Thursday, 8 August 2024

नगदी पिक ऊस

 निर्मला फार्म- भाग बारा - नगदी पिक ऊस.

शेतकऱ्यांना हमखास दोन पैसे मिळवून देणारे नगदी पिक म्हणजे - ऊस. ऊसाचे पिक करायला इतर पिकांच्या तुलनेत कष्ट कमी लागतात. यावर्षी ऊसाची आडसाली लागण करण्यासाठी आठ एकर क्षेत्र नांगरून तयार ठेवले होते. 15 जुलै दरम्यान जी ऊस लागवड केली जाते ते पिक 18 महिने शेतात राहते त्याला आडसाली ऊस म्हणतात. डिसेंबर महिन्यात जर ऊस लागवड केली तर ते पिक 12 महिने शेतात राहते त्याला सुरु किंवा एकसाली ऊस म्हणतात. यावर्षी इंदापूर तालुक्यात सुदैवाने जून महिन्यातच बऱ्यापैकी पाऊस झाला.तीव्र दुष्काळामुळे पहिल्यांदाच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लिफ्टचे पाणी बंद झाले होते.त्यामुळे शेतकऱ्यांची खोडवा, निडवा ऊसाची पिके अडचणीत आली होती. ऊसाचे पिक एकदा शेतात लावले की ते पुन्हा पुन्हा घेता येते. दुसऱ्या वर्षी पुन्हा उगवणाऱ्या ऊसाला खोडवा म्हणतात तर तिसऱ्या वर्षीच्या ऊसाला निडवा म्हणतात. या वर्षी वेळेवर आणि गरज होती तेव्हा आलेल्या पावसामुळे आमच्या शेतात उभा असलेल्या खोडवा ऊस पिकाला अक्षरशः जीवदान मिळाले याकरिता मी वरूण देवता,परमेश्वराचे  हृदयापासून आभार मानतो. पाऊस झाल्यामुळे शेतात तण वाढले होते त्यामुळे वापसा होताच शेत दोनदा फणले आणि ऊसासाठी सरी सोडली.


शेतातील रस्त्यावर आणि बांधावर तण वाढले होते त्यामुळे वाटेकरी पोपट दळवी यांनी ऊस लावण्याआधीच त्यावर राऊंड अप औषध फवारणी केली . असा स्वतः पुढाकार घेऊन वेळेवर कामे केली तर शेत स्वच्छ, तण विरहित राहील आणि पिकाची उत्पादकता वाढायला नक्कीच मदत होईल.


ऊस पिकाला कमी कष्ट लागतात म्हणण्याचे कारण असे की, ऊसाची नांगरट, फनपाळी, सरी सोडणे ही कामे ट्रॅक्टरवाला एजन्सी करते . ऊस लागवड मजुरांची टोळी करते.ऊसाचा बुजवटा आणि बांधणी ट्रॅक्टरवाला एजन्सी करते . शेवटी ऊस तोडणी आणि वाहतूक साखर कारखाण्याची यंत्रणा करते . तणनाशक फवारणे, खते टाकणे, इलेक्ट्रिक मोटर देखभाल व दुरुस्ती करणे आणि पिकाला पाणी देणे इतकेच काम शेतकऱ्याला करावे लागते.जो शेतकरी ही सर्व कामे वेळेवर करतो त्याला ऊसाचे सरासरी वजन चांगले भेटते. एका एकरात ऊसांची संख्या साधारणपणे चाळीसहजार असते. एक ऊस जर एक किलोचा झाला तर ऊसाचे वजन चाळीस टन भरते. एक ऊस दीड किलोचा झाला तर ऊसाचे वजन साठ टन भरते आणि दोन किलोचा झाला तर 80 टन भरते. एका एकर क्षेत्रात 100 टन किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादन घेणारे महाराष्ट्रात काही शेतकरी आहेत. परंतु हेही लक्षात घ्या की,संपूर्ण महाराष्ट्रातील एकूण ऊसाच्या वजनाची सरासरी फक्त पस्तीस ते चाळीस इतकीच आहे.


लोणी देवकर गावातील ऊस लाडवड करणाऱ्या टोळीने एकरी ऊस लागवडीचा दर तीनच वर्षात पाच वरून सहा आणि या वर्षी सहा वरून सात हजार रुपये केला आहे. भावडीतली टोळी साडेसहा हजार रुपये सांगत आहे. उक्ते काम करणारे शेतमजूर कामाची काय वाट्टेल ती किंमत मागायला लागले आहेत. शेतकऱ्याला हा नपरवडणारा दर आहे. आरे बाबांनो! शेतात फार नफा नाही रे होत, याची थोडी तरी जाणीव ठेवा. शेवटी तुम्हीपण शेतकरीच आहात ना. हेच काम वरकुटे बुद्रुक गावातील मजुरांची टोळी पाच हजार प्रमाणे करत असल्याचे सासऱ्यांनी मला सांगितले त्यामुळे वरकुटे बुद्रुक येथील शिवाजी सोनवणे यांना हे काम दिले. आता लोणीत येऊन सोनवणे यांनी पण बिघडू नये म्हणजे चांगले होईल. ऊस लागणीच्या कामात पाण्याच्या पाटाच्या बाजूची म्हणजे माथ्याला आणि पायथ्याला सरी तोडली जाते,पाण्याचा पाट तयार केला जातो. जिथे बियाणे उपलब्ध आहे तिथे  ऊस तोडला जातो , ऊस वाहनात भरला आणि जिथे ऊस लावायचा आहे तिथे आणून उतरविला जातो. नंतर ऊसाचे तुकडे करून ऊस बियाणे सरीत अंथरून लावले जाते. ऊसाच्या प्रत्येक कांडीवर किंवा टिपरीवर एक डोळा असतो. एक डोळा किंवा दोन डोळे किंवा तीन डोळे अशी पण ऊस लावण्याची पद्धत आहे. एक डोळा एक फूट अंतरावर लावला जातो. काही शेतकरी कांडीला कांडी जोडून म्हणजे दोन कांड्यात जराही अंतर न ठेवता ऊस लावतात याला टक्कर असे पण म्हणतात. कांडी जमिनीत लावताना ऊसाचा डोळा डावीकडे किंवा उजवीकडे राहील असे पाहिले जाते. कारण डोळा जर खालील बाजूला राहिला तर अंकुर वर यायला त्रास होतो आणि वर राहिला तर त्याला उन्हाचा त्रास होतो. आमच्या भागात 86032 किंवा 265 या वाणाचा ऊस मोठ्या प्रमाणावर लावला जातो. 86032 ला रिकव्हरी चांगली मिळते म्हणून साखर कारखाना हा ऊस खुशीने नेहतो. तर 265 ला वजन चांगले मिळते, त्यामुळे शेतकरी खूष असतो .यावर्षी आमच्या शेतात स्वतःचे बियाणे नव्हते त्यामुळे सासऱ्यांकडून 86032 वाणाचे बियाणे विकत घेतले. ऊस बियाण्याचा दर गुंठ्यावर ठरला जातो. एक गुंठा ऊस बियाण्याचा दर सहा हजार रुपये आहे .रणजित डोंगरेने ट्रॅक्टरने बियाणे वाहतूक केली आणि 9 जुलै 2024 रोजी प्रत्येक्ष ऊस लागवड सुरु झाली आणि 14 जुलै रोजी पूर्ण झाली.


ऊस बियाण्यावरील बुरशी किंवा रोगराई नष्ट व्हावी म्हणून सदर बियाणे औषधाच्या मिश्रणात बुडवून मग शेतात लावले जाते.यासाठी बावसकर टेकनॉलॉजिचे -जर्मीनेटर हे औषध वापरले आहे. या औषधाची एक लिटरची बाटली 400 रुपयांस मिळते. बॅरल मध्ये पाणी भरणे, औषधाचे मिश्रण तयार करणे, त्यात ऊसाच्या कांड्या बुडविणे ही कामे ऊस लागवड टोळीचे लोक करत नाहीत. त्यामुळे दळवी नवरा बायकोने हे काम केले.

शेतातले तण तर शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेले आहे असे वाटते. ऊसाला पहिले दोन पाणी अंबवणी, निंबवणी दिले की तणनाशके फवारणी करावी लागणार आहे. यासाठी 1) Weedmar 2) Diurex 3) Tata metri 100gm लागले .


ऊस लागवडीपासूनच पोपटचा उत्साह वाढलेला आहे. दिवस रात्र काम करण्याची या माणसाची तयारी आहे. ते म्हणतात शेतात मला फार करमते. अशी शेतीची आवड असेल तर काम आनंद देते. 

यावर्षी आवश्यक ते सर्व प्रयत्न करून एकरी ऊसाचे टनेज् किमान 70 ते 80 राहील असा प्रयत्न केला जाणार आहे.


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

No comments: