गुणांबद्दल बोलू काही !
अनाहत चक्र: चौथे चक्र.
मानवी सूक्ष्म शरीरातील अनाहत चक्र हे हृदयात स्थित असून ते प्रेम, धैर्य, समतोल आणि मानसिक व शारीरिक रोग प्रतिकार शक्तीचे प्रतीक मानले जाते. “अनाहत” म्हणजे न वाजवता निर्माण होणारा नाद.
१) निर्भयता: (Fearlessness):
अनाहत चक्राचे सर्वात महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे निर्भयता. जेव्हा हे चक्र शुद्ध ,संतुलित असते, तेव्हा व्यक्ती बाह्य परिस्थितींना घाबरत नाही. भीती ही बहुतांश वेळा असुरक्षिततेतून जन्माला येते; परंतु अनाहत चक्र मजबूत असेल तर मनाला अंतर्गत आधार मिळतो.
ही निर्भयता आक्रमक नसून शांत धैर्याची असते—जी संकटातही विवेक टिकवते, योग्य निर्णय घेण्यास मदत करते आणि जीवनात स्थैर्य आणते.
२) आत्मविश्वास: (Self-Confidence):
खरा,रास्त आत्मविश्वास अहंकारातून नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वावरील श्रद्धेतून निर्माण होतो. अनाहत चक्र संतुलित असताना व्यक्ती स्वतःला
आपल्या मर्यादा, सामर्थ्य आणि भावनांसह स्वीकारते. हा आत्मविश्वास तुलना न करता स्वतःच्या मूल्याची जाणीव करून देतो. त्यामुळे व्यक्ती इतरांवर अवलंबून न राहता निर्णय घेऊ शकते, नातेसंबंधात प्रामाणिक राहते आणि जीवनात सकारात्मक दृष्टीकोन विकसित करते.
३) रोगप्रतिकारकता: (Immunity):
अनाहत चक्राचा थेट संबंध हृदय, फुफ्फुसे, रक्ताभिसरण प्रणाली आणि रोगप्रतिकारक शक्तीशी जोडला जातो. सतत भीती, ताणतणाव, दु:ख किंवा भावनिक दडपण असल्यास हे चक्र दुर्बल होते आणि त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर दिसून येतो.
भावनिक स्थैर्य, अंतर्गत शांतता आणि सकारात्मक भावना रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे शुद्ध, संतुलित अनाहत चक्र हे केवळ मानसिकच नव्हे, तर शारीरिक आरोग्याचेही रक्षणकर्ते ठरते.
आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि अनिश्चित जगात भीती, अस्थिरता व ताणतणाव सामान्य झाले आहेत. अशा वेळी अनाहत चक्राचे गुण मानवाला—
भावनिक संतुलन,
मानसिक स्थैर्य,
आरोग्यदायी शरीर,
नातेसंबंधात सुसंवाद
आणि जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन
देण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतात. निर्भयता मनाला मुक्त करते, आत्मविश्वास व्यक्तिमत्त्वाला बळ देते आणि रोगप्रतिकारकता शरीराला सक्षम बनवते—ही तिन्ही मूल्ये परस्परपूरक आहेत.
संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.
आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -
Sahajayogapune.org
Sahajayogamumbai.org
लेखन - योगीराज देवकर.
No comments:
Post a Comment