेऊनही काही उणीवा रहात असतील. एकाच वेळी गर्दी केली तर तुम्हाला लाईन मध्ये जास्त वेळ उभे रहावे लागते. कधी कधी गर्दीच्या वेळी Volunteers ना पण प्राधान्याने भोजन मिळत नाही. असं म्हणतात की, दर दहा किलोमीटरवर मसाल्यांची आणि पदार्थांची चव बदलते. त्यामुळे कोणाला काही पदार्थांची चव आवडत नसेल. पण एक लक्षात घ्या सहजयोग हे आपले कुटुंब आहे. तुम्हाला काही उणीव जाणवली तर माझ्या कमिटी मेंबर्सना सांगा. अहो श्री माताजींच्या कृपेत ते तत्पर आहेत माझ्या आणि तुमच्या सेवेला.


सेमिनार संपतो तसं तुम्ही परत फिरता पण इकडे माझी आवराआवर आणि बांधाबांध सुरु होते. उरलेला किराणा माल रिटर्न केला जातो आणि मग हिशेब पूर्ण केले जातात. म्हणजे सेमिनार प्री हवन नंतर सुरु झालेले हे काम सेमिनार नंतर आठवडा भराने संपते. सेमिनार मध्ये किचन म्हणून मी एकटीच नसते तर असे बरेच विभाग आणि कमिट्या कार्यरत असतात ज्या एकमेकांसोबत समन्वय राखून काम करत असतात. 


चला तर मग या आठवणी ताज्या ठेवून मला पुन्हा भेटा किचन 2025 मध्ये.


जय श्री माताजी!

आपले नम्र,

पोटपूजक गणपतीपुळे सेमिनार किचन 2024

शब्दांकन -  योगीराज देवकर.पुणे.


No comments: