श्री बलभीमराव नारायणराव जाधव - एक प्रसन्न आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व.
श्री बलभीमराव नारायणराव जाधव यांचा जन्म २३ मार्च १९४४ रोजी वरकुटे बुद्रुक , ता. इंदापूर, जि.पुणे, महाराष्ट्र येथे शेतकरी कुटुंबात झाला. बलभीमराव यांचे वडील नारायणराव जाधव यांच्या पहिल्या पत्नीचे माहेरचे आडनाव देवकर होते आणि त्या वरकुटे याच गावातील होत्या .त्यांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या. पहिली पत्नी वारल्यानंतर काही कालावधीने नारायणराव जाधव यांनी दुसरे लग्न केले . दुसऱ्या पत्नीचे नाव सुंदराबाई . त्यांच्या माहेरचे आडनाव शिंदे आणि गाव कुंभेज, ता.करमाळा असे होते . सुंदराबाई यांना तीन मुले आणि चार मुली झाल्या. या भावंडांमधील बलभीमराव हे सात नंबरचे मूल, घरातले शेवटचे मुल म्हणजे शेंडेफळ . बलभीमराव चार- पाच वर्षाचे असतानाच दुर्दैवाचे त्यांचे वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे वडील त्यांना जेमतेम आठवतात. आई सुंदराबाई यांचेही निधन झालेले आहे.
आईची साथ आणि शिकवण मात्र त्यांना आयुष्यभर मोलाची ठरली आहे. आई सुंदराबाई त्यांना नेहमी सांगायच्या ,"खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही,गरिबी असली तरी स्वाभिमानाने रहायचे , हावरेपणा करायचा नाही, कोणी जेवत असेल आणि त्याने जेवतो का विचारले तर जेवला नसला तरी पोटावर हात फिरवून जेवलो आहे असे म्हणायचे ,आपण समाधानी आहोत असे वागायचे ."
आज या सावत्र आणि सख्ख्या दहा भावंडांपैकी फक्त एक बहिण हयात आहे . या दहा जणांची काही मुले वारली आहेत. उर्वरित मुलं,नातवंडे असा भला मोठा परिवार गुण्यागोविंदाने नांदत आहे.
आज वयाची ८१ वर्षे पूर्ण करून आयुष्यात सहस्त्रचंद्र दर्शन झाले आहे. आयुष्याचे सिंहावलोकन करताना, जीवनाचा प्रवास आठवताना लहानपणीची गरिबी, योगायोगाने भेटलेली चांगली माणसे, आयुष्यात आपण काहीतरी चांगले करून दाखवायचे ही भावना, आयुष्याने दिलेल्या संधी , आयुष्यात कष्टाने मिळविलेले यश, पत्नीची लाभलेली साथ आणि तिचं अकाली निघून जाणं , एका जावयाचे आजारपण आणि निघून जाणे, हे सगळं आठवताना त्यांच्या मनात संमिश्र भावना उमटत आहेत.
जाधव कुटुंबाकडे पन्नास एकर जमिन होती पण दोन एकर विहीर बागायत वगळता सगळी जमीन जिरायत होती.कुटुंबाचे शेती हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते. बलभीमराव यांचे लहानपण गरिबीत गेले. जेव्हा त्यांचे शाळेत जायचे वय होते त्याचदरम्यान महाराष्ट्रात १९५२ सालचा दुष्काळ पडला होता. सगळं कुटुंब करमाळा तालुक्यातील मांगी या गावी तलावाच्या कामासाठी स्थलांतरित झाले. तेव्हा बालमजूर वगैरे असा काही प्रकार नव्हता. त्यामुळे कुटुंबातील सर्वांना रोजगार मिळाला खरा ,पण बलभीमराव यांचे शिक्षण, शाळा दुष्काळ संपल्यानंतर गावी परतल्यावर वयाच्या तुलनेने उशिरा सुरू झाले . त्यांचे तिसरीपर्यंत शिक्षण झाले होते तोच घरच्यांनी गुरे राखण्यासाठी त्यांची शाळा बंद केली . झालं आता ते गुरे
हाकू- राकू लागले. गावातली त्यांच्या वयाची मुले शाळेत जात आहेत आणि आपल्याला मात्र गुरे राखावी लागत आहेत यामुळे त्यांना फार वाईट वाटायचे . त्यांना पण शाळा शिकायची होती, हे असले जीवन जगायचे नव्हते. एकदा ते शेतात मातीत खेळत होते. देव असतो आणि तो आपले म्हणणे ऐकतो असे त्यांनी आई कडून ऐकले होते . त्यांनी दोन्ही हात आकाशाकडे केले आणि देवाला कळवळून प्रार्थना केली ," हे देवा ,तू जर असशील तर ,काय पण कर ,पण मला शिकायला शाळेत पाठव ."
पुढे झाले असे की,वरकुटे गावच्या शाळेत पाचवीचा वर्ग सुरू करायचा होता. त्यांना पटसंख्या कमी पडत होती . म्हणून त्यांनी बलभीमरावला आग्रह केला . तुला आम्ही चौथीच्या परीक्षेला बसवितो आणि पास झाला की,पाचवीच्या वर्गात घेतो . तू अभ्यास करून चौथीची परीक्षा दे . यांनी परीक्षा दिली,पास झाले आणि यांना पाचवीच्या वर्गात घेतले गेले . त्यांच्या मोठ्या भावाला मात्र वाटायचे हा जर शाळेत गेला तर गुरे कोण राखणार . पण अशा अडीअडचणीवर मात करत ते इंदापूर केंद्रावर सातवीची परीक्षा देऊन पास झाले. तेव्हा सातवी,अकरावीच्या परीक्षा बोर्ड घेत असे.
मनमाडचे श्री तात्या काटे हे बलभीमराव यांच्या बहिणीचे पती म्हणजेच त्यांचे मेहुणे होते. चाळीसगावचे श्री भिकन गायकवाड हा काटे यांचा भाचा . हे दोघे पाहुणे वरकुट्याला आले होते. त्यांनी पाहिले बलभीमराव हा हुशार मुलगा आहे,तो जर इथेच राहिला तर त्याचे शिक्षण होणार नाही आणि त्यांनीच यांना शिक्षणासाठी म्हणून मनमाडला नेले. मनमाडच्या शाळेत श्री तमा धारवाडकर नावाचे शिक्षक होते. त्यांनी खरे तर बलभिमराव यांच्या शिक्षणाला आणि जीवनाला दिशा दिली. इकडे गावाकडे सगळे मागे लागले होते ,तू परत ये ,इथे तुला तलाटी,ग्रामसेवकांची नोकरी मिळेल. बलभीमराव यांना मात्र शिकायचे होते.
हा प्रकार जेव्हा धारवाडकर गुरुजींना समजला तेव्हा ते म्हणाले ,"शिक्षण अर्धवट सोडून अजिबात गावाकडे परत जायचे नाही, घरातल्यांनी नाही शिकविले तर मी तुझा शिक्षणाचा खर्च करेल ." आणि त्यांनी खर्च केलाही. पुढे मधवे भाऊ नोकरीला लागले होते,ते पैसे पाठवत होते.मनमाडला गुरुजींचा बंगला होता , त्यांचे कुटुंब त्यांच्या मूळ गावी रहात होते ,त्यामुळे बंगल्यात ते एकटेच रहायचे , त्यानंतर त्यांनी यांची बंगल्यावर अभ्यासाची ,रहायची सोय केली . बलभीमराव यांचे आठवी ते दहावीचे शिक्षण मनमाडला झाले. गुरुजींनीच यांना सुचविले आणि आयटीआय औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर येथे प्रवेश मिळवून दिला . बलभीमराव आयटीआय फिटर ट्रेड पास झाले आणि औरंगाबादलाच एका कारखान्यात सहा महिने एप्रेंटिस जॉब केला .
हुशार आणि प्रामाणिक असल्यामुळे बलभीमराव धारवाडकर गुरुजींचा आवडता विद्यार्थी होते . धारवाडकर यांनी बलभीमराव यांना नोकरी साठी मुंबईला पाठविले. प्रेस कॉस्ट इंजिनिअरिंग ,कांदिवली येथे त्यांची नोकरी सुरू झाली. पण ते रहायचे कल्याणला . थोडे महिने कल्याण - कांदिवली - कल्याण केले पण यात जाण्या-येण्यात फार वेळ जायचा . श्री धारवाडकर याचे मेहुणे श्री मोनकर दादा हे आई ,वडील,तीन मुलं आणि एका मुलीसह माहीमला छोट्याशा जागेत रहात असत. ती जागा खरंतर त्यांनाच राहायला अपुरी आणि गैरसोयीची होती . धारवाडकर यांनी मोनकरांना विनंती केली याची तुमच्याकडे रहायची सोय करावी . श्री मोनकर फार मोठ्या मनाचा माणूस . त्यांनी बलभिमरावला घर आणि वस्तुस्थिती दाखवली आणि तुझी रहायची सोय करतो पण तुला व्हरांड्यात झोपावे लागेल असे सांगितले . मुंबई सारख्या महानगरात असा आसरा मिळणे आणि तोही माहिमाला
ही मोठीच गोष्ट होती . बलभीमराव तयार झाले . इथे ते एक वर्ष राहिले . श्री व सौ मोनकर फारच प्रेमळ आणि माणुसकी जपणारे लोक आहेत. बलभीमराव यांना नोकरी असल्यामुळे पगार मिळत होता ,त्यामुळे जवळच त्यांनी मेस लावली होती पण हळूहळू काकूंनी नाश्ता बनव ,जेवण बनव,डब्बा बनव करत यांची जेवणाची सर्व सोय पण केली. बलभीमराव आजही या सर्व मोनकर फॅमिलीच्या संपर्कात आहेत. स्वतः मोनकर चांगल्या नोकरीत होते पण त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असे वाटत असे. मोनकरांचा एक शिरस्ता होता ,ते मोकळा वेळ असेल तेव्हा बलभीमरावला सोबत घेऊन माहीम,कुर्ला,दादर,परळ भागात चालत फिरायचे आणि रस्त्यात दिसणारे व्यवसाय करणारे लोक आणि व्यवसाय दाखवायचे आणि आपण असा काहीतरी व्यवसाय करावा असे सांगायचे . खरंतर हे पाहून पाहून बलभीमराव यांच्यात उद्योजकता बिंबली असावी असे वाटते.मोनकरांकडेच त्यांना श्री बाळासाहेब काटे भेटले,ते इंदापूर तालुक्यातीलच होते,ते पोलीस खात्यात लेखनिक होते आणि पोलिसांच्या बऱ्याक मध्ये रहायचे . त्यांनीच पुढे बलभीमराव यांना बऱ्याक मध्ये राहायला नेले. त्यांनी बलभीमराव यांच्या सोबत चांगलीच मैत्री वाढविली होती. पुढे त्यांनीच त्यांच्या मावस बहिणीचा प्रस्ताव यांच्या लग्नासाठी आणला होता पण तो योग जुळला नाही .
श्री भिकन गायकवाड यांनी बालभिमरावसाठी चाळीसगांव मधील श्री काशिनाथ गणपत मोरे यांच्या कु.सुशीला या मुलीचा प्रस्ताव लग्नासाठी आणला आणि ११ मे १९६६ रोजी बलभीमराव आणि सुशीलाबाई यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. आता या बाळासाहेब काटे यांना लालबाग भागात क्वार्टर मिळाले होते ,त्यामुळे लग्नानंतर बलभीमराव दोन महिने लालबागला राहिले आणि नंतर कांदिवली येथे खोली भाड्याने घेतली आणि ते कांदिवलीत राहू लागले .
आता बलभीमराव पहिली नोकरी सोडून इंटरनॅशनल ट्रॅक्टर कंपनीत नोकरी करू लागले होते. म्हणजे आजचे महिंद्रा अँड महिंद्रा .पण त्यांना फक्त नोकरी पुरते मर्यादित रहायचे नव्हते. याच काळात स्वर्गीय श्री हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईत महत्व वाढायला लागले होते. मराठी माणसाने परराज्यातील लोकांचा अन्याय सहन करायचा नाही, एकजुटीने रहावे, उद्योग धंदा करावा, हे विचार बोलले जात होते. तेव्हाच एक ,दोन अशाकाही घटना घडल्या की,त्यामुळे बलभीमराव शिवसेनेशी जोडले गेले.कांदिवलीला राहायला आल्यानंतर थोड्याच महिन्यात त्यांनी शिवसेनेचे काम सुरू केले.सहा फूट तीन इंच उंची,रुबाबदार व्यक्तिमत्व , कोणत्याही अवघड कामाला भिडण्याचा स्वभाव, खेड्यातला रांगडेपणा यामुळे ते शिवसेनेच्या नजरेत आले. श्री मंगेश नाबर हे तिथे शिवसेनेचे शाखा प्रमुख होते. थोड्याच कालावधीत बलभिमराव कांदिवली येथे शिवसेनेचे गट प्रमुख झाले आणि पुढे शाखा प्रमुखही झाले. शिवसेना गट प्रमुख असताना ते शाखेच्या वतीने मराठी आणि परप्रांतीय यांच्यात वाद झाले तर पोलिस स्टेशन मध्ये मराठी माणसाची बाजू सांभाळायचे . लोकात मिसळणे,वाद मिटविणे,मराठी माणसाला न्याय मिळवून देणे यामुळे त्याभागात ते चांगलेच लोकप्रिय झाले होते. याचा परिणाम असा झाला की,कधीही दहा,पंधरा पोरांचा ग्रुप सोबत असायचा . यातूनच त्यांना छोटे मोठे व्यवसाय करण्याचे प्रस्ताव येऊ लागले. कांदिवली येथे केळीचा एक व्यापारी होता ,तो केळीचा रिटेल व्यवसाय सुरू करा म्हणून यांच्या मागे लागला. व्यवसाय करायला कामगार म्हणून काम करायला पोरं हाताशी होतीच . बलभीमराव यांनी केळी विक्रीचा रिटेल व्यवसाय सुरू केला. थोड्याच दिवसात त्यांनी बटाटे वडे तयार करून विक्री व्यवसाय सुरू केला. एका दिवाळीत तर त्यांनी शिवसेनेचा उपक्रम म्हणून मोठ्या प्रमाणावर मिठाई तयार करून विक्री पण केली. शिफ्ट मध्ये नोकरी,घरी आले की उशिरापर्यंत शिवसेनेचे काम आणि हे दोन व्यवसाय . यामुळे त्यांचे आयुष्य पूर्ण बिझी झाले होते. १९६६-६७ मध्ये त्यांना पगार होता ३०० रुपये पण व्यवसायातून त्यांना रोज ५० रुपये मिळू लागले होते. पत्नी सौ. सुशीलाबाई यांना वाटायचे फिरायला जावे,सिनेमा पाहायला जावे पण त्यांनी पत्नीला समजावून सांगितले की,"आपल्याला जर मोठे व्हायचे असेल तर फक्त नोकरी करून चालणार नाही. हेच कष्ट करायचे दिवस आहेत." पत्नीला पण हे पटले ,त्यानंतर त्यांनी कधी हौस ,मजेचा आग्रह केला नाही. पुढे दोन वर्षे तरी हे दोन छोटे व्यवसाय सुरू होते. एव्हाना बलभीमराव यांचे कांदिवलीत आणि विशेष म्हणजे सासरी चाळीसगावला चांगलेच नाव झाले होते.
श्री परशुराम शिंदे ,पाचोरा हे श्री काशिनाथ मोरे यांचे नातेवाईक होते. शिंदे यांचा दुधाचा व्यवसाय होता . त्यांचे दूध मुंबईत विक्रीला यायचे .त्यांना मुंबईत अजून दूध विकायचे होते. मोरे आणि शिंदे बलभीमराव यांच्याकडे कांदिवलीला दोन दिवस रहायला आले. कांदिवली परिसरात हॉटेल्स मध्ये फिरून त्यांना कोण ,किती दूध खरेदी करू शकते हे पहायचे होते. बलभीमराव त्यांना घेऊन सगळीकडे फिरले. त्यांच्या ओळखी आणि प्रभावामुळे रोज दोनशे लिटर दुधाची मागणी निर्माण झाली. हे पाहून शिंदेंना पण आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आता पुढचा प्रश्न होता कांदिवलीत हे काम कोण करणार. श्री शिंदे यांनी हा प्रस्ताव बलभीमराव यांच्यासमोर ठेवला. पण बलभीमराव यांना भांडवल म्हणा किंवा नोकरी,केळी,बटाटे वडे व्यवसाय ,शिवसेनेचे काम,इ.मुळे हा प्रस्ताव स्वीकारायची इच्छा नव्हती. शिंदे म्हणाले ,"तुम्हाला भांडवलाची गरज नाही, फक्त कष्टाची तयारी पाहिजे. रोज सकाळी दूध पोहोचवायचे,संध्याकाळी पैसे घेऊन यायचे आणि एक आठवडा झाला की ,कमिशन वजा करून पैसे मला पाठवायचे ." रोज दोनशे लिटर दुधाची विक्री केली तर त्यांना पन्नास रुपये कमिशन मिळणार होते. त्यांचा नकार ऐकून शिंदे म्हणाले ,"बरं राहूद्या हा प्रस्ताव , तुम्हाला नाही जमायचा हा दुधाचा धंदा , त्याला जिद्द लागते." हे ऐकून बलभीमराव यांना अपमानाचा स्ट्रोक बसला आणि मला जमणार नाही म्हणजे काय ,मी करून दाखवतो हा दुधाचा धंदा म्हणून त्यांनी हा व्यवसाय करायला होकार दिला.
यथावकास केळी,बटाटेवडे व्यवसाय बंद करून त्यांनी कांदिवलीत दुधाचा धंद्यात जम बसवला. शंभर लिटर पासून सुरुवात करून तो सातशे लिटरवर नेला. १९७० मध्ये त्यांनी कांदिवलीत दुधाचे दुकान सुरू केले. अंगभूत हुशारी वापरून भाड्याची खोली सोडली आणि या नव्या भाड्याच्या जागेत पुढे दुकान आणि मागे मकान अशी व्यवस्था केली.
दुधाच्या धंद्यात चांगला जम बसल्यावर त्यांनी १९७२ नोकरी सोडली . कांदिवलीत असे पर्यंत या उभयतांना संगीता ,अनिता,मनिषा,शीतल या चार मुली झाल्या होत्या.
दूध व्यवसायासाठी ठाण्यात खूप वाव आहे असे मानून शिंदे यांनीच बलभीमराव यांना ठाण्यात दुधाचा व्यवसाय करायला सुचविले. १९७७ ला त्यांनी ठाण्यात वर्तकनगर येथे दुधाचे दुसरे दुकान सुरू केले. ठाण्यात आल्यानंतर ते शिवसैनिक राहिले पण कोणते पद न घेता बँकफूटवर राहिले. पुढे मग कळवा ,मग डोंबिवली अशी दुधाची चार दुकाने सुरू झाली आणि हा दुधाचा धंदा रोज ७५०० लिटर वर पोहोचला . श्री बलभीमराव यांच्याकडे मनुष्यबळ व्यवस्थापनाची खूप चांगली कौशल्य होती आणि आहेत. त्यांनी केळी,बटाटेवडे,मिठाई,दूध ,बांधकाम देखभाल व दुरुस्ती, कृष्णा खोरे महामंडळाची कॉन्ट्रॅक्ट ,मंडप,शेती असे अनेक प्रकारचे व्यवसाय केले पण त्यांनी कधी स्वतः केळीची पाटी उचल , बटाटेवडे बनव ,दुधाचे कॅन
उचल,अशा गोष्टी केल्या नाही. एकादाच प्रसंग असेल जेव्हा दुधाची लाइन टाकणारा मुलगा न आल्यामुळे त्यांनी दूध वितरित केले. त्यादिवशी दूध घेणाऱ्या ग्राहकांनी पण आश्चर्य व्यक्त केले ,साहेब आज डायरेक्ट तुम्ही आलात दूध द्यायला. काम स्वतः करण्यापेक्षा ते करवून घेता आले पाहिजे तरच व्यवसाय मोठा होतो,धंद्याचे मॅनेजमेंट महत्वाचे असते हे त्यांना माहीत होते.
ठाण्यात स्वतःचा फ्लॅट झाला, कुटुंबात मेघना या पाचव्या मुलींचे आगमन झाले.सर्व मुलींचे शिक्षण सुरू होते. सगळे काही सुरळीत चालू होते. ते कांदिवलीत होते तेव्हाही आणि ठाण्यात आल्यावरही त्यांच्याकडे गावाकडून ' जीवाची मुंबई ' करायला येणाऱ्यांचा नेहमी राबता होता. गावाकडच्या भावांना मदत , पुतण्यांची शिक्षणाची ,व्यवसायाची सोय करणे असे सगळे सुरू होते. त्यांनी गावाकडच्या बऱ्याच मुलांना ठाणे ,मुंबईत नोकऱ्या मिळवून दिल्या . साधारणपणे १९७२ ची गोष्ट असेल , तेव्हाही महाराष्ट्रात १९५२ सारखा दुष्काळ पडला होता. श्री सुभाष शिंदे यांच्यासह प्रवासात असताना बलभीमराव वाट वाकडी करून वरकुटे गावी गेले होते ,त्यांनी काय पाहिले तर त्यांच्या घरातले लोकं कुठेतरी मोलमजुरी करायला चालले होते,यांची गाडी पाहून लाज वाटून ते घरी परतले. याचा अर्थ बलभीमराव यांच्या गावी घरच्यांची परिस्थिती अजून हलाकीचीच होती. हे ओळखून बलभीमराव यांनी तिथून पुढे किमान पंधरा वर्षे गावातल्या घरच्यांचे राशन, किराणा सामान भरले आणि भावाला दर महा घरखर्चाला आर्थिक मदत पण केली.
जुना शिवसैनिक म्हणून बलभीमराव यांना ठाण्यात चांगला मान मिळत होता. श्री मो.दा.जोशी शिवसेनेचे ठाण्यातले आमदार होते, कै.आनंद दिघे यांच्याकडे त्यांचे जाणे येणे असे , दिघे साहेब त्यांची घरी आले होते , श्री प्रकाश परांजपे, श्री सतीश प्रधान , अशा अनेकांशी त्यांच्या चांगल्या ओळखी होत्या. खरंतर त्याकाळात हे ठाण्यात सहज नगरसेवक होऊ शकले असते पण त्यांनी धंद्यावर लक्ष केंद्रित केले. एकदा काय झाले श्री विक्रम मोरे नगरसेवक पदासाठी जाधव रहात होते त्याच वॉर्ड मधून शिवसेनेचे उमेदवार होते. प्रचाराच्या चर्चेसाठी ते मो.दा.जोशींना भेटले ,तर मो.दा. न्नी त्यांना सांगितले तू बलभीमराव जाधव यांना भेट ,ते जुने शिवसैनिक आहेत,तुझा चांगला प्रचार करतील . मोरे जाधवांना भेटले ,मग बलभीमराव यांनी मोरेंना सांगितले ,तुम्ही मी सांगतो त्या दिवशी पंधरा वीस शिवसैनिकासह माझ्या सोसायटी मध्ये या,मी पाहतो काय करायचे ते. ठरल्याप्रमाणे विक्रम मोरे सोसायटीत आले,बघतात तर काय बलभीमराव यांनी सोसायटीतले भरपूर लोकं त्यांच्या स्वागतासाठी सोसायटीच्या गेटवर आणले होते आणि मोरे येताच फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली, खूप फटाके उडत आहेत हे पाहून रस्त्यावर पण मोठी गर्दी जमा झाली, मोरेंचे सोसायटीत जंगी स्वागत झाले. मग काय पुढच्या अजून काही सोसायट्यात असेच स्वागत आणि प्रचार झाला. श्री विक्रम मोरे ती निवडणूक सहज जिंकून नगरसेवक झाले.
ठाण्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार निर्माण झाला होता. शिवसेनेचे काम चालूच होते. आता बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्रभर वाढू लागली होती . बाळासाहेबांनी जाधवांची सुरुवातीला पुणे जिल्हा उप प्रमुख ,नंतर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी नेमणूक केली . १९९० मध्ये शिवसेनेने राज्यभर विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा बाळासाहेबांनी बलभीमराव यांना इंदापूर मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा आदेश दिला . ते म्हणाले तुमचा जनसंपर्क चांगला आहे. तुम्ही निवडणुकीत स्वतःचे पैसे पण खर्च करू शकता , असे म्हणून त्यांनी पक्षातर्फे काही आर्थिक निधी पण दिला आणि प्रचार प्रसारासाठी पोस्टर्स ,बॅनर्स पण पुरविले . तालुक्यातील प्रस्थापितासमोर निवडणूक लढविणे ही त्यांच्यासाठी मोठी झेप होती . ही निवडणूक ते हरले पण ही त्यांच्या आयुष्यातील मोठी खेळी ठरली. पुढे १९९५ ला शिवसेना सत्तेत आली तेव्हा श्री मनोहर जोशी, श्री सुधीर जोशी ,अशा नामदार मंत्र्यासोबत त्यांची चांगली जवळीक होती. शिवसेनेने त्यांना १९९५ ते १९९९ पुणे म्हाडाचे सदस्य पद दिले होते.
१९९५-९६ दरम्यान त्यांनी दुधाचा धंदा बंद केला आणि ठाण्यात बिल्डिंग देखभाल व दुरुस्ती व्यवसाय सुरु केला. पुढे तो बंद करून ते कॉन्ट्रॅक्टर बनले आणि पुणे जिल्ह्यात कृष्णा खोरे विकास महामंडळाची कामे करू लागले. आतापर्यंत त्यांच्या चार मुलींची लग्न झाली होती. सौ संगीता चंद्रशेखर काळे, सौ अनिता योगीराज देवकर ,सौ मनिषा प्रदीप काळे, सौ शीतल राजेंद्र कोल्हे अशी घराणी त्यांनी नातलग म्हणून जोडली होती आणि या चारही मुली पुण्यात राहत होत्या . पुढे जावयांनी आग्रह करून त्यांना पुण्यात राहायला आणले. जावयांचे मत होते तुम्ही पुण्यात शिफ्ट झालात तर म्हातारपणात मुलींच्या जवळपास रहाल. मेघनाला पण आपण पुण्यातलाच मुलगा शोधू.
पुण्यात आल्यावर त्यांनी मंडप व्यवसाय सुरू केला होता. पुढे पाचवी मुलगी सौ मेघना विक्रांत अब्दागिरे हिचेही लग्न पण योगायोगाने पुण्यातच झाले. बलभीमराव आणि सुशीला या उभयतांच्या मुलींना अमेय अनिता देवकर, अपूर्वा आणि अथर्व संगीता काळे , आदिती आणि प्रतीक मनिषा काळे, आयुष आणि अनुज शीतल कोल्हे, अर्णव आणि अहाना मेघना अब्दागिरे अशी मुलं झाली आहेत .इतकंच नाही तर अपूर्वा कटारिया हिला वाणी आणि आदिती शिरोळे हिला शिव अशी बालके झाली आहेत. अमेयचे रुचराशी लग्न झाले आहे, त्यामुळे बलभीमराव आता आजोबा , पंजोबा झाले आहेत.
त्यांना सहज विचारले तुम्हाला मुलगा झाला नाही याची खंत वाटते का . तर ते म्हणाले मला स्वतःला नाही . जे काही आमच्या नशिबात होते ते झाले आणि काय वाईट झाले ,सगळे चांगलेच झाले आहे की. आज मुलाने पाहिले असते त्यापेक्षा जास्त आज मुली माझे पाहत आहेत.जावयांबद्दल विचारले तर ते भरभरून बोलले, एक जावईच मुलाखत घेत आहे म्हटल्यावर त्यांचे हे असे बोलणे क्रमप्राप्तच होते.
श्री चंद्रशेखर काळे या जावयाने पुण्यात राजवाडा हॉटेल सुरू केले होते. हॉटेल कामकाज पहायला त्यांना अजून घरातली माणसे हवी होती म्हणून त्यांना जाधवांना राजवाड्याचे व्यवस्थापन पहायची जबाबदारी दिली होती.
श्री बलभीमराव यांना आयुष्यात सर्वात चांगली भेट मिळाली ती म्हणजे आध्यात्मिक मार्ग - सहजयोग. परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी यांनी स्थापन केलेला सहजयोग. त्यांचा मेहुणा श्री सुभाष मोरे हे अगोदर सहजयोग प्रॅक्टिस करायला लागले मग त्यांनी एकएक करून जवळच्या बहुतेकांना सहजयोगी बनविले. सुरुवातीला त्यांचा अशा गोष्टीवर विश्वास नव्हता पण जेव्हा त्यांना दोन्ही हाताच्या तळव्यावर ,डोक्याच्या टाळूवर थंड थंड चैतन्य लहरी जाणवू लागल्या तेव्हा त्यांचा विश्वास बसला. आता वयाच्या या टप्प्यावर तर त्यांचे सगळे जगणे सहजयोगाने व्यापलेले आहे.
सहजयोगामुळेच ते प्रिय पत्नीचे अकाली झालेले निधन, प्रिय नातेवाईकांचे आकस्मित सोडून जाणे,आयुष्यातील बरे वाईट प्रसंग आणि चढउतार सहन करू शकले.
कोणत्याही माणसाचे आयुष्यातील यश हे तो कोण होता आणि नंतर कोण झाला यावर मोजले जाते . या यश नावाच्या मोजमापाला अजूनही काही फुटपट्ट्या असतीलही. परंतु श्री बलभीमराव जाधव लहान असताना गुरे राखत होते ,मोठे होत होत मुंबई ,ठाण्यात व्यावसायिक झाले, शिवसेनेत पदे भूषविली,आमदारकीची निवडणूक लढविली, नेटका संसार केला, ठाण्यात,पुण्यात प्रॉपर्टी केल्या, वडिलोपार्जित शेती होती तरी स्वतः शेती विकत घेतली आणि जोमाने शेती पण केली, पाचही मुलींचे उत्तम घराण्यात थाटात विवाह केले ,घराण्याचा नावलौकिक वाढविला , उत्तम आध्यात्मिक स्थिती प्राप्त केली, इंग्लंड,युरोप देश फिरून झाले, आयुष्यात कुणी त्यांचे नुकसान केले तरी त्यांनी त्यांचे भलेच केले, खरंतर ही मोठी भरारी आहे.
आता आयुष्यात सगळं काही करून झालं आहे. त्याची एव्हढी एकच इच्छा आहे की, या जगातून जायचे जर प्रत्येकालाच आहे, फक्त खितपत पडायला लागू नये, शरीर धडधाकट असताना जाण्याचा योग यावा.
परमेश्वराने आणि श्री माताजींनी जगातल्या सर्वांचे कल्याण करावे अशी त्यांची भावना आहे.
अशा या नेहमी हसतमुख ,प्रसन्न व्यक्तीकडून सर्वांना नेहमी प्रेरणा मिळते हे मात्र खरे आहे.
मा.श्री.बलभीमराव जाधव यांनी मार्च २०२५ मधेच वयाची ८१ वर्षे पूर्ण करून ८२ व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यांचे सहत्रचंद्रदर्शन पूर्ण झाले आहे. या निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना सर्व कुटुंबीय, नातेवाईक, हितचिंतक यांच्यातर्फे उत्तम आरोग्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी अनंत ,अनंत शुभेच्छा.
मुलाखत आणि शब्दांकन ...
योगीराज देवकर.