Thursday, 15 January 2026

सवय चार : तुम्ही जिंका ,दुसऱ्यांना जिंकू द्या असा विचार करा,सर्वांचा फायदा होईल.

 सवय चार :

*तुम्ही जिंका ,दुसऱ्यांना जिंकू द्या असा  विचार करा,  सर्वांचा फायदा होईल!*


जीवनात आपल्याला अनेक परिस्थितींमध्ये जिंकण्याची इच्छा असते, पण जिंकणे म्हणजे दुसऱ्याला हरवणे असे नसते. खरे जिंकणे म्हणजे सर्वांना फायदा होईल असे समाधानकारक परिणाम मिळवणे.


"तुम्ही जिंका,इतरांना  जिंकू द्या, यामुळे सर्वांना  फायदा होईल!" हा विचार आपल्याला सहकार्य आणि परस्पर फायदा घेण्यास प्रोत्साहित करतो. जेव्हा आपण सर्वांना जिंकू देतो, तेव्हा आपल्याही फायदा होतो आणि संबंध मजबूत होतात.


सर्वांना जिंकू देण्याचे फायदे:


- आपले संबंध मजबूत होतात.

- सर्वांच्या आयुष्यात Win-Win ,Ok-Ok सहकार्याची भावना वाढते.

- आपल्याला अधिक आनंद मिळतो.

- आपल्याला अधिक आत्मविश्वास मिळतो.

- आपल्याला जीवनात अधिक संतुलन मिळते.


तर, आजपासूनच तुम्ही जिंका आणि सर्वांना जिंकू देण्याचा प्रयत्न करा! 😊

सवय तीन : पहिल्यांदा महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या. काम पाहिले,मजा नंतर.

 सवय तीन :

*पहिल्यांदा महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या. काम पहिले, मजा नंतर!*


जीवनात आपल्याला अनेक कामे करायची असतात, पण सर्व कामे एकाच वेळी करणे शक्य नसते. त्यामुळे महत्वाच्या कामांना प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे.


"पहिल्यांदा महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या. काम पहिले, मजा नंतर !" हा विचार आपल्याला आपल्या कामांना व्यवस्थितपणे व्यवस्थापित करण्यास प्रोत्साहित करतो. जेव्हा आपले महत्वाचे काम पूर्ण होते, तेव्हा आपल्याला मजा करण्यास अधिक आनंद मिळतो.


काम पहिले, मजा नंतर ठेवल्याने आपल्याला अनेक फायदे होतात:


- आपले काम व्यवस्थितपणे होते.

- जीवनात प्राधान्य कशाला द्यायचे ते समजते.

- आपल्याला ताण कमी जाणवतो.

- आपल्याला अधिक आत्मविश्वास मिळतो.

- आपल्याला जीवनात वर्क - लाइफ संतुलन मिळते.


तर, आजपासूनच आपल्या कामांना व्यवस्थितपणे व्यवस्थापित करण्याचा प्रयत्न करा! 😊

सवय दोन: अंतिम लक्ष लक्षात ठेवा,योजना तयार करा.

 सवय दोन :

*अंतिम लक्ष्य लक्षात ठेवा, योजना तयार करा!*


जीवनात काहीही करायचे असेल तर त्याचे अंतिम लक्ष्य काय आहे हे ठरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा आपल्याला आपले लक्ष्य माहित असते, तेव्हा आपल्याला त्यासाठी योजना तयार करणे सोपे जाते.


"अंतिम लक्ष्य लक्षात ठेवा, योजना तयार करा !" हा विचार आपल्याला आपल्या लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करण्यास आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या पायऱ्यांची  योजना तयार करण्यास प्रोत्साहित करतो.


अंतिम लक्ष्य लक्षात ठेवण्याचे फायदे:


- आपले लक्ष्य स्पष्ट होते.

- आपल्याला दिशा मिळते.

- आपल्याला प्रेरणा मिळते.

- विचार आणि कृतीत समानता येते.

- आपल्याला आपल्या वेळेचा सदुपयोग करण्यास मदत होते.


तर, आजपासूनच आपले अंतिम लक्ष्य लक्षात ठेवा आणि त्यासाठी योजना तयार करा! 😊

सवय एक : सकारात्मक रहा,तुम्हीच आहात जबाबदार

 सवय एक :

*सकारात्मक रहा, तुम्हीच आहात (Incharge)जबाबदार !*


जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हे एक शक्तिशाली हत्यार आहे. जेव्हा आपण सकारात्मक असतो, तेव्हा आपल्याला आव्हानांचा सामना करण्याची ताकद मिळते. आपण आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवू शकतो आणि आपल्या जीवनाला आकार देऊ शकतो.


"सकारात्मक रहा, तुम्हीच  आहात जबाबदार ! " हा विचार आपल्याला आपल्या जीवनाची मालकी घेण्यास प्रोत्साहित करतो. आपण आपल्या परिस्थितीचे शिकार नाही, तर आपल्या परिस्थितीचे निर्माते आहोत.


सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने आपल्याला अनेक फायदे होतात:


- आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारते.

- आपले संबंध मजबूत होतात.

- आपले काम अधिक प्रभावी होते.

- आपल्याला जीवनात अधिक आनंद मिळतो.


तर, आजपासूनच सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हीच आहात तुमच्या  जीवनास  जबाबदार ! 😊

Friday, 12 December 2025

श्री बलभीमराव जाधव - एक प्रसन्न आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व .

 श्री बलभीमराव  नारायणराव  जाधव - एक प्रसन्न आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व.

श्री बलभीमराव  नारायणराव  जाधव यांचा जन्म २३ मार्च १९४४ रोजी वरकुटे बुद्रुक , ता. इंदापूर, जि.पुणे, महाराष्ट्र येथे शेतकरी कुटुंबात  झाला. बलभीमराव यांचे वडील नारायणराव जाधव यांच्या पहिल्या पत्नीचे माहेरचे आडनाव देवकर होते आणि त्या वरकुटे याच गावातील  होत्या .त्यांना एक मुलगा आणि दोन मुली होत्या. पहिली पत्नी वारल्यानंतर काही कालावधीने नारायणराव जाधव यांनी दुसरे लग्न केले . दुसऱ्या पत्नीचे नाव सुंदराबाई . त्यांच्या माहेरचे आडनाव शिंदे आणि गाव कुंभेज, ता.करमाळा असे होते .  सुंदराबाई यांना तीन मुले  आणि चार मुली झाल्या. या भावंडांमधील बलभीमराव हे सात नंबरचे  मूल, घरातले शेवटचे मुल म्हणजे शेंडेफळ .  बलभीमराव चार- पाच वर्षाचे असतानाच दुर्दैवाचे त्यांचे  वडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे वडील त्यांना जेमतेम आठवतात.  आई सुंदराबाई यांचेही   निधन झालेले आहे.

आईची साथ आणि शिकवण मात्र त्यांना  आयुष्यभर मोलाची ठरली आहे. आई सुंदराबाई त्यांना नेहमी सांगायच्या ,"खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही,गरिबी असली तरी स्वाभिमानाने रहायचे , हावरेपणा करायचा नाही, कोणी जेवत असेल आणि त्याने  जेवतो का विचारले तर जेवला नसला तरी पोटावर हात फिरवून जेवलो आहे असे म्हणायचे ,आपण समाधानी आहोत असे वागायचे ." 

आज या सावत्र आणि सख्ख्या दहा भावंडांपैकी फक्त एक बहिण हयात आहे . या दहा जणांची काही मुले वारली आहेत. उर्वरित मुलं,नातवंडे असा भला मोठा परिवार गुण्यागोविंदाने नांदत आहे.

आज वयाची ८१ वर्षे पूर्ण करून आयुष्यात सहस्त्रचंद्र दर्शन झाले आहे. आयुष्याचे सिंहावलोकन करताना, जीवनाचा  प्रवास आठवताना लहानपणीची गरिबी, योगायोगाने भेटलेली चांगली माणसे, आयुष्यात आपण काहीतरी चांगले करून दाखवायचे ही भावना, आयुष्याने दिलेल्या संधी , आयुष्यात कष्टाने मिळविलेले यश, पत्नीची लाभलेली साथ आणि तिचं अकाली निघून जाणं , एका जावयाचे आजारपण आणि निघून जाणे, हे सगळं आठवताना त्यांच्या  मनात  संमिश्र भावना उमटत आहेत.

जाधव कुटुंबाकडे पन्नास एकर जमिन होती पण दोन एकर विहीर बागायत वगळता सगळी जमीन जिरायत होती.कुटुंबाचे  शेती हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन होते. बलभीमराव यांचे लहानपण गरिबीत गेले. जेव्हा त्यांचे शाळेत जायचे वय  होते त्याचदरम्यान महाराष्ट्रात १९५२ सालचा दुष्काळ पडला होता. सगळं कुटुंब करमाळा तालुक्यातील मांगी या गावी तलावाच्या  कामासाठी   स्थलांतरित झाले. तेव्हा बालमजूर वगैरे असा काही प्रकार नव्हता. त्यामुळे कुटुंबातील सर्वांना रोजगार मिळाला खरा ,पण बलभीमराव यांचे  शिक्षण, शाळा दुष्काळ संपल्यानंतर  गावी परतल्यावर  वयाच्या तुलनेने उशिरा सुरू झाले . त्यांचे तिसरीपर्यंत शिक्षण झाले होते तोच घरच्यांनी गुरे राखण्यासाठी त्यांची शाळा बंद केली . झालं आता ते गुरे 

हाकू- राकू लागले. गावातली त्यांच्या वयाची मुले शाळेत जात आहेत आणि आपल्याला मात्र गुरे राखावी लागत आहेत यामुळे त्यांना फार वाईट वाटायचे . त्यांना पण शाळा शिकायची होती, हे असले जीवन जगायचे नव्हते. एकदा ते शेतात मातीत खेळत होते. देव असतो आणि तो आपले म्हणणे ऐकतो असे त्यांनी आई कडून ऐकले होते . त्यांनी दोन्ही हात आकाशाकडे केले आणि  देवाला कळवळून प्रार्थना केली  ," हे देवा ,तू जर असशील तर ,काय पण कर ,पण मला शिकायला शाळेत पाठव ."

पुढे झाले असे की,वरकुटे गावच्या शाळेत पाचवीचा वर्ग सुरू करायचा होता. त्यांना पटसंख्या कमी पडत होती . म्हणून त्यांनी बलभीमरावला आग्रह केला . तुला आम्ही चौथीच्या परीक्षेला बसवितो आणि पास झाला की,पाचवीच्या वर्गात घेतो . तू अभ्यास करून चौथीची परीक्षा दे . यांनी परीक्षा दिली,पास झाले आणि यांना पाचवीच्या वर्गात घेतले गेले . त्यांच्या मोठ्या भावाला मात्र वाटायचे हा जर शाळेत गेला तर गुरे कोण राखणार . पण अशा अडीअडचणीवर मात करत ते इंदापूर केंद्रावर सातवीची परीक्षा देऊन पास झाले. तेव्हा सातवी,अकरावीच्या परीक्षा बोर्ड घेत असे.

मनमाडचे श्री तात्या काटे हे बलभीमराव यांच्या बहिणीचे पती म्हणजेच त्यांचे मेहुणे होते. चाळीसगावचे  श्री भिकन गायकवाड हा काटे यांचा भाचा . हे दोघे पाहुणे वरकुट्याला आले होते. त्यांनी पाहिले बलभीमराव हा हुशार मुलगा आहे,तो जर इथेच राहिला तर त्याचे शिक्षण होणार नाही आणि त्यांनीच यांना शिक्षणासाठी म्हणून मनमाडला नेले. मनमाडच्या शाळेत श्री तमा धारवाडकर नावाचे शिक्षक होते. त्यांनी खरे तर बलभिमराव यांच्या शिक्षणाला आणि जीवनाला दिशा दिली. इकडे गावाकडे सगळे मागे लागले होते ,तू परत ये ,इथे तुला तलाटी,ग्रामसेवकांची नोकरी मिळेल. बलभीमराव यांना मात्र शिकायचे होते. 

हा प्रकार जेव्हा धारवाडकर गुरुजींना समजला तेव्हा ते म्हणाले ,"शिक्षण अर्धवट सोडून अजिबात गावाकडे परत जायचे नाही, घरातल्यांनी नाही शिकविले तर मी तुझा शिक्षणाचा खर्च करेल ." आणि त्यांनी खर्च केलाही. पुढे मधवे भाऊ नोकरीला लागले होते,ते पैसे पाठवत होते.मनमाडला गुरुजींचा  बंगला होता , त्यांचे कुटुंब त्यांच्या मूळ गावी रहात  होते ,त्यामुळे बंगल्यात ते एकटेच रहायचे , त्यानंतर त्यांनी यांची बंगल्यावर अभ्यासाची ,रहायची सोय केली . बलभीमराव यांचे आठवी ते दहावीचे  शिक्षण मनमाडला झाले. गुरुजींनीच  यांना सुचविले आणि आयटीआय औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर येथे प्रवेश मिळवून दिला . बलभीमराव आयटीआय फिटर ट्रेड पास झाले आणि औरंगाबादलाच एका कारखान्यात सहा महिने एप्रेंटिस जॉब केला . 

हुशार आणि प्रामाणिक असल्यामुळे  बलभीमराव धारवाडकर गुरुजींचा आवडता विद्यार्थी होते . धारवाडकर यांनी बलभीमराव यांना नोकरी साठी मुंबईला पाठविले. प्रेस कॉस्ट इंजिनिअरिंग ,कांदिवली येथे त्यांची नोकरी सुरू झाली. पण ते रहायचे कल्याणला . थोडे महिने कल्याण - कांदिवली - कल्याण केले पण यात जाण्या-येण्यात फार वेळ जायचा . श्री धारवाडकर याचे मेहुणे श्री मोनकर दादा हे आई ,वडील,तीन मुलं आणि एका मुलीसह माहीमला छोट्याशा जागेत रहात असत. ती जागा खरंतर त्यांनाच राहायला अपुरी आणि गैरसोयीची होती . धारवाडकर यांनी मोनकरांना विनंती केली याची तुमच्याकडे रहायची सोय करावी . श्री मोनकर फार मोठ्या मनाचा माणूस . त्यांनी बलभिमरावला घर आणि वस्तुस्थिती दाखवली आणि तुझी रहायची सोय करतो पण तुला व्हरांड्यात झोपावे लागेल असे सांगितले . मुंबई सारख्या महानगरात असा आसरा मिळणे आणि तोही माहिमाला 

ही मोठीच गोष्ट होती . बलभीमराव तयार झाले . इथे ते एक वर्ष राहिले . श्री व सौ मोनकर फारच प्रेमळ आणि माणुसकी जपणारे लोक आहेत. बलभीमराव यांना नोकरी असल्यामुळे पगार मिळत होता ,त्यामुळे जवळच त्यांनी मेस लावली होती पण हळूहळू काकूंनी नाश्ता बनव ,जेवण बनव,डब्बा बनव करत यांची जेवणाची सर्व सोय पण केली. बलभीमराव आजही या सर्व मोनकर फॅमिलीच्या संपर्कात आहेत. स्वतः मोनकर चांगल्या नोकरीत होते पण त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असे वाटत असे. मोनकरांचा एक शिरस्ता होता ,ते मोकळा वेळ असेल तेव्हा  बलभीमरावला सोबत घेऊन माहीम,कुर्ला,दादर,परळ भागात चालत फिरायचे आणि रस्त्यात दिसणारे व्यवसाय करणारे लोक आणि व्यवसाय दाखवायचे आणि आपण असा काहीतरी व्यवसाय करावा असे सांगायचे . खरंतर हे पाहून पाहून बलभीमराव यांच्यात उद्योजकता बिंबली असावी असे वाटते.मोनकरांकडेच त्यांना श्री बाळासाहेब काटे भेटले,ते इंदापूर तालुक्यातीलच होते,ते पोलीस खात्यात लेखनिक होते आणि पोलिसांच्या बऱ्याक मध्ये रहायचे . त्यांनीच पुढे बलभीमराव यांना बऱ्याक मध्ये राहायला नेले. त्यांनी बलभीमराव यांच्या सोबत चांगलीच मैत्री वाढविली होती. पुढे त्यांनीच त्यांच्या मावस बहिणीचा प्रस्ताव यांच्या लग्नासाठी आणला होता पण तो योग जुळला नाही . 

श्री भिकन गायकवाड यांनी बालभिमरावसाठी  चाळीसगांव मधील  श्री काशिनाथ गणपत मोरे यांच्या कु.सुशीला या मुलीचा प्रस्ताव लग्नासाठी आणला आणि ११ मे १९६६ रोजी बलभीमराव आणि सुशीलाबाई यांचा विवाह सोहळा संपन्न  झाला. आता या बाळासाहेब काटे यांना लालबाग भागात क्वार्टर मिळाले होते ,त्यामुळे लग्नानंतर बलभीमराव  दोन महिने लालबागला राहिले आणि नंतर कांदिवली येथे खोली भाड्याने घेतली आणि ते कांदिवलीत राहू लागले . 

आता बलभीमराव पहिली नोकरी सोडून इंटरनॅशनल ट्रॅक्टर कंपनीत नोकरी करू लागले होते. म्हणजे आजचे महिंद्रा अँड महिंद्रा .पण त्यांना  फक्त नोकरी पुरते मर्यादित रहायचे नव्हते. याच काळात स्वर्गीय श्री हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईत महत्व वाढायला लागले होते. मराठी माणसाने परराज्यातील लोकांचा अन्याय सहन करायचा नाही, एकजुटीने रहावे, उद्योग धंदा करावा, हे विचार बोलले जात होते. तेव्हाच एक ,दोन अशाकाही  घटना घडल्या की,त्यामुळे बलभीमराव शिवसेनेशी जोडले गेले.कांदिवलीला राहायला आल्यानंतर थोड्याच महिन्यात त्यांनी शिवसेनेचे काम सुरू केले.सहा फूट तीन इंच उंची,रुबाबदार व्यक्तिमत्व , कोणत्याही अवघड कामाला भिडण्याचा स्वभाव, खेड्यातला रांगडेपणा यामुळे ते शिवसेनेच्या नजरेत आले. श्री मंगेश नाबर हे तिथे शिवसेनेचे शाखा प्रमुख होते. थोड्याच कालावधीत बलभिमराव कांदिवली येथे शिवसेनेचे गट प्रमुख झाले आणि पुढे शाखा प्रमुखही झाले. शिवसेना गट प्रमुख असताना ते शाखेच्या वतीने मराठी आणि परप्रांतीय यांच्यात वाद झाले तर पोलिस स्टेशन मध्ये मराठी माणसाची बाजू सांभाळायचे . लोकात मिसळणे,वाद मिटविणे,मराठी माणसाला न्याय मिळवून देणे यामुळे त्याभागात ते चांगलेच लोकप्रिय झाले होते. याचा परिणाम असा झाला की,कधीही दहा,पंधरा पोरांचा ग्रुप सोबत असायचा . यातूनच त्यांना छोटे मोठे व्यवसाय करण्याचे प्रस्ताव येऊ लागले. कांदिवली येथे केळीचा एक व्यापारी होता ,तो केळीचा रिटेल व्यवसाय सुरू करा म्हणून यांच्या मागे लागला. व्यवसाय करायला कामगार म्हणून काम करायला  पोरं हाताशी होतीच . बलभीमराव यांनी केळी विक्रीचा रिटेल व्यवसाय सुरू केला. थोड्याच दिवसात त्यांनी बटाटे वडे तयार करून विक्री व्यवसाय सुरू केला. एका दिवाळीत तर त्यांनी शिवसेनेचा उपक्रम म्हणून मोठ्या प्रमाणावर मिठाई तयार करून विक्री पण केली.  शिफ्ट मध्ये नोकरी,घरी आले की उशिरापर्यंत शिवसेनेचे काम आणि हे दोन व्यवसाय . यामुळे त्यांचे आयुष्य पूर्ण बिझी झाले होते. १९६६-६७ मध्ये त्यांना पगार  होता ३०० रुपये पण व्यवसायातून त्यांना रोज ५० रुपये मिळू लागले होते. पत्नी सौ. सुशीलाबाई यांना वाटायचे फिरायला जावे,सिनेमा पाहायला जावे पण त्यांनी पत्नीला समजावून सांगितले की,"आपल्याला जर  मोठे व्हायचे असेल तर फक्त नोकरी करून चालणार नाही. हेच कष्ट करायचे दिवस आहेत." पत्नीला पण हे पटले ,त्यानंतर त्यांनी कधी हौस ,मजेचा आग्रह केला नाही. पुढे दोन वर्षे तरी हे दोन छोटे व्यवसाय सुरू होते. एव्हाना बलभीमराव यांचे कांदिवलीत आणि विशेष म्हणजे सासरी चाळीसगावला चांगलेच नाव झाले होते. 

श्री परशुराम शिंदे ,पाचोरा हे श्री काशिनाथ मोरे यांचे नातेवाईक होते. शिंदे यांचा दुधाचा व्यवसाय होता . त्यांचे दूध मुंबईत विक्रीला यायचे .त्यांना मुंबईत अजून दूध विकायचे होते. मोरे आणि शिंदे बलभीमराव यांच्याकडे कांदिवलीला दोन दिवस रहायला आले. कांदिवली परिसरात हॉटेल्स मध्ये  फिरून त्यांना कोण ,किती दूध खरेदी करू शकते हे पहायचे होते. बलभीमराव  त्यांना घेऊन सगळीकडे फिरले. त्यांच्या ओळखी आणि प्रभावामुळे रोज दोनशे लिटर दुधाची मागणी निर्माण झाली. हे पाहून  शिंदेंना पण आश्चर्याचा सुखद धक्का बसला. आता पुढचा प्रश्न होता कांदिवलीत हे काम कोण करणार. श्री शिंदे यांनी हा प्रस्ताव बलभीमराव यांच्यासमोर ठेवला. पण बलभीमराव यांना भांडवल म्हणा किंवा नोकरी,केळी,बटाटे वडे  व्यवसाय ,शिवसेनेचे काम,इ.मुळे हा प्रस्ताव स्वीकारायची इच्छा नव्हती. शिंदे म्हणाले ,"तुम्हाला भांडवलाची गरज नाही, फक्त कष्टाची तयारी पाहिजे. रोज सकाळी दूध पोहोचवायचे,संध्याकाळी पैसे घेऊन यायचे आणि एक आठवडा झाला की ,कमिशन वजा करून पैसे  मला पाठवायचे ."  रोज दोनशे लिटर दुधाची विक्री केली तर त्यांना पन्नास  रुपये कमिशन मिळणार होते. त्यांचा नकार ऐकून शिंदे म्हणाले ,"बरं राहूद्या हा प्रस्ताव , तुम्हाला नाही जमायचा हा दुधाचा धंदा , त्याला जिद्द लागते." हे ऐकून बलभीमराव यांना अपमानाचा स्ट्रोक बसला  आणि मला जमणार नाही म्हणजे काय ,मी करून दाखवतो हा दुधाचा धंदा म्हणून त्यांनी हा व्यवसाय करायला होकार दिला. 

यथावकास केळी,बटाटेवडे व्यवसाय बंद करून त्यांनी कांदिवलीत  दुधाचा धंद्यात जम बसवला. शंभर लिटर पासून सुरुवात करून तो सातशे लिटरवर नेला. १९७० मध्ये त्यांनी कांदिवलीत दुधाचे दुकान सुरू केले. अंगभूत हुशारी वापरून भाड्याची खोली सोडली आणि या नव्या भाड्याच्या जागेत पुढे दुकान आणि मागे मकान अशी व्यवस्था केली.

दुधाच्या धंद्यात चांगला जम बसल्यावर त्यांनी १९७२ नोकरी सोडली . कांदिवलीत असे पर्यंत या उभयतांना संगीता ,अनिता,मनिषा,शीतल  या चार  मुली झाल्या होत्या.

दूध व्यवसायासाठी ठाण्यात खूप वाव आहे असे मानून शिंदे यांनीच बलभीमराव यांना ठाण्यात दुधाचा व्यवसाय करायला सुचविले. १९७७ ला त्यांनी ठाण्यात वर्तकनगर येथे दुधाचे दुसरे दुकान सुरू केले. ठाण्यात आल्यानंतर ते शिवसैनिक राहिले पण कोणते पद न घेता बँकफूटवर  राहिले. पुढे मग कळवा ,मग डोंबिवली अशी दुधाची चार दुकाने सुरू झाली आणि हा दुधाचा धंदा रोज ७५०० लिटर वर पोहोचला . श्री बलभीमराव यांच्याकडे मनुष्यबळ व्यवस्थापनाची खूप चांगली कौशल्य होती आणि आहेत. त्यांनी केळी,बटाटेवडे,मिठाई,दूध ,बांधकाम देखभाल व दुरुस्ती, कृष्णा खोरे महामंडळाची कॉन्ट्रॅक्ट ,मंडप,शेती असे अनेक प्रकारचे व्यवसाय केले पण त्यांनी कधी स्वतः केळीची पाटी उचल , बटाटेवडे बनव ,दुधाचे कॅन 

उचल,अशा गोष्टी केल्या नाही. एकादाच प्रसंग असेल जेव्हा दुधाची लाइन टाकणारा मुलगा न आल्यामुळे त्यांनी दूध वितरित केले. त्यादिवशी दूध घेणाऱ्या ग्राहकांनी पण आश्चर्य व्यक्त केले ,साहेब आज डायरेक्ट तुम्ही आलात दूध द्यायला. काम स्वतः करण्यापेक्षा ते करवून घेता आले पाहिजे तरच व्यवसाय मोठा होतो,धंद्याचे  मॅनेजमेंट महत्वाचे असते हे त्यांना माहीत होते.

ठाण्यात स्वतःचा फ्लॅट झाला, कुटुंबात मेघना या पाचव्या  मुलींचे  आगमन झाले.सर्व  मुलींचे शिक्षण सुरू होते. सगळे काही सुरळीत चालू होते.  ते कांदिवलीत होते तेव्हाही आणि ठाण्यात आल्यावरही त्यांच्याकडे गावाकडून ' जीवाची मुंबई ' करायला येणाऱ्यांचा  नेहमी राबता होता. गावाकडच्या भावांना मदत , पुतण्यांची शिक्षणाची ,व्यवसायाची सोय करणे असे सगळे सुरू होते. त्यांनी गावाकडच्या बऱ्याच मुलांना ठाणे ,मुंबईत नोकऱ्या मिळवून दिल्या .  साधारणपणे १९७२ ची गोष्ट असेल , तेव्हाही महाराष्ट्रात  १९५२ सारखा दुष्काळ पडला होता. श्री सुभाष शिंदे यांच्यासह प्रवासात असताना बलभीमराव वाट वाकडी करून वरकुटे गावी गेले होते ,त्यांनी काय पाहिले तर त्यांच्या घरातले लोकं कुठेतरी मोलमजुरी करायला चालले होते,यांची गाडी पाहून लाज वाटून ते घरी परतले. याचा अर्थ बलभीमराव यांच्या गावी घरच्यांची परिस्थिती अजून हलाकीचीच होती. हे ओळखून बलभीमराव यांनी तिथून पुढे किमान पंधरा वर्षे गावातल्या घरच्यांचे  राशन, किराणा सामान भरले आणि भावाला दर महा घरखर्चाला आर्थिक मदत पण केली. 

जुना शिवसैनिक म्हणून बलभीमराव यांना ठाण्यात चांगला मान मिळत होता. श्री मो.दा.जोशी शिवसेनेचे ठाण्यातले  आमदार होते, कै.आनंद दिघे यांच्याकडे त्यांचे जाणे येणे असे , दिघे साहेब त्यांची घरी आले होते , श्री प्रकाश परांजपे, श्री सतीश प्रधान , अशा अनेकांशी त्यांच्या चांगल्या  ओळखी होत्या.  खरंतर त्याकाळात हे ठाण्यात सहज नगरसेवक होऊ शकले असते पण त्यांनी धंद्यावर लक्ष केंद्रित केले. एकदा काय झाले श्री विक्रम मोरे नगरसेवक पदासाठी जाधव  रहात होते त्याच वॉर्ड मधून शिवसेनेचे उमेदवार होते. प्रचाराच्या चर्चेसाठी ते मो.दा.जोशींना भेटले ,तर मो.दा. न्नी त्यांना सांगितले तू बलभीमराव जाधव यांना भेट ,ते जुने शिवसैनिक आहेत,तुझा चांगला प्रचार करतील . मोरे जाधवांना  भेटले ,मग बलभीमराव यांनी मोरेंना सांगितले ,तुम्ही मी सांगतो त्या दिवशी पंधरा वीस शिवसैनिकासह माझ्या सोसायटी मध्ये या,मी पाहतो काय करायचे ते. ठरल्याप्रमाणे विक्रम मोरे सोसायटीत आले,बघतात तर काय बलभीमराव यांनी सोसायटीतले भरपूर लोकं त्यांच्या स्वागतासाठी सोसायटीच्या  गेटवर आणले होते आणि मोरे येताच फटाक्यांची जोरदार  आतषबाजी केली, खूप फटाके उडत आहेत हे पाहून रस्त्यावर पण मोठी गर्दी जमा झाली, मोरेंचे सोसायटीत जंगी स्वागत झाले. मग काय पुढच्या अजून काही सोसायट्यात असेच स्वागत आणि प्रचार झाला. श्री विक्रम मोरे ती निवडणूक सहज जिंकून नगरसेवक झाले.

ठाण्यात त्यांचा मोठा मित्रपरिवार निर्माण झाला होता. शिवसेनेचे काम चालूच होते. आता बाळासाहेबांची शिवसेना महाराष्ट्रभर वाढू लागली होती . बाळासाहेबांनी जाधवांची सुरुवातीला पुणे जिल्हा उप प्रमुख ,नंतर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी नेमणूक केली . १९९० मध्ये शिवसेनेने राज्यभर विधानसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला होता.  तेव्हा बाळासाहेबांनी बलभीमराव यांना इंदापूर मतदार संघातून निवडणूक लढविण्याचा आदेश दिला .  ते म्हणाले तुमचा जनसंपर्क चांगला आहे. तुम्ही निवडणुकीत स्वतःचे पैसे पण खर्च करू शकता , असे म्हणून त्यांनी पक्षातर्फे  काही आर्थिक निधी पण दिला आणि प्रचार प्रसारासाठी पोस्टर्स ,बॅनर्स पण पुरविले . तालुक्यातील प्रस्थापितासमोर निवडणूक लढविणे ही त्यांच्यासाठी मोठी झेप होती . ही निवडणूक ते हरले पण ही त्यांच्या आयुष्यातील मोठी खेळी ठरली. पुढे १९९५ ला शिवसेना सत्तेत आली तेव्हा श्री मनोहर जोशी, श्री सुधीर जोशी ,अशा नामदार  मंत्र्यासोबत त्यांची चांगली जवळीक होती. शिवसेनेने त्यांना १९९५ ते १९९९ पुणे म्हाडाचे सदस्य पद दिले होते. 

१९९५-९६ दरम्यान त्यांनी दुधाचा धंदा बंद केला आणि ठाण्यात बिल्डिंग देखभाल व दुरुस्ती व्यवसाय सुरु केला. पुढे तो बंद करून ते कॉन्ट्रॅक्टर बनले आणि पुणे जिल्ह्यात  कृष्णा खोरे विकास महामंडळाची कामे करू लागले. आतापर्यंत त्यांच्या चार मुलींची लग्न झाली होती. सौ संगीता चंद्रशेखर काळे, सौ अनिता योगीराज देवकर ,सौ मनिषा प्रदीप काळे, सौ शीतल राजेंद्र कोल्हे अशी घराणी त्यांनी नातलग म्हणून जोडली होती आणि या चारही मुली पुण्यात राहत होत्या . पुढे जावयांनी आग्रह करून त्यांना पुण्यात राहायला आणले. जावयांचे मत होते तुम्ही पुण्यात शिफ्ट झालात तर म्हातारपणात मुलींच्या जवळपास रहाल. मेघनाला पण आपण पुण्यातलाच मुलगा शोधू.

पुण्यात आल्यावर  त्यांनी मंडप व्यवसाय सुरू केला होता. पुढे पाचवी मुलगी सौ मेघना विक्रांत  अब्दागिरे हिचेही लग्न पण योगायोगाने  पुण्यातच झाले. बलभीमराव आणि सुशीला या उभयतांच्या मुलींना अमेय अनिता देवकर, अपूर्वा आणि अथर्व संगीता काळे , आदिती आणि प्रतीक मनिषा काळे, आयुष आणि अनुज शीतल कोल्हे, अर्णव आणि अहाना मेघना अब्दागिरे अशी मुलं झाली आहेत .इतकंच नाही तर अपूर्वा कटारिया हिला वाणी आणि आदिती शिरोळे हिला शिव अशी बालके झाली आहेत. अमेयचे रुचराशी लग्न झाले आहे, त्यामुळे बलभीमराव आता आजोबा , पंजोबा झाले आहेत.

त्यांना सहज विचारले तुम्हाला मुलगा झाला नाही याची खंत वाटते का . तर ते म्हणाले मला स्वतःला नाही . जे काही आमच्या नशिबात होते ते झाले आणि काय वाईट झाले ,सगळे चांगलेच झाले आहे की. आज मुलाने पाहिले असते त्यापेक्षा जास्त आज मुली माझे पाहत आहेत.जावयांबद्दल विचारले तर ते भरभरून बोलले, एक जावईच मुलाखत घेत आहे म्हटल्यावर त्यांचे हे असे बोलणे क्रमप्राप्तच होते. 

श्री चंद्रशेखर काळे या जावयाने पुण्यात  राजवाडा हॉटेल सुरू केले होते. हॉटेल कामकाज पहायला त्यांना अजून घरातली माणसे हवी होती म्हणून त्यांना जाधवांना राजवाड्याचे व्यवस्थापन पहायची जबाबदारी दिली होती.

श्री बलभीमराव यांना आयुष्यात सर्वात चांगली भेट मिळाली ती म्हणजे आध्यात्मिक मार्ग - सहजयोग. परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी यांनी स्थापन केलेला सहजयोग. त्यांचा मेहुणा श्री सुभाष मोरे हे अगोदर सहजयोग प्रॅक्टिस करायला लागले मग त्यांनी एकएक करून जवळच्या बहुतेकांना सहजयोगी बनविले. सुरुवातीला त्यांचा अशा गोष्टीवर विश्वास नव्हता पण जेव्हा त्यांना दोन्ही हाताच्या तळव्यावर ,डोक्याच्या टाळूवर थंड थंड चैतन्य लहरी जाणवू लागल्या  तेव्हा त्यांचा विश्वास बसला. आता वयाच्या या टप्प्यावर तर त्यांचे सगळे जगणे सहजयोगाने व्यापलेले आहे. 

सहजयोगामुळेच ते प्रिय पत्नीचे अकाली झालेले निधन, प्रिय नातेवाईकांचे आकस्मित सोडून जाणे,आयुष्यातील बरे वाईट प्रसंग आणि चढउतार सहन करू शकले.

कोणत्याही माणसाचे आयुष्यातील यश हे तो कोण होता आणि नंतर कोण झाला यावर मोजले जाते . या यश नावाच्या मोजमापाला अजूनही काही फुटपट्ट्या असतीलही. परंतु श्री बलभीमराव जाधव लहान असताना गुरे राखत होते ,मोठे होत होत  मुंबई ,ठाण्यात व्यावसायिक झाले, शिवसेनेत पदे भूषविली,आमदारकीची निवडणूक लढविली, नेटका संसार केला, ठाण्यात,पुण्यात प्रॉपर्टी केल्या, वडिलोपार्जित शेती होती तरी स्वतः शेती विकत घेतली आणि जोमाने शेती पण केली, पाचही मुलींचे  उत्तम घराण्यात थाटात विवाह केले ,घराण्याचा नावलौकिक वाढविला , उत्तम आध्यात्मिक स्थिती प्राप्त केली, इंग्लंड,युरोप देश फिरून झाले, आयुष्यात कुणी त्यांचे नुकसान केले तरी त्यांनी त्यांचे भलेच केले, खरंतर ही  मोठी भरारी आहे.

आता आयुष्यात सगळं काही करून झालं आहे. त्याची एव्हढी एकच इच्छा आहे की, या जगातून जायचे जर प्रत्येकालाच आहे, फक्त खितपत पडायला लागू नये, शरीर धडधाकट असताना जाण्याचा योग यावा.

परमेश्वराने आणि श्री माताजींनी जगातल्या सर्वांचे कल्याण करावे अशी त्यांची भावना आहे.

अशा या नेहमी हसतमुख ,प्रसन्न  व्यक्तीकडून सर्वांना नेहमी प्रेरणा मिळते हे मात्र खरे आहे.

मा.श्री.बलभीमराव जाधव यांनी मार्च २०२५ मधेच वयाची ८१ वर्षे पूर्ण करून ८२ व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यांचे सहत्रचंद्रदर्शन पूर्ण झाले आहे. या निमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना सर्व कुटुंबीय, नातेवाईक, हितचिंतक यांच्यातर्फे  उत्तम आरोग्यासाठी आणि उदंड आयुष्यासाठी अनंत ,अनंत शुभेच्छा.

मुलाखत आणि शब्दांकन ...

योगीराज देवकर.

Tuesday, 14 October 2025

बदलाला (Change) सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक.

 बदलाला (Change) सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक.

बेडकावर एक प्रयोग करण्यात आला. एका पातेल्यात पाणी घेतले, त्यात एक बेडूक सोडला, पातेले शेगडीवर ठेवून खालून मंद उष्णता देणे सुरु केले, शेवटी काय घडले तर उष्णता वाढून बेडूक उकडून मेले. दुसऱ्या प्रयोगात बदल केला. पातेल्यातील पाण्याचे उष्णतामान थोडे वाढलेले असताना त्यात बेडूक सोडला. पाणी गरम आहे हे जाणवल्याबरोबर बेडकाने पातेल्याबाहेर उडी मारली आणि स्वतःला वाचविले. 


पहिल्या प्रयोगातील बेडकाप्रमाणे काही उद्योजक बाह्यवातावरणातील बदलाकडे दुर्लक्ष करतात,सहनशील वागतात,परिस्थितीशी जुळवून घेतात आणि नामशेष होतात. 

काही उद्योजक मात्र लवचिक असतात, बदलासोबत बदलायला तयार असतात.


'या जगात केवळ एकच गोष्ट निश्चित आहे,ती म्हणजे बदल, बदल हा होतच राहणार.'


कोणताही उद्योग,संस्था माणसे,टीम,परस्परांमधील संबंध,टीम्समधील संबंध याने निर्माण होते. परंतु या जगात उद्योग, तुमचा उद्योग,संस्था एकटीच नसते. संस्थेच्या बाह्य वातावरणात असतात... ग्राहकांच्या गरजा,पसंती आणि अपेक्षा ,स्पर्धक,तंत्रज्ञान,शासन, सामाजिक, सांस्कृतिक ,शैक्षणिक , पर्यावरणातील बदल,इ. मध्ये सतत बदल होत असतात. यावर कोणाचेच काही नियंत्रण नसते. उलट बदलाचेच उद्योगावर,संस्थेवर नियंत्रण राहते. माझ्यासोबत रहा नाहीतर तुमचे काही खरे नाही.


बाह्यवातावरणातील बदलासोबत रहायचे असेल तर स्वतः उद्योजक, संस्थेतील अधिकारी,कर्मचारी, नेटवर्क मधील यंत्रणा, यांना प्रशिक्षणाशिवाय पर्याय नाही.


यशाचा एक पंचकोन सांगितला जातो. एक - माहिती,ज्ञान. दोन - हार्ड व सॉफ्ट कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य. तीन -  उद्योजकीय प्रतिभा . चार - दृष्टीका (Vision ). पाच - सवयी. या पाचही लेवलवर सतत शिकणे आणि सुधारणा करणे आवश्यक ठरते.


पूर्वी बदलाचा वेग कमी होता. एक सेवा मार्केटमध्ये आली तर तिला पर्यायी दुसरी सेवा मार्केटमध्ये यायला बराच काळ जात असे. आता सेवा,व्यापार,उत्पादन प्रत्यक प्रकारात बदल व्हायला काळ सोडा थोडाही वेळ लागत नाही. इतक्या झपाट्याने हे सर्व बदलत आहे.


व्यवहारिक जगात उद्योगांचे, संस्थांचे खालील प्रकार आढळतात...


*काही उद्योग, संस्था निरर्थक, कुचकामी असतात* - आजारी पडण्याच्या मार्गांवर असतात. संस्थेतील आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि अशा संस्था बंद पडतात, नामशेष होतात.


*काही उद्योग,संस्था असमाधानकारक कार्य करत असतात*- संस्थेतील अंतर्गत, बाह्य गरजा, ग्राहकांच्या गरजा यांचे समाधान करण्यात त्या असमर्थ ठरतात. त्या बंद पडण्याच्या मार्गांवर असतात.


*काही उद्योग,संस्था समाधानकारक कार्य करत असतात*- ग्राहक, लाभधारक, भाग भांडवलधारक, इ. यांच्या अपेक्षा पूर्ण करतात. खर्च, नफा, मालमत्ता, वेळ, इ.घटकांचा परिणामकारक वापर करतात. यांची मार्केटमध्ये टिकून राहण्याची शक्यता वाढते.


*काही उद्योग,संस्था समव्यावसायिक किंवा वर्गवारीत अतिउत्तम संस्था असतात*- ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त देतात, थेट स्पर्धेत  सर्व स्पर्धकांपेक्षा उत्तम कामगिरी करतात, तीव्र स्वरूपाच्या स्पर्धेत अव्वल ठरतात.


*काही उद्योग,संस्था जागतिक दर्जाच्या असतात*- सर्वोत्तम, अतिउत्तम कार्यपद्धतीसाठी ओळखली जातात. अशा आदर्श संस्थेच्या यशाचे निकष समोर ठेवून इतर संस्था मार्गाक्रमण करत असतात. 


महाराष्ट्रातील, भारतातील, प्रत्यक उद्योग,संस्थेचा लोकल टू ग्लोबल असा प्रवास व्हायला हवा.


सर्व आदरणीय उद्योजक  भारतरत्न जे आर डी टाटा, रतन टाटा, बाबा कल्याणी, आनंद देशपांडे, प्रमोद चौधरी, इ. यांच्या सिद्धीचा वा

प्रवास वाचायला हवा,जाणायला हवा. नीलकंठराव कल्याणी त्यांच्या आत्माचरित्रात त्यांनी आयुष्यात किती तास विमान प्रवास केला, किती सेमिनार्स, वर्कशॉप्स, मिटींग्स अटेंड केल्या, त्यामुळे जॉईंट व्हेंचर, टेकनॉलॉजि ट्रान्सफर, एक्स्पोर्ट्स साठी कसा फायदा झाला याचा उल्लेख करतात. मी 1 एप्रिल 2003 रोजी बाबा कल्याणी यांनी 'बीटिंग चायना ' नावाच्या सेमिनारमध्ये भारत फोर्ज कंपनीचे दिलेले प्रेजेंटेशन ऐकले होते. 1997 साली कंपनीचा आर्थिक परफॉर्मन्स खराब झाला होता. सगळे खडबडून जागे झाले आणि मग त्यांनी कंपनीत उत्पादन दर्जा सुधार,कार्यक्षमता वाढ,मनुष्यबळ व्यवस्थापन, तंत्रज्ञान, इ. खूप काही सुधारणा केल्या , प्रशिक्षण दिले , इ. गोष्टी केल्या . ते म्हणाले याचा परिणाम स्वरूप, "2003 साली, Bharat Forge is  the third largest company in the world." त्यांची यशाची ही घोडदौड अशीच चालू राहिली आणि 2005 मध्येच Bharat Forge became the first largest company in the world.हे असं सर्व पाहिलं की पटतं बदलांना सामोरा जाणारा मार्ग प्रशिक्षणातून जातो.


प्रशिक्षणाने बौद्धिक अंधंकार दुर व्हायला मदत होते. माणसाचे अनेक मेंटल ब्लॉक असतात. वर्तणूक, मनोवृत्ती, भावना, सर्वसाधारण दृष्टीकोन, स्व: च्या जाणीवा, या कोणत्याही पातळीवर हे ब्लॉक असू शकतात.याला ब्लाइंड स्पॉट असे म्हणता येईल. प्रशिक्षणाने अशा ब्लाइंड स्पॉटवर लख्ख प्रकाश पडतो. माणूस Self actualized, Self realized व्हायला मदत होते.


शरद काळे  पाटील यांची अहिल्यानगर येथे दिशा मॅनेजमेंट ही संस्था आहे.  दिशा मॅनेजमेंट महाराष्ट्रात उद्योग, संस्थांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम, वर्कशॉप, सेमिनार्स आयोजित करीत असते. आजपर्यंत त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे अहिल्यानगर, पुणे, नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, इ. ठिकाणच्या उद्योजकांना, संस्थाचालकांना मोठ्याप्रमाणावर लाभ झालेला आहे. दिशा मॅनेजमेंटकडे विजय बात्रा, योगीराज देवकर, सतीश केरकळ  ,डॉ. संगीता देशपांडे अशा तज्ञ व अनुभवी प्रशिक्षकांची मोठी फळी उपलब्ध आहे. दिशा मॅनेजमेंट Leadership, Skills base, Attitudinal & Motivational, Sales & Services, Quality & Technical, Accounts & Finance, IT & AI, Health & Fitness, Organization Development, Entrepreneurial Motivation अशा अनेक विषयावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असते.उद्योग, संस्था विकास, व्यक्तिमत्व विकास हे शरद काळे पाटील यांचे ध्येय आहे.


नाशिक मध्ये 21 व 22 नोव्हेंबर 2025 दरम्यान श्री .विजय बात्रा यांचा TWO DAYS OPEN HOUSE WORKSHOP ON LEADERSHIP SKILLS आयोजित केला आहे. 


नाशिक मधील उद्योजकांनी या वर्कशॉपचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.


संपर्क : शरद 98500 18200, दिशा मॅनेजमेंट 80555 18200


सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.


योगीराज देवकर.पुणे.

9307133134

Wednesday, 8 October 2025

आभासी मुलं, वास्तव गेलं.

 आभासी मुलं, वास्तव गेलं.


एक पिढी अशी होती जेव्हा पालक मुळगावी रहात होते आणि त्यांची मुलं नोकरी निमित्त शहरात.

पुढच्या पिढीत ही मुलं पालक बनून शहरात स्थिरावली आणि त्यांची मुलं नोकरी निमित्त परदेशात.

आता त्या पुढच्या पिढीची मुलं कुठे असतील ? तर कदाचित स्पेस स्टेशनवर जॉब करतील. एका पिढीला राज्य,देश ठेंगना वाटला , मुलांच्या पिढीला जग ठेंगनं वाटत आहे. त्या पुढच्या पिढीला आकाश ठेंगनं वाटेल .असं पिढी दर पिढी लोकांचे स्थलांतर आणि सो कॉल्ड प्रगती सुरु आहे.जग हे असे लहान झाले आहे आणि माणसं मात्र दुर दुर गेली आहेत.


आपल्यापेक्षा आपली मुलं नामवंत, यशवंत , कीर्तिमंत व्हावी आणि त्यांनी आपल्यापेक्षा अधिक चांगलं आयुष्य जगावं अशी प्रत्येक पालकांची अपेक्षा असते. मुलांचे यश हे पालकांचा अभिमान आणि समाजातील मान, सन्मान वाढविते.


विविध अँप्समुळे चॅटिंग,ऑडिओ, व्हिडीओ कॉलिंग शक्य झाले आहे.हवं तेव्हा एकमेकांशी बोलता येत असल्यामुळे माणसं जवळपासच असल्याचा भास होतो. ही या आभासी विश्वाची देणगी आहे . इतकच नाही तर सध्याच एआयचा उपयोग करून कोणाचाही आवाज, चेहरा याचा बेमालूम उपयोग करून फॉल्स ऑडिओ, रील्स, फिल्म्स तयार केले जात आहेत. मला तर असं वाटतं की, उद्या लोकं हयात नसलेल्या आप्तांचे  देखील रिल्स करतील किंवा त्यांच्याशी वर्च्युअली बोलतील. लोकं इहलोकी गेलेल्या लोकांच्या बाबतीत पण ते वर्च्युअली जिवंत असल्याचा भास निर्माण करतील. काय बाबा हे टेक्नॉलॉजिवाले लोकं काय करतील याचा भरोसा राहिलेला नाही.


तेव्हा खेड्यातल्या पालकांसाठी शहरातली मुलं आभासी झाली असतील, तर आता शरातल्या पालकांसाठी परदेशातली मुलं आभासी झाली आहेत.तेव्हा ठिकाणांमधील आंतर कमी होतं, प्रवासाचा वेळ आणि खर्चही कमी होता,त्यामुळे प्रत्यक्ष भेटी जास्त होत असत. आता आंतर, वेळ, खर्च वाढला आणि प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या आहेत.


सध्याची मुलं मग ती खेड्यातली असो की, शहरातली असो की, परदेशातली असो,जास्त वेळ सोशल मीडियावरच असतात आणि ऑनलाईनच  भेटतात. सारखं सारखं फोनमध्ये काय असतं असं विचारलं तर म्हणतात, महत्वाचं काम चालू आहे, आमचं ऑफिस काम फोनवरच चालतं . सुट्टीत स्वतःच्या देशात सारखं सारखं काय यायचं असं म्हणत परदेशातूनच परदेशात फिरायला जातात.नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना भेटायला भारतात येतात तेव्हा घरी बॅगा टेकवतात तेवढाच काय तो त्यांचा पालकांना सहवास.  सगळ्यांना वेळ देता यावा म्हणून गेट टुगेदर, पार्टी, करणे किंवा एखादी ट्रिप काढणे असे घडत असते. तेवढाच प्रियजणांचा मेळा.


त्याकाळी पालक शहरात मुलांकडे आले तर स्वतःच्या खेड्यातली साधी राहणी,काटकसरीपणा, मोकळंचोकळंपणा या विरुद्ध शहरी राहणीमान,सुधारणा,

शुद्ध भाषा आणि एकूणच क्रॉस कल्चरल पैलूमुळे

लाजरे बुजरे होवून जायचे .

आताचे पालक परदेशात मुलांकडे गेले तर स्वतःच्या शहरातली संस्कृती,परंपरा या विरुद्ध परदेशी भाषा, प्रगत तंत्रज्ञान,रुपयाच्या तुलनेतली महागाई आणि एकूणच क्रॉस कल्चरल पैलूमुळे संकोचून जातात .

 

तेव्हा गावच्या तुलनेत शहरात पालक अडाणी होते आता शहराच्या तुलनेत परदेशात पालक अडाणी आहोत. लोकांनी कितीही सुधारणा केली तरी आधीची आवृत्ती जुनी आणि पुढची आवृत्ती नवी हे असंच चालू आहे. दोन पिढ्यातला हा जनरेशन गॅप कधी भरून निघेल अशी सूतराम शक्यता नाही.


आभासावरुन सहज आठवले, मुलीने,सुनेने घरात खाद्य पदार्थ बनवावेत असं पालकांना वाटणे साहजिक आहे. पण पुन्हा ते इथे असले तरी वेळेअभावी हे घडत नाही. आता ही मुलं जगभर फिरत असतात .मग काय तर तिथं बनवलेल्या खाद्य पदार्थांचे फोटो पोस्ट करत असतात. या ऑनलाईन फोटोचे कौतुक केले जाते. जीभेला पाचकरस सुटल्याचा स्मायली  पाहणारे पोस्ट करत असतात आणि "मला पण", "मला पण", म्हणत या आभासी दुनियेचा भाग होत असतात . 


हल्ली सिंगल चाईल्ड आणि चौकोनी कुटुंबचा जमाना आहे.

मुलं लहान असतात तेव्हा आई त्यांच्या हवं-नकोची काळजी घेते. इथपर्यंत मुलांना आईच्या हातच्या खाद्यपदार्थांचे कौतुक असते. आता त्यांना देशविदेशातले पदार्थ समजलेले असतात. फास्टफूड,झोम्याटो,स्विगी त्यांच्या दिमतीला हजर आहे. त्यामुळे त्यांना घरचं खाणं आवडेनासे झाले आहे.


मुल परदेशातनं इथं आलं की, दिवसभर शहरभर याला भेट, त्याला भेट करत फिरतं, "आरे जरा घरात थांब, आम्हाला पण वेळ दे!", म्हटलं की, "इतके पैसे खर्च करून मी काय घरात थांबायला आलो आहे का?", असं म्हणतं . आता जिथं स्वतःच्या मुलाला घरात थांबवू शकत नाही तिथं दुसऱ्याच्या घरातनं इथं आलेल्या मुलीला कसं थांबवायचं. हेच तुझं सासर आहे हे तीच्या मनावर कसं बिंबवायचं.


पूर्वीच्या काळात सासर, माहेर आणि त्यामध्ये नोकरीचं शहर होतं.आता त्या शहराची जागा परदेशातल्या शहरानं घेतली आहे आणि पालकांचे मूळ घर मात्र भोंज्या झालं आहे.


पालकांना स्वावलंबन, कष्ट तर असं काही चिकटलं आहे की, ना त्यांना निवृत्ती आहे,ना त्यांना सुट्टी आहे. या आभासी जगात कधीतरी ही पोरं आपल्यासोबत रहायला येतील या आशेवर हसऱ्या मुखवट्याच्या चेहऱ्याने रहायचे आहे .


आजच्या या आभासी जगात मुलांना गूगल, एआय, ग्रोक, जेमिनी, चॅट जीपीटी असे अनेक ज्ञानी गुरु आहेत. अनुभवी, जास्त उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या प्रौढ पालकांनी काही सांगायचा,शिकवायचा प्रयत्न केलाच तर ते त्यांना आधीच माहित असतं, पण गंम्मत म्हणजे तसं वागायचं मात्र नसतं.


माणूस म्हणजे गुणदोषांचा पुतळा,देव नव्हे. माणसात गुण असो की दोष त्याचा मुख्य श्रोत कोण असणार तर साहजिकच आई - वडील आणि आधीच्या पिढीतील पूर्वज्यांचे संस्कार आणि सहवास . मित्र,साहित्य ही अफवा आहे. त्यामुळे मुलं आई - वडिला सारखी वागली तर धन्यच म्हणावे. त्यांच्या सारखी नाही वागली तर आश्चर्य समजावे. कारण मुलं रस्त्यावरच्या वाटसरू सारखी तर नक्कीच वागणार नाही ना. दुसऱ्याचे असो वा स्वतःचे,गुणांचं गुणगान गावं आणि दोषात सुधारणा करावी हे प्रत्यकाचं इप्सित असावं. आई-वडिलांची जुनी आवृत्ती सुद्धा शिकून शिकूनच इथपर्यंत आली आहे म्हणून समजून घ्यावं आणि टीका न करता मुलांनी त्यांची सुधारित आवृत्ती बनावं.


पूर्वी मुलं घरातल्या जेष्ठान्ना,आई वडिलांना आदरयुक्त घाबरायची , बायको नवऱ्याला आदरयुक्त घाबरायची, सुन सासू-सासऱ्याला आदरयुक्त घाबरायची.तेव्हा लोकं थोडीतरी एकमेकांवर अवलंबून असायची. आता अवलंबून असणं पण संपलं आहे, प्रत्यकजण स्वतंत्र झाला आहे. कोणच कोणाला  घाबरेनासे झाले आहे. आदर नावापुरता उरला आहे किंवा हे चित्र उलटे झाले आहे.

आधुनुकतेच्या नावाखाली हा मुक्त स्वातंत्र्याचा विकास आहे म्हणायचे, की ऱ्हास आहे म्हणायचे.


जग मग ते प्रत्यक्ष असो वा आभासी, जग आहे त्यापेक्षा अधिक चांगले बनविणे हे शब्दशः मोबाईलमुळे ज्याच्या त्याच्या हाती आहे. 


एक मात्र सत्य आहे, येताना एकटे आलो आहोत, जाताना प्रत्येकाला एकटेच जायचे आहे. पण जिवंतपणी मुलं,कुटुंबीय, नातेवाईक, मित्र,हितचिंतक इतका गोतावळा असताना जगात असे आभासी का जगावे लागत आहे?  इथे असते वडिलोपार्जित प्रॉपर्टी किंवा शहरात एखादी सदनिका,पालक ते सांभाळण्यातच अडकतात. ते ना धड इकडचे ना तिकडचे होतात. मुलांना असे सांगावेसे वाटते की,

'भारत देश बदल रहा हैं l '  हे जर सत्य असेल तर भारतात पण Ease of leaving अनुभवता येईलच ना . बाळांनो तुम्ही खरंतर Non Residential Indian (NRI) आहात Non Returning Indians (NRI) बनू नका .  पालकांना असं वाटतं की, मुलांनी लवकरात लवकर एकाचे दोन व्हावे आणि दोनाचे तीन,चार व्हावे. करिअरसाठी स्वतःच्या देशात यावे,कुटुंबाच्या जबाबदारीची धुरा सांभाळावी, पालकांना त्यांच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा त्यांना हवा तसा जगू द्यावं, हीच पालकांच्या वास्तव जीवनाची आस आहे.


आयुष्याच्या शेवटी अशी नको वेळ यायला की, आमची मुलं  करिअरकरिता परदेशी राहिल्याने आमच्यासाठी आभासी  राहिली आणि पालकांवर आभासी मुलं आणि वास्तव गेलं म्हणायची वेळ आली.


लेखक...

योगीराज देवकर.