Sunday 19 February, 2023

बैलगाडी आणि माझे बालपण

 बैलगाडी आणि बालपण.


5 मे 2021 रोजी अमेय आणि रुचिराचे लग्न झाले. त्यालग्नात  श्री.गिरीषराव रमेशराव गायकवाड आणि कुटुंबियांनी पदार्थांचा रुखवत केला होता त्यासोबत एक शोभेची बैलजोडी आणि बैलगाडी पुण्यातल्या घरात आली. मी मुळात शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकरी असल्यामुळे ही बैलगाडी दिसली कि,मला माझा गांव, शेती आणि बालपण आठवणे आगदी साहजिकच आहे.


लोणी देवकर या गावात माझा जन्म झाला आणि त्याच गावात बालपण पण गेले.चौथी पर्यंतची शाळा जीवन शिक्षण विद्या मंदिर, लोणी देवकर, पाचवी श्री नारायणदास रामदास हायस्कूल, इंदापूर. सहावी पासून पुण्याला असा शिक्षणाचा प्रवास झाला. माझे वडील स्व.हरिश्चंद्र ज्ञानदेव देवकर मोठे शेतकरी होते. आमची वस्ती शेतातच होती .शेतावर सालाने काम करणारे दहा -बारा शेतमजूर होते आणि त्यांचे कुटुंबीयपण आमच्या वस्तीवरच रहात असत.शेतावर गाय, बैल आणि म्हैस अशा पाळीव प्राण्यांचे मोठमोठे गोठे होते.उन्हाळ्यात सहा-सहा बैलांचे दोन नांगर शेतीची नांगरट करीत असत. म्हैसिंचे दूध भिगवणच्या हॉटेलला पाठविले जायचे.मेंढारांचा मोठा कळप होता आणि  मेंढ्यासाठी वाडगे पण होते. मेंढ्याच्या लोकरीची विक्री व्हायची. त्याकाळात वडिलांनी किमान चाळीस, पन्नास लहान मोठी जनावरे पाळलेली होती. त्यामुळे शेतीसाठी मुबलक शेणखत मिळायचे. वस्तीवर कोंबड्या, कुत्री,असल्यामुळे शेतीला स्वयंपूर्ण करणाऱ्या साऱ्या गोष्टी तिथेच होत्या. एका विहिरीवर दहा

अश्वशक्तीचे रस्टन इंजिन होते. इंजिन चालू केले कि त्याच्या सायलन्सरचा आवाज परिसरात सगळीकडे ऐकू यायचा. इंजिनाने विहिरीतून बाहेर काढलेले पाणी शेतात पिकांपर्यंत वाहून नेहण्यासाठी मोठ्या तालीवरुन पाट बनविलेले होते.एका विहिरीवर मोट असायची. त्याविहिरीवर मोटीसाठीचे वडवान, दगडी हौद, पाण्याचा पाट,धाव, आजही अस्तित्वात आहे.

त्याकाळात गावात बारा बलुतेदारी अस्तित्वात होती. सुतार शेतीला मशागतीसाठी लागणारी औत,कुळव,तीफण ,अशी अवजारे आणि बैलगाड्या बनवत असत.लोहार लोखंडी खुरपं,विळा,कुदळ,कुऱ्हाड, बनवायचे.आमच्या शेताच्या तालींवर भरपूर केकताडाची झाडे होती. मातंग समाजाचे लोक त्या केकताडापासून वाक बनवायचे आणि मग त्या वाकापासून काणी, कासरा, सोल, नाडा, दोरखंड बनवायचे. त्याकाळात गावात घिसाडी समाजाचे लोक यायचे, तेही शेतीसाठी लागणारी कुदळ, टिकाव,खोरं अशी लोखंडी हत्यारे बनवायचे तसेच बैलगाडीच्या चाकांना लोखंडी रिम बसवून द्यायचे.गावात शेती हाच प्रमुख व्यवसाय होता त्यामुळे आजूबाजूला सगळी असली शेतीचीच कामे होताना दिसत असत.


बालपणी माझे मित्र कोण तर वस्तीवरील शेतमजूरांची मुले आणि गावातली शाळेतली मुलं. आजूबाजूच्या या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर प्रभाव होता.त्यातच मी बागायतदारचं पोर,मोठे भाऊ श्री.कालिदास देवकर सरपंच असायचे त्यामुळे मित्रांत आणि शाळेत माझा रुबाब असायचा.

बालपणी आमचे खेळ काय असायचे तर शेतात आम्ही जे बघायचो त्याची प्रतिकृती आम्ही अंगणात तयार करायचो. विहीर खोदायचो , त्यात पाणी भरायचो ,मोट किंवा कधी चिखलाचे इंजिन तयार करायचो, त्याला कांद्याच्या रोपाला जे बियाण्यांचे शुटआउट येतात त्याचे पाईप वापरून आमच्या छोटेखानी शेताला पाणी द्यायचो.

ज्वारीचा कडबा असतो त्याच्या चिपाडापासून मी अगदी हुबेहून खेळण्यातली बैलगाडी आणि शेतीची अवजारे बनवायचो.

चिखलापासून बैलजोडी बनवायचो आणि मग आमचा बैलगाडीचा खेळ चालायचा.

माझ्यापेक्षा मोठा भाऊ श्री.रत्नकवी देवकर यांनी मला पोहायला शिकवायचा प्रयत्न केला. एक बारव होती तिथे पाठीला पोहरा बांधून मला पोहायला शिकवायचे प्रयोग झाले. तेव्हा मला ते काही जमले नाही. पुढे काही कालावधीनंतर माझ्या वडिलांनी एक नवी विहीर खोदली.आमचा एक शेतमजूर त्याविहिरीत रोज पोहायला जायचा. मी ते रोज पहायला जायचो. मला शिकायचे होते म्हणून त्याचे निरीक्षण करायचो. एक दिवस धाडस करून मीच त्या मजुराला म्हणालो, मला पण पोहायचे आहे. त्याने विचारले पोहायला येते का? मी हो म्हटलं पण त्याला लक्ष द्यायला सांगितले आणि मग काय उतरलो विहिरीत आणि आश्चर्य म्हणजे मला पोहायला जमले. यात मला जे थोडेफार शिकवले होते, माझे निरीक्षण आणि माझा विश्वास याचा वाटा असावा असे वाटले. मग काय पुढचे अनेक दिवस मी त्या मजूरासोबत पोहायला जात होतो .

त्याकाळात शेतावर कडुनिंब, रामकट, बाभूळ अशी खुप झाडे होती. गावातल्या एका मित्रामुळे मला या झाडांवरचे सरडे विनाकारण दगडांनी मारायची खोडकर सवय लागली होती. सरड्याने जर आम्हाला पाहिले तर तो पळ न काढता उलट तसाच झाडाच्या बुंद्यावर थांबत असे. माझा दगड मारण्याचा नेम फार चांगला होता. त्यामुळे स्थिर उभा राहिलेला सरडा मी एकाच दगडात मारत असे.पुढे समज आल्यावर समजले कि,केवळ स्वतःची नेमबाजी दाखविण्यासाठी मी करत ती एक चूक होती याची नंतर खंत मात्र वाटत राहिली. पण या दगडाच्या नेमबाजीचा मला एकदा चांगलाच फायदा झाला. मी तिसरी किंवा चौथीत असेल, काहीतरी कामासाठी विहिरीकडे गेलो होतो. जवळच्या गवतातून चालताना अचानक एक नाग फना काढून माझ्या समोर उभा राहिला. एक इंच जाडीचा तर नक्की होता तो . मी घाबरून पळालो. 10-15 फुटावर जाऊन उभे राहून पाहिले तर तो नाग तसाच फना  काढून उभा होता.मी एक दगड घेतला आणि जोरात त्या नागाच्या दिशेने मारला. तो नेम इतका बरोबर होता तो फटफा नेमका त्याच्या उघडलेल्या फन्यावरच बसला आणि एकाच फटक्याक त्या नागाचा मृत्यू झाला. तेव्हा मला मी शूर आहे असे वाटले होते.झाडांवरचा डिंक  गोळा करायची एक चांगली सवय मला लागली होती.स्व.हिराबाई माझ्या आईचे नाव पण तिला सगळे भाभी म्हणत असत.मिळालेला डिंक मी आई कडे देत असे.

आमच्या गावातल्या शाळेच्या मैदानात ओळीने वडाची झाडे होती, त्यावर आम्ही सुरपारुंब्या हा खेळ खेळायचो.झाडाच्या फांद्या पारुंब्या वरून आम्ही वानरासारखे खेळत असू.

चीर चीर घोडी हा आमचा अजून एक खेळ, तो तर आम्ही पाचवीत इंदापूर हायस्कूल मध्ये पण खेळत असू .

विटी-दांडू,गोट्या,लगोरी हे खेळ तर होतेच पण 

घरातले लोक आंबे खावून कोया शेणाच्या उकिरड्यावर टाकायचे, पाऊस पडला कि त्यापासून आंब्याची रोपे उगवायची.ही रोपे ज्या तालीवरून पाण्याचा पाट वाहत असे त्या तालीवर नेहून लावणे हा अजून एक खेळ. तालीच्या उतारावर व्यवस्थित खड्डा करून त्यात रोप लावायचे, आळे तयार करायचे, त्याची पाण्याची सोय करायची. हे सगळे करण्यात आम्ही शेतीचे काहीतरी काम करतोय ही भावना पण असायची.

त्याकाळात आमच्याकडे एक बुलेट मोटारसायकल होती आणि शेतात बैलगाडी हेच वाहतुकीचे एक साधन होते.महिलांना गावात जायचे यायचे असो ,शेतमाल,शेणखत वाहतूक असो ती बैलगाडीनेच होत असे.त्यामुळे कोणत्याही कारणासाठी बैल गाडीला झुंपले कि आम्ही त्यागाडीत बसायला पळायचो. फार मजा होती बालपणी.

सध्या हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे पुण्यातल्या घरात दररोज दिसणारी रुचिरा सोबत आलेली बैलजोडी आणि बैलगाडी.

धन्यवाद.

योगीराज देवकर.

www.motivationacademy.in

No comments: