गुणांबद्दल बोलू काही !
मूलाधार चक्र :
पावित्र्याचे व अबोधितेचे पवित्र आसन म्हणजे मूलाधार चक्र.मानवी सूक्ष्म शरीर हे केवळ भौतिक रचना नसून, ते एक सूक्ष्म आध्यात्मिक यंत्रणा आहे. या सूक्ष्म प्रणालीतील सर्वात मूलभूत, पवित्र आणि संरक्षक केंद्र म्हणजे मूलाधार चक्र. याच चक्रात आदिशक्ती कुंडलिनी माता आपल्या अबोधितेच्या पूर्ण पावित्र्यात वास करते. म्हणूनच मूलाधार चक्राला सर्व धर्मांचे, सर्व संस्कारांचे आणि सर्व आध्यात्मिक उन्नतीचे मूळ मानले जाते.
१) अबोधिता : हा गुण आत्म्याचा सहज स्वभाव आहे. श्री माताजी निर्मला देवी सांगतात, “Innocence is the source of wisdom.”
अबोधिता म्हणजे बालकासारखी निष्कलंक अवस्था—जिथे मनात गणित नाही, चलाखी नाही, अहंकार नाही. ही अवस्था म्हणजे आत्म्याचा सहज, नैसर्गिक स्वभाव आहे.
मूलाधार शुद्ध असेल तर साधक विचारांच्या गुंतागुंतीत अडकत नाही. ध्यानात त्याचे मन सहज शांत होते, आणि कुंडलिनीला वर चढण्यासाठी सुरक्षित, पवित्र आधार मिळतो. अबोधिता नष्ट झाली की आध्यात्मिक प्रगती थांबते, कारण कुंडलिनी माता फक्त पवित्र व अबोध वातावरणातच जागृत राहते.
२) पावित्र्य : पावित्र्य ही कुंडलिनीचे संरक्षण करणारी शक्ती आहे.
पावित्र्य हा केवळ नैतिक विषय नसून सूक्ष्म आध्यात्मिक नियम आहे. मूलाधार चक्र हे धर्मतत्त्वाचे केंद्र आहे. येथे पावित्र्य भंग झाले की, कुंडलिनी संकुचित होते, ध्यानात स्थैर्य राहत नाही आणि आत्मसाक्षात्काराची गती मंदावते.
पावित्र्य म्हणजे:
विचारांची शुद्धता,
दृष्टीची संयमित अवस्था,
नात्यांतील आदर,
शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन आहे.
३) विवेक : व्हायब्रेशन्सद्वारे सत्याची ओळख करणे. विवेक हा बौद्धिक नसून व्हायब्रेशनल (चैतन्याधिष्ठित) असतो. मूलाधार चक्र शुद्ध असले की साधकाला आपल्या बोटांवरून व्हायब्रेशन्सद्वारे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे सहज कळते.
हा विवेक माणसाला:
अंधश्रद्धेपासून वाचवतो,
खोट्या गुरूंना ओळखण्याची शक्ती देतो,
अतिरेक व विकृतींपासून दूर ठेवतो,
श्री माताजी याला ''सत्
असत् विवेक", "Intelligence to discriminate between truth and untruth ." सद्सद्विवेक असे म्हणतात. तसेच “You must know the truth on your central nervous system.”
हा अनुभवात्मक विवेक मूलाधाराच्या स्थैर्यावरच अवलंबून असतो असे वर्णन करतात.
४) पराक्रम : ही धर्मरक्षणासाठीची शांत शक्ती आहे.
मूलाधारातील पराक्रम हा आक्रमक नसून धर्माच्या बाजूने उभे राहण्याचा आत्मिक धैर्यभाव आहे. पराक्रम म्हणजे अहंकाराने लढणे नव्हे, तर सत्यावर स्थिर राहणे होय .
हा पराक्रम साधकाला:
अधार्मिकतेपासून स्पष्ट नकार देण्याची ताकद देतो,
स्वतःच्या पावित्र्याचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य देतो,
समाजात सत्याचे तत्त्व निर्भयपणे मांडण्याची क्षमता देतो,
पराक्रम नसला तर विवेक असूनही साधक डगमगतो.
मूलाधार शुद्ध नसल्यास काय होते?
सहजयोगाच्या अनुभवात दिसते की मूलाधार कमजोर असेल तर:
ध्यानात अस्थैर्य येते,
डाव्या किंवा उजव्या बाजूची अतिरेक प्रवृत्ती वाढते,
व्हायब्रेशन्स कमकुवत होतात,
साधक अध्यात्मात टिकत नाही,
म्हणूनच श्री माताजी मूलाधार शुद्धीवर विशेष भर देतात.
थोडक्यात , मूलाधार चक्र म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या मंदिराचा पाया आहे.
अबोधिता—आत्म्याची भाषा आहे,
पावित्र्य—कुंडलिनीचे कवच आहे,
विवेक—सत्याची ओळख आहे,
आणि पराक्रम—धर्माचा रक्षक आहे.
संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.
आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा
Sahajayogapune.org
Sahajayogamumbai.org
लेखन - योगीराज देवकर.
No comments:
Post a Comment