Sunday 19 February, 2023

राळेगण, गावाचा वाढदिवस.

 महाराष्ट्रातील सर्व खेड्यांनी राबवावी अशी स्तुत्य संकल्पना - गावाचा वाढदिवस.


राळेगण सिद्धी-ग्रामपरिवर्तन दिवस.


एकदा गावाकऱ्यांनी आण्णा हजारे यांचा वाढदिवस साजरा करायचे ठरविले होते. तेव्हा आण्णांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी गावाचा वाढदिवस साजरा करूया अशी संकल्पना मांडली. आणि मग 2 ऑक्टोबर हा दिवस ठरविण्यात आला.राळेगण मधील या उपक्रमाला आता वीस वर्ष झाली आहेत. यावर्षी अतीवृष्टी मुळे तो दिवस 19 नोव्हेंबर रोजी साजरा झाला. योगायोगाने त्याच दिवशी आण्णांच्या मातोश्री कै.लक्ष्मीबाई हजारे यांचा स्मृती दिनही होता.


दिवसभर रक्तदान शिबीर आणि पद्मश्री डॉ तात्यासाहेब लहाने यांच्या उपस्थितीत मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर पार पडले.


विशेष म्हणजे यादिवशी गावात संध्याकाळी चूल बंद असते आणि सगळ्या ग्रामस्थ आणि उपस्थितांना भोजन दिले जाते, ज्याचा खर्च आण्णा हजारेंच्या पेंशनच्या पैशातून केला जातो. या अभिनव उपक्रमात खालील कल्पना राबविण्यात येतात.

1)ग्राममाता आणि ग्रामपिता चरण पूजन आणि सन्मान- गावात ज्या पुरुषाचे आणि ज्या महिलेचे वय जास्त आहे अशा दोन व्यक्तीची दरवर्षी निवड  केली जाते आणि त्यांचे ग्रामपिता आणि ग्राममाता म्हणून आण्णांच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चरणपूजा करून सन्मान केला जातो.याचा उद्धेश असा आहे कि,गावातील लहान,थोरांना जेष्ठ नागरिकांच्या योगदानाची जाणीव असावी आणि त्यांचा नेहमी आदर केला जावा.

2) गतवर्षात गावात जन्मलेल्या बालकांचा सन्मान - गतवर्षात गावात जी बालके जन्माला आलेली आहेत त्यांचा गावाच्या वतीने अंगडं, टोपडं देऊन सन्मान केला जातो .एकप्रकारे हा मातांचाही सन्मान केल्यासारखेच आहे.याचा उद्धेश असा आहे कि,मुले ही गावाची, देशाची संम्पत्ती आहेत. सन्मानाने गावात त्यांचे स्वागत केले जाते.

3) गतवर्षात गावात ज्या सुना आलेल्या त्यांचा गावाच्या वतीने साडी चोळी देऊन ओटीभरण आणि सन्मान करणे - याचा उद्धेश असा आहे कि,सुन घरात आल्यानंतर तिला जसे घराण्यातील चाळीरिती समजाव्यात,परंपरा आणि संस्कृती कळावी असे वाटते तसेच तिला गावाचा इतिहास आणि संस्कृती कळावी.तिच्या सर्वांशी ओळखी व्हाव्यात.ती गावाची सुन आहे.

4) कर्तृत्ववान नागरिकांचा सत्कार - गावातील ज्या नागरिकांनी ते जिथे असतील तिथे गतवर्षात जर काही विशेष कामगिरी गेली असेल त्यांचा सत्कार केला जातो. याचा उद्धेश असा आहे कि, हे नागरिक गावाचे भूषण आहेत, ते गावाचे नाव मोठं करीत आहेत त्यांची उचित दखल घेणे.यात उद्योजक, अधिकारी,शहरातील नोकरी सोडून गावात परत येऊन शेती करणारा शेतकरी, आधुनिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी, दूध व्यावसायिक, मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळविलेले विद्यार्थी, सैन्यदलात प्रवेश करण्याचे मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक, गावाची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करणारे नागरिक,इ. असे अनेकजण होते.


मी 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान ट्रेनिंगच्या निमित्ताने राळेगण मधेच होतो त्यामुळे या उपक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. मला मनापासून असे वाटते कि महाराष्ट्रातील इतर गावांनीही या संकल्पनेचे अनुकरण करावे.


योगीराज देवकर.

www.motivationacademy.in

No comments: