Sunday, 16 August 2026

चार वेद आणि सहजयोग

चार वेद- थोडक्यात सोपी ओळख आणि वेद व सहजयोग संबंध.

वेद म्हणजे “ज्ञान” (संस्कृत: विद् = जाणणे).

वेद हे मानवजातीचे सर्वात प्राचीन आध्यात्मिक ग्रंथ मानले जातात.

चार वेद आहेत:

१)ऋग्वेद

२)यजुर्वेद

३)सामवेद

४)अथर्ववेद


१) ऋग्वेद (Rigveda)

हा सर्वात प्राचीन वेद आहे.

याचा मुख्य विषय आहे :

-देवतांची स्तुती (इंद्र, -अग्नी, वरुण,इ.).

-सृष्टीचे रहस्य.

-जीवन आणि निसर्ग.

स्वरूप:

१० मंडल (chapters),

सुमारे १०,५८० मंत्र.

वैशिष्ट्य:

“ज्ञान आणि काव्य” यांचा संगम,

आध्यात्मिक विचारांची सुरुवात इथून होते.

उदाहरण:

“एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति”

(सत्य एक आहे, पण ज्ञानी त्याला अनेक नावांनी ओळखतात.)


२) यजुर्वेद (Yajurveda)

हा कर्मकांड आणि यज्ञांचा वेद आहे.

याचा मुख्य विषय आहे:

-यज्ञ कसे करावे?

-विधी, नियम, मंत्र.

याचे दोन प्रकार आहेत :

१)शुक्ल यजुर्वेद (स्पष्ट, व्यवस्थित).

२)कृष्ण यजुर्वेद (मिश्र स्वरूप).

वैशिष्ट्य:

“कर्मयोग” ची पायाभरणी

कृतीतून शुद्धी.

साधा अर्थ: “योग्य कृती म्हणजेच पूजा.”


३) सामवेद (Samaveda)

हा  संगीताचा वेद आहे.

याचा मुख्य विषय आहे :

-मंत्रांचे “गायन”

-संगीताच्या स्वरात उपासना.

वैशिष्ट्य:

भारतीय संगीताची मुळे इथे या वेदात आहेत.

बहुतेक मंत्र ऋग्वेदातून घेतलेले आहेत.

साधा अर्थ: “भक्ती + संगीत = आत्मानुभव.”


४) अथर्ववेद (Atharvaveda)

हा जीवनोपयोगी वेद आहे.

मुख्य विषय:

-आरोग्य, औषध.

-गृहजीवन, समाज.

-मन, ऊर्जा, संरक्षण.

वैशिष्ट्य:

सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित

आध्यात्मिक + व्यावहारिक ज्ञान.

साधा अर्थ: “दैनंदिन जीवनात आध्यात्म महत्वाचे आहे .”


प्रत्येक वेदात वेदाचे चार भाग आहेत.

प्रत्येक वेद चार स्तरांमध्ये समजला जातो:

१) संहिता-

मंत्र आणि स्तोत्रे.

२) ब्राह्मण-

विधी आणि यज्ञांचे स्पष्टीकरण.

३) आरण्यक-

ध्यान आणि अंतर्मुखता.

४) उपनिषद-

“मी कोण आहे?” याचे उत्तर

आत्मा आणि ब्रह्म यांचे ज्ञान.


वेदांचा मुख्य संदेश (सार)-

१. सत्य एक आहे.

२. आत्मा अमर आहे.

३. कर्म महत्वाचे आहे.

४. ज्ञान आणि ध्यान आवश्यक आहे.

५. “तत्त्वमसि” – तूच परमसत्य आहेस.


शेवटचा सार

ऋग्वेद = ज्ञान

यजुर्वेद = कर्म

सामवेद = भक्ति

अथर्ववेद = जीवन

आणि हे चार मिळून:  “पूर्ण जीवनाचा आध्यात्मिक अर्थ ” तयार करतात.


सहजयोग्यांसाठी महत्वाचे -

*वेद आणि सहजयोग – यामधील मूलभूत संबंध काय आहे.*


वेद हे “सिद्धांत” (Theory) आहेत.

तर सहजयोग हा “अनुभव” (Experience) आहे.


म्हणजेच: वेद सांगतात काय आहे.

आणि सहजयोग दाखवतो ते कसे अनुभवायचे.

१) वेदांतील “आत्मज्ञान” आणि सहजयोगातील " आत्मसाक्षात्कार "

वेदांचा मुख्य प्रश्न आहे: “मी कोण आहे?” (कोहं?)

याचे उत्तर उपनिषदांत दिले आहे ते खालीलप्रमाणे :  “तत्त्वमसि” – तूच ते परमसत्य आहेस.


सहजयोगात: आपण “Self Realization” (आत्मसाक्षात्कार) अनुभवतो.

कुंडलिनी जागृतीमुळे “मी आत्मा आहे.” याची जाणीव होते.


म्हणजेच : वेदांचे ज्ञानाचा सहजयोगात प्रत्यक्ष अनुभव येतो .


२) वेद आणि कुंडलिनी शक्ती.

वेदांमध्ये “आदिशक्ति” किंवा “दिव्य ऊर्जा” याचा उल्लेख आहे.

उदाहरण:

ऋग्वेदात “शक्ति” आणि “अग्नि” यांचा उल्लेख आहे.


सहजयोगात: हीच शक्ति = कुंडलिनी जी मणक्याच्या तळाशी सुप्त अस्वस्थेत असते.

कुंडलिनी जागृती झाल्यावर:

चैतन्य लहरींचा (vibrations) अनुभव येतो.

चक्र शुद्ध होतात.

आत्मसाक्षात्कार होतो.


३) सामवेद आणि ध्यान-

सामवेद म्हणतो:  संगीत आणि स्वरातून ईश्वराशी एकरूप व्हा.

सहजयोगात: भारतीय शास्त्रीय संगीत, भजन, नाद, संतुलन,चैतन्य आहे.

ध्यानात “अनाहत नादचा” अनुभव येतो.

म्हणजे: सामवेद = भारतीय शास्त्रीय संगीताच्या  माध्यमातून ध्यानाचा अनुभव घेणे.


४) यज्ञ आणि सहजयोग-

यजुर्वेदात: यज्ञ म्हणजे शुद्धीकरण प्रक्रिया

सहजयोगात:

हवन विधी केला जातो .

“अंतर्गत यज्ञ” (Inner purification)

उदा: चक्र शुद्धीसाठी संतुलन,ध्यान,

पूजा, केली जाते.

तमो,रजो गुणातील 

दोषांचा त्याग केला जातो.

अहंकार व कंडिशनिंग कमी होते .

म्हणजे: यज्ञ = अंतर्मन शुद्धी.


५) अथर्ववेद आणि जीवन.

अथर्ववेद: आरोग्य, मन, ऊर्जा, संरक्षण.

सहजयोगात: ध्यान द्वारा :

आरोग्य सुधारणा

मानसिक शांतता

बौद्धिक सुधारणा

आध्यात्मिक उन्नती होते.

म्हणजे: आध्यात्म + दैनंदिन जीवन = एकत्र जोडले जाते.


६) वेदातील “चैतन्य” आणि सहजयोग.

वेद: सर्वत्र “चैतन्य” (Divine consciousness)

सहजयोग:हातावर, टाळूवर थंड चैतन्य लहरीं जाणवतात.


म्हणजे: “चैतन्य” आता अनुभवण्याजोगे होते.


अंतिम सार-

वेद म्हणतात:

“तू परमात्म्याचा अंश आहेस.”

सहजयोग आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे हा अनुभव देतो:

“होय, मी तेच आहे.”


परम पूज्य श्री माताजी म्हणतात ब्राम्हण म्हणजे ज्याने ब्रह्म जाणले आहे तो. सहजयोगामुळे सहजयोग्यांना हे ब्रह्म ज्ञान अगदी सहज मिळालेले आहे.


जय श्री माताजी!

संकलन,संपादन ...

योगीराज देवकर.

सुशिक्षित ते निवृत्त - एक अनुभव

 सुशिक्षित ते निवृत्त - एक अनुभव .


व्यक्ती पदवीधारक ,उच्च पदवीधारक अगदी डॉक्टरेट होऊन एकतर रोजगाराची किंवा स्वयंरोजगाराची पात्रता निर्माण करतो. पात्रतेच्या निकषांच्या आधारावर त्याला नोकरी मिळते. नोकरीला फक्त इतकेच पुरेसे नसते. मग तो एम्प्लॉयर प्रोबेशन पिरियड मध्ये या व्यक्तीला जॉब संबंधित प्रशिक्षण देतो,ठराविक कालावधीसाठी वरिष्ठांच्या हाताखाली काम करायला लावतो. हा त्याचा उमेदवारीचा काळ असतो. व्यक्ती इंडिपेंडंटली काम करू शकेल अशी खात्री पटली की, ज्युनियर लेवलवर इंडिपेंडंट जबाबदारी देऊन काम सुरू होते. 


काहीच बदलांना सामोरे जाणाऱ्या किंवा सतत सुधारणा होत असलेल्या ऑर्गनायझेशन्सचा अपवाद वगळला तर बहुतेक व्यक्ती प्रोबेशन आणि सुरुवातीच्या पहिल्या वर्षात जे शिकलेले असतात तेच निवृत होईपर्यंत करत असतात. थोडक्यात त्यांचा अनुभव असतो पहिल्याच वर्षाचा निवृत होईपर्यंत तो चौतीस, पस्तीस वेळा रिपीट झालेला असतो ,पण ते मात्र फुशारकी मारत असतात,मला इतक्या,इतक्या वर्षांचा कामाचा अनुभव आहे. 


केवळ म्हणायला आणि दाखवायला एम्प्लॉयरला सगळे अधिकारी,

कर्मचारी सारखेच असतात.पण त्यातले साधारणपणे वीस टक्के जास्त सारखे असतात.जास्त पात्र किंवा योग्य असतात. हेच ते वीस टक्के कर्मचारी असतात जे ऑर्गनायझेशनचे ८०  टक्के काम करत असतात, उरलेले ८० टक्के कर्मचारी २० टक्के काम करतात. बहुतेक संस्थेत असे अगदी Pareto Principle ला साजेसे घडत असते.


संस्थेच्या धोरणानुसार एम्प्लॉयर जॉबमधे अधिक सक्षम व्हायची संधी सर्वांनाच देतो पण जेव्हा त्याच्या लक्षात येते की,काही व्यक्ती प्रशिक्षणासाठी पाठविल्यावर फक्त वजन वाढवून परत येत आहेत तेव्हा तो विशेषतः ज्ञान वाढवून येणाऱ्या या वीस टक्के एम्प्लॉयीजची पात्रता वाढविण्याचा प्रयत्न करतो.  ऑर्गनायझेशन मध्ये नवीन शिकण्याची, प्रश्न सोडवायची , प्रयोग करायची, आहे त्यापेक्षा अधिक चांगले काम करायची , रिझल्ट प्रोड्युस करायची आणि विशेषतः संस्थेच्या बाहेरील आणि आतील ग्राहकास खूष करायची  आवड असणारे काही कर्मचारी असतात.अशा कर्मचाऱ्यांना संस्था 

स्थानिक, राज्य,देश विदेशात प्रशिक्षणाची संधी देते. यातले दोन,चार टक्के लोकं ऑर्गनायझेशन मध्ये त्यांच्या विषयातील तज्ञ बनतात,त्यातील काहींना 

तर त्या विषयाचे विस्डम प्राप्त होते.


एखाद्या कर्मचाऱ्याला असे हे विस्डम सहजासहजी  प्राप्त होत नसते . 


या विस्डोमिस्ट लोकांना आयुष्यात बराच त्याग करावा लागतो.कुटुंब,घर, 

नातेवाईक,सण समारंभ,मौजमजा, इत्यादीकडे दुर्लक्ष होणे, मुलांना वेळ देता न येणे, खूप प्रवास करावा लागणे,१० ते ६ नव्हे तर तहान - भूक विसरून दिवसाचे कितीही तास झोकून दिल्यासारखे काम करणे, नवीन शिक्षण,प्रशिक्षण, वाचन,मनन,चिंतन, अभ्यास, लिखाण, जे शिकलोय त्याचा प्रभावी वापर , सतत नंबर गेम मध्ये टिकून राहण्यासाठी वेळ,पैसे,श्रम खर्च करणे, आरोग्याकडे दुर्लक्ष होणे, स्वतःची मते बाजूला ठेवून संस्थेच्या ध्येय धोरणांना पाठिंबा देणे,  हे आणि असे कितीतरी त्याग कळत ,न कळत झालेले असतात.


आता तुम्ही संस्थेत वरिष्ठ असता. हा तुमचा भरभराटीचा काळ असतो. तुम्हाला संस्थेत आणि संस्थे बाहेरही मान,सन्मान असतो. तुमचं आयुष्य म्हणजे संस्थेने नेमून दिलेले आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त काम करणे, निमंत्रणे, मार्गदर्शन,हार,तुरे,शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह, पुरस्कार,ऑटोग्राफ,फोटो, बातम्या, आज या पंचतारांकित हॉटेलमध्ये तर उद्या त्या मध्ये सेमिनार अटेंड करायचे योग येत  असतात. संस्था तुमच्यावर खर्च करते कारण त्याच पटीत तुम्ही त्यांचा लाभ करून देत असता.


जसेकाही तुम्हीच या संस्थेचे प्रमुख आहात आणि राज्याच्या,देशाच्या विकासाची जबाबदारी तुमच्याच खांद्यावर आहे अशा थाटात तुम्ही वागत असता. चौतीस, पस्तीस वर्षापूर्वी पेटविलेल्या या खोंडाला वयाची अठ्ठावणं वर्षे कधी पूर्ण होतात ते समजत पण नाही. संस्थेत तुमचा औपचारिक निरोप समारंभ होतो. तुम्ही कसे श्रेष्ठ आहात,मार्गदर्शक,

गुरु आहात असे भाग्याचे बोल ऐकायला मिळतात आणि तुम्ही घरी जाता,ते उद्यापासून पुन्हा या संस्थेत परत यायचे नाही त्यासाठी. 


पुढचे काही महिने तरी तुम्हाला तुम्ही संस्थेचे काम करत असल्याची स्वप्न पडतात. स्वप्नातच तुम्हाला जो प्रतिसाद मिळतो त्यामुळे खुष होत असता. थोड्याच दिवसात तुमच्या हे लक्षात येते की,विषयातला तज्ञ, विस्डोमिस्ट हे सगळं त्या संस्थेपुरते मर्यादित होते. बाहेरच्या जगात याला फारसी किंमत नाही. 


आता तुम्हाला पटते की, एकाच विषयाचा तज्ञ असून काही उपयोग नाही. तुम्ही चार,पाच विषयातले तज्ञ असायला पाहिजे होते. एकापेक्षा जास्त कामांसाठी पात्र असायला पाहिजे होते म्हणजे तुम्हाला अजूनही बिझी राहायला वाव मिळाला असता. काहीतरी इन्कम सोर्स सुरू राहिला असता.  मग काय शोधून काढायचे अर्थवट राहिलेले छंद आणि गुंतवून ठेवायचे स्वतःला त्यात. 


आता तुमच्या घरात नव्या पिढीचा उदय झालेला असतो. एका बाजूला त्यांना त्यांची स्पेस निर्माण करायची असते. त्यांना स्वतःला स्पेस हवी असते आणि तुमची स्पेस कमी ,कमी होत जाते. इतकी की,तुमची लायब्ररी,तुमचे  मोमेंटोज,पुरस्कार घरात एक समृद्ध अडगळ होते.  तुम्ही कितीही अजून जेष्ठ नागरिक झालो नाही, फिट अँड फाइन आहात असा प्रयत्न केला तरी लोकं तुम्हाला पदोपदी हे जाणून देतात की,तुम्ही आता इतिहास झाले . 


भारतात राहून आपण नुसत्याच जपानच्या ' इकीगाई ' च्या गप्पा मारायच्या आणि ज्येष्ठांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि मनुष्य संसाधनांचा उपयोग नाही करायचा जे विसंगत वाटते.


योगीराज देवकर.

Sunday, 10 May 2026

शोध मी कोण आहे स्व संकल्पनेचा

 शोध ' मी कोण आहे?' या स्व संकल्पनेचा.


प्रत्येक माणूस स्वतःबद्दल काही विचार,विश्वास,

प्रतिमा आणि प्रतिभा बाळगत असतो — यालाच स्व-संकल्पना ( Self concept ) असे म्हणतात.

मी कोण आहे? हा प्रश्न फार प्राचीन काळापासून विचारला जात आहे.


वेदा मधील उपनिषदात याला “कोहं?” (मी कोण ?)तर 

आधुनिक मानसशास्त्रात याला  “Self Identity”स्व-ची ओळख समजले जाते.


स्व-संकल्पना म्हणजे काय? तर ' स्वतःबद्दलची एकूण समज, भावना आणि मूल्यांकन म्हणजे स्व-संकल्पना.' 

व्यक्तिमत्व आणि स्व संकल्पना या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. व्यक्तिमत्व म्हणजे इतरांना माहीत असलेले तुम्ही आणि स्व संकल्पना म्हणजे तुम्हाला माहीत असलेले तुम्ही.


स्व मध्ये तीन मुख्य घटक असतात:

१) Self-Image (स्व-प्रतिमा)

मी स्वतःला कसा पाहतो?

उदा. “मी हुशार आहे.”, “मी लाजाळू आहे.”

२) Self-Esteem (स्व-मूल्य)

मी स्वतःला किती महत्व देतो?

उदा. “मी योग्य आहे./नाही.”

३) Ideal Self (आदर्श स्व)

मला कसा व्हायचं आहे?

उदा. “मला आत्मविश्वासी ,आत्मनिर्भर व्हायचं आहे.”


“मी कोण आहे?” विरुद्ध “मी काय आहे?”

प्रश्न-मी कोण आहे?

याचा अर्थ- तुमची ओळख (Identity) – जी तुमची भूमिका, नाती, व्यक्तिमत्त्व याद्वारे निर्माण होते.

प्रश्न - मी काय आहे?

याचा अर्थ - तुमचे अस्तित्व (Existence) –जे तुमचे  शरीर( Body), मन ( Mind), आणि  आत्मा( Soul) दर्शविते.

उदाहरण:

“मी प्रशिक्षक आहे.” ही  भूमिका झाली.

“मी माणूस आहे.” हे  अस्तित्व झाले.

“मी आत्मा आहे” हा  आध्यात्मिक दृष्टिकोन झाला.


स्व-संकल्पना कशी तयार होते?

१) कुटुंब आणि बालपण,

आई-वडिलांचे शब्द, वागणूक.

२) समाज आणि संस्कृती,

समाजातील अपेक्षा, तुलना.

३) अनुभव- (Experiences)

यश/अपयश.

४) शिक्षण आणि मित्र-

Feedback आणि interaction.


मानसशास्त्रीय दृष्टिकोन-

१) Humanistic Theory- 

मानसशास्त्रज्ञ Carl Rogers

त्यांनी सांगितले:

Real Self v/s Ideal Self

दोघांमध्ये अंतर असेल तर तणाव निर्माण होतो.

२) Social Identity Theory- 

आपण समाजकारण,राजकारण,अर्थकारण, वारकरी, आध्यात्मिक पंथ,  कोणत्या गटात आहोत यावर आपली ओळख ठरते.


“कोहं?” (Ko’ham) -

याचा संस्कृत अर्थ:

“को” = कोण.

“अहम्” = मी.

“कोहं?” = मी कोण ? असा आहे.

१) उपनिषदांमध्ये हा प्रश्न का विचारला गेला?

तर स्वतःचा खरा शोध (Self-inquiry) घेण्यासाठी विचारला गेला आहे.

माणूस स्वतःला ओळखतो असे वाटते,पण बहुतेक वेळा तो नाव,व्यवसाय,

नाती यालाच ' मी ' समजतो.

उपनिषद म्हणते :

हे सगळं तात्पुरतं आहे — खरा ' मी ' यापेक्षा  काहीतरी वेगळं आहे.

२) ' कोहं? ' हा एक प्रक्रिया (Process) आहे.हा प्रश्न एकदा विचारून संपत नाही —

तो सतत स्वतःला विचारायचा आहे.


Step-by-step Self-Inquiry: कशी करावी.

मी शरीर आहे का?

शरीर बदलतं (लहानपण ,मोठेपण, म्हातारपण)

मग मी शरीर नाही.


मी मन/विचार आहे का?

विचार येतात-जातात

मग मी विचार नाही.


मी भावना आहे का?

भावना बदलतात.

मग मी भावना नाही.


मग प्रश्न उरतो:“हे सगळं पाहणारा कोण?”

उत्तर:तो observer म्हणजेच “खरा मी.”


उदाहरण:चित्रपट स्क्रीन. उदाहरण:स्क्रीनवर चित्रपट चालतो (दृश्ये, भावना, कथा)

पण स्क्रीन स्वतः बदलत नाही.

चित्रपट = आपले विचार, भावना, जीवन.

स्क्रीन = 'मी '(साक्षीभाव).

शेवटी 'शुद्ध जाणीव ' (pure awareness) उरते ती तुम्ही.


भारतीय तत्त्वज्ञानातील दृष्टिकोन -

१ ) वेदा मधील उपनिषद – “तत्त्वमसि.”याचा अर्थ:

“तूच ते आहेस.” — म्हणजे व्यक्ती (individual self) आणि परम सत्य (ultimate reality) एकच आहेत.

सखोल समज-

“तत्त्व” = अंतिम सत्य (ब्रह्म).

“त्वम्” = तू (जीव/व्यक्ती).

“असि” = आहेस.

म्हणजे-तुझ्या आतच परम सत्य आहे — तू वेगळा नाहीस.


मानसशास्त्रीय अर्थ:

आपली ओळख फक्त नाव, काम, भूमिका इतकी मर्यादित नाही.

आपल्या आत गाभ्यात एक, स्थिर, शांत ‘स्व’ आहे.

उदाहरण:

लाट आणि समुद्र

लाट वेगळी दिसते, पण ती समुद्रच आहे.

अगदी तसंच आपण “वेगळे” वाटतो, पण मूळ "एकच चेतना" आहे.


२) “Each soul is potentially divine .”

याचा अर्थ:

प्रत्येक व्यक्तीमध्ये दैवी शक्ती (infinite potential) आहे.

सखोल समज:

आपण बाहेरून कमजोर, घाबरलेले, गोंधळलेले वाटू शकतो.

पण आतून तुमच्यात :

क्षमता (potential)

शक्ती (power)

ज्ञान (wisdom)

मूळ आधीपासूनच आहे.

तेव्हा "स्वतःवर विश्वास ठेवा".

उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका.”


मानसशास्त्रीय connection:

Self-confidence = Self-concept वर आधारित आहे.

जर तुम्ही स्वतःला “कमकुवत” समजाल तर तसेच वागाल.

जर “divine potential” मानाल तर प्रगती होईल.

उदाहरण:बीज (seed) → झाड (tree).

बीजामध्ये आधीपासून झाडाची क्षमता असते.


३) भगवद्गीता – शरीर, मन आणि आत्मा.

मुख्य कल्पना:

आपण तीन स्तरांवर आहोत:

शरीर (Body)

मन (Mind)

आत्मा (Soul)

१) शरीर (Body)-

दिसणारे, बदलणारे आहे.

जन्म → वाढ → मृत्यू.

“मी शरीर नाही, शरीर माझं आहे.”

२) मन (Mind)-

विचार, भावना, इच्छा

सतत बदलत असतात.

“माझे विचार बदलतात, म्हणजे मी विचार नाही.”

३) आत्मा (Soul)-

स्थिर, शाश्वत, शांत

न बदलणारा “खरा मी.”

गीतेतील विचार:

आत्मा न जन्मतो, न मरतो

शरीर बदलते, पण आत्मा कायम असतो.तेव्हा “मी शरीर नाही, मी आत्मा आहे.”


मानसशास्त्रीय अर्थ:

आपण स्वतःला शरीर किंवा विचारांशी identify करतो,

त्यामुळे:

stress

fear

insecurity येते.

पण जर “मी observer आहे.” हे समजलं तर clarity येते.

उदाहरण:

आकाश आणि ढग

ढग = विचार, भावना आहेत.

तर आकाश = आत्मा आहे. ढग येतात-जातात, आकाश कायम राहते.


स्व-संकल्पनेचे दोन प्रकार

१)Positive Self-Concept -

आत्मविश्वास, स्पष्टता.

२)Negative Self-Concept -

न्यूनगंड, गोंधळ.


स्व-संकल्पना का महत्त्वाची आहे?

निर्णय घेण्यावर परिणाम,

करिअर निवड,

नातेसंबंध,

मानसिक आरोग्य.


स्व-संकल्पना सुधारण्यासाठी- Practical Techniques

१)Self-Reflection (स्व-चिंतन) Self Instrospection (आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण )

रोज 10 मिनिटे:

“आज मी काय शिकलो?”

२)Journaling

स्वतःबद्दल लिहिणे.

३)Meditation (ध्यान)निर्विचार येतो,

विचारांची स्पष्टता वाढते.

४)Feedback घेणे

इतरांच्या दृष्टीकोनातून स्वतःला समजणे.


“मी कोण आहे?” हे एकदाच मिळणारे उत्तर नाही — हा एक प्रवास आहे.

स्व-संकल्पना वाढते आणि विकसित होते.

स्वतःला ओळखणे म्हणजे यशस्वी जीवनाची पूर्ती.


संकलन, संपादन...

योगीराज देवकर.

Monday, 23 February 2026

सहजयोग

 जय श्री माताजी!


परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी यांनी मानवजातीला दिलेली भव्य भेट म्हणजे सहजयोग. श्री माताजींनी जगाला सहजयोग दिला ,आता तो घेण्याची जबाबदारी आपली आहे.

( २१ मार्च १९२३ - २३ फेब्रुवारी २०११)


सहजयोग हा, कुंडलिनी जागृती, आत्मसाक्षात्कार,

निर्विचार समाधी, अंतर्गत शुद्धी आणि सामूहिक  वैश्विक दैवी चैतन्य यांवर आधारित आहे. 


सदर आध्यात्मिक ज्ञान अनुभवप्रधान आहे—इथे विश्वासापेक्षा अनुभूतीला प्राधान्य आहे.


1) आत्मसाक्षात्कार –हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे.

“Self-realization is not a myth; it is your right.”

मानवामध्ये सुप्त असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होऊन सहस्त्रारातून आत्मसाक्षात्कार देते—हा प्रत्यक्ष अनुभव आहे.


2) कुंडलिनी जागृती – सहज, सुरक्षित आणि नैसर्गिक.

कठोर साधना, तप, संन्यास आवश्यक नाही.

सहज (Spontaneous) पद्धतीने, गुरुकृपेने कुंडलिनी जागृत होते.


3) निर्विचार समाधी (Thoughtless Awareness)

विचारांच्या पलीकडे जाणे म्हणजेच ध्यान.

या अवस्थेत:

मन शांत

चित्त प्रसन्न

अंतःकरण शुद्ध

आत्म्याशी प्रत्यक्ष संपर्क.


4) अद्वैताचा प्रत्यक्ष अनुभव

आत्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य अनुभवाने कळते.

हे तत्त्वज्ञान विवादाने नव्हे, अनुभूतीने सिद्ध होते.


5) चक्र आणि नाड्यांचे ज्ञान

मानव देहातील सात चक्रे आणि तीन नाड्या शुद्ध झाल्या की:

शारीरिक,

भावनिक,

बौध्दिक,

आध्यात्मिक, संतुलन प्राप्त होते.


6) नैतिकता – परिणाम म्हणून: नियम म्हणून नव्हे,

नैतिकता उपदेशातून नव्हे, तर आत्मसाक्षात्कारानंतर नैतिकता स्वाभाविकपणे प्रकट होते.

अहंकार व सुप्तगंड (ego–superego) संतुलित होतात.


7) सामूहिक चेतना (Collective Consciousness)

स्वतःच्या प्रगतीबरोबरच सर्वांच्या कल्याणाची जाणीव निर्माण होते.

स्वार्थातून विश्वार्थाकडे प्रवास होतो.


8) सर्वधर्मसमन्वय: 

श्री माताजींनी सर्व धर्मगुरूंना एकाच उत्क्रांतीच्या प्रवासातील अवतार मानले आहे—

त्यांचे सार सहजयोगात अनुभवास येते. Sahajayoga is best of all religions .


9) वैज्ञानिक आणि सार्वत्रिक अध्यात्म

सहजयोग:

अंधश्रद्धा नाही,

पैसे लागत नाहीत,

सदस्यत्व नाही,

सर्व मानवांसाठी खुले.


थोडक्यात सारांश

माताजी श्री निर्मला देवी यांचे तत्त्वज्ञान म्हणजे—

“आत्मसाक्षात्काराद्वारे सत्याचा प्रत्यक्ष अनुभव.”

“तुम्ही आत्मा आहात—हे जाणणे नव्हे, अनुभवणे.”

“जागतिक परिवर्तन स्वतःच्या अंतर्गत परिवर्तनातून.”


जय श्री माताजी!

Thursday, 19 February 2026

सहस्त्रार् चक्र

 गुणांबद्दल बोलू काही!

सहस्त्रार चक्र : सातवे चक्र.


सहस्त्रार चक्र सर्व चक्रांचे संयोगबिंदू आहे. इथेच व्यक्तीचा अहं आणि चित्त विलीन होऊन परम चैतन्याशी एकरूप होते .


या चक्राचे प्रमुख गुण एकाकारिता, समग्रता, शांती आणि निरानंद हे आहेत. 


१) एकाकारिता: (Integration / Oneness):


एकाकारिता म्हणजे आतल्या आणि बाहेरच्या जीवनात असलेली तूट नाहीशी होणे. ज्ञान, भावना आणि कृती यांच्यात समन्वय निर्माण होतो. “मी” आणि “ते” असा भेद कमी होत जातो.आत्मा आणि परमात्मा यांच्या भेटीचा योग येतो .


विभक्त मनामुळे संघर्ष, दुटप्पीपणा व अस्वस्थता निर्माण होते. सहस्त्रारातील एकाकारिता व्यक्तीला समग्र, प्रामाणिक आणि नैसर्गिक बनवते.


२)समग्रता: (Wholeness):


समग्रता म्हणजे जीवनाकडे तुकड्यांत नव्हे तर पूर्णतेने पाहण्याची क्षमता. सहस्त्रार चक्र खुले झाल्यानंतर मनुष्य केवळ स्वतःच्या फायद्यापुरता विचार करत नाही; तो व्यापक कल्याणाचा दृष्टिकोन स्वीकारतो.


३) शांती :(Inner Peace):


सहस्त्रार चक्राचा सर्वात जाणवणारा गुण म्हणजे अंतःशांती. ही शांती बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते.


४) निरानंद :(Nirānand / Thoughtless Bliss):


निरानंद म्हणजे कारणाशिवाय येणारा, विचारांच्या पलीकडचा आनंद. हा भौतिक सुखासारखा क्षणभंगुर नसतो.


माणूस सतत आनंदाचा शोध बाहेर घेतो—संपत्ती, प्रतिष्ठा, नातेसंबंध यांत. निरानंद अनुभवलेला मनुष्य मात्र आतून तृप्त असतो. त्यामुळे त्याच्यात लोभ, भीती व असुरक्षितता कमी होते आणि जीवन सहज, निर्मळ बनते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा .

Sahajayogapune.org 

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Wednesday, 18 February 2026

आज्ञा चक्र

 गुणांबद्दल बोलू काही!

आज्ञा चक्र : सहावे चक्र.


क्षमाशीलता हा गुण मानवी उत्क्रांतीचा मौन द्वार आहे.आज्ञा चक्र  विचारांच्या पलीकडील शांततेचे, अहंकार-प्रति अहंकाराच्या  अतिक्रमणाचे आणि क्षमाशीलतेचे केंद्र आहे.


क्षमाशीलता म्हणजे दुर्बलता नव्हे, ती आंतरिक सामर्थ्याची, परिपक्वतेची आणि जागरूकतेची निशाणी आहे. क्षमा म्हणजे अन्यायाचे समर्थन करणे नव्हे, तर डोक्यातला भार सोडून देणे, भूतकाळातील जखमांपासून स्वतःला मुक्त करणे होय.


आज्ञा चक्रावर दोन मोठे अडथळे असतात—

अहंकार (Ego) : “मी बरोबर, तू चूक.”

प्रति अहंकार , ममत्व (Superego) : अपराधभाव, दु:ख, भूतकाळातील साठलेली वेदना.

जेव्हा आपण क्षमा करत नाही, तेव्हा हे इगो, कंडिशनिंग हे अडथळे अधिक घट्ट होतात आणि कुंडलिनीचा प्रवाह आज्ञा चक्रावर अडकतो. परिणामतः मन अस्वस्थ होते , विचार अतिरेकाकडे वळतातआणि ध्यानात अडथळे निर्माण होतात.


श्रीमाताजी स्पष्टपणे सांगतात —

“क्षमाशीलता ही सर्वात मोठी शक्ती आहे.”

क्षमा केल्याने आज्ञा चक्र तत्क्षणी मोकळे होते,इगो,सुपर इगोचा फुगा फुटतो ,कुंडलिनी सहजपणे सहस्राराकडे जाते,विचार थांबतात, निर्विचार समाधीचा अनुभव येतो,

अंतर्मन शांत, हलके व आनंदी होते.


मानसिक आरोग्यासाठी

राग, द्वेष, आकस हे दीर्घकाळ मनात साठले तर ताणतणाव, असंतोष, नैराश्य निर्माण होते. क्षमा ही यावरचे नैसर्गिक औषध आहे.


क्षमाशील व्यक्ती सहजपणे साक्षीभावात स्थिर राहते. क्षमेमुळे नाती तुटत नाहीत; ती अधिक परिपक्व व नि:स्वार्थ होतात.


जिथे क्षमा आहे तिथे संघर्ष टिकत नाही. वैयक्तिक क्षमा हीच सामाजिक शांतीची बीजं पेरते.


क्षमेशिवाय ध्यान खोल जात नाही,

क्षमेशिवाय आत्मसाक्षात्कार स्थिर राहत नाही,

क्षमेशिवाय सहज आनंदाचा अनुभव क्षणिक ठरतो.

म्हणूनच आज्ञा चक्राच्या शुद्धीकरणासाठी सहजयोगात प्रथमच सांगितले जाते : म्हणा

“मी सर्वांना मनापासून क्षमा केली आहे .”आणि "हे परमेश्वरा,माझ्याकडून कळत ,नकळत , जाणते, अजाणतेपणी ज्या चुका झाल्या असतील त्यासाठी मला क्षमा कर."


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -

Sahajayogapune.org 

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

विशुद्धी चक्र

 गुणांबद्दल बोलू काही !

विशुद्धी चक्र: पाचवे चक्र.


मानवी सूक्ष्म शरीरातील विशुद्धी चक्र हे कंठप्रदेशात स्थित असून, ते संवाद, अभिव्यक्ती, सामूहिकता आणि साक्षीभाव यांचे केंद्र मानले जाते. व्यक्तीची अंतर्गत शुद्धता आणि बाह्य व्यवहार यांचा सेतू म्हणून विशुद्धी चक्र कार्य करते. या चक्राचे संतुलन म्हणजे केवळ चांगली वाणी नव्हे, तर शुद्ध विचार, सत्यनिष्ठ कृती आणि सामूहिक चेतनेशी जोडलेपण होय.


१) सामूहिकता:


विशुद्धी चक्राचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे सामूहिकता. “मी”पणातून “आपण”कडे नेणारी ही चेतना आहे. व्यक्ती स्वतःला समाजाचा, कुटुंबाचा, राष्ट्राचा , संपूर्ण विश्वाचा ,आणि अखेरीस संपूर्ण मानवजातीचा भाग समजू लागते. याचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे आत्मा परमात्म्याशी सामूहिक होणे.सामूहिकतेमुळे अहंकार विरघळतो, मतभेद कमी होतात आणि सहकार्य, सहानुभूती व समन्वय वाढतो. 


२) साक्षीभाव:


साक्षीभाव म्हणजे परिस्थिती, भावना व विचार यांना आसक्त न होता निरीक्षण करण्याची क्षमता. विशुद्धी चक्र शुद्ध असले की व्यक्ती प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देऊ लागते.

यामुळे मानसिक स्थैर्य, विवेक आणि शांतता प्राप्त होते. साक्षीभावामुळे व्यक्ती नात्यांमध्ये समतोल राखते, वाद टाळते आणि सत्याला समजून घेण्याची क्षमता वाढवते.


३) बोलण्यातील माधुर्य:


शब्द हे केवळ ध्वनी नसून ते ऊर्जा वाहक असतात. विशुद्धी चक्र संतुलित असले की वाणीत माधुर्य, नम्रता आणि सौम्यता येते.

अशा व्यक्तीची वाणी मनाला स्पर्श करते, संघर्ष शमवते आणि विश्वास निर्माण करते. कठोर सत्यसुद्धा प्रेमपूर्वक मांडण्याची कला याच चक्रातून विकसित होते.


४) व्यवहार चातुर्य व संपर्क कुशलता: 


विशुद्धी चक्र व्यक्तीला योग्य वेळी ,योग्य शब्द,योग्य पद्धतीने सुसंवाद साधण्याची बुद्धी देते.

यामुळे  सामाजिक स्वीकार, नातेसंबंधांची दृढता आणि व्यावसायिक यश वाढते. संवादातील स्पष्टता गैरसमज टाळते व विश्वास निर्माण करते.


५) कुटनितिज्ञता: (राजनैतिक/सामाजिक सूज्ञता):


कुटनितिज्ञता म्हणजे फसवणूक नव्हे, तर परिस्थितीची अचूक जाण ठेवून शहाणपणाने वागण्याची क्षमता. विशुद्धी चक्र जागृत असलेली व्यक्ती शब्दांचा गैरवापर न करता, सत्याशी प्रामाणिक राहूनही परिस्थिती हाताळू शकते.

हा गुण

कौटुंबिक,सामाजिक समन्वय, प्रशासन आणि नेतृत्व यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.


६) सत्यनिष्ठा: 


येथे सत्य म्हणजे केवळ खोटे न बोलणे नव्हे, तर विचार, बोलणे आणि कृती यातील एकरूपता होय .

सत्यनिष्ठ व्यक्तीवर समाज विश्वास ठेवतो.  अंतःकरणात अपराधभाव नसल्याने मानवाचे जीवन हलके, निर्भय व आनंदी होते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -

Sahajayogapune.org 

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.