Friday, 9 June 2023

श्री नितीन साने फॅक्टरी व्हिजिट

 *Omega Sinto Sane Foundry Machinery Pvt Ltd. Pirangut, Pune.*


उद्योजक श्री नितीन साने यांचे वडील नगरला फिरोदिया फौंडरीत नोकरीत होते. तिथे त्यांनी सॅन्ड आणि तिचा पुनःवापरचा अभ्यास केला आणि त्यांनी असा विचार केला की, आपणच हा व्यवसाय का सुरु करू नये आणि पिरंगुट मध्ये साने फौंडरी मशीनरीची सुरुवात झाली. पुढे नितीन साने मेकॅनिकल इंजिनीअर झाले आणि त्यांनी या व्यवसायाची भरभराट केली आणि आता त्यांचा मुलगा सिद्धार्थ तिसरी पिढी रोबोट्रिक्स मध्ये एमएस करून त्यांना जॉईन झाला आहे. अशा एका जगभर नावारूपाला आलेल्या उद्योगाला Entrepreneurs' International Club मुळे भेट देण्याचा योग आला. श्री साने त्यांच्या उद्योगाच्या प्रगतीचा रोमांचक प्रवास समजून घेताना सर्वांनाच खूप आनंद झाला.


1991-92 ला देशात जागतिकरणाचे वारे वाहू लागले. अनेक परदेशी कंपन्या भारतात आल्या त्यामुळे डिझाईन, क्वालिटी, मार्केट शेअर, प्राईस अशा सगळ्याच फ्रंटवर स्पर्धा सुरु झाली. अशावेळी त्यांना ओमेगा कंपनी सोबत 50:50 भागीदारी करण्याचा योग आला याचीही मोठी सुरस कथा त्यांनी आम्हाला सांगितली.


Chemically bounded sand चा वापर सुरु झाला होता अशावेळी ओमेगाचे foundry equipments आणि machinery निर्माण करण्यात technical know-how, designs, product quality सर्वच पातळ्यावर फार सहाय्य झाले. सध्या Sinto या जापनीज् कंपनीने ओमेगाचे नव्वद टक्के शेअर्स घेतले आहेत त्यामुळे साने ओघानेच सिंटो कंपनीशी जोडले गेले आहेत. याशिवाय गार्गी ही फौंडरी केमिकल उत्पादक कंपनी साने ग्रुपच्या मार्केटिंगचे काम करते त्यामुळे ओमेगा सिंटो साने कंपनीला मुबलक ऑर्डर्स मिळत आहेत.


Chemically bounded sand equipments & foundry machinery निर्माण करणाऱ्या या कंपनीचे Sand mixer, Mould handling equipment, Core making machinery, Shakeouts, Sand reclamation plant, Coating plants असे बरेच प्रॉडक्ट्स आहेत. ते नवीन फौंडरी लेआऊट डिझाईन आणि एक्सपान्शन अशा टर्न की प्रकल्प उभारणीचे कामही करतात. त्यांना लेझर कटिंगचे आऊटसोर्स करावे लागते.


56 म्हटले की, आपल्याला आठवेल अबतक  छप्पन सिनेमा किंवा 56 इंच छाती पण इथे ओमेगा सिंटो साने कंपनीने 56 देशात त्यांचा ग्राहकवर्ग तयार केला आहे. भारतात त्यांच्या 3500 समाधानी ग्राहक कंपन्या आहेत.


पिरंगुट येथे 40000 आणि 10000 चौ.फु. च्या दोन कंपन्या. कोथरूड मध्ये उपर मकान नीचे दुकान असे 2000 चौ.फु.ऑफिस. अशा विस्तारलेल्या कंपनीला भेट देवून समाधान वाटले.

योगीराज देवकर.

9403733901

www.motivationacademy.in

श्री एस पी रानडे उर्फ तात्या

 आदरणीय श्री सुरेश परशुराम रानडे सर.


मिटकॉन चे पहिले व्यवस्थापकीय संचालक. बहुतेकांना मिस्टर एस पी रानडे म्हणून परिचित तर जवळच्या लोकांचे तात्या. आदरणीय श्री सुरेश परशुराम रानडे सरांनी 31 मार्च 2023 रोजी वयाची नव्वद वर्षें पूर्ण केली आहेत.आ.तात्यांना वाढदिवसा निमित्त आणि पुढील दशाकाच्या आरोग्यपूर्ण जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.


नोव्हेबर 1985 मध्ये मिटकॉन ली.मध्ये ट्रेनर मोटिव्हेटर पदी सिलेक्शन्स झालेली माझी तिसरी बॅच. माझ्या बॅच मध्ये सुनील चांडक, राजकुमार फटाटे, अरुण गाट आणि सुभाष कारले हे ट्रेनर्स होते. तेव्हाच रानडे सरांचा पहिल्यांदा परिचय झाला. पुढे तीन वर्षे त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझी ट्रेनर म्हणून जडणघडण झाली. ऑक्टोबर 1988 नंतर आम्हा सर्व ट्रेनर्सची रवानगी MCED मध्ये झाली होती.आम्हाला Entrepreneurship Trainers Training Program करिता EDII अहमदाबादला पाठविले होते.तिथेही ते ट्रेनर्सना भेटण्यासाठी आणि मार्गदर्शन करायला आले होते.


मला आणि सुनील चांडकला पहिला डेमो 'उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम' ठाणे शहरात करायचा होता. इथं आमचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुरु झाले. मी एक साधे फोल्डर घेऊन फिरायचो. सर कुठूनतरी एका सेमिनारहुन आले होते.तिथे त्यांना एक छान ऑफिस बॅग मिळाली होती त्यांनी ती मला भेट दिली आणि इथून पुढे ऑफिस बॅग वापरत जा असा सल्ला दिला . आम्ही ऑफिस फाइल्स तयार केलेल्या नव्हत्या हे लक्षात आल्यावर त्यांनी एकजणाला ऑफिस फाइल्स विकत आणायला लावल्या. कोणकोणत्या विषयासाठी फाईल लागतील त्यानुसार त्यावर नावे लिहायला लावली.अगदी कागदांना स्टेपलर पिन कशी मारावी, कागदाला पेपर पर्पोरेटरने होल कसे करावेत, इतक्या बारीकसारीक गोष्टी त्यांनी आम्हाला शिकविल्या.ते म्हणायचे प्रत्येक काम चांगलं करायचं एक शास्त्र असते.तसा मला नीटनीटकेपणा आवडायचाच पण सरांमुळे त्यात भर पडली.


मी आणि सुनील चांडक ठाण्यात गोखले रोडवरील एका सोसायटीत रहात होतो . मिटकॉनचा एम डी असलेला हा माणूस एकदा चक्क आमच्या खोलीवर आला होता,याचे आम्हाला फार आश्चर्य वाटले होते. तसे ते पुण्यात आपटे रोडवर बंगल्यात रहायचे पण त्यांचा भांडुपला राम रतन त्रिवेदी रोडवर एक फ्लॅट होता. तिथे असल्यावर ते आम्हाला संध्याकाळी तिकडे बोलवायचे, सोसायटीत कट्ट्यावर बसून आमच्याशी गप्पा मारायचे, फारच उशीर झाला तर बाहेर डिनरला घेऊन जायचे. हेतू एकच असायचा आमच्यातला ट्रेनर घडविणे. महाराष्ट्रात गुजरात प्रमाणे उद्योजकता विकास करायचा हे त्यांचे स्वप्न होते आणि आम्ही ट्रेनर्स त्या स्वप्नाचे माध्यम होतो. 


एकदा इंडस्ट्रिज असोसिएशन, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये त्यांचे एक व्याख्यान होते. तिथे ते आम्हाला घेऊन गेले होते. उद्योजकता विकासाचा प्रचार प्रसार कसा करायचा याचा तो धडा होता. दुसऱ्या दिवशी एका रोटेरिअन उद्योजकाने त्यांना भेटायला बोलावले होते. तो माणूस पूर्णवेळ इंग्लिश मध्ये बोलला पण रानडे सर मात्र त्यांच्याशी मराठीत बोलले. याबद्दल त्यांना विचारले तर ते म्हणाले, "त्यांना मराठी समजते तर मग इंग्रजीत का बोलायचे आणि ठाण्या मुंबईत असला तरी आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांसाठी काम करायचे आहे.मातृभाषेत लोकांना जास्त चांगले समजते."


त्या काळात Entrepreneurship Development विषयावरील साहित्य इंग्लिश मध्ये उपलब्ध होते. सरांचे म्हणणे होते की, महाराष्ट्रातील लोकांमध्ये जर उद्योजकता रुजवायची असेल तर हे साहित्य मराठीत भाषांतरित करणे आवश्यक आहे. पुढे मी अनेक पेपर्स, नोट्स मराठीत करण्याचे काम केले.


तात्या बऱ्याचदा डेक्कन क्विनने प्रवास करायचे एकदा चर्चा करण्यासाठी त्यांनी आम्हाला कल्याणला येऊन व्हीटीचे फर्स्ट क्लासचे तिकीट काढून ते बसलेल्या बोगीत भेटायला बोलावले होते. ठरल्यानुसार डेक्कन क्विन मधून आमचा कल्याण - व्हीटी (आत्ताचे सि एस टी ) प्रवास सुरु झाला. सर म्हणाले, "या भेटीसाठी आपला बराच खर्च होत आहे. आपल्या हातात आता मिटिंग साठी सव्वा तास वेळ आहे. आता आपण इतकी उपयुक्त चर्चा करू की मीटिंगच्या खर्चापेक्षा पाच पट अधिक फायदा व्हायला पाहिजे." Effectiveness, efficiency, input v/s output चे हे उत्तम उदाहरण होते. व्हीटी ला उतरून ते त्यांच्या कामाला मुंबईत गेले आणि आम्ही आमच्या कामासाठी ठाण्याला परतलो.


सर आम्हाला नेहमी सांगायचे की," Trainer must be X plus something. तुमचा ट्रेनी जर X असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्तच असले पाहिजे. कायम अभ्यास करत रहा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहितच हवी असे नाही तर ती कोणाला माहित आहे हे तरी तुम्हाला माहित हवे."


एकदा एका ट्रेनर ने त्यांच्याकडे दुसऱ्या एका ट्रेनरची चुगली केली होती. तेव्हा सर म्हणाले होते की," एकतर तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय तो इथे हजर नाही.जे काही बोलायचे ते समोरासमोर बोला.दुसरे असे की, ज्या अर्थी त्याच्या गैरहजेरीत तुम्ही त्याच्याबद्दल बोलताय तसेच तुम्ही माझ्या गैरहजेरीत माझ्याबद्दलही बोलाल. हा तुमचा स्वभाव दिसतोय.याला बॅक बायटिंग म्हणतात. हे पहिले आणि शेवटचे, यापुढे असे बॅक बायटिंग करायचे नाही."


मी बोलताना, लिहताना माझी ओळख वाय एच देवकर अशी करायचो. सर म्हणाले, "माझं ठीक आहे रे सुरेश परशुराम ऐवजी मी एस पी रानडे लिहतो. तुझे नाव किती छान आहे योगीराज. नेहमी योगीराज हरिश्चंद्र देवकर पूर्ण नावाचा वापर कर."


सर मराठी, इंग्लिश मध्ये उत्तम भाषणे करायचे. एकदा मी म्हणालो, सर, तुम्ही फार छान भाषण करता. मी बऱ्याचदा भाषण करताना तुमची कॉपी करतो. तर सर म्हणाले,"मी छान बोलतो ते मला माहित आहे रे. आता तुम्ही छान भाषण करायला शिका. कोणाची कॉपी करू नका. प्रत्येकाची स्वतःची अशी एक खास शैली असते. आता तुझी स्वतःची भाषणाची शैली तयार कर."


काही ट्रेनर्स सरांच्या खूप पुढं पुढं करायचे. सरांना खूष करायचा प्रयत्न करायचे. तेव्हा सर म्हणायचे मला माहित आहे तुम्ही चांगले आहात. पण मी तुम्हाला चांगलं म्हणावं म्हणून काम करू नका. ज्यांच्यासाठी तुम्ही काम करत आहात ना त्या प्रशिक्षणार्थिंनी तुम्हाला चांगलं म्हणावं असे काम करा. थोडक्यात बॉस ने नव्हे तर ग्राहकाने चांगलं म्हणावं असे काम करा.


एक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे पाच-सहा महिन्यांचा कार्यकाळ असायचा. तेव्हा एखाद्या जिल्ह्यात हा कार्यक्रम होणे म्हणजे काहीतरी नावीन्यपूर्ण, वैशिष्ठपूर्ण घडत आहे असे वातावरण होते. आता माझे ठाणे, पुणे,नांदेड चे कार्यक्रम पूर्ण होऊन माझा रत्नागिरी येथे चौथा कार्यक्रम सुरु होता. त्या कार्यक्रमाचा Achievement Motivation Training (AMT) गणपतीपुळे येथे झाला होता. त्या काळी महाराष्ट्रात मनोहर नाडकर्णी सोडले तर AMT घेणारे कोणी नव्हते. हा AMT घ्यायला EDII अहमदाबाद वरून रमेश दवे सर आले होते. त्यांचा AMT चालू असताना मी 20-25 पानांच्या नोट्स काढल्या. त्यांनी पाहिल्यावर मी त्यांना सांगितले की, मला AMT ट्रेनर व्हायचे आहे. ते म्हणाले या 20-25 पानांनी काय होणार. आता लगेच माझा सिंधुदुर्गच्या कार्यक्रमासाठी पुढचा AMT इथेच होणार आहे त्यात तु तीन दिवस शब्द न शब्द लिहून काढ. मी त्यांचे ऐकले आणि खरंच शंभर पेक्षा जास्त पानांच्या नोट्स काढल्या. नंतर त्यावर आधारित AMT Trainers Manual तयार केले. ते जेव्हा मी रानडे सरांना दाखविले तेव्हा ते प्रचंड खूष झाले आणि म्हणाले, "तु फार मोठं काम केलेलं आहे. आता सांग मी तुझ्यासाठी काय करू." मी म्हणालो मला प्रत्येक्ष AMT घ्यायला परवानगी द्या. त्यांनी मला गावात मित्रांना एकत्र करून AMT घ्यायला सुचविले. थोडक्यात उंदरांवर प्रयोग करतात तसे हे होते. मग मी लोणी देवकर या गावात माझ्या मित्रांना एकत्र करून माझा पहिला वहिला AMT यशस्वी केला आणि मी AMT ट्रेनर बनलो. पुढे मी महाराष्ट्रात शेकडो AMT घेऊन इतिहास घडविला ते अनेकांना माहित आहे. पण माझ्या या कार्याचा पाया रानडे सरांमुळे तयार झाला  होता.


पुढे माझ्या पहिल्या 'उद्योजकता ' पुस्तकाची संहिता तयार झाली . रानडे सरांनीच कॉन्टीनेंटल प्रकाशन कडे माझ्या पुस्तकाची शिफारस केली होती . माझी कॉन्टी्नेंटल प्रकाशनचे श्री अनिरुद्ध कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली आणि पुढे आमचे खूप छान सूर जुळले.माझे पहिले पुस्तक प्रकाशित झाले आणि मी खऱ्या अर्थाने लेखक झालो . माझे पहिले पुस्तक रानडे सर आणि बारामतीचे बहुप्रेरित आप्पासाहेब पवार यांना अर्पण केलेले आहे.रानडे सर "उद्योग संधी, शोधा म्हणजे सापडेल", असं ते नेहमी म्हणत असत . तेच माझ्या दुसऱ्या पुस्तकाचे टायटल आहे.


कुठंलाही नवीन पुस्तक वाचलं, नवीन माहिती समजली की, सर आम्हाला बोलवून सांगत असत. ते म्हणायचे," आरे तुम्ही फार नशीबवान आहात रे. जी माहिती समजायला मला 52 वर्षें लागली ती तुम्हाला ती तुम्हाला वयाच्या 24व्या वर्षी समजत आहे रे. याचा सगळ्यांना फायदा होऊद्या."


नोकरीत चांगला बॉस मिळायला नशीब लागते असे म्हणतात. माझं नशीब चांगलं होतं की, मला रानडे सर बॉस म्हणून लाभले. या माणसाला माणूस कसा घडवायचा हे शास्त्र समजलेलं आहे. उद्योजकता विकास हे त्याचं पहिलं प्रेम होतं आणि कन्सल्टन्सी दुसरं. त्यामुळे तुलनेनं ते ट्रेनिंग ला जास्त वेळ द्यायचे.


आपल्याकडे काही लोकं नोकरी झोकून देऊन करतात अगदी स्वतःचं, घरचं कार्य असल्यासारखं. वेळ, काळ, भुक, तब्बेतीचं भानही ठेवत नाहीत. त्यांना कुणी टार्गेट द्यायची गरजच नसते, तेच स्वतःचे टार्गेट ठरवितात. अशी लोकं नोकरी वेतनासाठी नाही तर आनंद आणि समाधानासाठी करतात.माझ्या आई वडिलांचे संस्कार आणि रानडे सरांची शिकवण यामुळे मीही अशीच नोकरी केली.रानडे सरांनी स्वतःच्या कार्याने मिटकॉनला सामाजिक चेहरा मिळवून दिला. माझ्या बॅचच्या ट्रेनर्सने देखील त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आपापल्यापरीने महाराष्ट्राच्या उद्योजकता विकासात खारीचा वाटा उचलला आणि त्यांनी जसं आम्हाला घडवलं तसं आम्ही जुनिअर्सना घडविण्याचा प्रयत्न केला.


श्री सुरेश परशुराम रानडे सर उर्फ तात्या तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्ताने शतक पूर्ण करण्यासाठी आभाळभर शुभेच्छा.


योगीराज हरिश्चंद्र देवकर.


Sunday, 19 February 2023

दिवाळी पहाट

 BLOG


*दैवी ऊर्जेशी एकरूप झालेली एक दिवाळी पहाट.*


दि ३ नोव्हेंबर २०२१ रोजी

दिवाळीच्या निमित्ताने Saturday Club Global Trust-SCGT वाकड चॅप्टर तर्फे आयोजित पिंपरी चिंचवड रिजन मधील पिंपरी-चिंचवड , औंध-बाणेर चॅप्टर करिता दिवाळी पहाटचा कार्यक्रम पार पडला.


कार्यक्रमाचे प्रायोजक होते

पैस रंगमंचचे श्री प्रभाकर पवार(चिंचवड) आणि रेझोनन्स स्टुडिओचे श्री तेजस चव्हाण. ज्यांनी स्वखुषीने रसिक प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम केला.


सांगितिक दिवाळी पहाटची सुरूवात SCGTचे संस्थापक स्व. माधवराव भिडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने लनाने  झाली . सूत्रसंचालक  प्राजक्ता गव्हाणे यांच्या अलंकारिक शब्दांनी सुरुवातीपासूनच जादू सुरू केली. या आगळ्या वेगळ्या रंगमंचचा उल्लेख त्यांनी निकट रंगमंच असा केला. पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवडची पहाट कशी वेगळी हे सांगताना," इथे दिवसाची सुरुवात भोंग्याने होते, सतत जागं आणि वेगानं धावणारं शहर, आवडीच्या शिव्या खात भंडारा डोंगरावर विठोबाच्या भेटीला जाणारे तुकाराम महाराज." अशी शब्द नव्हे तर  प्राजक्ताच्या फुलांची उधळण करत त्यांनी बहारदार सूत्रसंचालन केले आणि सादरकर्ते व रसिक यांच्यातील दुवा साधला.


अक्षय घाणेकर तरुण गायकांमधले एक नवीन नाव.  नाव कमवायला खूप कष्ट घ्यावे लागतात पण भरपूर मेहनत करून ज्यांनी सा रे ग म पा ,व्हाईस ऑफ इंडिया, पुणे आयडॉल अशा कार्यक्रमांना आणि पुरस्कारांना  सन्मान मिळवून दिला आहे त्यांच्या निरागस स्वरांनी म्हणजेच, "सूर निरागस हो..." या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 


मनीषा देशपांडे यांनी," माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा..." अशा सदाबहार गाण्यांनी मैफलीत रंगत भरली.


लिटिल मास्टर आदिती धर्माधिकारी,सातवीत शिकणारी मुलगी हिच्या गायनाने तर रसिकांच्या हृदयात शिरकाव केला . रसिकांच्या भावना आणि अश्रू दाटून आले. हिच्या गायनाची सगळ्यांनी प्रशंसा केली.


संगीतकार तेजस चव्हाण यांनी संगीतबद्ध केलेली आणि प्रीती तेजस यांनी गायलेली काही गाणी सादर करण्यात आली . तेजसने संगीत संयोजन केलेल्या आणि बेला शेंडे यांनी गायिलेल्या ज्या मराठी ब्रेथलेस गाण्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली आहे ते गीत त्यांनी सादर केले ज्याची शब्दरचना प्राजक्ता गव्हाणेची आहे हे ऐकून फार विशेष वाटले . तेजसने कैलास खेर यांनी गायलेले एक सुफी, "हिरे मोती मै ना चाहू....सैया..." हे गीत सादर केले. तेजसने संगीतबद्ध केलेले ," कर कटेवरी उभा विटेवरी वास पंढरपूरी,  माझे विठ्ठल रखुमाई..."हे भक्तीगीत अक्षयने सादर केले. या गायकांनी स्वरांची जी काही उधळण केली त्यामुळे रसिकांना निर्विचारतेचा अनुभव मिळाला. दैवी ऊर्जेशी एकरूप होणं यापेक्षा काय वेगळं असतं.


महेश गाढवे यांनी तबल्यावर साथ संगत केली. गायनाइतकेच तालवाद्य पण महत्वाचे असते हे त्यांच्या ठेक्याने रसिकांच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही.


महामारीमुळे गेले दीड-पाऊने दोन वर्षें कलाकार आणि रसिक यांची ताटातूट झाली होती. आजचा प्रसंग असा होता की, कलाकाराला रसिक हवा होता आणि रसिकाला कलाकार. ऑन लाईनला कंटाळलेले दोघेही आज तृप्त झाले.


आजचा कार्यक्रम हा SCGT मेंबर्ससाठीचा एकदम खाजगी कार्यक्रम जाणवला . जसं की 'कट्यार काळजात घुसली',चित्रपटात राज्याच्या राजवाड्यात फक्त राजासाठी मैफिल होत आहे किंवा पु. ल. चित्रपटात दाखवलंय तसं कोणाच्यातरी घरात फक्त कलेचा आस्वाद घ्यायला गर्दी नव्हे तर दर्दी जमले आहेत. पहाटे सुरू झालेल्या संगीत कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांना अल्फा, थिटा हर्ट्स अनुभवत  अडीच-तीन तास कधी संपले ते समजलेसुद्धा नाही.कधी कधी टाळ्या नाही तर ही परा वाणीची शांतता पण अनुभवावी असे वाटते. 


दिवाळी पहाट २०२१ संस्मरणीय करण्याकामी निलेश कुलकर्णी,योगीराज देवकर, गौरव गायकवाड, अनुक्रमे चेअरमन,सेक्रेटरी, ट्रेझरर,  वाकड चॅप्टर , कोअर टीम,इतर दोन चॅप्टरचे CST  आणि स्वप्नील कुलकर्णी,PCMC रिजन हेड यांनी भरपूर मेहनत घेतली.


शेवटी भेटवस्तू देवून,आभार मानून ,अल्पोपहार घेऊन कार्यक्रम संपला पण तो पुढील बराच काळ स्मरणात राहील तो श्री तेजस चव्हाण यांनी आजचा दिवस समृद्ध केला त्यामुळे. कोणालाही हा अभरूचीसंपन्न कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर श्री तेजस चव्हाण यांच्याशी जरूर संपर्क साधण्यात यावा . मो.95611 50916.


योगीराज देवकर.

लेखक,प्रेरक,प्रशिक्षक.

PCMC Region Blog Writer.

www.motivationacademy.in

केरळ सहल

 *केरळ पर्यटन-एक सुखद अनुभव.*


मी,सौ अनिता देवकर,श्री गिरीश(आप्पा)गायकवाड,

सौ सुनीताताई गायकवाड,श्री अमोल शेटे आणि फॅमिली असे आम्ही सर्वांनी २२ ते २९ मार्च २०२२ दरम्यान केरळचे पर्यटन केले.


श्री निलेश कुलकर्णी यांच्या आकांक्षा हॉलिडेज प्रा ली तर्फे ही टूर आयोजित केली होती. कुलकर्णी यांना कार्पोरेट लॉजिस्टिकसचा अनुभव आहे. त्यांनी नव्याने ट्रॅव्हल एजन्सीचा श्री गणेशा केलेला आहे. त्यांच्याकडे बुकिंग करणारा मी पहिलाच पर्यटक.


कोची एअरपोर्ट ते त्रिवेंद्रम एअरपोर्ट इनोव्हा कार सेवा आणि कोची(फोर्ट कोची,वास्को द गामा चर्च, राजा वर्मा पॅलेस, कलाडी ),मुन्नार( फ्लॉवर गार्डन,रस्तो-रस्ती फोटो पॉईंट्स,टी फॅक्टरी,मत्त्युपट्टी डँम,एको पॉईंट),

थेक्कडी( स्पाइस प्लँटेशन व्हिजिट,कलरीपटू मार्शल आर्ट, कथकली डान्स, एलिफंट राईड,पेरियार वाइल्ड लाईफ सँच्युअरी बोट राईड),आलेप्पी (व्हेंबनाड लेक हाउस बोट राईड),कोलम जवळ( पूवार आयलंड रिसॉर्ट)कन्याकुमारी,त्रिवेंद्रम( पद्मनाभम टेम्पल) असा खास आमच्यासाठी टूर डिझाईन केला होता.  


कुलकर्णीने आमच्यासाठी काय वेगळे केले तर,एअर टिकेट्स बुकिंग, चांगली गाडी,चांगला ड्रायव्हर  ,निवासासाठी उत्कृष्ट हॉटेल्स,भेटीची आवश्यक आणि निवडक ठिकाणे,खरेदीसाठी सल्ला आणि आमची कोठे फसवणूक होणार नाही याची दक्षता.


अनिता नेहमी म्हणते वाजवी किंमतीत दर्जेदार कपडे खरेदी करायला पारख लागते . अगदी तसच टूरच्या वाजवी किंमतीत उत्कृष्ट हॉटेल्स,कॉंटिनेंटल ब्रेकफास्ट, व्हेज,नॉनव्हेज,लोकल फूड द्यायला आकांक्षा सारखी पारखी एजन्सीअसली पाहिजे. 


खरंतर आम्हाला पुरविलेली हॉटेल्स,रिसॉर्ट्स इतके सोईसुविधा असलेले होते की त्यांचा लाभ घ्यायला वेळ पुरत नव्हता.

मुन्नार,थेक्कडीची ब्युटी इतकी सिनिक आहे की २२८ sq.kms विस्तीर्ण डोंगरांच्या रांगात हिरवागार गालिचा अंथरल्या सारखे चहाचे मळे बघून मन हरखून जाते. पेरियार आणि व्हेंबनाड राईड्स अनेक दिवस लक्षात राहतील.


कोची ते पूवार आयलंड रिसॉर्ट पर्यंतची हॉटेल्स चढत्या क्रमाने एकापेक्षा एक सरस होती. शेवटच्या दोन दिवसात भारत बंद आंदोलनामुळे आम्हाला कन्याकुमारी रद्द करावे लागले पण आम्ही पूवार रिसॉर्ट एन्जॉय केले.


निलेश मला म्हणाले होते की,"सर,तुम्ही माझे पहिले कस्टमर आहात, मला तुम्हाला एकदम चांगली सेवा द्यायची आहे.इतके सगळे नियोजन केले तरी प्रत्येक्षात काही ऊंनीस-बीस होऊ शकते. पण मी प्रामाणिकपणे चांगली सेवा देणार आहे."


केवळ माझ्या शब्दावर विश्वास ठेवून सर्वश्री गायकवाड आणि शेटे यांनी निलेशवर जो विश्वास ठेवला तो त्यांनी सार्थ ठरविला.


निलेश यापुढेही आलेल्या प्रत्येक ग्राहकास पहिला ग्राहक असे समजूनच सेवा दिली तर तुम्ही जिंकलात म्हणून समजा.


आमची केरळ टूर अविस्मरणीय केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार!


योगीराज देवकर.

9403733901/9307133134

www.motivationacademy.in

चितळे फॅक्टरी

 मध्यंतरी श्री इंद्रनील चितळे यांनी क्लब सदस्यांना दिलेल्या निमंत्रणावरून चितळे फॅक्टरीला भेट देण्याचा योग आला. इथे प्रसिद्ध बाकरवडी आणि स्वीट्सचे आद्ययावत मशीनरी द्वारा उत्पादन केले जाते. चितळे घराण्यातील या युवा पिढीने हा उद्योग एका वेगळ्याच उंचीवर पोहचवीला आहे.महाराष्ट्रीयन उद्योजकाचा अभिमान वाटावा असे हे उदाहरण आहे.

प्रथम टेकनॉलॉजिज्

 World Class From India ही टॅग लाईन देशप्रेमासह मिरविणाऱ्या Pratham Technologies Pvt Ltd च्या श्री दत्ता देशपांडे आणि श्री संजय दांडेकर यांनी Entrepreneurs' International च्या सदस्यांना निमंत्रित केल्यामुळे या फॅक्टरी व्हिजिटचा योग आला. पेपर फोल्डिंग मशीनरी उत्पादन करणाऱ्या या कंपनीने जर्मनीच्या उत्पादकांवर मात करून जगभर स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. अनेक प्रगत,अप्रगत देशात मशीनरी निर्यात करून आणि USA मध्ये उद्योगाची मुहूर्तमेढ रोवून एक मेंचमार्क निर्माण केला आहे. दोन्ही उद्योजक मित्रांचे अभिनंदन आणि प्रगतीसाठी शुभेच्छा.

मालक नको पालक बना

 शनिवार 20 ऑगस्ट 22 रोजी म.टा.पुणे मध्ये रेणू गावस्कर मॅडमचा 'मालक नको, पालक व्हा', हा लेख पाहिला-वाचला आणि वंदन नगरकर आठवले.गावस्कर मॅडम नेहमीच फार साध्या, सोप्या,सरळ, समजावण्याच्या भाषेत लेख लिहतात त्यासाठी प्रथम त्यांचे अभिनंदन.

प्रसाद मिरासदार मुळे माझी वंदनशी ओळख झाली. पुढे ते वक्ता म्हणून आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमात येऊ लागले .उत्सुकता म्हणून त्यांनी माझा सूर्य शिबीर येथे 'उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रमही',अटेंड केला.पुढे त्यांचे पुस्तक प्रकाशन असो, व्याख्यान असो त्यांची निमंत्रणे येऊ लागली .त्यांनी जेव्हा 'चला बोलूया जग जिंकूया', चा बालगंधर्वला पहिला प्रयोग केला तेव्हा मला परीक्षणासाठी बोलावले होते. वंदन म्हणजे सृजनशील,प्रयोगशील, स्पष्टवक्ता,विनोदी आणि खादाड माणूस.कुठं,काय चांगलं खायला-प्यायला मिळतं ते वंदनला विचारायचं.आज लेखात त्यांचा उल्लेख वाचून आनंद वाटला. प्रयोगशीलतेसाठी वंदनचेही अभिनंदन.