*मानवाची तिसरी गरज* :
सामाजिक/प्रेम/आपुलकीच्या गरजा: (Love and Belongingness Needs):
अब्राहम मॅस्लो यांच्या Theory of Needs Hierarchy च्या उतरंडी मधील ही तिसरी गरज आहे.
कुटुंब,नातेवाईक,मित्र, सहकारी, हितचिंतक,लोकसंग्रह, प्रेम,आपुलकीने सामाजिक स्वीकार—समूहाशी नाते जोडण्याची मानवी गरज या स्तरात येते.
मुळातच माणूस हा कुटुंबप्रिय,समाजप्रिय,समूहप्रिय प्राणी आहे.मानवाला इतरांशी नाते जोडण्याची, प्रेम देण्याची व मिळवण्याची आणि समूहाचा भाग असल्याची तीव्र गरज असते. मानवाला सामूहिकता आवडते.
या स्तरात कुटुंबातील जिव्हाळा,नातेवाईकांशी खुलेपणाचे,प्रेमाचे संबंध, मित्रमैत्रिणींची संगत, दाम्पत्यातील प्रेम, सामाजिक सहभाग, तसेच समाजाकडून स्वीकार मिळणे यांचा समावेश होतो. व्यक्तीला “मी एकटा नाही, मी कोणाचा तरी आहे” " मी कशाचातरी भाग आहे " अशी भावनिक खात्री मिळणे ही या गरजेची मध्यवर्ती बाब आहे. म्हणूनच मानवाला मित्रांचा ग्रुप असणे, नातेवाईकांच्या सुख दुःखात सहभागी होणे, टीम,गटात काम करायला आणि एकत्रित रिझल्ट्स निर्माण करायला आवडणे,नेतृत्व करणे,गणपती/ महिला/महाराष्ट्र मंडळ, औद्योगिक/कामगार/अधिकारी/सामाजिक/संघटना, राजकीय पक्ष,धार्मिक पंथ,असा कशाचातरी भाग असणे आवडते.आपण कोणत्यातरी गटाचा,विचारसरणीचा,प्रवाहाचा ,पंथाचा भाग आहोत ही बाब माणसाला प्रेम आणि आपुलकीची भावना देते.
प्रेम हा जीवनाचा पाया आहे. तुम्ही प्रेमळ असाल तर माणसे जोडता आणि दुष्ट असाल तर माणसे तोडता. म्हणूनच
प्रेमळ,दयाळू,करुणामय,उदार,माणसे सर्वांना आवडतात. दुष्ट माणसे खड्यासारखी बाहेर फेकली जातात.
या गरजा समाधानकारकरीत्या पूर्ण झाल्यास मानसिक स्थैर्य, भावनिक संतुलन आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे सामाजिक व आपुलकीच्या गरजा मानवी जीवनातील भावनिक आरोग्याचा कणा मानल्या जातात.
परंतु या गरजा अपूर्ण राहिल्यास व्यक्तीमध्ये एकाकीपणा, ताणतणाव , नैराश्य, असुरक्षितता किंवा समाजापासून दुरावलेपण निर्माण होऊ शकतो.
योगीराज देवकर.
क्रमशः