Thursday 1 July, 2021

कोरोना काळातील लग्नाचे आमंत्रण. एक काव्य.

 कोरोना काळातील लग्नाचे आमंत्रण


या काव्यात संत आणि सामान्य माणूस तसेच लग्नघरातील श्रीमान,श्रीमती अशी चार काल्पनिक पात्र आहेत. कोणाच्या प्रसंग अथवा घटनेशी हे जुळत असेल तर हा निव्वळ योगायोग समजावा. संत म्हणजे आध्यात्मिक मार्गाने जाणारा आणि पारमार्थिक सुख पाहणारा व्यक्ती,तर सामान्य माणूस म्हणजे चारचौघा सारखे जीवन जगणारा आणि भौतिक सुख पाहणारा व्यक्ती. श्रीमान मायक्रोअँग्रेशनची(अहंकार) शिकार,तर श्रीमती हतबलता दर्शविणारी व्यक्तीमत्व होत. समाजात आपल्या आजूबाजूला अशी नाट्ये  घडत असतात . आपण आपले डोळे,कान उघडे ठेवले की ती अनुभवास येतात. 

*काव्य*

संत असो वा सामान्य माणूस एकसारखाच स्वार्थी असतो हेच खरे.

दोघांनाही वाटते पन्नास आमंत्रितांच्या यादीत आपले नाव असेल तर बरे ।

संत सुध्दा तुला आलंय का आमंत्रण असे याला त्याला विचारात असतो.

लगीन घरातल्यांना अजून माझे नाव कसे नाही सुचले विचार करत बसतो ।।१।।

श्रीमान,श्रीमती यापैकी कोणाला बरे पुश करावे याचे चिंतन करत असतो.

श्रीमान काय, अन श्रीमती काय शेवटी रक्ताची असतात तीच आपली हे उमजतो ।

दोघांनीही जर काही इलाज नाही म्हटले तर अवघड होऊन बसेल..मग तत्पूर्वीच,

भात्यातील कोणती बरे शस्त्रे वापरावीत हे साक्षात देवालाच विचारतो ।।२।।

मी मुलीचा किंवा मुलाचा मामा असतो तर किती बरे झाले असते.

लगीन घरच्यांना ब्राह्मणानेच सांगितले असते की मामाला बोलवायचे असते ।

मुलांचा मामा नसलो म्हणून काय झाले,आण्णा,दादा सारखाच एखादा मामाही असतो.

मामा या लाभलेल्या उपाधीचा लाभ अश्यावेळी नाही तर मग कधी होणार असतो ।।३।।

फोनचा मेसेज वाजला,दुसऱ्याला फोन आला तरी पहात अथवा विचारत असतो .

अरे देवा ! मी तर अजून इथेच आहे, माझी दखल का घेत नाही म्हणून खट्टू होऊन बसतो ।

त्यापेक्षा श्रीमतीला फोनच केलेला बरा, हवा-पाण्याच्या गप्पा माराव्यात म्हणतो .

फोनवर बोलताना आमंत्रणाचे आठवणारच नाही असे कसे होईल हे तो हेरतो ।।४।।

देवाकडे नमस्कार, विनवण्या,प्रार्थना सारे काही अगदी मनोभावे करतो.

हे सगळे जगासाठी करायचे असते असे म्हणणारा यावेळी मात्र स्वतःसाठी करतो ।

संत असूनही ध्यान,झोप लागत नाही आणि सारे संतुलन गमावून बसतो .

अजून कसे फळ मिळाले नाही म्हणून चेहरा चिंताग्रस्त करून असतो ।।५।।

शेवटी एकदाची प्रार्थना लागू होते, कुटुंबप्रमुखाचा फोन येतो,मग चेहऱ्यावर लाली झळाळते .

डोळ्यात बालिश ,निरागस तेज वाढते आणि गालावर हास्याची लकेर उमटते ।

सर्वांच्या आधी मी कसे माझे तिकीट निश्चित केले याचा वेगळाच आनंद दाटतो.

कोरोनाच्या काळात हवाई प्रवासाच्या तिकिटापेक्षा याच तिकिटाची किंमत जास्त वाटते ।।६।।

जनसंपर्क मोठा असेल तर ? तर हा , पन्नास लोकांची यादी बनविणे अवघडही असेल.

पण नावांची पसंती ठरविताना लग्नघरात नक्की कोणाचे बरे चालत असेल ?

हा माहेरचा,तो सासरचा,हा असा,अन तो तसा,अशी चर्चा तिथेही झडत असेल .

पण राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्या इतके का ते अवघड असेल ?।।७।।

या पन्नास नावांच्या भानगडीत ज्यांनी आपला पाहुणचार घेतलेला आहे ते सुद्धा बदलतात.

आपल्या टॉप मोस्ट फायद्याचे कोण आहेत, त्यांचीच नावे फक्त ते नक्की करतात ।

उशिरा का होईना ज्याला तोंडी आमंत्रण येते तो आनंदतो अन सुखावतो .

प्रथा,परंपरे प्रमाणे ज्याला आमंत्रण दिले गेले नाही तो मात्र दुखावतो अन दुरावतो।।८।।

आयोजकांचा होमवर्क कच्चा असेल तर आमंत्रितांपैकी ऐनवेळी नकार देणारी संख्या वाढते .

आता मात्र जे वेटिंग लिस्टवर होते वा ग्रहित नव्हते त्यांना कॉल करायची धांदल उडते ।

अशा वेळी घाई करायची नसते, तुम्ही वॉन्टेड होता का अनवॉन्टेड हेही पहायचे असते.

कोणामुळे तरी रिकामी झालेली जागा भरायला न मिळाल्यासारखे जायचे नसते ।।९।।

लग्नाच्या ठिकाणी तुम्ही वॉन्टेड होता का अनवॉन्टेड हे समजणे फारच सोपे असते.

वॉन्टेड ला नमस्कार, चमत्कार आणि अनवॉन्टेडला साधी नजरेला नजर सुद्धा नसते ।

वॉन्टेडच्या डोक्यावर फेटा बांधला जातो आणि खायचं-प्यायचं असतं म्हणून तोंडावर मास्क नसतो .

अनवॉन्टेडला खायचं-प्यायचं नसतं म्हणून तोंडावरचा मास्क तसाच असतो अन डोक्यावर फेटा नसतो ।।१०।।

तसंही कोरोनामुळे सोशिअल डिस्टनसिंग, सँनीटायझेशन आणि मास्क वापरायचा आहे.

लग्नाच्या भाऊगर्दीत तुम्ही होता काय आणि नव्हता काय कोणाला समजणार आहे ।

सरकार सावध करतंय, दिवाळीनंतर कोरोना वाढतोय,उगाच कशाला गर्दीचा भाग व्हायचे आहे.

सध्या सगळं कसं ऑनलाईन आहे, वधु-वराला घरात बसूनच आशीर्वाद व शुभेच्छा द्यायची ही वेळ आहे ।।११।। 


योगीराज देवकर.

www.motivationacademy.in

प्रेरक,प्रशिक्षक,लेखक.

२२/११/२०२०


No comments: