Tuesday, 25 June 2024

लिफ्ट करादे l

 निर्मला फार्म - भाग पाच - लिफ्ट करा दे l खाजगी उपसा जलसिंचन योजना.


'तेरी उंची शान हैं श्री माँ 

मेरी अर्जी मान ले श्री माँ 

तु हैं सबकुछ जानने वाली 

मैं हूं तेरा मानने वाला 


मुझ को भी तो लिफ्ट करा दे 

थोडी सी तो लिफ्ट करा दे l'


श्री माताजी निर्मला देवी मुझ को भी तो लिफ्ट करा दे l


अदनान सामी चे सॉंग आठवण्याचे आणि थोडा बदल करून लिहण्यामागचे कारण म्हणजे माझे लिफ्ट, म्हणजेच खाजगी उपसा जलसिंचन योजना.


लोणी देवकर मधील माझ्या शेतापासून भावडी या गावापाशी उजनी जलाशय फुल्ल कंडिशन (अधिक )मध्ये साडेसहा किलोमीटर आणि एमटी( वजा )कंडिशन मध्ये आठ किलोमीटर अंतरावर आहे. माझ्या शेतातून खडकवासला मुठा उजवा कालवा गेला आहे. या कालव्याची वाट पाहण्यात माझ्या वडिलाची हयात गेली.नियोजित वेळेपेक्षा किमान वीस वर्षें उशिरा कालवा निर्माण झाला पण या जास्त खोलीतून गेलेल्या कालव्यातून आमच्या शेतीला कधीच पाणी मिळाले नाही. त्यामुळे या कालव्याचे वर्णन फक्त MIDC आणि  आमच्या शेतीचे विभाजन करणारी रेषा इतकच करता येईल.शेतीला थोडंही बागायती न करणाऱ्या या कालव्याचा कायतो इतकाच फायदा झाला की,कमांड एरियातील किंवा कॅनॉलमुळे संभाव्य ओलीताखाली येणारी शेती MIDC ला जाण्यापासून वाचली. कालव्यामुळे शेत बागायत होणार ही आशा पूर्णपणे मावळल्यानंतर 2013 मध्ये पुतण्या अमोल देवकरने चार -पाच एकर शेती विकून साहस केले आणि स्वतःच्या शेतात उजनी जलाशयातून लिफ्ट(खाजगी उपसा जलसिंचन योजना )करून पाणी आणले आणि भावाचे संपूर्ण शेत बागायती झाले.आता अमोल माझ्या मागे लागला. तुम्हाला फायद्याची शेती करायची असेल तर लिफ्ट शिवाय पर्याय नाही. 1998 पासून मी थोडीफार विहीर बागायती आणि बरीच जिरायती अशी नुकसानीची शेती करत होतो,त्यामुळे एकतर मला शेतात अजून गुंतवणूक करायची तयारी नव्हती आणि लिफ्टच्या खर्चाचे आकडे ऐकून तर ही योजना मला माझ्या आवाक्यात वाटत नव्हती . पण अमोलने पाठपुरावा करणे काही सोडले नाही.


श्री माताजींची इच्छा असावी असे मानून 5 जानेवारी 2014 रोजी एका इंजिनिअरकडून लिफ्टचा सर्वे करून घेतला . मी आणि इंजिनिअरने भावडी ते लोणी देवकर पाईपलाईन ज्या मार्गांवरून करायची आहे त्या पूर्ण मार्गांवरून पायपीट केली. इंजिनिअरने एकूण हेड 13 LPS साठी 81 तर 18 LPS साठी 87 मीटर  आहे,त्यानुसार 6"(160mm) पाईपलाईन फेज एक करण्यासाठी 8 kg चे 52, 6kg चे 200 आणि 4 kg चे 800 पाईप,फेज दोन साठी 4kg चे 200 पाईप असे एकूण 1250 प्लस पाईप लागतील. LBH40, TMH60,AMH40,TMHSSMTASM10 यापैकी कोणताही एक पंप चालेल,16 एअरवॉल बसविणे आवश्यक आहेत,5" NRVolve वापरावा, सक्शन पाईप 4" करावा,डिलिव्हरी पाईप 2.5" ठेवावा,इतर इलेक्ट्रिक डिटेल्ससह प्लॅन आणि एस्टीमेट डिझाईन करून दिले. खर्चाचा एकूण अंदाज दिला पस्तीस लाख रुपये.


दुसऱ्या दिवशी सकाळी मी याबद्दल विचार करत होतो तोच अमोल हजर आणि म्हणाला, "आबा तुम्ही दोनशे पाईपची व्यवस्था करा. सिद्धेश्वर थोरात आणि संजय पवारच्या पाईपलाईनचे काम चालू आहे. ते लोणी देवकरला चारी सुरु करून भावडी हद्दीत पोहोचले आहेत. त्यांच्या शेवटच्या 200-250 पाईपचे चारीचे काम बाकी आहे. भावाडीतलेच काम त्रासदायक असते. तुमचे हे काम त्यांच्यासोबत होवून जाईल. मी त्यांना बोललो आहे आणि ते हो म्हणून तुमच्यासाठी थांबले आहेत . तुम्ही फक्त दोनशे पाईपची सोय करा.उरलेली लाईन तुम्हाला एकट्याला करावी लागेल." झालं माझं विचार आणि कृती चक्र सुरु झाले.


मी पुण्यात परत आलो. आता मला दोन महत्वाची कामे करायची होती ती म्हणजे उजनी धरणातून पाणी उचलण्यासाठी पाणी परवाना मिळविणे आणि लिफ्टसाठी भांडवल उभारणी करणे . दुसऱ्या एका इंजिनिअरने लिफ्टचे प्रपोजल तयार केले, गावानकाशे जोडले, त्यावर पाईपलाईनचा मार्ग दाखविला आणि आवश्यक कागदपत्रासह हे प्रपोजल उजनी धरण कार्यालयात सादर केले.


मी नातेवाईकांशी बोललो तर लगेच मला मदतीचा ओघ सुरु झाला. मी स्वतः काही पैशाची व्यवस्था करे पर्यंत मला हे पैसे वापरायला मिळणार होते. पुढे कर्ज काढून मी नातेवाईकांचे पैसे परत केले आणि हे काम पूर्ण केले.एखाद्या कामाचा जेव्हा योगच आलेला असतो तेव्हा सगळ्या गोष्टी अशा विनासायास जुळून येतात. लगेच पाईप खरेदी केले आणि आमचे फील्डवरील काम सुरु झाले.


आठ किलोमीटर लांबी असलेल्या या पाईपलाईनचे काम दोन टप्प्यात होणार होते. पहिला टप्पा लोणीदेवकर मधील माझे शेत ते भावडी मधील धरण फुल्ल कंडिशन मध्ये असते तो जुन्या चारीवरील स्पॉट आणि दुसरा जुन्या चारीवरील स्पॉट ते धरण एमटी( वजा) कंडिशन मध्ये असते तो नव्या चारीवरील स्पॉट. दुसऱ्या टप्प्यामध्ये सिद्धेश्वर थोरात आणि धनंजय चव्हाण आणि मी एका चारीतून एकत्र पाईपलाईन केली आहे. या स्पॉट एक आणि स्पॉट दोनच्या चारी म्हणजे नदीपात्रातील पाणी सर्व शेतकऱ्यांनी खर्च करून कॅनॉल सारखा चर काढून जवळ आणले आहे ती जागा.याच जागेवर अनुक्रमे पहिली आणि दुसरी इलेक्ट्रिक मोटर बसवली जाते. पाईपलाईनसाठी JCB ने आठ किलोमीटर इतक्या मोठ्या अंतराची तीन फूट खोलीची चारी खोदने, चारी खोदताना इतर शेतकऱ्यांच्या आडव्या येणाऱ्या पाईपलाईन वाचवीने आणि फुटल्याच तर भरून देणे,चारीत 6" पाईप फिट करणे,जागोजागी एअर  व्हॉल्व्ह बसविणे आणि पुन्हा ती चारी बुजविणे हे फार अवघड आणि परीक्षा पाहणारे काम होते. याला किमान पाच- सहा महिन्यांचा कालावधी लागणार होता. विशेष म्हणजे भावडी आणि लोणीदेवकर गावातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून ही चारी काढावी लागणार होती आणि पाईपलाईन टाकावी लागणार होती. या मार्गात चार ओढे आणि पुणे - सोलापूर हायवे पुलाखालून क्रॉस करावा लागणार होता.


असा एक नियम ऐकीवात आहे की, एखादा 7/12 जरी त्या शेतकऱ्याच्या नावावर असला तरी त्या जमिनी खाली फक्त अडीच फुट खोली पर्यंतच त्याचा अधिकार असतो. याचा अर्थ जमिनीच्या खाली अडीच फुटानंतर सरकारचा अधिकार सुरु होतो . त्यामुळे एक - कोणत्याही शेतकऱ्याच्या शेतातून अडीच फूट खोलीखालून पाईप लाईन टाकायची असेल तर तो पाईपलाईन वाल्याची अडवणूक करू शकत नाही. दोन - शेतकरी चारी काढू देत नसेल तर आणि तरीही शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन टाकायची असेल तर त्यास तहसील कार्यालयातून परवानगी मिळते. पण त्यासाठी तहसील कार्यालयाकडे रीतसर अर्ज करावा लागतो आणि त्यासोबत या आठ किलोमीटर पाईपलाईनच्या मार्गात ज्या शेतकऱ्यांची शेते येतात त्या सर्वांचे सातबारे जोडावे लागतात. मग ही सरकारी यंत्रणा या मार्गाचा अभ्यास करून सर्व शेतकऱ्यांना पाईपलाईनचे काम होणार असल्याचे परिपत्रक काढते.आता फक्त कल्पना करा की, कर्ज काढून व्याजाचे मीटर चालू असताना पाईपलाईन करायची असेल तर असा सरकारकडे अर्ज करून परवानगी मिळायला किती वेळ, श्रम, पैसा आणि त्रास सहन करावा लागेल.सरकारी काम आणि सहा महिने थांब असे म्हणतात ते उगीच नाही.त्यामुळे कोणताही शेतकरी सरकारी कार्यालयात अर्ज प्रकरण न करताच मार्गात येणाऱ्या शेतकऱ्यांचे सहकार्य मिळवूनच हे काम करतो. याचा अर्थ ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून त्याला पाईपलाईन करायची आहे त्या प्रत्येकाला त्याला भेटावे लागते आणि त्याची मनधरणी करावी लागते आणि मान्यता मिळवावी लागते. कोण चांगला शेतकरी भेटला तर सौजन्य दाखवून परवानगी देतो. अडवणूक करणारे भेटले तर कोण पैसे पाहिजेत म्हणून, कोण त्याच्या शेतातले दगड उचलावे लागतील,कोण त्याच्या शेतात काळी माती भरावी लागेल, शेतात पिक असेल तर कोण उसाची रोपे आणून द्यावी लागतील किंवा मका पेरून द्यावा लागेल, कोण जाता जाता त्याच्या शेतातले एखादे काम JCB मशीनने फुकट करून द्यावे लागेल, अशी काहीतरी अट घालून परवानगी देतात.याला ते नुकसान भरपाई असे म्हणतात. याचे चांगले वाईट अनुभव मला आले आहेत.हे अनुभव हा काही आपला मेन विषय नाही पण जाताजाता दोन तीन प्रसंग सांगतो.हेच लिहीत बसलो तर कादंबरी तयार होईल.


एक शेतकरी मला भेटला . त्यांच्या शेतात ऊसाचे पिक होते. ते म्हणाले हा सुरु ऊस गेला की तुम्ही माझ्या शेतातून चारी काढा. खोडवा ऊसाच्या शेतातून दोन सऱ्यामधून आम्ही JCB ने चारी काढली आणि त्यांच्या शेतातील माझे पाईपलाईनचे काम झाले. यात त्यांच्या पिकाचे थोडेफार नुकसानपण झाले. याबद्दल मी त्यांच्यासोबत बोलत होतो तर ते म्हणाले, " होऊद्याहो थोडसं नुकसान. त्यात काय एव्हढं. पण एखादा शेतकरी जर दुसऱ्या शेतकऱ्याला स्वतःच्या शेतातून पाईपलाईन नेहू देत नसेल तर तो जातिवंत शेतकरीच नाही. " शाब्बास रे माझ्या शेतकरी भावा!


एका शेतकऱ्याने आमची अडवणूक केली होती. इतकेच पैसे पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांची मागणी जरा जास्तच अवास्तव होती. आम्ही त्यांच्या शेतात बैठकीला बसलो होतो . पण काही केल्या तो आकडा कमी करायला तयार नव्हता. मग मीच त्यांना उपरोधाने म्हणालो, " आपण इथे आमची पाईपलाईन तुमच्या शेतातून जावू देण्यासाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील ही चर्चा करायला बसलो आहोत का तुमच्या शेताचा सौदा करायला बसलो आहोत." पण दुर्दैव, त्याला माझे उपरोधीक बोलणे समजले नाही. तो म्हणे, " पाईपलाईनची चर्चा करायला." शेवटी त्याने काही रक्कम कमी केली हे आमचे नशीब समजायचे.


एक काकू तर अशा भेटल्या की, आयुष्यात जणुकाही  एखाद्या देवकरचा बदला घेण्याचीच त्या वाट पहात होत्या. काय तर म्हणे, माझ्या पुतण्या आणि भावाने त्यांच्या मुलाच्या करिअरचे नुकसान केले आहे. आता मी तुम्हाला पैसे दिल्याशिवाय शेतातून पाईपलाईन करू देणार नाही. आम्ही जंग जंग पछाडले पण त्यांनी त्यांना हवी ती रक्कम घेऊनच मला परवानगी दिली. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. असो!


भावडीतला एक शेतकरी तर सगळ्यां पाईपलाईनवाल्यांना असा भेटतो जो त्याच्या शेतातून पाईपलाईन करू देण्यासाठी जी नुकसान भरपाई घेतो त्याला तो पाण्यासारखा लाभलेला पैशाचा झरा समजतो. धन्य आहे हा शेतकरी दादा.


भावडी गावात आम्हा तिघांना पैसे घेऊन परवानगी देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आम्ही साधारणपणे तीन लाख रुपये रक्कम मोजली.आता पण आमच्यामुळे तुमची शेती सुधारली अशी या गाववाल्यांची भावना आहे.लोणी देवकर गावाच्या हद्दीत मात्र मला कोणा शेतकऱ्याचा त्रास झाला नाही.


या कामात मला अनेक चांगले लोक भेटले, ज्यांनी मला आऊट ऑफ दी वे जाऊन मदत, मार्गदर्शन आणि सहकार्य केले. पाईपलाईनचा जवळचा, सोपा मार्ग सुचविला. कोणी इतर शेतकऱ्याला मदत देण्यासाठी समजावून सांगितले. यात पोपट डोंगरे, अमोल देवकर, अशा अनेक शेतकऱ्यांची नावे घ्यावी लागतील.माझा मुलगा अमेय याने देखील या कामाची देखरेख केली.या सर्वांचा मी आभारी आहे.


दहा वर्षांपूर्वी पंचवीस लाख रुपये फक्त पी व्ही सी पाईपचे बिल झाले. या चारीच्या मार्गात काही ठिकाणी खडक होता तो फोडण्यासाठी ब्लास्टिंग साठी तीस हजार रुपये खर्च झाला. JCB ने चारी काढायला दीड लाख रुपये लागले,तर ती परत बुजवायला चाळीस हजार रुपये लागले. पाईपलाईन जोडणारास एक लाख रुपये दिले. दोन इलेक्ट्रिक मोटरी, MSEB डीपी आणि कनेक्शन चार्जेस, खालील चारीवर सभासद होण्यासाठी पन्नास हजार द्यावे लागले,इतर खर्च,बघता बघता खर्च पस्तीस लाखाच्या पुढे कधी गेला ते समजले पण नाही. ज्या शेतकऱ्यांनी आणि हो अधिकाऱ्यांनी माझ्याकडून पैसे घेतले आहेत त्यांची माझ्या डायरीत नोंद आहे.


चारी काढण्याचे काम ज्यांनी केले ते सोमनाथ डोळे हे JCB चे चालक होते. एकदम एक्स्पर्ट चालक. जमिनीवर असं काही मशीन चालवायचे जसं काही सुरीने केक कापत आहेत. एकतर या माणसाने गावातल्या बहुतेक लोकांच्या पाईपलाईन केल्या आहेत. त्यामुळे या आठ किलोमीटर अंतरात कोणाची पाईपलाईन उभ्या, आडव्या कोठून गेली आहे हे त्यांना शंभर टक्के माहित होते. त्यामुळे शक्यतो ते कोणाची आडवी आलेली पाईपलाईन फुटू देत नव्हते. एका ठिकाणी तर एका रस्त्याखालून आठ पाईपलाईन गेल्या होत्या. त्या तर त्यांनी वाचविल्याच पण त्यांच्या खालून माझे पाईप आणायला अलगद जागा निर्माण केली. शाब्बास रे पठ्ठ्या! पाईपलाईन वाचविली की मी त्यांना बक्षीस देत असे. कारण पाईप फुटला तर होणारा खर्च जास्त होत असे.


आपली परिस्थिती आहे त्यापेक्षा चांगली व्हावी म्हणून श्री माताजी कडे 'मुझ को भी तो लिफ्ट करा दे  l'

म्हणत उजनी जलशयातून पाणी लिफ्ट केले याला आता दहा वर्षें होत आहेत.


लिफ्ट मुळे माझं शेत बागायत झाले. एक संकल्प पूर्ण झाला आणि भविष्याची तजबीज झाली असे वाटले.मी राहतो पुण्यात त्यामुळे माझी शेती मजुरावर अवलंबून राहते. इथेच राहणाऱ्या आणि स्वतः शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी लिफ्टचा जितका फायदा उचलला तितका मला घेता आला नाही. दरवर्षी शेतात विहीरी आणि लिफ्ट मिळून 15-16 एकर ऊस होवू लागला. भुसार पिके पण घेतली जावू लागली .यामुळे माझी ओळख बागायतदार शेतकरी अशी झाली आहे .परंतु या दहा वर्षात तीनदा दुष्काळ पडला.कधी बेभरवशाचा तर कधी प्रतिकूल निसर्ग हे शेतकऱ्यांचे मोठे संकट आहे. धरणातच पाणी कमी झाले तर शेतात कुठून येणार. त्या प्रत्येक वेळी पिकांना फटका बसला आणि नुकसान झाले.भावडीतील दुसऱ्या टप्प्यावरील चारी पाचशे मीटर लांब आणि दहा मीटर खोल आहे. या एकाच स्पॉटवर पंधरा वीस MSEB च्या DP आहेत. तीथे किमान दीडसे इलेक्ट्रिक मोटारी आहेत. उजनी जलाशयाच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावर असे किमान पन्नास स्पॉट असतील आणि हजारो इलेक्ट्रिक मोटरी असतील. पप्पू घाडगे, कुंडलिक घाडगे, धनंजय चव्हाण, सुनील घाडगे, हनुमंत जाधव, पोपट उचाळे, तात्या साळवे या शेतकरी मंडळींचा उल्लेख केल्याशिवाय भावडी चारी हा विषय पूर्णच होऊ शकणार नाही. मागील दुष्काळाच्या वेळी या मंडळींनी चारीवरील दीडशे शेतकऱ्याकडून काँट्रीब्युशन जमा करून या चारीची खोली तीन मीटरने वाढविली. यासाठी टोटल ब्लास्टिंग पद्धत वापरली गेली.पन्नास फुटी पोकलेन वापरले. स्वतःची शेती करत करत हे शेतकरी इतरांच्या शेतीच्या पाण्याची व्यवस्था देखील निस्वार्थीपणे पहात आहेत हे कौतुकास्पद आहे.आता पर्यंत सामुदायिक चारी खोदायला मी दोनदा काँट्रीब्युशन दिले आहे.  वर्षातून किमान एकदा तरी इलेक्ट्रिक मोटर जळते, वर्षभरात इलेक्ट्रिक मोटरी भरायला/ दुरुस्त करायला एका एकराचा नफा जातो. MSEB म्हणजे इलेक्ट्रिक मोटारिंची बिले किमान चार-पाच एकराचा नफा घेऊन जातात. इलेक्ट्रिक मोटारीस मीटर नसते, असले तरी कागदावर.मग बिल कसे आकारतात तर एका  MSEB डिस्ट्रिब्युशन सेंटर वरून किती युनिट वापरले गेले आहेत ते पाहिले जाते. समजा जर एक लाख युनिट वापरले असतील आणि त्या सेंटर अंतर्गत दोन हजार इलेक्ट्रिक मोटारी असतील तर एक लाख युनिट भागिले दोन हजार मोटारी अशी युनिटची सरासरी काढून दर तीन महिन्यांनी बिल पाठविले जाते. यात MSEB चा अजिबात तोटा होत नाही. मग तुमच्या विहिरीला पाणी आणि शेतात पीक असो किंवा नसो.तुम्ही इलेक्ट्रिक मोटर वापरा अगर वापरू नका. MSEB चे मीटर मात्र चालू राहते. मी नियमित वीज बिले भरतो.परंतु अशामुळेच अनेक शेतकरी वीजबिले भरत नाहीत. प्रत्येक निवडणुकीत शेतकऱ्यांना चोवीस तास वीज देणार असे राजकारणी सांगतात पण ग्रॉऊंड रिऍलिटी फार वेगळी आहे. इथे आठवड्यातील तीन दिवस दिवसा आणि तीन दिवस रात्री फक्त आठ तास थ्री फेजची लाईट असते. सध्या तर ती सहा तास आहे.रात्री 1.05 am ला लाईट येते. कशी शेती करायची शेतकऱ्याने. कोणीतरी लाईट सिंगल फेज असताना दोन वायर स्पार्क करून इलेक्ट्रिक मोटर चालू करण्याचा शोध लावला. याला ते चुटका असे म्हणत. हे फार धोकादायक काम होते.आता तर लाईट सिंगल फेज असतानाही मोटर चालू करण्यासाठी उत्पादने मिळत आहेत. याचे नामकरण पण चुटका असेच झाले आहे. MSEB आणि शासनाच्या नाकर्तेपणामुळे असली उत्पादने बाजारात फोफावली आहेत. मग MSEB च्या अधिकाऱ्यासोबत तोडपाणी करून खात्रीशीर सिंगल फेज सप्लाय मिळविला जातो.म्हणजे असं जुगाड करून चोवीस तास लाईट आहे तर मग असला गोरखधंदा चालवीण्यापेक्षा शासन आम्हाला चोवीस तास थ्री फेज लाईट का नाही देत .धरणाची पाणीपट्टी, जमिनीचा शेतसारा यात एकराचा नफा जातो. कर्जाचे हप्ते अजून एक एकराचा नफा गेला म्हणून समजा. पाईपलाईन नादुरुस्त होणे, लीक होणे ही एक फार मोठी समस्या आहे.  एकदा एका ओढ्यात पाच फूट पाण्यात लिकेज झाले होते , लिकेज काढायचा खर्च तीस हजार झाला . हो बरोबर वाचले तुम्ही, तीस हजार . एकदा एका आडमुठ्या शेतकऱ्याने मुद्दाम माझ्या पाईपलाईनवर विहीर खोदली, पाईपलाईन दुरुस्ती खर्च पंचवीस हजार. पाईप लाईन लिकेज काढणे हा तर दोन तीन लोकांचा व्यवसाय झाला आहे. लिकेज काढायचे त्यांचे एक टेरिफ कार्डच आहे. लिफ्टच्या मोटरी चालू- बंद करणे हा पण दोन तीन लोकांना व्यवसाय झाला आहे.म्हणजे मी किती एकर शेती या इलेक्ट्रिसियन, MSEB, शासन, बँका, दुरुस्ती व देखभाल यंत्रणा, यांच्यासाठी करत आहे पहा.वर्षाच्या शेवटी जे उत्पन्न आलेले दिसते त्यातले 80-90 टक्के बऱ्याचदा आधीच खर्च झालेले असतात.कधी कधी तर त्यापेक्षा जास्त. तीन वर्षें थोडा नफा आणि चौथ्या वर्षी दुष्काळ आणि तोटा असे आमचे शेतकऱ्यांचे दुष्टचक्र चालू आहे. दुर्दैवाने आजही जितकी विक्री तितका नफा असे समजणारे अडाणी शेतकरी आहेत. नुसती शेती फायद्यात करणे फार अवघड आहे. शेती फायद्यात रहायला काहीतरी जोडधंदा हवा. 

मी शेती बागायती केली त्यामुळे वरील सगळ्यांना त्यांचा त्यांचा शेअर मिळत आहे.आहे का नाही इतरांची मजा.


नफ्यात सगळे वाटेकरी असतात पण तोट्यात कोण सोबत करत नाही. कोणताही शेतकरी आवडतंय म्हणून आत्महत्या नक्कीच करत नसेल. 


मला इतकच वाटतं की, प्राथमिक सोयी सुविधा  ( Basic Infrastructure )असतील आणि निसर्गाची साथ असेल तर शेती फायद्याची आहे. यात काय येते तर धरणे आणि कालव्यांची साखळी, जलयुक्त शिवार, पाणी फौंडेशन सारख्या योजना,म्हणजे हक्काचं पाणी, खात्रीशीर वीज पुरवठा, मागेल त्याला सबसिडीसह विहिरीवर सोलर मोटर, बीन व्याजी पीक कर्ज, पिकाला हमी भाव, हवामानाची अचूक माहिती देणारी यंत्रणा , कोणती पिकं घ्यावीत याचे मार्गदर्शन,योग्य पीक विमा योजना,निसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई,इ. मग बघा आम्ही शेतकरी कशी फायद्यात शेती करतो ते. हे सर्व कोण करू शकते तर शासन किंवा NGOs. शेतकऱ्यांना शासकीय तिजोरीतून वर्षाला सहा,बारा हजार रुपये मतासाठी लाच देवून लाचार बनविण्याची काही गरज नाही. त्याला प्राथमिक सुविधा द्या तो खंबीर आहे कष्ट करायला.


शेतकऱ्यां इतका आशावादी प्राणी शोधून सापडणार नाही. तोटा झाला तरी त्याला आशा असतेच की, यावर्षी तरी फायदा होईल. सर्व शेतकरी बांधवांचा आशावाद शासनाने जिवंत ठेवावा अशी श्री माताजींकडे प्रार्थना.


श्री माताजी खूप कष्ट आहेत हो शेती कामात तेव्हा श्री माताजी थोडी सी तो लिफ्ट करा दे l


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

शेताचा कॉस्मेटिक चेंज.

 निर्मला फार्म- भाग चार - शेताचा कॉस्मेटिक चेंज.

माणसाला कसं केस कापले, दाढी केली तर बरं आणि हलकं हलकं वाटतं . तसंच काहीसं अधून मधून शेतालापण करावं लागतं.पूर्वी शेती विहीर बागायत होती तेव्हा विहिरीचेच पाणी शेतात खेळायचे त्यामुळे शेतात बाहेरून कोणतही नवीन तण येत नसे.आता उजनी जलशयातून लिफ्टने शेतात पाणी आणल्यामुळे टनटनी, कासल्या अशी कसलीही तणं शेतात बेमाप वाढत आहेत. ही तणं शेतातील अंतर्गत रस्ता म्हणू नका, बांध म्हणू नका सगळीकडे केस वेडेवाकडे वाढल्यासारखी वाढत आहेत. बांधावर वेड्या बाभळी तर शेतकऱ्यांच्या जणुकाही पाचवीलाच पूजलेल्या आहेत. दर तीन चार वर्षानंतर एकदातरी बांध, रस्ते, विहिरीच्या आजूबाजूची जागा JCB मशीन लावून साफ करावी लागते. याने शेत निर्मळ होते पण हा अनुउत्पादक ( Non productive ) खर्च मात्र होत राहतो.याला अजून एक पर्याय आहे तो म्हणजे शेतात पिकांना जसे तणनाशक फवारले जाते तसे पिकं सोडून जी रिकामी जागा आहे तिथे पण वेळीच फवारणे. 


तण,खुरटी झुडपे याचे नियंत्रण कसे करावे याची दोन उदाहरणे माझ्याकडे आहेत. एक- माझे मामा, ते कधीच त्यांच्या शेतात काँगेस गवत वाढू देत नसत. काँग्रेस गवताचे रोप दिसले की लगेच ते उपटले जात असे. रोप परिपक्व होऊ दिले तर त्याच्या हजार बिया शेतात पडतात आणि आपणच तितके राक्षस निर्माण करतो असे ते म्हणत. तेव्हा बी यायच्या आधीच तणाचा नायनाट करा आणि अनावश्यक झाडे, झुडपे वेळीच काढा असं ते म्हणत आणि करत असत. दोन - माझे वडील, ते नेहमी असे म्हणायचे की, "शेतमजूराने आणि शेतमालकाने शेतात फिरताना नेहमी विळा किंवा कुऱ्हाड सोबत ठेवावी. कुठं तण, अनावश्यक झुडुप दिसले तर ते वेळीच उपटता येते किंवा तोडता येते.शेतात फिरले की, शेत काम सांगतं.शेतात फिरा आणि शेत चांगले ठेवा."


पूर्वी शेतात काम करणाऱ्या मजुरांची संख्या जास्त असायची.आमच्याच कडे 10-12 सालकरी शेतात कामाला असत. त्यामुळे शेतातील बऱ्याच गोष्टी नियंत्रणात रहायच्या. हल्लीचे शेतमजूर तणं, पिकं याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे पण अशा अनुउत्पादक खर्चात भर पडते . 


काही वर्षांपूर्वी मी एक चूक केली होती. ती म्हणजे शेतात बांधावर कुंपण करावे म्हणून गजगा आणि मोगली एरंडाच्या बिया आणून लावल्या होत्या. गजगा तर इतका वाढतो की झाडाच्या आजूबाजूला 10-15 फूट जमीन व्यापतो. मोगली एरंडाची  झुडपे पण चांगलीच मोठी होतात आणि हे दोन्ही फार कमी पाण्यात येते. आता दर दोन तीन वर्षांनी मला ही झुडपे साफ करावी लागत आहेत. चुकीला माफी नाही.


मे महिन्यात सतरा तास JCB ने आणि साडेचार तास ट्रॅक्टरने लेवल काम करून शेतात स्वच्छता मोहीम राबविली आणि शेताचे बांध, रस्ते आणि विहिरीजवळचा परिसर स्वच्छ केला आणि बांध दुरुस्त केले. यासाठी शेतकऱ्याचे तीन मॅन डेज् खर्च झाले.अशा कामात JCB, ट्रॅक्टर वाल्याचा हमखास फायदा होतो. या काढलेल्या वेस्टचे ढीगरे तयार केले आणि दिले पेटवून. आता कोण म्हणेल की, या वेस्टचे काही वेगळे मॅनेजमेंट नसते का करता आले. तर आले असते ना, पण माझ्यासाठी हाच स्वस्त पर्याय होता. आता या कॉस्मेटिक चेंजमुळे शेत एकदम स्वच्छ, निर्मळ झाले आहे आणि छान सुंदर दिसत आहे. असा शेतात होणारा अनुउत्पादक  खर्च टाळता यायला हवा. अनावश्यक खर्च वाचवीने म्हणजे पैसे कमावनेच आहे. जून - जुलै मध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकासाठी शेत तयार झाले आहे.

लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

शेतमालाला किंमत मिळणे कठीण.

 निर्मला फार्म- भाग तीन - शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळणे कठीण आणि व्यापाऱ्याच्या श्रमाला मोल मिळणे पण कठीण .

पहिली बाजू...

माझ्या वडिलांच्या काळात आमच्या शेतावर उंबर,मेंदी,कडुनिंब, बाभळ, रामकट (सरळ वाढणारी बाभळ ) आंबा, जांभूळ, आपटा, बेल, बोर,चिंच,निलगिरी,अशी विविध प्रकारची झाडे होती. पुढे शेताच्या चार वाटण्या झाल्या,प्रत्येक भावाने स्वतःच्या शेतात सुधारणा केल्या. काळाच्या ओघात आणि शेती बागायती करण्याच्या रेट्यात त्यातली बरीचशी झाडे आता नष्ट झाली आहेत.

सध्या माझ्या शेतात चिंच,सागवान,नारळ, चिक्कू,कडुनिंब,बांबू, असे निवडक वृक्ष उपलब्ध आहेत.शिवाय काही ठिकाणी कुबाभळ वाढलेले आहेत. हे वृक्ष मोठे झाले आहेत.दोन ठिकाणी वेड्या/कुबाभळीच्या झाडा वरून लाईटच्या तारा गेल्या आहेत ,काही तारा तर झाडाच्या खोडात रुतलेल्या आहेत .काही ठिकाणी कडूनिंबाचे वटलेले वृक्ष उभे आहेत. जमिनीची मशागत करता येण्यासाठी आणि पिकं निट येण्यासाठी मोठ्या झाडांच्या खालील भागातील फांद्या काढणे,शेतातील वटलेले वृक्ष काढणे, तारा खालच्या वेड्या बाभळी काढणे आवश्यक झाले होते. शेतातील कुबाभळ/ वेड्या बाभळी काढायला कोणाच्या परवानगीची गरज नसते असे मला व्यापाऱ्याचे सांगितले.


माझा एक CCF (Retired )मित्र आहे. तो या कुबाभळ बद्दल असं म्हणाला होता की, " सध्या लोकं इतक्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करत आहेत की, कडुनिंब, पिंपळ इ. सारखे वृक्ष शेतावर ठेवायला कोण तयारच नाही, म्हणून देवानेच कदाचित शाप म्हणून हा कुबाभळ किंवा वेडी बाभळ पृथ्वीवर पाठवली असेल. झाडं तोडणारे, पर्यावरणाचे नुकसान करणारे लोक या वेड्या बाभलीच्यासारख्या वृक्षाच्याच लायकीचे आहात. भोगा आता तुमच्या कर्माची फळं. "


मी विचार केला हा लाकूडफाटा काढून विकूया आणि दोन पैसे मिळवूया. ही वृक्षतोड नसून केवळ  झाडांच्या फांद्या, वेड्या बाभळी आणि वटलेले वृक्ष काढणे आहे. परिसरात पर्यावरणाचा समतोल रहावा यासाठी जून -जुलै मध्ये मी प्रतिष्ठान चिंच वाणाच्या पन्नास वृक्षाचे वृक्षारोपण करणार आहे. 


फांद्या काढणारे आणि विकत घेणारे व्यापारी आहेत. एकीकडे पर्यावरण, जंगल वाचवा मोहिमा चालू आहेत तर दुसरीकडे कंपन्यात बॉयलर, लाकडी खोकी निर्मिती ,घरात, हॉटेल्स मध्ये चुली आणि तंदूर , बेकऱ्या,इ. साठी मुबलक प्रमाणात लाकूडफाटा आणि कोळसा लागतो आहे, त्यामुळे वृक्षतोड सर्रास चालू आहे. MIDC लोणी देवकर जी आमच्या शेताला लागूनच आहे तिथे जळणासाठी लाकूडफाटा खरेदी करणाऱ्या दोन, तीन कंपन्या आहेत. तिथे पुतण्याने चौकशी केली तर समजले की असा जळावू लाकूडफाटा 3100₹ टन प्रमाणे विकत घेतला जातो. कंपन्याकडे रीतसर नोंदणी असलेले व्यापारी आहेत.जवळपासच्या दोन व्यापाऱ्यांसोबत बोलणी सुरु केली.

मी त्यांना विचारले, " तुम्ही हा लाकूडफाटा कुठे विकणार ?"तर उत्तर आले. "MIDC मधील कंपन्यात". दुसरा प्रश्न "किती रुपये टन प्रमाणे विकता?" उत्तर "2600₹ टन." तिसरा प्रश्न "मला किती भाव देणार?"उत्तर "800₹ टन."

इतका कमी दर का? तर म्हणाले, " झाडं कापणाऱ्या मेन कटरला 1000₹ आणि हेल्परला 600₹ रोज मजुरी द्यावी लागते ,( व्यापारी सांगतील ती माहिती आपण खरी समजायची .)त्यांना कामावर येण्या-जाण्याचा खर्च, कटींग मशीनला पेट्रोल, ऑइल लागते, कटिंग चेन लागतात, मशीन बिघडतात ते दुरुस्त करावे लागतात, ट्रॅक्टर वाहतूक,इ.विचारात घेतले तर आमचा प्रती टन 800₹ खर्च होतो . मग आम्हाला पण दोन पैसे नको का मिळायला."

म्हणजे गंम्मत बघा. कंपनी खरेदीचा दर 3100 असताना शेतकऱ्याला 2600₹ सांगितला जातो , त्यांचा खर्च + नफा 1800₹ सांगितला जातो , प्रत्येक्षात 2300₹ स्वतःकडे ठेवले जातात आणि ज्या शेतकऱ्याने इतके वर्ष सांभाळलेला माल आहे त्याला प्रती टन फक्त 800₹ देणार. म्हणजे केवळ 25%.काय हा अजब व्यवहार आहे.


मी म्हणालो, " कंपनीत तर माल 3100₹ ला घेतात." तर म्हणे, " नाही आमचा नाही घेत." "आरे तुम्ही पण तिथेच आणि तितक्यालाच विकणार आहात ना." मी म्हटले, "ठीक आहे मी ओळख वापरुन हा माल कंपनी त्यांच्या 3100₹ किमतीला घेईल असा प्रयत्न करतो . तुम्ही मला 50% म्हणजे 1550₹ टन भाव द्या."

मग त्यांनी बरीच कारणं पुढे केली. कंपनीत ट्रॅक्टरनं माल स्वीकारत नाहीत, बिल महिनाभराने मिळते,आमचं भांडवल अडकतं, इ. मग एक काम करा ना ,तुम्हीच आम्हाला 1800₹ टन प्रमाणे रोज रोख पैसे द्या आणि तुम्ही कंपनी कडून 3100₹  घ्या. भारीच,म्हणजे माझाच माल मीच रोज विकत घ्यायचा. यातून लवकर काही तोडगा निघत नव्हता.

शेवटी एक व्यापारी कमाल 1000₹ भाव द्यायला तयार झाला म्हणजे 32% तर दुसरा वाढता वाढता 1300₹ द्यायला तयार झाला. तो म्हणाला इतका दर तुम्हाला कोणच देऊ शकणार नाही. म्हणजे 42%.


झाडं कटिंग करायला एक तर इलेक्ट्रिक किंवा पेट्रोलवर चालणारे कटर लागतात. शेतकऱ्याकडे अशी साधने आणि अनुभवी मनुष्यबळ नसते. शेतकरी डायरेक्ट कंपनीला माल पाठवू शकत नाही.हॉटेल्स किंवा अन्य काही गरजवंत ठिकाणी तर असा माल 3200 ते 3300 टन प्रमाणे विकला जातो पण शेतकऱ्याला असे ग्राहक माहित नसतात.झाडाच्या फांद्या काढणे ही कधीतरीच घडणारी घटना आहे. त्यामुळे अशा कामासाठी शेतकऱ्याला व्यापाऱ्यावर अवलंबून रहावे लागते. व्यापारी प्रत्येक दिवशी सदर माल विकून 58% रक्कम कमवणार . 25% खर्च ग्रहित धरला तरी 33% निव्वळ नफा.

तर मग शेतकऱ्याच्या मालाला विक्री किंमतीच्या 50% किंमत मिळायला काय हरकत आहे? हेच तर आहे ना,सोयाबीन असो, तुर असो की, लाकूडफाटा शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणे कठीण आहे.


दुसरी बाजू...

हे काम करायचे ठरल्यानंतर व्यापारी चार माणसांची टीम घेऊन हजर झाला. दोन कटर आणि दोन हेल्पर. दिवसाला साधारणपणे चार  टन माल कट करतील असे त्याचे म्हणणे होते. 

पहिल्याच दिवशी एक अडचण आली. वेड्या बाभळीचे दोन ताटवे इलेक्ट्रिक लाईनच्या खालीच वाढलेला होते. वेड्या बाभळीला वेड्या का म्हणतात ते या प्रसंगामूळे समजले. पण आता काढाव्या लागणार होत्या त्या वेड्या बाभळी. या वेड्या बाभळी काढण्यासाठी इलेक्ट्रिक लाईनच्या दोन पोल मधील तारांचा एक गाळा सोडविणे भाग होते. MSEB त फोन केला तर अधिकाऱ्याने तात्काळ हजर होवून सुखद धक्का दिला . येताना ते एक डमी वायरमन सोबत घेवून घेऊन आले होते. डमी वायरमनने या कामासाठी एक हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. मी म्हणालो, "थोडे कमी पैसे घ्या." तर म्हणे, "तुम्हाला म्हणून योग्यच सांगितले आहेत, हेच या व्यापाऱ्याला दोन हजार सांगितले असते." झाले मी गप्प झालो. मला वाटते हा डमी वायरमन प्रत्येकाला असेच सांगत असेल आणि हवे तितकेच पैसे आकारत असेल .एकीकडे मला एक टन लाकूडफाटा विकून 1300₹ मिळणार आणि हा डमी वायरमन थोड्या वेळात हजार रुपये घेऊन जाणार.या डमी वायरमनने  काही वेळातच 'तारा जमीपर', करून टाकल्या आणि वेड्या बाभळी कापल्या गेल्या. वेड्या बाभळी, झाडांच्या फांद्या कापताना एवढेच पाहिले की त्यावर कोणत्याही पक्षाचे घरटे नाही.बाभळी कापताना मला वाईट वाटले पण यापेक्षा काही वेगळा उपाय नव्हता.


एकवेळ पूर्ण झाड लवकर कापले जावू शकते पण झाडाच्या फांद्या काढायला फार वेळ लागतो. वेड्या बाभळी काढणे तर फार किचकट आणि वेळखाऊ काम. कामाचा कमी वेग आणि मशीनचे बदलावे लागणारे पार्ट्स अशा कारणांमुळे शेवटच्या दिवशी व्यापारी निराश दिसत होता. मग मीच त्यांना विचारले, काय हो, "आज चेहरा का पडला आहे." मग ते बोलू लागले'

"सहा दिवसात अंदाजे फक्त पंधरा टन माल तयार झाला आहे . फांद्या,वेड्या बाभळीमुळे दिवसाला चार टन लाकूड कटाई काम व्हायला पाहिजे होते तसे झाले नाही. रोज किमान तीन चार लिटर पेट्रोल, ऑइल लागले,कंपनीत जळावू लाकूडफाटा तुकडे तुकडे करून द्यावा लागतो,दीड ते दोन फुट तुकड्याचे माप असते,फांदी पेक्षा तिचे तुकडे करायला चारपट पेट्रोल खर्च होते, 2500₹ चे ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरले आहे,800₹ एक प्रमाणे कटरच्या तीन नव्या चेन आणाव्या लागल्या, एक हॅन्डल नवा आणला तो गरम होवून वितळला,काय परवडले या कामात? म्हणून तुम्हाला कोण 1000₹ पेक्षा जास्त भाव देत नव्हतं ."

मग मी त्यांचा व्यवसाय समजून घ्यायचा प्रयत्न केला.

हा व्यापारी कुबाभळी तोडून त्या लाकडापासून कोळसा तयार करतो. एखाद्या शेतात कुबाभळी फार वाढल्या तर शेतकऱ्याला JCB मशीन लावून स्वतः खर्च करून त्या काढाव्या लागतात. त्यापेक्षा हा व्यापारी तेच काम मोफत करतो आणि सर्व माल घेऊन जातो. या लाकडाची तो वीटभट्टी प्रमाणे भट्टी लावतो आणि त्यापासून कोळसा तयार करतो. एक टन लाकडापासून तीनशे किलो कोळसा तयार होतो. पुढे हा कोळसा 15 ते 16 हजार ₹ टन प्रमाणे हॉटेल्सला विकला जातो. ते सांगत होते सॉ मिलला दारा-खिडक्यांच्या चौकटी बनविण्यासाठी कडुनिंब, बाभूळ, रामकटचे लाकूड लागते. त्यांना आंब्याचेपण लाकूड लागते. फुर्निचरसाठी सागवान लाकूड लागते. सॉ मिल मध्ये लाकडाची जी किंमत असते त्यातली 40% रक्कम व्यापाऱ्यास मिळते, त्यातील जवळपास अर्धी रक्कम शेतकऱ्याला मिळते.म्हणजे 60:20:20%. म्हणजे इतकी वर्षें झाडं सांभाळून शेतकऱ्याला 20%, दोन-चार दिवसात झाडे तोडून व्यापाऱ्याला 20% आणि सॉ मिल मालक 60%. त्याचं पुढे फुर्निचर बनते तेव्हा तर सॉ मिल किंवा फुर्निचरवाला त्याच्या चार-पाच पट अधिक पैसे बनवितो.म्हणजे उद्योगात कच्या मालापासून उत्पादन तयार झाले की किती किंमत वाढते बघा.खरा फायदा सॉ मिल किंवा फुर्निचर तयार करणाराला होतो.

या सहा दिवसांचा मीही हिशेब केला तर व्यापाऱ्याला जेमतेम प्रतिदिन मजुरी इतकाच लाभ झाला होता. इतक्या उन्हातान्हात आणि शारीरिक कष्टा पुढे तो विशेष नव्हता असे जाणवले.मजुरी महागल्यामुळे मला नाही वाटत हे लोकं जंगलात जावून लाकडे कापत असतील. कारण त्यांना ती विकायला पण परवडत नसेल.

व्यापारी स्वतःच्या कामगारांबद्दल सांगत होता अहो या असल्या 40-42 तापमाणात दिवसात 4-5 लिटर पाणी प्यायले तर साधी थेंबभर लघवी सुद्धा होत नाही.फार त्रास होतो या कामात.


मग या कामात फायदा नक्की कोणाला झाला. एका कंपनीने लाकूडफाटा विकत घेणे ही एक छोटी ऍक्टिव्हिटी आहे पण ती किती जणांना रोजगार, पैसे देवून जाते पहा. शेतमालक, व्यापारी, मजूर,पेट्रोल पंप, वूडकटर सुट्टे सामान विक्रेते, पाणी जार विक्रेते, डमी वायरमन,पुढे फांद्या गोळा करायला जेसिबी इ.इतकच नाही तर कंपनीपण काही टॅक्स कापून घेणार.असा प्रत्येकजण स्वतःचा शेअर घेऊन गेला. शेवटी मलाही वाटले की, व्यापाऱ्याच्या श्रमाला पण योग्य मोल मिळणे कठीण आहे. 

लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

स्टोन पिक अप ड्राईव्ह

 निर्मला फार्म- भाग दोन - होऊदे खर्च.शेतात स्टोन पिक  अप ड्राईव्ह.

एप्रिल 2024 - दुष्काळ असल्यामुळे माझे 75% शेत  पडीक किंवा मोकळेच होते .शेतात पाण्याअभावी जेमतेम 25% क्षेत्रात पीक आहे. दुष्काळामुळे शेतीची पिकपूर्व मशागत करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. शेतात दगडांचे प्रमाण होते. प्रत्येक वेळी नांगरट,रोट्याव्हेटर, फणपाळी, पिकाची बांधणी, अशी शेताची कामे करताना हे दगड त्रासदायक ठरत असत. यावेळी ठरवलं हे सगळे दगड गोळा करून शेताबाहेर काढायचे. पण कसे?  अशा कामासाठी सध्या Stone pickup machine उपलब्ध झाले आहेत. मी ते मिळविण्याचा प्रयत्न केला पण परम चैतन्याचीच इच्छा असावी की, हे काम मजुरांना मिळावे. शिवाय सध्यातरी मशीनपेक्षा मजूर उपलब्ध असतील तर मजुरी खर्च कमी आहे. गावात ऊस लागवड करणाऱ्या टोळ्या आहेत पण ते या कामासाठी तयार झाले नाही. गावात बेलदार समाजाची काही कुटुंबे राहतात आणि त्यांच्या महिला शेतातील दगड उचलणे, शेणखत विस्कटने अशी कामे करतात अशी माहिती मला मिळाली. बेलदार समाज म्हणजे डोंगर फोडून बांधकामासाठी दगड तयार करणारा भटका समाज. गेली काही वर्षें ते लोणी देवकर गावात रहात आहेत. त्यांना भेटलो तर एक ट्रॅक्टर ढंम्पिंग ट्रॉली जी नॉर्मली 600₹ ला उचलतात तीच त्यांनी मला 900₹ सांगितली. शहरात राहतोय असं समजलं की माझ्यासारख्याला गावाकडे सगळेच असे चढे दर सांगतात आणि वेड्यात काढतात. निगोसिएशन करत 750₹ मग शेवटी 600₹ ढंम्पिंग ट्रॉली असा दर ठरला पण प्रत्येक्ष शेतात आल्यावर त्यांनी तो 650 ₹ केला. 12 एप्रिलला काम सुरु झाले. ट्रॅक्टर मालक आणि चालक नेहमीचाच रणजित डोंगरे. 350₹ एक खेप वाहतूक या प्रमाणे ठरले.

बेलदार समाजाच्या 4-5 महिला रोज सकाळी 8 वाजता कामावर येत असत आणि दुपारी 4 वाजेपर्यंत दररोज 4 ते 5 ट्रॉली दगड उचलत असत.खूप कष्टाचे काम त्या करत असत. मी कामाची देखरेख करण्यासाठी ट्रॅक्टरच्या मागेच फिरत असे. माझ्या दिवसभरात 8 ते 9 हजार स्टेप्स होत असत. त्यांच्या दीड किलोमीटर वरून कामाला येणे-जाणे विचारात घेता 17-18 हजार स्टेप्स नक्की होत असतील. दगड उचलताना उठबस करणे, वाकून काम करणे, उन्हाने तापलेले दगड उचलणे आणि रोज इतके चालणे. यातील दोन महिला तर 62 ते 65 वयाच्या होत्या. 19,20 तारखेला दगड उचलून उचलून या महिलांच्या हातांच्या बोटातून रक्त बाहेर आले. हे पाहुन मला फार वाईट वाटले आणि त्यांची दया आली. त्या म्हणाल्या, "काय करणार, हे दगड कापऱ्या कापऱ्या आहेत, गोल दगडाने रक्त नाही निघत, हातात घालायला मोजे पण नाहीत." मी म्हटले, "आता उपचार काय करणार?" तर म्हणे, "कसले उपचार, हे आपलं रोजचंच आहे." 21 तारखेला या महिला हाताला, बोटाला फडकं गुंडाळून काम करू लागल्या. मग मी पाच हातामोझे विकत आणले आणि त्यांना भेट दिले. भेट मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झालेला दिसला. रोज 37 ते 40 तापमाणात काम करणे,मानलच पाहिजे या महिलांना आणि त्यांच्या कष्टाला.किती हे काबाडकष्ट. परमेश्वराने अशा कष्टकऱ्यांचे आयुष्य सुखी करावे अशी प्रार्थना करतो.काम करताना या महिलांची एक खोड होती, ती म्हणजे शेतात जिथे विरळ दगड असतील तिथे त्यांचा प्रयत्न भरभर पुढे जाण्याच्या रहायचा.यामुळे शेतात काही छोटे दगड तसेच रहायची शक्यता निर्माण व्हायची. परंतु जिथे जास्त दगड असतील तिथे त्या आवडीने दगड उचलायच्या . कारण काय तर कमी वेळात ट्रॉली भरली गेली पाहिजे. एरवी त्या मराठीत बोलायच्या पण काही महत्वाचे बोलायचे असेल तर त्यांच्या बेलदारी, मारवाडी सारख्या भाषेत बोलायच्या. कारण काय तर मला कळायला नको.यात एक सारखी कुरकुर करणारी महिला होती. तिची भुणभुण असायची की, "आम्हाला सांगितले नारळा एव्हढे मोठे दगड उचलायचे आहेत, इथं तर बारीक दगड आहेत, अशा दगडाला आम्ही 700,800 रुपये ट्रॉली घेतो." तीचं नावच मी कुरकुरे ठेवलं होतं.विरल दगड असले की एक बुड्डी तर म्हणायची, "काय हे शेत,ना दगड ना फिगड आम्ही नुसते चकरा मारूनच मरायचो. गाढव मेलं ओझ्यानं आणि शिंगारू मेलं येरजाऱ्यानं अशी आमची गत झालीयं." गाढव हेच मुख्य वाहन असणाऱ्या बेलदारी समाजातील महिलेने ही म्हण वापरणे मला फार गमतीशीर वाटले. ही बुड्डी भयंकर ड्रॅमेबाज होती कमी दगड असलेल्या शेतात फिरायची वेळ आली की ही पार्टी सोडून जायचीच भाषा करायची,असल्या कामाचे आम्ही इतके पैसे घेतो म्हणत खोक्याचीच भाषा बोलायची नाहीतर चाललो आम्ही काम सोडून म्हणायची. माझी अस्वस्था मात्र बिचाऱ्या एखाद्या पक्ष प्रमुखासारखी व्हायची.विरळ , बारीक दगड उचलावे लागत असल्यामुळे माझी उपस्थिती आणि देखरेख त्यांना चांगलीच नकोशी झाली होती.

रणजित,तसं पाहिलं तर त्याचं काम ट्रॅक्टर चालवणे . सुरुवातीला शेतात महिलांना उचलता येणार नाही असा एक मोठा दगड दिसला .मग मी आणि महिलांनी रणजितला विनंती केली. "अरे रणजित उचल ना हा एक दगड." पुढे मोठा दगड दिसला की रणजितला काम सांगणे सुरु झाले. शेवटी महिलांची भीड इतकी चेपली की, मोठा दगड दिसला की महिला म्हणायच्या, " वो ड्रायव्हर दादा या खाली आणि उचला तो दगड." आधार म्हणून धरायला बोट दिले तर माणूस अवलंबून रहायला हात पकडतो तसे हे झाले होते. बिचारा रणजित.

माझ्या बद्दल विचाराल तर अशा उन्हाची मला सवय नव्हती. उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून मी शक्य ती सर्व काळजी घेत होतो. अहो दिवसभरात चार लिटर पाणी प्यायलो तर शंभर मिली सुद्धा लघवी होत नव्हती.काय ही उष्णता. बरं बायको पुण्यात आणि मी लोण्यात ( लोणी देवकर ) फोन झाला की कधी काळी अधिकारी असलेला तिचा नवरा काय करतोय तर दगड उचलायच्या कामाचे सुपरविजन करतोय म्हणून तिची बोलणी ऐकावी लागायची ते वेगळंच.

सदर काम 13 दिवस चालले. यासाठी 57 (वूमन)मॅन डेज् लागले.ड्राइवर आणि मी असे 26 मॅनडेज लागले.47 ट्रॉली दगड शेताबाहेर काढले आणि यासाठी 47000 हजार रुपये खर्च झाला. या वयस्कर दोन महिला कामाला फार चिवट आणि दिलेला शब्द पाळणाऱ्या होत्या. या तेरा दिवसात तीनदा असे घडले की, बाकी महिलांनी कामाला दांडी मारली पण या दोन म्हाताऱ्या हजर . शेवटी या दोघींना मी 1000₹ बक्षीस दिले. होऊद्या खर्च पण आता दगड, उट्या विरहित मातीदार, कसदार शेत पाहताना मिळणारा आनंद काही वेगळाच आहे. यानंतर शेतीची मशागत करणे सुलभ होईल आणि पिकं पण जोमदार येतील.

लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

वाटेकरी

 *निर्मला फार्म*-भाग एक -  *वाटेकरी भेटला.*

यापूर्वी माझ्या शेतात बलभीम चितारे, बाळू चितारे, सुरेश चवरे हे शेतमजूर वाटेकरी होवून गेले . सुरेश चवरेला शेतातून काढायचे ठरल्यानंतर मी जून -जुलै 23 पासून वाटेकरी शोधत होतो. पण काही केल्या योग्य शेतमजूर वाटेकरी भेटत नव्हता. माझी अवस्था अगदी नटसम्राट सारखी झाली होती.

कुणी वाटेकरी देता का, वाटेकरी? एका तुफानाला कुणी वाटेकरी देता का?

एक तुफान पाहुण्या रावळ्यांना सांगतंय, शेतकरी मित्रांना सांगतंय, व्हाट्सअँप मेसेजेस करतंय, शेतात इतकं सारं भांडवल गुंतवून शेती करायला शेतमजूर वाटेकरी शोधत हिंडतंय, शहरात म्हणू नका, खेड्यात म्हणू नका सगळीकडं नुसतं वाटेकऱ्याला धुंडतंय.

कुणी वाटेकरी देता का? वाटेकरी?

एका तुफानाला कुणी वाटेकरी देता का? 

खरंच वाटेकरी मिळणं अवघड झालंय की काय असे वाटायला लागले आहे.आठ, दहा मजूर भेटले पण जे अयोग्य होते त्यांना मी रिजेक्ट केले आणि योग्य वाटले त्यांच्या अटी जास्त होत्या.आता एक वाटेकरी नक्की केल्यावरही किमान 3-4 चांगल्या मजुरांचे फोन आले पण त्यांना आता उशीर झाला.


लोकांना आता कामं हवी आहेत पण उणाताणात, शेताची, जास्त कष्टाची कामे नको आहेत. लोकांना सगळं कसं झटपट हवं आहे. नेमकी शेती झटपट श्रीमंत करण्यात मोडत नाही.


कोणत्याही कामाची योग्य वेळ यावी लागते.परमेश्वरी परम चैतन्याने जाणले आणि मला योग्य वाटेकरी भेटला असे मी समजतो.


नाव - राजेंद्र बजरंग लोंढे. मुळगाव - हत्तीज, ता. बार्शी, जि. सोलापूर. माझा भाचा मनोजकुमार सुभाष पाटील याने ही मध्यस्थी केली.

2 एप्रिल 2024 ला  राजेंद्र लोंढे, त्यांच्या पत्नी हेमा, मुलगा कु. महादेव, मुलगी सारिका, तिच्या दोन मुलीसह हे कुटुंब माझ्या शेतावर डेरे दाखल झाले.

वाटेकरी नेमणे ही पण एक प्रक्रियाच आहे. वाटेकऱ्याला एक लाख रुपये उचल / ऍडव्हान्स रक्कम द्यावी लागली. शिवाय दरमहा घरखर्चाला ठराविक रक्कम द्यायची आहे. त्यांच्या लेबर वर्क या जबाबदारीसाठी पण भांडवल शेतमालकालाच गुंतवावे लागते. वाटेकऱ्याचा रीतसर पाच वर्षांचा नोटराईज करार केला आहे. यात वाटेकऱ्याची जबाबदारी म्हणजे सर्व प्रकारचे लेबर वर्क आणि बाकी जबाबदारी शेत मालकाची असते . वाट्याचे हिस्से म्हणाल तर नगदी पीक केल्यास वाटेकऱ्याला चौथा वाटा मिळेल आणि भुसार पीक केल्या तिसरा वाटा मिळेल. याचा अर्थ वाटेकरी केलेल्या पिकाचा तिसऱ्या किंवा चौथ्या भागाचा मालकच असतो. शेतीच्या पिकात खेळत्या भांडवलाची सायकल फार सावकाश चालते. आता हेच पहाना. सोयाबीन पीक चार महिने, तुर साडेपाच महिने, केळी बारा महिने, ऊस बारा आणि आडसाली असेल तर अठरा महिने. उद्योगात खेळते भांडवल सायकल वर्षात किमान 5 ते 6 वेळा फिरते आणि हॉटेल सारख्या व्यवसायात तर दररोज फिरते. म्हणजे हॉटेल मध्ये सकाळी 100₹ गुंतविले तर रात्री त्याचे किमान 120₹ झालेले असतात.  शेतीत भांडवल फार महिने अडकून पडते आणि वाटेकऱ्याला, शेतकऱ्याला 6,12,18 महिन्यानंतर पैसे मिळतात. तेही अनिश्चित.


तुम्ही 12th Fail सिनेमा पाहिला असेल. त्यात एक डायलॉग आहे. . UPSC परीक्षा देताना चाचणी परीक्षा द्या, पास झाले की, मेन परीक्षा द्या , ती पास झाली की, मुलाखत द्या . यात कुठल्याही लेव्हल वर फेल झालं तर , मग पुन्हा बॅक टू क्वेअर वन. मग पुन्हा रिस्टार्ट, रिस्टार्ट, रिस्टार्ट.


या वर्षी गंभीर दुष्काळामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतीची अवस्था पण अशीच बॅक टू क्वेअर वन झाली आहे.याला मी पण अपवाद नाही. मग काय पुन्हा एकदा रिस्टार्ट आहे.


खरंतर जे काही होतंय ते सारं काही परम चैतन्यच करत असतं आपण केवळ निमित्तमात्र किंवा माध्यम असतो.आपण फक्त त्या परमेश्वरी चैतन्याशी एकरूप व्हायचे. मग सगळं कसं सहज होत राहतं. याचा अर्थ असेल हरी तर देईल खाटल्यावरी असा नाही.आपण आपले कर्म करत रहायचे. आपण जमिनीत बी पेरतो. ते कधी काळ्या मातीत , कधी मुरमाड मातीत,तर कधी दगड धोंड्यात पडते.तरी त्याला अंकुर फुटतो, त्याचे रोप बनते, त्याचे झाड होते. हे होताना त्याला त्रास होत नसेल का? होत असेल ना. पण हे दैवी कार्य अगदी सहज घडते. तसं आपण देवाशी जोडलेले राहूया. आपली संकल्प सोडलेली सर्व कामे सहज होत राहतील .


परमेश्वराच्या कृपेत या वर्षी शेतात केळी,ऊस, सोयाबीन,तुर अशी पिके घ्यायची आहेत. केळीला ड्रीप करायचे आहे. पिकपूर्व बरीच कामे करायची आहेत.परमेश्वरानेच आपल्याला या भूमिका दिलेल्या आहेत. आता बघूया यात हा राजेंद्र लोंढे वाटेकरी ही भूमिका कशी पार पाडतात ते.मुळात मजुरी, सालकरी आणि वाटेकरी यात फरक आहे. मजुरी ही दैनंदिन असते. एक दिवस कामं केले की लगेच मजुरी मिळते. सालकरी म्हणजे वर्षाला साधारणपणे 1.2 ते 1.3लाख रुपये या प्रमाणे वर्षभर काम करावे लागते. वाटेकरी म्हणजे शेतात जी पिकं घेतली जातात त्याच्या नफ्यात करारप्रमाणे वाटा मिळतो. या प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी असते. राजेंद्र पूर्वी सालकरी होते आता वाटेकरी झाले आहेत . त्यांनी वाटेकरी म्हणून कष्ट केले तर चार पट अधिक आर्थिक लाभ होऊ शकतो. पण यासाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना खूप मानसिक बदल करावा लागेल. गाव बदललं की सहवास बदलतो. त्यांना चांगल्या लोकांचा सहवास ठेवावा लागेल.व्यसनी लोकं आणि व्यसनापासून दुर रहावे लागेल. शेतातले उत्पादन वाढावावे लागेल. 

कोणताही मजूर काम मिळेपर्यंत स्वतःची फार जोरदार जाहिरात करतो. मी एकरी इतके टन उसाचे उत्पादन काढेल,शेताचे कडे कोपरे स्वच्छ ठेवेल, पिकात तणतोडा दिसणार नाही,शेत एके शेत करेल, शेत सोडून उगाच इकडे, तिकडे बोंबलत फिरणार नाही, मला कसलंही व्यसन नाही,माझं इतक्या माणसाचं कुटुंब आहे सगळे शेतात कामं करतील,घरातल्यांनी कामं केली तर मजुरीचा पैसा बाहेर जात नाही हे मला माहित आहे ,मला मोटर,लाईट आणि पाईप लाईन कामातलं सगळं येत,इ. असंच सारं हे लोंढे पण बोललेले आहेत. त्यांच्या बोलण्यात आणि प्रत्येक्ष कामात काही फरक असायला नको इतकच वाटतं.कारण यावर्षीच्या नियोजनात वाटेकऱ्याची भूमिका फार महत्वाची आहे. बरं इतकं करून आपण या कुटुंबाला इकडे आणायचे आणि स्थानिक लोकं त्यांना MIDC त काम मिळेल,धुनी भांडी करा,दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करा असले सल्ले  देत असतात. या फॅमिलीला शेतात कामं करायला आणलेले आहे. काही कोटी रुपये किंमतीचे शेत आणि येथील सोयी साधने त्यांच्या ताब्यात दिली आहेत. त्यांनी शेतात काम, कष्ट करत रहावे अशी अपेक्षा आहे. माझ्या राजेंद्र आणि महादेव कडून खूप आशा, आकांक्षा आहेत. त्यांनी चांगले कामं केले तर आम्हा दोघांनाही अपेक्षित पैसा,यश, आनंद आणी समाधान मिळेलच की.

लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

Thursday, 7 March 2024

केल्याने होत आहे रे!

 केल्याने होत आहे रे!

डेंटिस्ट डॉ चेतन पोपटराव पराडे हे डॉ आकाश कदम या माझ्या मेव्हण्याचा क्लासमेट त्यामुळे माझी त्यांच्याशी ओळख झाली. मागच्या वर्षी मला समजले की त्यांनी पन्नास एकर केळीचे पीक केले आहे तेव्हापासून त्यांचे शेत पहायला जाण्याची इच्छा होती ती 29 जानेवारीला पूर्ण झाली.

सकाळी पुण्याहून निघून 10.30ला सासरे श्रीबलभीमराव जाधव कु.आकाश जाधव आणि मी महाळुंग, श्रीपूर या गावी पोहोचलो. त्यानंतर पुढील तीन तास ऐकत आणि पहात राहिलो डॉ चेतन पराडे याची रोलर-कोस्टर, चढ-उतारांची सक्सेस स्टोरी...


2020 मध्ये शेती महामंडळाची शंभर एकर जमीन ठराविक कालावधीसाठी भाडेकराराने देण्याची एक जाहिरात होती. डॉ चेतन यांनी हा फॉर्म भरला. यांचा दर कंपेटिटिव्ह असल्यामुळे अर्ज मंजूर झाला. सुरुवातीलाच दोन वर्षाचे भाडे डिपॉजिट स्वरूपात भरायचे होते ते यांनी भरले. प्रोजेक्टचे नामकरण निर्मला ऍग्रो अँड फार्म्स (NAAF) असे केले. 2021 ला जमिन ताब्यात मिळाली आणि कामं सुरु झाली तितक्यात कोरोना वाढला ज्याचा चेतनला डॉक्टर फायदाच फायदा झाला.डॉक्टर असल्यामुळे पुणे - श्रीपूर विना अडथळा ये-जा करता येत होते, लॉकडाउन मध्ये शेतीची कामं सुरु होती पण कोरोनाच्या भीतीने स्थानिक लोकांच्या हाताला काम नव्हते  त्यामुळे या कामाला माणसं, यंत्रणा उपलब्ध झाली आणि लोकांना रोजगार मिळाला.


ती शंभर एकर जमीन गेली 8-10 वर्ष पडीक होती. सगळीकडे वेड्या बाभळींचे जंगल वाढले होते. जेसीबी लावून सर्वप्रथम ते काटेरी जंगल साफ केले, त्याची विल्हेवाट लावली आणि जमीन स्वच्छ केली. आता शंभर एकर जमीनीची कशी डेव्हलोपमेंट करायची याचा एकत्रित प्लॅन करणे गरजेचे होते. यात त्यांना काही जाणकार आणि नेटाफेम एजन्सीचे सहकार्य झाले. शेतात कॅनॉलचे पाणी येत होते. अगोदर एक छोटे शेततळे तयार केले, कॅनॉलचे पाणी या शेततळ्यात घेतले, तिथेच शेत मजु्रांसाठी खोल्या बांधल्या आणि शेतीचा श्रीगणेशा झाला. पण एव्हढ्याने त्या शंभर एकरांचे भागणार नव्हते. मग हाती घेतला सहा एकर आकाराचा भव्य शेततळ्याचा प्रोजेक्ट.  सहा एकरावर जमिनीच्या खाली 15 फूट आणि जमिनीच्या वर 20 फूट महाकाय प्रोजेक्ट पोकलेन, हेवी ट्रक्स, ब्लास्टिंगच्या मदतीने अहोरात्र कामं करून केवळ दोन महिन्यात पूर्ण केला. इथं जी कामं करायला माणसं होती त्यांच्यासाठी गावातच एक मेस लावली होती केवळ त्याचं बिल तीन लाख झाले होते. शेततळ्यावर जो प्लास्टिक पेपर अंथरला आहे तो पस्तीस लाखाचा आहे. या शेततळ्यातून जी काळी माती बाहेर काढली ती शेततळ्याचा भराव लेवल करण्यासाठी वापरली, दहा-दहा एकरांचे प्लॉट तयार केले,शेततळ्यातून जो मुरूम, दगड बाहेर आला त्यातून शेतात प्रत्येक प्लॉट पर्यंत जाण्यासाठी पंधरा फुटी रस्ते तयार केले. स्वतंत्र डीपी घेतला, त्या शेततळ्यावर प्रत्येकी दहा HP च्या आठ इलेक्ट्रिक मोटरी बसविता येतील अशी सोय केली, सध्या चार मोटारी आहेत. आठ सॅन्ड फिल्टर्सची सिस्टीम उभारली, इथून प्रत्येकी दहा एकर क्षेत्रात ड्रीप इर्रीगेशन होईल अशा आठ पाईपलाईन सुरु होतात. एक मोटर चालू केली तर दहा एकर भरणे होते. आठ मोटरी चालू केल्या तर एका वेळी 80 एकर भरणे होऊ शकते. पिकांना औषधे, बुरशीनाशके, खते ड्रीप मधून देण्याची सोय आहे. शेतावर वर्षभर बांधील कामं करणारे दहा महिला आणि दहा पुरुष कामगार आहेत. या प्रोजेक्टमुळे डायरेक्ट इनडायरेक्ट 40-50 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सुदैवाने इथं कामं करणारे मॅनेजर आणि कामगार श्रमांची, मोबदल्याची जाणीव असलेले आणि प्रामाणिक आहेत. हा कर्मचारी वर्ग खुरपण, शेणखते टाकणे, मल्चिंग करणे, कीटक नाशके फवारणे, पिकांची निगा राखणे, पाणी व्यवस्थापन करणे आदी कामं अगदी आपलेपणाने करताना आढळले. चेतनने सुरुवातच पन्नास एकर केळी पिकापासून केली. पीक चांगलं आलं, एक्स्पोर्ट केलं आणि चांगला आर्थिक फायदा झाला. आता त्यांच्या प्रोजेक्टला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला पपई , कलिंगड ही पिकं केली जी चांगलीच तोट्यात गेली. एकदा वादळ झालं आणि तीन एकर केळी आलेल्या फळासह झोपली, म्हणजे पुन्हा मोठं नुकसान. सध्या शेतावर प्रत्येकी दहा एकरावर आलं, पेरू, शेवगा आहे, पन्नास एकरावर केळी पीक सुरु, खोडवा, निडवा आहे आणि उर्वरित क्षेत्रात ऊस होता. हे मी एका वाक्यात लिहून मोकळा झालो पण त्यामागे आहेत डॉक्टरचे अपरिमित कष्ट.


चेतन स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे त्यांना प्रत्येक पिकाच्या तब्बेतीमधील लहानसहान बदल लगेच लक्षात येतात आणि त्यावर लागलीच उपचार करतात. शेणखत, मळी, राख, औषधे, खते, इ. पुरवठा धारक आणि मालाच्या विक्री, एक्स्पोर्टचे नेटवर्क उभे केले आहे.


चेतनचे मुळ गांव बाभुळगाव जे श्रीपूर पासून 15 किमीवर आहे. तिथे त्यांची वडिलोपार्जित 16 एकर जमीन आहे. या 16 एकराच्या अनुभवरून चेतनने ही 100 एकराची उडी घेतली आहे जी फारच कौतुकास्पद आहे. यात आढळतं ते चेतनचे व्हिजन, आर्थिक धोका, भांडवल उभारणी आणि व्यवस्थापन, साहस, हुशारी, कष्ट आणि उपयुक्त लोकांची सांगड घालण्याची कला. चेतन एकदम इनोसंट आहेत त्यांच्याकडे पाहुन या कार्याची कल्पना पण येत नाही.


कथा ऐकताना लक्षात आले की, इथं लाखात, कोटीत खर्च झाला आहे, होत आहे, हे मुळीच सोप काम नाही. आता आर्थिक उलाढाल पण त्याच प्रमाणात आहे. या प्रोजेक्टबद्दल बोलताना ते म्हणाले, " हे करत असताना मला भीती अशी कधी वाटलीच नाही. ना कधी दडपण आलं, ना कधी झोपमोड झाली. ही सारी श्री माताजी निर्मला देवींची कृपा.सगळं कसं सहज चाललं आहे. घरातल्या सगळ्यांचा सपोर्ट आणि दाखविलेला विश्वास तितकाच महत्वाचा आहे."


वॉटर मॅनेजमेंट सिस्टीमच्या ठिकाणी छान शेड उभारले आहे. छोटेखानी ऑफिस आहे. ऑफिसमध्ये श्री माताजींचा फोटो आहे. चेतन इथली शेती सहजकृषी प्रमाणे करतात. म्हणजे काय तर शेती, पिकं करण्यासाठी वैश्विक चैतन्य आणि पृथ्वी किंवा पंच तत्वाचे सहाय्य घेणे. ही श्री माताजींनी सहजयोगात निर्माण केलेली सहजकृषी पद्धती आहे. यात कामगारांचा पण सहभाग आहे.


डॉ चेतनने खरंच इथं नंदनवन उभ केलं आहे. ते म्हणाले, " इथं शेततळ्याजवळ, वॉटरसप्लायजवळ आलं की पूर्ण शंभर एकरातील पिकांचे विहंगम दृष्य दिसते आणि इथलं वातावरण इतकं आल्हाददायक असतं की,अगदी काश्मीर सारखं वाटतं. "


डॉ चेतनला भविष्यात अजून यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा.


शब्दांकन...

लेखक योगीराज देवकर.

Wednesday, 11 October 2023

युरोप ट्रिप 2023

 विक्रांत, मेघना, अर्णव आणि आहाना अबदागिरे फॅमिलीस नमस्कार!


पूर्वी सासरे ठाण्यात रहायचे तेव्हा  त्यांच्याकडे जाऊन सासुरवाडीत राहणे होत असे. सध्या सासरे, सगळे साडू, व्याही,असे जवळचे  सगळेच नातेवाईक पुण्यातच रहात असल्यामुळे कोणा नातेवाईकांच्या घरी जाऊन मुक्काम करणे ही गोष्ट घडत नाही . तुम्ही म्युनिक, जर्मनीत राहता, इथे येऊन तुमचा पाहुणचार घेणे, तुमच्याकडे येऊन राहणे  केवळ तुमचा आम्हाला युरोप फिरायला यायचा केलेला आग्रह आणि अमेय आणि रुचिराचे या सुट्टीत भारतात न येता जर्मनी, युरोपला ट्रिप करूया या कल्पनेमुळे शक्य झाले.एरवी हॉटेल मध्ये जाऊन राहणे वेगळे पण यनिमित्ताने खूप वर्षानंतर नातेवाईकाच्या घरी जाऊन जास्त दिवस राहण्याचा योग आला. तुमच्या स्वागत आणि आदरातिथ्यामुळे  हा अनुभव खूप चांगला आणि कायम लक्षात राहील असा ठरला.


ऑस्टपार्क मधील बार्रबेक्यू पार्टीच्या वेळीच तुम्ही आमच्यासाठी केलीली तयारी लक्षात आली होती. तेव्हा या मेमोरेबल ट्रिप साठी सर्वप्रथम तुमचे मनःपूर्वक आभार!


पण खरंतर तुमची ही सगळी सुट्टी आमचा पाहुणचार करण्यात खर्च झाली याची खंत वाटली.


एकत्र राहताना आपल्यामुळे कोणाला काही त्रास होऊ नये असा माझा प्रयत्न असतो तरी माझे स्पष्ट आणि कडक बोलणे यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर किंवा आम्हा कोणाकडून कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमस्व. (अमेयने तर मला बर्न मध्ये सूचनाच दिली की, त्या अर्णवला मोठ्या आवाजात सांगितलेले ऐकायची सवय नाही. एक बरंच झालं ही सूचना आणि याचा सराव भविष्यात आजोबा झाल्यावर मला फायदाच होईल.😀)


या ट्रिपमध्ये लक्षात राहीले ते अर्णव आणि आहानाने आपल्या बरोबरीने तयार होऊन ट्रिपच्या वेळा पाळणे. आहानाच्या निरागस वागण्याने ट्रिपची आणि येथील वास्तव्याची मजा वाढली. हुशार आणि समजूतदार आहेत तुमची दोन्ही मुलं.


युरोप मध्ये टुरिझमसाठी सगळं रेडी असलेलं इन्फ्रास्ट्रॅक्चर, तुमच्या स्वतःच्या कारने आणि अमेयने इंटरनॅशनल ड्रायविंग लायसन्स घेऊन युरोप मध्ये रेंटेड कारने पार्किंग टू पार्किंग दिलेली सेवा,आल्प्सपर्वत रांगा, बर्फाछाद्दीत शिखरे,प्रदूषणाचे कमी प्रमाण, वाहतुकीतली शिस्त, स्वच्छ पाण्याच्या वाहणाऱ्या नद्या,प्रत्येक ठिकाणी केलेले ऍडव्हान्स इंट्री बुकिंग, इंटरलाखन आणि झुरीच येथील अनुक्रमे छान कॅम्पिंग साईट आणि युथ हॉस्टेलची निवड, डे टू डे चे प्रॉपर प्लँनिंग, स्विझरलँड आणि एकूणच युरोपमधील महागाईवर मात करण्यासाठी पोर्टेबल गॅस शेगडी पासून केलेली तयारी, कल्याण भेळ,मिसळ, गिट्सची तयार पाव ,पनीर  भाजी,ब्रेड-ऑम्लेट,मॅगी, चितळे, जोशी फूडस् चे प्रॉडक्ट्स, ( ब्रेकफास्ट, लंच असो की डिनर या सेवेसाठी सदैव तत्पर रुचिरा, मेघना आणि अनिताचे विशेष कौतुक आणि आभार. एकवेळ Lazy Rancho इथे फूड तयार करणे ठीक होते पण त्यांनी विशेषतः Brienzsee आणि Bern इथे ऑड कंडिशन्स असताना कूकिंग केले ते कायम लक्षात राहील. ) LIDL, ADLI, KAUFLAND अशा सुपर स्टोअर्स, Ali super food मध्ये तसेच Macdonald मध्ये मिळणाऱ्या खाद्य पदार्थामुळे युरोपात महागाई असली तरी त्यातल्यात्यात इकॉनॉमिकल करता आली आणि कारच्या प्रवासामुळे मुळे पण हे शक्य झाले.


नाहीतर काय इथली महागाई आणि काय या युरोपीयन लोकांचे टुरिस्टच्या प्रति भेदभाव केल्यासारखे वागणे . पॅरिस आणि मिलान शहरे तर भुरट्या, पाकीटमार चोरांची शहरे आहेत .काय या देशांची ख्याती,इथे गेल्यापासून परत येईपर्यंत पिकपॉकेटर्स पासून सावध रहा हेच ऐकायला मिळते आणि मला तर अनुभवायलाच मिळाले . शहाण्या माणसाने फ्रान्स आणि इटली ट्रीपला अजिबात जाऊ नये या मतावर मी आलो आहे.


प्रत्येक्ष ट्रिपच्यावेळी वातावरण उष्ण होते तरी सगळा निसर्ग पाहता आल्यामुळे ट्रिप चांगली झाली आणि आपल्याला एन्जॉय करता आले याचा आनंद आहे. ट्रिप नंतर सुरु झालेला गारवा निर्माण करणारा पाऊस जर ट्रिपच्या वेळी आला असता तर आपले हाल झाले असते. 


तुम्हा चौघान्ना जर्मन भाषा येते याचा या प्रवासात आम्हाला लाभ झाला.( अर्णवचा जरा जास्तच.)तुम्ही आणि अमेय अभ्यासू ट्रिप ऑर्गनायझर असल्यामुळे ही ट्रिप छान झाली. मी यापूर्वीही पण म्हटलंय की, पूर्वी आम्ही आम्ही अमेयला भारतातील राज्यात फिरायला घेऊन जायचो आता त्याने आम्हाला सिंगापूर, जपान नंतर युरोपची  ट्रिप घडविली आहे. फीलिंग प्राऊड.


देवकर आणि अबदागिरे फॅमिलीची ही पहिलीच एकत्र आणि मोठी ट्रिप होती. आता लवकरच आपण आपल्या भारतात भेटूया आणि महाराष्ट्र किंवा भारत ट्रिप करूया. अर्णवला किल्ले पहायचे आहेत ते पाहूया.


अमेय,रुचिरा आणि आहानाचा कमी वेळात चांगलाच लळा निर्माण झाला होता त्यामुळे आहाना सारखी "अमेय दादाsss, रुची वहिनीsss!" असा दोसरा काढत होती. आम्ही निघत असताना अर्णव भारी बोलला. मेघनाला म्हणे, तु म्हणत बस आता, "योगीराज भाऊजी sss, अनिता मावशी ( माई )sss!"


आता पुढचे काही दिवस तुम्हाला घर मोठे झाल्यासारखे वाटेल आणि आम्हाला सुनेसूने.


अर्णव, छान अभ्यास कर आणि मोठ्ठा Scientist हो. आता तुला तुझे 16 एरिया ऑफ इंटरेस्ट पण समजले आहेत. पण त्यासाठी अभ्यास करावा लागेल,मेहनत घ्यावी लागेल, आणि हो मम्मी, डॅडी चे ऐकावे लागेल. आरे बाबा कोणत्याही मुलाला भविष्य चांगले व्हावे म्हाणून त्याचे आई, वडीलच रागवतात रे. तुला Scientist होण्यासाठी शुभेच्छा.💐


चिमणी आहाना तर काय उद्या उड्या मारतच स्कूल मध्ये जाईल.


तिकडे उजव्या बाजूने चालायची सवय झाली होती आता मुंबईत उतरलो की डाव्या बाजूने चालणे अवघड जाईल  असे वाटते.🤣🤣


असो पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभार!

😅😂🤣🙏🏻💐👍🏻