Monday 4 October, 2021

चैतन्य इंगळे, डोअरमोझो

 कोरोना योद्धा :

*डोअरमोजो*


Saturday Club Global Trust(SCGT) वाकड चाप्टर. सक्सेस स्टोरी क्रमांक पाच.

Business Category: Pest control & sanitization.


श्री चैतन्य इंगळे यांची ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यातच  दमछाक झाली होती. खरंतर ज्यांना शिक्षण अवघड जाते,ज्यांची परिस्थिती प्रतिकूल असते, असेच विद्यार्थी पुढे जीवनाच्या परीक्षेत पास होतात. मिळेल ते काम करायचे या प्रयत्नातून त्यांनी यशदामध्ये करार पद्धतीने स्वागत कक्षातील नोकरी मिळविली. नोकरीला समांतर केटरिंग डिप्लोमा ,एम ए चे शिक्षण चालू ठेवले आणि यशदातच त्यांनी स्वच्छता, केटरिंग, मेंटेनन्स विभागात लक्ष घालून अनुभव पण मिळविला.


आयुष्यात घडणारा सकारात्मक किंवा नकारात्मक आघात आयुष्याला कलाटणी देऊन जातो. चैतन्यच्या बाबतीतही तसेच घडले. एकदा एका वरिष्ठ पर्यवेक्षकाने चैतन्यची काही चुक नसताना अपमानकारक भाषा वापरली. या आघाताने त्यांनी पुढच्या पाच मिनिटात नोकरीचा राजीनामा दिला.


आता जे काही करायचे ते स्वतःचा आणि घरच्यांचा स्वाभिमान,अभिमान वाढविणारेच असेल अशा इराद्याने त्यांनी पुढील वाटचाल सुरू केली. यशदात वेगवेगळ्या विभागात लक्ष दिल्यामुळे त्यांना कदाचित स्वच्छता या विषयात करिअर होऊ शकते असे वाटले असावे . समोर प्रश्नांचा डोंगर तर होताच परंतु न डगमगता त्यांनी झाडू,खराटा,फिनेल आणि बादली घेऊन लोकांची घरे साफसफाई करण्याच्या कामास सुरुवात केली. ग्रॅज्युएट मुलगा हे काम करू लागल्यामुळे मित्र ,नातेवाईक त्यांना हसत होते पण चैतन्यला मात्र या कामात वाव आणि भविष्य दिसत होते.


त्यांनी वर्धस ग्रुपची स्थापना केली . कष्ट,ओळखी, माऊथ पब्लिसिटी यामुळे कामे मिळत होती. आता कुठे व्यवसायाची गाडी रुळावर येत होती अशा काळात त्यांना ऐन तारुण्यात  हार्ट अटॅक आला. हॉस्पिटलचे सगळे उपचार पार पडले. वेदना असल्या की मन भावनात्मक होते. हॉस्पिटलायझेशनच्या काळातच त्यांच्यात समाज उपयोगी कामाची बीजे रोवली गेली आणि त्यांनी युनायटेड मराठा ऑर्गनायझेशनच्या कामास सुरुवात केली. यामाध्यमातून त्यांनी अनेकांना उद्योजक बनविले.


वर्धस ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छता, सुरक्षा सेवा, होम क्लीनिंग अशा सेवा पुरविल्या जातात. यातून १८०० लोकांना करार पद्धतीने रोजगार उपलब्ध झाला.


सदर सर्व चालू असतानाच ग्राहक पेस्ट कंट्रोल आणि इतर सेवांची मागणी करत होते. यातूनच पुढे ५ मे २०१८ रोजी डोअरमोजोचा जन्म झाला. ( *92 3007 3007*)


आजपर्यंत श्री चैतन्य इंगळे यांना विविध संस्थांकडून गौरविण्यात आले आहे. यासंपर्कातूनच लोक त्यांना राज्यभर मार्गदर्शनासाठी बोलावू लागले. यामाध्यमातून त्यांना महाराष्ट्रात तीस हजारपेक्षा जास्त युवकांना उद्योगाचे मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली.


जब जब जो जो होना हैं ।

तब तब तो तो होता हैं ।

मार्च २०२० मध्ये भारतात कोरोनात वाढ झाली आणि सगळी समिकरणेच बदलली.

कोरोनामुळे एकाबाजूला वर्धस ग्रुपच्या व्यवसायात ८०% घट झाली आणि १५०० करार पध्दतीच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली. लॉक डाउनच्या काळात बिलिंग थांबले होते पण कर्मचाऱ्यांचे पगार चालू होते. कर्मचारी जीवाचा धोका पत्करून काम करत होते. दुसऱ्या लाटेत घरातल्या चौघांना कोरोना झाला होता. स्वतः जगतोय का मरतोय अशी भीतीदायक परिस्थिती अनुभवली आणि कोरोनाला हरवून परत आलो. पण ८०% आय टी आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसाय बंद झाला तो दीड वर्षानंतरही पुन्हा पूर्ववत झालेला नाही. 


दुसऱ्याबाजूला डोअरमोजोच्या व्यवसायात २५० ते ३०० टक्के वाढ झाली. डोअरमोजोतुन ते पेस्ट कंट्रोलची सेवा देत होते. कोरोनामुळे सॅनीटायझेशन हा शब्द नव्याने वापरात आला. याचा इतका मोठा बिझनेस होईल याचा चैतन्यने विचारही केला नव्हता. पण या कल्पनाही न केलेल्या व्यवसायाने त्यांना प्रचंड काम,नाव आणि पैसे मिळवून दिले. सॅनीटायझेशनची गरज ओळखून त्यांनी सात लाख रुपये गुंतवणूक करून तुर्की वरून नऊ Ultra Low Volume Misting Machines दीड महिन्यात आयात केल्या. त्यानंतर श्री चैतन्य आणि त्यांच्या १० जणांच्या टीमचे कोरोना विरुद्धचे युद्ध सुरू झाले. गेल्या दीड वर्षात त्यांनी 24×7 सेवा देऊन १२००० पेक्षा जास्त पुणे आणि मुंबईत घरे,ऑफिसेस,बँका, दवाखाने, हॉस्पिटल्स,  कंपन्या,कार्पोरेट्स,अपार्टमेंस, सोसायट्या,इ. ठिकाणी सॅनीटाइज केल्या आहेत आणि विक्रमी काम करून लाखो रुपयांचा व्यवसाय केलेला आहे . यातील १०% व्यवसाय SCGT च्या नेटवर्क मधून झालेला आहे असे ते सांगतात.

सुदैवाने दहापैकी कोणालाही कोरोना झाला नाही. अर्थात कर्मचाऱ्यांची PPE किट वापरात होते आणि सर्व नियमांची काटेकोरपणे पालन करीत होते. खरंतर या कर्मचाऱ्यांच्या धाडसाला दाद द्यायला हवी आणि त्यांचे कौतुकही करायला हवे.


कोणतेही काम छोटे किंवा मोठे , चांगले किंवा वाईट नसते. मिळेल ते काम जर उत्कृष्ट तऱ्हेने केले तर दोन पैकी एक परिणाम होतोच. एकतर तुमच्यामुळे त्या कामाला प्रतिष्ठा मिळेल किंवा त्या कामामुळे तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. श्री चैतन्य इंगळे असे सांगतात की,"खरंतर मानव जातीवर असले महामारीचे संकट पुन्हा येऊ नये. पण या संकटाच्या काळात आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली ही मोठी समाधानाची बाब आहे." कोरोनासारख्या या महामारीच्या काळात श्री चैतन्य आणि टीमने केलेले कार्य योध्या सारखे आहे त्यांना दोन्ही हात जोडून प्रणाम. 


प्रेरक,प्रशिक्षक,कथा लेखक-

योगीराज देवकर.

SCGT वाकड चाप्टर,सेक्रेटरी.

मो.9307133134

www.motivationacademy.in

No comments: