Sunday 19 February, 2023

वर्गमित्र मेळावा औरंगाबाद

 ऊर्जादायी जुनी मैत्री.

श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर सन 1972 ते 1978 च्या पाचवीच्या पहिल्यावहिल्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे गेटटुगेदर 13 फेब्रुवारी 2013 ला झाले होते. तब्बल 35 वर्षांनी एकावेळी सगळे एकमेकांना भेटत होते.फारच भावुक आणि नॉस्टालजिक दिवस होता तो. गेटटुगेदरची कल्पना सुचल्यानंतर गणेश देशपांडे,सत्यजित गुजर , प्रदीप गारटकर, घनश्याम शहा,पांडुरंग राऊत सगळ्यांनी मनावरच घेतलं होतं की, वर्गातल्या सगळ्यांना जिथं कुठं असतील तिथून शोधून काढायचे. सत्तरच्या दशकात ज्यांचे आई-वडील उजनी धरण प्रकल्पच्या नोकरीत होते ती मुलं,मुली औरंगाबाद,मुंबई,

हैद्राबाद, बेळगाव अशा ठिकाणी गेली होती,नोकरी निमित्त काहीजण पुण्यामुंबईत होते,तर मुली लग्न होऊन कुठे कुठे सासरी गेल्या होत्या. मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका निवृत्त झाले होते आणि त्यातले काही इंदापूर तर काही इतरत्र स्थायिक झाले होते. पण या मित्रांनी सगळ्यांना शोधून काढलेच आणि आमचे गेटटुगेदर जोशात पार पडले. खरंतर मी फक्त पाचवीला एकच वर्ष इंदापूरला होतो.माझं पुढचं सगळं शिक्षण पुण्यात झाले. इथे नवीन मित्रवर्ग निर्माण झाला. पण जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे बालपणीच्या मित्रांचे खास वेगळेच स्थान असते. गेटटुगेदरचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला की आमचा 'मधली सुट्टी ' या आगळ्यावेगळ्या नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार झाला. पुढे सत्यजित गुजरने थेऊरला आणि प्रमिला जाधवने कुंभरगाव -भिगवणला गेटटुगेदर ऑर्गनाईज केले होते. तेव्हा आयोजकांच्या यथायोग्य आदरातिथ्य आणि पाहुणचारासोबत थेऊरच्या गणपतीच्या दर्शनाचा आणि कुंभरगावला उजनी जलाशयात फ्लेमिंगो पक्षी निरीक्षणचा आनंद घेतला होता.


मध्यंतरी मित्र -मैत्रिणींच्या मुला -मुलींची लग्न झाली तेव्हा या भेटीगाठी होत राहिल्या.


21 आणि 22 जानेवारी 2023 ला म्हणजे नुकतच आमचं पहिलं निवासी गेटटुगेदर औरंगाबादला साजरे झाले. आयोजनाची पूर्ण जबाबदारी सत्यजित व स्वाती गुजर आणि डॉ सविता व डॉ मिलिंद पटवर्धन या उभायतांनी घेतली होती.


20 जानेवारीला रात्रीच नियोजनानुसार तिसजण औरंगाबादला पोहोचले. सत्यजित गुजर हा सध्या औरंगाबाद विभागाचा मुख्य वन संरक्षक आहे. त्याने गेस्टहाऊस आणि बंगल्यात सर्वांची निवासाची सोय केली होती. सकाळी नाष्ट्यापासून ते रात्री भोजनापर्यंत खानसामा दिमतीला होता. मग काय ग्रुपच्या गप्पा आणि मज्जा .


पहिल्या दिवशी सकाळी आम्ही घृषणेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो . स्वागताला वन विभागाचे अधिकारी हजर होते. सरळ सगळे मंदिराच्या कार्यालयात गेलो.  मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांची प्राधान्याने दर्शनाची सोय केली. शनिवार,गर्दी असूनही आम्हाला महादेवाचे व्हीआयपी दर्शन घडले. त्यानंतर वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेलो. तिथं गाईड कचरू जाधव आमची वाट पहात उभा होता. त्यांच्या विनोदी, हजरजबाबी आणि तितक्याच अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखाली आम्ही कैलास लेणी पाहण्याचा आनंद लुटला. तिथून चालतच आम्ही महादेव वनात गेलो. बारा जोतिर्लिंगापैकी पाच जोतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. युती सरकारने प्रत्येक जोतिर्लिंगाच्या ठिकाणी महादेवाला आवडणाऱ्या वृक्षांचे वन निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. घृषणेश्वर मंदिर परीसरात सदर महादेव वन निर्माण करण्यात आरएफओ सत्यजित गुजरचे मोठे योगदान आहे. साडेबारा एकरात फुललेल्या नंदनवनात विविध प्रकारचे बेल,रुद्राक्ष,चाफा,अर्जुन सादळा अशा अनेक प्रकारचे वृक्ष पाहताना 

सगळ्यांनाच सत्यजितचा अभिमान वाटत होता. औरंगाबादला परतलो तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. जेवणानंतर तासाभराच्या आंतराने हुरडापार्टी सुरु झाली. एरवी कृषी पर्यटनात हुरडा पार्टी करणारी टीमच सत्यजितने कामाला लावली होती. हुरड्याच्या सोबतीला तीन प्रकारच्या चटण्या आणि आकटीत भाजलेली बेबी कॉर्नची चविष्ठ कणसे पण होती. आकटीच्या शेजारीच लॉनवर गोलाकार खुर्च्या मांडून बसलो मग काय योगीराज देवकरने मनोरंजक खेळांनी सुरुवात केली.सत्यजित गुजरच्या ऍक्टिव्हिटीज् नी सर्वांची मने जिंकली.गणेश देशपांडेने तर तो बॅचलर असताना सत्यजित आणि सविताने त्याला लिहलेल्या पत्रांचे वाचन करून मैत्रीच्या खोलीला उजाळा दिला. मग सविताने पण तिच्याकडील पत्रांचा खजिना काढला आणि काही शिक्षकांची पत्रे वाचून दाखविण्याची विनंती सत्यजितला केली कारण तिला स्वतःला फारच गहिवरून आले होते .श्रीकांत जोशीने बहारदार गायन करून अजूनही मी स्कूल मध्ये होतो तसाच छान गाणी गातो याची प्रचिती दिली. खरी मजा आणली ती पांडुरंग आणि पुष्पा राऊत या पती-पत्नीच्या विनोदांच्या जुगल बंदीने. बालपणीच्या कविता गायन, गाण्याच्या भेंड्या, पासिंग दी बॉल आणि शिक्षा सारख्या खेळांनी रात्रीचे नऊ कधी वाजले ते समजले नाही. हुरड्यानंतर मग रात्री नावाला जेवण आणि भरपेट गप्पा झाल्या.


दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता आम्ही दौलताबाद किल्याच्या पार्किंगला होतो. गाईडच्या मार्गदर्शनाखाली किल्ला पहायला चार तास लागले.वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना पाहताना सगळे आश्चर्यचकित झाले होते.256 एकरांना सुरक्षा भिंत,नागमोडी वळणावरील सात भव्य प्रवेशद्वारे,

पाण्याची व्यवस्था,वॉच टॉवर,खंदक, मेंढा तोफ,भुयारी मार्गातील भुलभूलय्या,निवास आणि मंदिराचे बांधकाम, दुर्गा तोफ असा हा अभेद्य किल्ला तोही मित्रांसोबत पाहणं एक अल्हाददायक अनुभव होता. सगळेजण भुलभूलय्या पार करून वरच्या टप्प्यावर आले खरे पण वेडात दौडलेले फक्त सातच वीर सत्यजित, योगीराज, गणेश, गौतम, रमेश, प्रदीप आणि अर्जुन दुर्गा तोफे पर्यंत पोहोचले. त्यानंतर आम्ही पैठण रोडवर सविताच्या घरी गेलो. तिच्या कॉलनीच्या शेजारीच वाल्मि संस्थेचे कॅम्पस आहे. निसर्गरम्य परिसरात तिचे घर पाहताना खूप छान वाटले. त्यानंतर वाटेत MCED  संस्थेला भेट देऊन  पुन्हा वन विभागाच्या बंगल्यावर पोहोचलो तर खानसामाने पुरणपोळीचा बेत केला होता. खानसामाची पत्नी,आई उत्तम सुगरण आहेत. जेवणानंतर त्यांचे कौतुक केले तर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.जेवणानंतर औरंगाबादच्या तारा पान सेन्टर मधील मगई पानाचा आस्वाद घेतला.


जेवणानंतर गेटटुगेदरच्या समारोपासाठी आम्ही एकत्र बसलो. यात गौतम गुणाजी बेळगांवहुन तर दयानंद काद्रे हैद्राबाद हुन आले होते.त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. उद्योग व्यवसायामुळे बिझी असलेले अविनाश जोशी, संजय सावंत थोडा वेळ का होईना पण गेटटुगेदरला हजेरी लावून गेले. प्रदीप गारटकरची मात्र उणीव भासली.एकएक करून सगळे बोलायला लागले तर सत्यजित म्हणे, " मला सेंडऑफचा फील देऊ नका." पण खरंच सत्यजित, स्वाती आणि सविता, मिलिंद या चौघांनी हे गेटटुगेदर यशस्वी करायला फार मेहनत घेतली. त्यांच्या एनर्जीला सगळ्यांनी दाद दिली. त्यांनी प्रत्येकाकडून जोडीचे फोटो मागविले होते आणि स्कूलच्या इमारतीचा फोटो पण मिळविला होता. स्कूलची इमारत आणि जोडीचा फोटो 'मग' वर छापून प्रत्येकाला भेट द्यायची नावीन्यपूर्ण कल्पना त्यांनी राबविली. समारोपात बोलताना प्रमिला जाधव, प्रशांत कुलकर्णी, संजीवनी यांना अश्रू अनावर झाले होते. तर गौतम गुणाजी, सविता पटवर्धन, गणेश देशपांडे, उज्वला अर्णिकर फारच भावुक झाले होते.घनश्याम शहा,अर्जुन ठोंबरे,राजेंद्र आणि रमेश देवकर, प्रदीप शहा,यांच्या सुंदर सहभागामुळे गेटटुगेदरची रंगत वाढली.

या गेटटुगेदरचे वेगळेपण म्हणजे सगळे मित्र आणि मैत्रिणी जोडीने आल्यामुळे मित्रांच्या बायका आणि मैत्रिणींचे नवरे सगळ्यांचीच एकमेकांशी मैत्री वाढायला मदत झाली. आयोजकांचे, वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे, खानसामाचे आभार मानून पुन्हा लवकरच भेटू असे ठरवून संध्याकाळी सगळे आपापल्या ठिकाणी मार्गस्थ झाले.


आयुष्यात बालपण, शिक्षण, नोकरी, व्यवसाय,प्रोफेशन, छंद, प्रवास,अशा विविध टप्प्यावर लोकं भेटतात परंतु केवळ बालपण आणि शिक्षणाच्या वेळी भेटलेले मित्रच निःस्वार्थ, निखळ, स्वच्छ मैत्री करतात आणि जपतात असा बहुतेकांचा अनुभव असावा.

म्हणूनच जुनी मैत्री खरीखुरी आणि ऊर्जादायी असते.


योगीराज देवकर.

लेखक, प्रेरक, प्रशिक्षक.

www.motivationacademy.in

No comments: