Saturday 15 July, 2023

न्यारी दुनियादारी

 न्यारी दुनियादारी

श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर मधील 1978 दहावीच्या माजी विद्यार्थी बॅचला आता गेटटुगेदर करण्याची चांगली सवय जडली आहे. इंदापूर,भिगवण,थेऊर, औरंगाबाद नंतर आता दरेकर वाडा येथे आमचे गेट टुगेदर नुकतेच पार पडले. यावेळी निमित्त होते मुख्य वन संरक्षक अधिकारी, सत्यजित गुजर, औरंगाबाद विभाग यांच्या सेवा निवृत्ती नंतरच्या ऋणनिर्देश सोहळ्याचे. याची महिनाभरापासूनच पूर्वतयारी सुरु होती. सदर गेटटुगेदरला माझ्यासह घनश्याम शहा, गणेश देशपांडे,पांडुरंग राऊत, प्रशांत कुलकर्णी,

रमेश देवकर,उज्वला अर्णीकर, प्रवीण शिंपी,

श्रीकांत जोशी,अर्जुन ठोंबरे,  विजय तांबिले,डॉ सविता पटवर्धन, प्रमिलाताई जाधव,गौतम गुणाजी, राजेंद्र चव्हाण,

राजेंद्र देवकर,गिरीश शहा,

सुरेश मेहेर,प्रदीपदादा गारटकर,संजय सावंत, यांची उपस्थिती लाभली.याशिवाय 

अविनाश जोशी,संजीवनी, प्रदीप शहा, दयानंद कद्रे यांचा गेटटुगेदरला बाहेरून पाठिंबा राहिला.


ठरल्याप्रमाणे सकाळी सर्वजण दरेकर वाडा येथे एकत्र जमले आणि ब्रेकफास्ट नंतर हॉल मध्ये फॉर्मल ऋणनिर्देश सोहळा सुरु झाला. हायस्कूल मधील वर्गमित्रांनी  एखाद्या मित्राचा सेवा निवृत्तीनिमित्त केलेला बहुदा हा पहिलाच सोहळा असावा. सुरुवातीलाच उज्वला अर्णीकरने सत्यजित विषयी तयार केलेल्या समर्पक कवितेचे वाचन केले. त्यानंतर श्रीमती प्रतिभा गारटकर मॅडम ज्या आमच्या माजी शिक्षिका आहेत त्यांनी सत्यजित विषयी खास कविता तयार करून पाठविली होती तिचे गणेशने वाचन केले. शिक्षिकेने विध्यार्थ्यांसाठी कविता लिहणे हा प्रसंगही विरळच असावा. प्रमिला ताईने भाषणात या ग्रुपमधील सगळेजण चांगले आहेत. साठी नंतरही आपण भेटतो, गेटटुगेदर करतो यांचे सगळ्यांना आश्चर्य वाटते. ग्रुप मधील कोणीही वाया गेलेला नाही असे म्हटल्यावर उपस्थित वहिनीं मंडळीतून आवाज आला आम्ही तुमच्या मित्रांना वाया जाऊ दिलेले नाही आणि एकच हशा पिकला. सुनीता कुलकर्णी यांनी उपस्थित महिलांचे प्रतिनिधीत्व करून फार छान विचार मांडले. सत्यजित बद्दल बोलताना बहुतेकांनी दोन प्रकारचा ऋणनिर्देश व्यक्त केला. एक त्याने मित्र म्हणून या ग्रुपच्या एकत्रीकरणासाठी दिलेले योगदान आणि दोन आय एफ एस अधिकारी म्हणून धरणीमातेच्या सेवेत वृक्ष,वेली,प्राणी आणि पक्षांसाठी दिलेले योगदान याबद्दल सगळे भरभरून बोलले. नंतर सत्यजितचा प्रदीप गारटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. तसेच सत्यजितच्या अर्धांगिनी स्वाती वहिनी यांचा डॉ सविता पटवर्धन, उज्वला अर्णीकर आणि प्रमिला जाधव यांच्या हस्ते भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला.

सर्वांच्या मनोगतानंतर स्वाती वहिनी आणि सत्यजितने सत्कारास उत्तर दिले. सत्यजितने 38 वर्षांच्या सेवेत 19 ठिकाणी झालेले पोस्टिंगचा थोडक्यात आढावा घेतला. भंडारा, अल्लापल्ली, रेहकुरी, भीमाशंकर, पुणे, अहमदनगर, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, कुंडल, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी तो छोटा साहेबापासून ( ACF) मोठा साहेब(CCF) कसा घडत गेला या प्रवासाचे वर्णन केले .वन क्षेत्रातील अतिक्रमणे कशी काढली, वनातून होणाऱ्या गैर गोष्टींना कसा आळा घातला, प्राणघातक गोष्टींना साहसाने कसा सामोरा गेला, असे अनेक किस्से सांगून त्याचा कारकिर्दीचा पट सर्वांसमोर उलगडला. सव्वादोन तास चाललेल्या कार्यक्रमाचा सर्वांचे आभार मानून समारोप झाला.


आता आम्हाला एन्जॉय करायचा होता दरेकर वाडा. मग काय ग्रुप फोटोज्, स्विमिंग टॅंकमध्ये पोहणे, रेन डान्स,दुपारचे जेवण,बोटिंग, ऍडव्हेंचर झुला, लॉन क्रिकेट, गप्पा आणि गाणी. यावेळच्या गेटटुगेदरला प्रवीण शिंपी, सुरेश मेहेर, राजेंद्र चव्हाण,पहिल्यांदाच उपस्थित होते . त्या उभायतांची ओळख परेड झाली. राजेंद्र चव्हाणने स्कूल मधील आठवणी सांगताना अशी काही धमाल उडवून दिली की, सर्वांची हसता हसता पुरी वाट लागली. आम्ही एकत्र असलो की,श्रीकांतची गाणी आणि राऊत वहिनींचे विनोद याची मेजवानी असतेच.


अशा कार्यक्रमात असे आढळते की, जे जास्त बोलणारे असतात ते भाव खाऊन जातात आणि जे कमी बोलतात ते आनंद घेऊन जातात.अशा या न्यारी दुनियादारीत मित्रांच्या संगतीत दिवस कसा गेला ते कळले देखील नाही.शेवटी हाय टी आणि खूप सारी ऊर्जा घेऊन आम्ही पुन्हा कधी भेटायचे ते ठरवून गेटटुगेदरचा समारोप गेला आणि सगळे परतीच्या प्रवासाला लागले.


योगीराज देवकर.

9307133134

No comments: