सुशिक्षित ते निवृत्त - एक अनुभव .
व्यक्ती पदवीधारक ,उच्च पदवीधारक अगदी डॉक्टरेट होऊन एकतर रोजगाराची किंवा स्वयंरोजगाराची पात्रता निर्माण करतो. पात्रतेच्या निकषांच्या आधारावर त्याला नोकरी मिळते. नोकरीला फक्त इतकेच पुरेसे नसते. मग तो एम्प्लॉयर प्रोबेशन पिरियड मध्ये या व्यक्तीला जॉब संबंधित प्रशिक्षण देतो,ठराविक कालावधीसाठी वरिष्ठांच्या हाताखाली काम करायला लावतो. हा त्याचा उमेदवारीचा काळ असतो. व्यक्ती इंडिपेंडंटली काम करू शकेल अशी खात्री पटली की, ज्युनियर लेवलवर इंडिपेंडंट जबाबदारी देऊन काम सुरू होते.
काहीच बदलांना सामोरे जाणाऱ्या किंवा सतत सुधारणा होत असलेल्या ऑर्गनायझेशन्सचा अपवाद वगळला तर बहुतेक व्यक्ती प्रोबेशन आणि सुरुवातीच्या पहिल्या वर्षात जे शिकलेले असतात तेच निवृत होईपर्यंत करत असतात. थोडक्यात त्यांचा अनुभव असतो पहिल्याच वर्षाचा निवृत होईपर्यंत तो चौतीस, पस्तीस वेळा रिपीट झालेला असतो ,पण ते मात्र फुशारकी मारत असतात,मला इतक्या,इतक्या वर्षांचा कामाचा अनुभव आहे.
केवळ म्हणायला आणि दाखवायला एम्प्लॉयरला सगळे अधिकारी,
कर्मचारी सारखेच असतात.पण त्यातले साधारणपणे वीस टक्के जास्त सारखे असतात.जास्त पात्र किंवा योग्य असतात. हेच ते वीस टक्के कर्मचारी असतात जे ऑर्गनायझेशनचे ८० टक्के काम करत असतात, उरलेले ८० टक्के कर्मचारी २० टक्के काम करतात. बहुतेक संस्थेत असे अगदी Pareto Principle ला साजेसे घडत असते.
संस्थेच्या धोरणानुसार एम्प्लॉयर जॉबमधे अधिक सक्षम व्हायची संधी सर्वांनाच देतो पण जेव्हा त्याच्या लक्षात येते की,काही व्यक्ती प्रशिक्षणासाठी पाठविल्यावर फक्त वजन वाढवून परत येत आहेत तेव्हा तो विशेषतः ज्ञान वाढवून येणाऱ्या या वीस टक्के एम्प्लॉयीजची पात्रता वाढविण्याचा प्रयत्न करतो. ऑर्गनायझेशन मध्ये नवीन शिकण्याची, प्रश्न सोडवायची , प्रयोग करायची, आहे त्यापेक्षा अधिक चांगले काम करायची , रिझल्ट प्रोड्युस करायची आणि विशेषतः संस्थेच्या बाहेरील आणि आतील ग्राहकास खूष करायची आवड असणारे काही कर्मचारी असतात.अशा कर्मचाऱ्यांना संस्था
स्थानिक, राज्य,देश विदेशात प्रशिक्षणाची संधी देते. यातले दोन,चार टक्के लोकं ऑर्गनायझेशन मध्ये त्यांच्या विषयातील तज्ञ बनतात,त्यातील काहींना
तर त्या विषयाचे विस्डम प्राप्त होते.
एखाद्या कर्मचाऱ्याला असे हे विस्डम सहजासहजी प्राप्त होत नसते .
या विस्डोमिस्ट लोकांना आयुष्यात बराच त्याग करावा लागतो.कुटुंब,घर,
नातेवाईक,सण समारंभ,मौजमजा, इत्यादीकडे दुर्लक्ष होणे, मुलांना वेळ देता न येणे, खूप प्रवास करावा लागणे,१० ते ६ नव्हे तर तहान - भूक विसरून दिवसाचे कितीही तास झोकून दिल्यासारखे काम करणे, नवीन शिक्षण,प्रशिक्षण, वाचन,मनन,चिंतन, अभ्यास, लिखाण, जे शिकलोय त्याचा प्रभावी वापर , सतत नंबर गेम मध्ये टिकून राहण्यासाठी वेळ,पैसे,श्रम खर्च करणे, आरोग्याकडे दुर्लक्ष होणे, स्वतःची मते बाजूला ठेवून संस्थेच्या ध्येय धोरणांना पाठिंबा देणे, हे आणि असे कितीतरी त्याग कळत ,न कळत झालेले असतात.
आता तुम्ही संस्थेत वरिष्ठ असता. हा तुमचा भरभराटीचा काळ असतो. तुम्हाला संस्थेत आणि संस्थे बाहेरही मान,सन्मान असतो. तुमचं आयुष्य म्हणजे संस्थेने नेमून दिलेले आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त काम करणे, निमंत्रणे, मार्गदर्शन,हार,तुरे,शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह, पुरस्कार,ऑटोग्राफ,फोटो, बातम्या, आज या पंचतारांकित हॉटेलमध्ये तर उद्या त्या मध्ये सेमिनार अटेंड करायचे योग येत असतात. संस्था तुमच्यावर खर्च करते कारण त्याच पटीत तुम्ही त्यांचा लाभ करून देत असता.
जसेकाही तुम्हीच या संस्थेचे प्रमुख आहात आणि राज्याच्या,देशाच्या विकासाची जबाबदारी तुमच्याच खांद्यावर आहे अशा थाटात तुम्ही वागत असता. चौतीस, पस्तीस वर्षापूर्वी पेटविलेल्या या खोंडाला वयाची अठ्ठावणं वर्षे कधी पूर्ण होतात ते समजत पण नाही. संस्थेत तुमचा औपचारिक निरोप समारंभ होतो. तुम्ही कसे श्रेष्ठ आहात,मार्गदर्शक,
गुरु आहात असे भाग्याचे बोल ऐकायला मिळतात आणि तुम्ही घरी जाता,ते उद्यापासून पुन्हा या संस्थेत परत यायचे नाही त्यासाठी.
पुढचे काही महिने तरी तुम्हाला तुम्ही संस्थेचे काम करत असल्याची स्वप्न पडतात. स्वप्नातच तुम्हाला जो प्रतिसाद मिळतो त्यामुळे खुष होत असता. थोड्याच दिवसात तुमच्या हे लक्षात येते की,विषयातला तज्ञ, विस्डोमिस्ट हे सगळं त्या संस्थेपुरते मर्यादित होते. बाहेरच्या जगात याला फारसी किंमत नाही.
आता तुम्हाला पटते की, एकाच विषयाचा तज्ञ असून काही उपयोग नाही. तुम्ही चार,पाच विषयातले तज्ञ असायला पाहिजे होते. एकापेक्षा जास्त कामांसाठी पात्र असायला पाहिजे होते म्हणजे तुम्हाला अजूनही बिझी राहायला वाव मिळाला असता. काहीतरी इन्कम सोर्स सुरू राहिला असता. मग काय शोधून काढायचे अर्थवट राहिलेले छंद आणि गुंतवून ठेवायचे स्वतःला त्यात.
आता तुमच्या घरात नव्या पिढीचा उदय झालेला असतो. एका बाजूला त्यांना त्यांची स्पेस निर्माण करायची असते. त्यांना स्वतःला स्पेस हवी असते आणि तुमची स्पेस कमी ,कमी होत जाते. इतकी की,तुमची लायब्ररी,तुमचे मोमेंटोज,पुरस्कार घरात एक समृद्ध अडगळ होते. तुम्ही कितीही अजून जेष्ठ नागरिक झालो नाही, फिट अँड फाइन आहात असा प्रयत्न केला तरी लोकं तुम्हाला पदोपदी हे जाणून देतात की,तुम्ही आता इतिहास झाले .
भारतात राहून आपण नुसत्याच जपानच्या ' इकीगाई ' च्या गप्पा मारायच्या आणि ज्येष्ठांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि मनुष्य संसाधनांचा उपयोग नाही करायचा जे विसंगत वाटते.
योगीराज देवकर.
No comments:
Post a Comment