उत्तुंग दुबई
आयुष्यात अनेकदा अचानक आनंददायक वळणे येत असतात, असे पण नव्हते की,दुबई आमच्या विश लिस्ट वर होते ,पण अमेयमुळे आम्हाला हा जपान सिंगापूर,युरोप ट्रिप नंतर आता दुबई प्रवासाचा योग आला .
अमेयची टोकियो, जपान येथून दुबई, यूएई येथे बदली झाली आणि अमेय–रुचिरा यांनी दुबई मरिना एरियात घर केले . लगेचच त्यांनी आम्हाला आग्रहाने बोलावून घेतले. जरी आम्ही टुरिस्ट व्हिसावर आलो असलो, तरी यावेळी पर्यटन हा आमचा मुख्य अजेंडा नव्हता. कारण एक आनंदाची, हळवी बातमी—सुनबाईंकडे गुड न्यूज आहे आणि अमेयचे ऑफिस पण सुरू असणार होते. त्यामुळे ' मुलांबरोबर वेळ घालवणे,मुलांचा चाललेला सुखी संसार पाहणे' , हाच आमचा एकमेव विचार होता.
पण तरुणाईची हौस आणि प्रेमळ हट्ट—मुलांनी आम्हाला दुबई दाखवायचीच ठरवले होते आणि मग सुरू झाला अनुभव उत्तुंग दुबईचा .
दुबई म्हणजे केवळ एक शहर नाही, तर मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम
राजाच्या आणि अनेक प्रसिद्ध वास्तुकारांच्या कल्पनाशक्तीने उभारलेले भव्य स्वप्न आहे.बुर्ज खलिफा - जगातली सर्वात उंच निवासी इमारत, ऐन दुबई - जगातील सर्वात मोठे जाइंट व्हील,दुबई मॉल - जगातला सर्वात मोठा मॉल,पाम जुमेराह - जगातील सर्वात मोठे मानवनिर्मित बेटं,दुबई एअरपोर्ट - जगातील सर्वात मोठे एअरपोर्ट उभारले जात आहे ,जगातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित वर्ल्ड आयलंडची उभारणी सुरू आहे , प्रशस्त रस्ते आणि रात्री लखलखणारा प्रकाशाचा झगमगाट—सगळेच थक्क करणारे आहे. बरं ही उत्तुंग प्रगती म्हणाल तर तीस ,पस्तीस वर्षातील आहे. त्याआधी तर दुबई मासेमारी, मोती,बंदरे,सोन्याचा व्यापार आणि खनिज तेल यासाठी ओळखले जात होते.
बर दुबई , मिरॅकल गार्डन,पाम आयलंड वरील अटलांटिस आणि रॉयल अटलांटिस हॉटेल्स , मरिना, जुमेराह बीच —ही ठिकाणे पाहताना प्रत्येक वेळी ' मानव किती अद्भुत
गोष्टी साकारू शकतो ', याची जाणीव होत राहिते. दुबई फ्रेम, म्युझियम ऑफ द फ्युचर , बुर्ज अल अरब या वास्तू तर शेख झायद रोडवरून ये–जा करताना सतत नजरेत भरत होत्या—भविष्यात डोकावल्यासारखेच. बुर्ज खलिफा तर जवळपास शहरातल्या कोणत्याही भागातून दहा किलोमीटर वरूनच दिसायला लागतो . एव्हढ्या लवकर आपल्याला फ्रेम नको म्हणून मला तर अजिबात फ्रेम पहायला जायचे नव्हते.
एखादी ट्रिप लहानातून सुरू करून टॉपला कशी घेऊन जायची ते या मुलांकडून शिकावे.सुरुवातीला मरिना एरियात पायी फेरफटका मारणे, मॉल मध्ये जाणे सुरू झाले आणि शेवटच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता आम्ही बुर्ज खलिफा इमारतीच्या १२३/२४ व्या मजल्यावर पोहोचलो. बुर्ज खलिफा १६३ मजली उंच आहे. तिथे १२३/२४/४९ मजल्यावर observation deck आहेत.गेले तीन आठवडे जी ठिकाणे आम्ही त्यात्या ठिकाणी जाऊन पाहिली होती ती ठिकाणे आम्ही आता बुर्ज खलिफा वरून पहात होतो. जगातील सर्वात वेगवान लिफ्ट बुर्ज खलिफा इमारतीत आहेत. १२३ व्या
मजल्यावर आम्ही एक मिनिटात पोहोचलो. दुबईतील इमारतींची भव्यता,उंची,डिझाईन्स, इलेव्हेशन्स,नावीन्यपूर्ण असल्यामुळे पाहण्यासारखे आहेत.
दुबई म्हणजे मॉल कल्चर.
Ibn Battuta Mall, Gold Souk, Spice Souk, Al Fahidi, LuLu Hypermarket, Dubai Mall, Zabil Mall, Mall of the Emirates, Festival City Mall, Souk Madinat Jumeirah — असे अनेक मॉल या शहरात आहेत. प्रत्येक मॉल वेगळ्या संकल्पनेने सजलेला, पण माणसाच्या गरजांपेक्षा इच्छा, हौशीला अधिक खतपाणी घालणारा. इच्छेला मर्यादा नाही आणि हौसेला मोल नाही असे म्हणतात. कमकुवत मानसिकतेच्या श्रीमंत माणसाने मॉल मध्ये खरेदीसाठी न गेलेलेच बरे, अशी माणसे मॉलचा तत्काळ बळी ठरतात .माणूस आत जातो गरजेची एक वस्तू घ्यायला आणि पाच,दहा अनिवार्य नसलेल्या वस्तू खरेदी करून घेऊन येतो .
' अरेबियन टी हाऊस ' मध्ये घेतलेले पारंपरिक अरेबियन जेवण, हाफिज मुस्तफा येथील स्वीट - तो स्वाद, तो सुगंध - आठवणीत ताजा आहे. प्रत्येक मॉल मध्ये हवे तितके फूड कोर्ट आहेत. एका मॉल मध्ये तर आम्हाला चक्क तांबडा,पांढरा रस्सा - कोल्हापुरी थाळी जेवण मिळाले . इथे एक चांगले आहे,इथे भरपूर भारतीय राहतात,भारतीय भाजीपाला, किराणा, खाद्यपदार्थ आणि सोयी सुविधा सर्वत्र उपलब्ध आहेत. यामुळे मुलांना महाराष्ट्राची ,भारताची आठवण होईल असे वाटत नाही.
पण या भौतिक वैभवाइतकेच मला मनाला स्पर्शून गेले ते म्हणजे दुबईतील सहजयोग सेंटर .
दुबईमध्ये सहजयोगाचे साप्ताहिक ध्यान केंद्र आहे आणि अडीचशेहून अधिक सहजयोग्यांची सामूहिकता आहे—एक व्हायब्रंट सेंटर. श्री धनंजय धुमाळ यांची म्युझिकल इव्हिनिंग आणि इन्स्ट्रुमेंटल कार्यक्रम झाला,पब्लिक प्रोग्राम , श्री शक्तीधरण भैय्या यांचे सुरेल बासरी वादन झाले , नियमित ध्यान—सगळे काही चालू असते. सेंटरला तीन रविवारी सामूहिक ध्यानाचा योग आला आणि परदेशात असूनही ' भारतीय आध्यात्मिक संस्कृतीचा ' अनुभव आला . बाह्य भौतिक उंचीपेक्षा आंतरिक आध्यात्मिक उंची किती महत्त्वाची आहे, याची प्रचिती तिथे आली.
मला विशेष भावले ते मुलांकडील दमाक हाईट्स या भव्य इमारतीतील आमचे वास्तव्य आणि मरिना एरिया . मरिनामध्ये सकाळी - संध्याकाळी फेरफटका मारताना समुद्र, गगनचुंबी इमारती आणि शांत चालणारे लोक—पाहिले की ,मन अगदी निवांत होतं. त्या चित्रपटासारख्या दिसणाऱ्या परिसरात वॉकमध्ये वेळ कसा निघून जात होता, तेच कळत नव्हते .
अमेय–रुचिरा परदेशात राहतात. त्यामुळे त्यांचा सहवास आम्हाला फारसा लाभत नाही. ते भारतात येणं किंवा आम्ही त्यांच्याकडे जाणं—ही आमच्यासाठी पर्वणीच .
या प्रवासाने केवळ दुबई शहर पाहायला मिळाले असे नाही, तर मुलांबरोबर जगायला, त्यांचे दैनंदिन जीवन,संसार ,अनुभवायला आणि अमेयची नवीन जबाबदारी समजून घ्यायला मिळाली.
दुबई मला फक्त उंच इमारतींमुळे उत्तुंग वाटली नाही, तर दुबईत असूनही मुलांना भेटलेल्या सहजयोग सामुहिकतेमधील मैत्री, नात्यांच्या उंचीमुळे, प्रेमाच्या उबेमुळे आणि अनुभवामुळे उत्तुंग वाटली.
श्री माताजींच्या कृपेत मुलं आनंदात आहेत,प्रगती करीत आहेत,आमचे चौकोनी कुटुंब आता पंचकोनी होणार आहे ,हे पाहून मनोमन आनंद झाला.
योगीराज देवकर.😊
No comments:
Post a Comment