Sunday, 19 February 2023

My Motivation Academy

 प्रेरणा विकसित करणारी मोटिवेशन अकॅडेमी.


माणसांची वर्तणूक,प्रेरणा, प्रवृत्ती या विषयी संशोधन करणाऱ्या मानसशास्त्रज्ञाना एक मूलभूत प्रश्न पडला होता, तो म्हणजे,'Why people do what they do?' या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात माणसांच्या प्रेरणा, प्रवृत्ती वरती पुष्कळ प्रमाणात प्रकाश पडलेला आहे. तुम्ही जे काय करत आहात ते का करत आहात ?  हाच प्रश्न तुम्ही स्वतःला पण विचारा म्हणजे तुम्हालाही तुमच्या प्रयत्नाचे कारण समजू शकेल.


Motivation,प्रेरणा म्हणजे काय तर To move याचा अर्थ हालणे, प्रवृत्त होणे, धडपड करणे, प्रयत्न करणे. मोटिवेशन हे दोन क्षेत्राशी संबंधित आहे. एक- स्वतःला प्रेरित करणे आणि दोन - इतरांना प्रेरित करणे. प्रेरणेची एक पूर्वअट असते ती म्हणजे माणसाचे निश्चित व्हिजन,मिशन,उद्देश,ध्येय, धोरण असे काहीतरी स्पष्ट असायला पाहिजे म्हणजे या हालचालीला एक निश्चित दिशा मिळू शकते. प्रेरणा, ध्येय असले तरी याच्या संदर्भात सर्वच हेतू, उद्देश, गरजा सारख्याच महत्वाच्या, उपयुक्त असतील असे सांगता येत नाही, काही बिगरउपयुक्त पण असू शकतात. त्यामुळे प्रेरणेत ध्येयाबरोबरच अजून एक घटक महत्वाचा ठरतो तो म्हणजे Need,गरज. म्हणजेच गरज असेल तरच माणूस हालचाल करायला प्रवृत्त होतो अन्यथा नाही.


माणसाला दोन प्रकारच्या गरजा असतात. एक - जिवशास्त्रीय किंवा भौतिक गरजा आणि दोन - मानसिक गरजा. मॅस्लो या मानसशास्त्रज्ञाने गरजांची जी थिअरी मांडली त्यात त्याने माणसाच्या मूलभूत गरजा, शारीरिक,आर्थिक सुरक्षितेच्या भौतिक गरजा सोडल्या तर उरलेल्या मानसिक, भावनिक सुरक्षिततेच्या गरजा , सहवास आणि प्रेमाची गरज, आदर आणि प्रतिष्ठा याची गरज,आदराच्या गरजेतही तो दोन भाग करतो. एक- आदराची खालची पातळी आणि दोन -आदराची वरची पातळी.आदराची वरची पातळी म्हणजे स्वतःचा सन्मान वाढेल, आत्मसन्मान वाढेल अशी वर्तणूक. मॅस्लोने वरच्या पातळीवरील जी गरज सांगितली आहे तिला तो बिईंग नीड असे म्हणतो. म्हणजे माणूस म्हणून विकसित व्हायची,समृद्ध व्हायची गरज किंवा 

आत्मविष्काराची गरज.

तुम्ही जर का भौतिक गरजा पूर्ण करण्याइतपतच हालचाल करणार असाल तर तुमची प्रगती मर्यादित होते पण तुम्ही जर मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करत असाल तर तुमची प्रगती अमर्याद होणार.

खरंतर पाच सहा प्रकारच्या महत्वाच्या मानसिक गरजा सांगितल्या जातात परंतु इथे आपण एकच मानसिक गरज पाहूया.

एक्सेल ची गरज - सेल्फ एक्सेल, सेल्फ एस्टिम, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन ही मानवाची सर्वोत्तम मानसिक गरज समजली जाते.ही गरज आढळणाऱ्या व्यक्तीला सिद्धिप्रेरित समजले जाते.मानवाने आज जी प्रगती केली आहे ती याच गरजेच्यापूर्ततेसाठी केलेली आहे.नीड फॉर सेल्फ एक्सेल म्हणजे काय तर स्वतःमध्ये वाढ करणे, स्वतः श्रेष्ठ असणे आणि तसे काहीतरी करणे , जे कराल त्याकामात भर घालणे, सुधारणा करणे, सतत उत्तम करण्याचा प्रयत्न करणे. कोणतेही काम मग ते तुम्ही पुन्हा पुन्हा करत असाल ते असो किंवा पहिल्यांदाच करत असाल ते असो ते सरसच व्हायला पाहिजे, उत्तमच व्हायला पाहिजे,ही मानसिक गरज असणे .

केवळ एक्सेल या गरजेच्या अनुषंगाने जगाच्या पाठीवर औद्योगिक विश्वात किती मोठे काम झाले आहे ते पहा. गुणवत्तापूर्ण वातावरणासाठी फाईव्ह एस, क्वालिटी सर्कल, लीन मॅनेजमेंट, जस्ट-इन -टाइम, टि क्यू एम, कायझेन,आयएसओ,असे किमान वीस पंचवीस तरी टूल्स पहायला मिळतील .

मला असे काही उद्योग, संस्था माहित आहेत ज्यांच्याकडे ISO प्रमाणपत्र आहे पण त्यांचा कारभार मुळीच क्वालिटी चाललेला नाही.याउलट एखाद्या संस्थेकडे असे मानक प्रमाणपत्र नसते परंतु तिथले लोक इतकी चांगली सेवा देतात कि आपल्यालाही आश्चर्य वाटते. ते कशामुळे तर कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्यामधील नीड फॉर एक्सेल या मानसिकतेमुळे.अशी मानसिक गरज जर स्वभावाचा भाग असेल तर अशा व्यक्तीला तू काम नीट कर हे सांगावे पण लागत नाही.

Fear,भीती आणि hope, आशा हे प्रेरणेचे दोन स्रोत आहेत. स्वभावात एक्सेलचे प्रमाण कमी असेल तर माणूस भीतीच्या छायेत वावरतो आणि स्वभावात एक्सेलचे प्रमाण जास्त असेल तर माणसाला यशाची आशा,आकांक्षा, महत्वाकांक्षा असते. आज आपल्याला अशाच प्रेरित, सकारात्मक, रचनात्मक, उत्पादक माणसांची गरज आहे.

माझी मोटिवेशन अकॅडेमी अगदी अशाच प्रकारची उद्योगी, मेहनती व्यक्तिमत्व विकासाचे कार्य करते.

औद्योगिक विश्वात कार्यरत कामगार, कर्मचारी, अधिकारी आणि उद्योजकांना Entrepreneurs day आणि भारतरत्न जे आर डी टाटा यांच्या वाढदिवस दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.


योगीराज देवकर.

लेखक, प्रेरक, प्रशिक्षक.

www.motivationacademy.in

महेश अमोणकर गोवा

 Regent Metal Tech & Rainbow Engineering at Kundaim-Goa.

माझे मित्र श्री महेश अमोणकर यांच्या दोन्ही फॅक्टरीज् ला भेट देण्याचा योग आला. इथे Powder Coating  चे काम केले जाते. प्रामुख्याने Crompton चे पंखे आणि संबंधित उत्पादनांचे पावडर कोटिंग केले जाते. या उद्योगास आता जवळपास पस्तीस वर्षें पूर्ण झाली आहेत. सदर तंत्रज्ञान तसे परिचित आहे परंतु हे दोन्ही युनिट्स क्वालिटी जॉब वर्कसाठी प्रसिद्ध आहेत. युनिट्स मधील काही कामगार तर अगदी पहिल्या दिवसापासून इथे काम करीत आहेत हे बघून मला थेअरी 'Z ' ची आठवण झाली. कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळच '5 S ' चे महत्व विषद केलेले आहे.कुंडईम इंडस्ट्रियल इस्टेट टेकडीवर आहे त्यामुळे निसर्गरम्य वातावरण आणि नजर जाईल तिथपर्यंत मांडवी नदीचे पात्र आणि खाडीचा भाग दिसतो.गोव्यात कोणाला पावडर कोटिंग ची सुविधा हवी असेल तर तुम्ही हे नाव विश्वासाने रेफेर करू शकता.

www.motivationacademy.in

गोवा आणि फिश

 गोवा आणि फिश


ओल्ड गोवा मध्ये श्री आनंद नाईक यांचे स्टार रेस्टॉरंट आहे.पणजी-जुना फोंडा रोडवर 8-10 मिनिटांच्या ड्राईव्हवर जवळची मोठी खूण म्हणजे सेंट ऍंथोनी चर्च किंवा रामदास सॉ मिल . माझ्या गोव्यातल्या मित्राचा हा मित्र आहे. हॉटेलच्या नावात स्टार आहे या नावाला साजेशाच इथल्या फिशच्या डिशेस चवदार असतात.मी पणजीला आलो कि इथे जेवायला जाणे होतेच. बिना काट्यांचा चाणक मासा ,छोट्या प्रॉन्स पासून किंग्ज प्रॉन्स पर्यंतचे प्रॉन्स मासे , सुरमई मासा,अशा कितीतरी एकापेक्षा एक चविष्ठ आणि सरस डिशेस तिथे मिळतात.रेस्टॉरंट म्हणाल तर एक छोटसं जुनं कौलारु बांधकाम, आजूबाजूला झाडी आणि बाहेर मोकळ्या जागेत बसायला लावलेल्या खुर्च्या आणि टेबल्स हा अवतार पाहुन एखाद्याला जेवणाच्या दर्जाबद्दल शंका येईल पण वर्षानुवर्षे चांगली क्वालिटी आणि सेवा देऊन त्यांनी मोठा ग्राहकवर्ग निर्माण केला आहे.एकदा गेलेला ग्राहक ऍम्बीयन्स नाही तर क्वालिटीसाठी तिथे जातो.तुम्ही पण,पण कशाला,पणजीला याल तेव्हा फिश खाण्यासाठी इथे भेट द्यायाचे ठरवू शकता.


स्टार रेस्टॉरंट

9822382944

7798354856

शरद काळे यांचा लोणी देवकर येथे सत्कार.

 विक्रमवीर शरद काळे पाटील यांचा लोणी देवकर येथे सत्कार.

लोणी देवकर-(12 नोव्हेंबर 2022)- आज शरद काळे पाटील पुणे-इंदापूर -पुणे 300 कि.मी.अंतर सायकल वरून 20 तासात पूर्ण करण्यासाठी हायवे वरून जात असताना लोणी देवकरचे सरपंच कालिदास देवकर यांच्या हस्ते त्यांचा पाहुणचार आणि सत्कार करण्यात आला.

वय हा केवळ एक आकडा आहे हे अहमदनगर मधील सोनाई गावचे सुपुत्र शरद काळे पाटील यांनी त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. खरंतर ते एक उद्योजक आहेत.वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी आयर्नमॅन होण्याचे स्वप्न पाहिले आणि पोहायला शिकण्यापासून सुरुवात केली. पोहणे, धावणे आणि सायकल चालवीण्याचा सराव सुरु झाला.आज वयाच्या 56 व्या वर्षी त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.तब्बल आठ वेळा एस आर स्पर्धा(200,300,400,600कि.मि.सायकल स्पर्धा.)पूर्ण करणारे महाराष्ट्रातील ते पहिले सायकल वीर आहेत.

औरंगाबाद येथे 1000 कि. मि.बीआरएम स्पर्धा 68 तास 10 मिनिटात पूर्ण.

पुणे 1200 कि.मि. स्पर्धा 79 तास 37 मिनिटात पूर्ण.

इंग्लंड येथे आयोजित लंडन-इडनबर्ग-लंडन 1540 कि.मि. अंतर 128 तासात पूर्ण.

ते एक नावाजलेले मोटरसायकल वीरही आहेत.त्यांचे नाव लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये दोनदा नोंदले गेले आहे.

मोटारसायकल वरून महाराष्ट्रातील अष्ठविनायक 12 तास 12 मिनिटात पूर्ण. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे 25 तासात पूर्ण.

भारतातील सुवर्ण चातुस्कोन म्हणजे मुंबई-दिल्ली-कोलकता-चेन्नई-मुंबई 5847 कि.मि. अंतर फक्त 88 तासात पूर्ण केले.

लोणी देवकर मधील योगीराज देवकर यांचे ते मित्र आहेत. सत्कार समारंभास सर्वश्री इंदापूर कारखान्याचे डायरेक्टर रत्नकवी देवकर,सहदेव डोंगरे,दादासाहेब तोरवे, सचिन घाडगे, दिलावर तांबोळी, पप्पू घाडगे, धनंजय चव्हाण, कुंडलिक घाडगे, पांडुरंग राखुन्नडे, नानासाहेब देवकर, अमोल देवकर,तुळशीराम घाडगे, साईराज देवकर, पत्रकार संदीप बल्लाळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

राळेगण, गावाचा वाढदिवस.

 महाराष्ट्रातील सर्व खेड्यांनी राबवावी अशी स्तुत्य संकल्पना - गावाचा वाढदिवस.


राळेगण सिद्धी-ग्रामपरिवर्तन दिवस.


एकदा गावाकऱ्यांनी आण्णा हजारे यांचा वाढदिवस साजरा करायचे ठरविले होते. तेव्हा आण्णांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी गावाचा वाढदिवस साजरा करूया अशी संकल्पना मांडली. आणि मग 2 ऑक्टोबर हा दिवस ठरविण्यात आला.राळेगण मधील या उपक्रमाला आता वीस वर्ष झाली आहेत. यावर्षी अतीवृष्टी मुळे तो दिवस 19 नोव्हेंबर रोजी साजरा झाला. योगायोगाने त्याच दिवशी आण्णांच्या मातोश्री कै.लक्ष्मीबाई हजारे यांचा स्मृती दिनही होता.


दिवसभर रक्तदान शिबीर आणि पद्मश्री डॉ तात्यासाहेब लहाने यांच्या उपस्थितीत मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर पार पडले.


विशेष म्हणजे यादिवशी गावात संध्याकाळी चूल बंद असते आणि सगळ्या ग्रामस्थ आणि उपस्थितांना भोजन दिले जाते, ज्याचा खर्च आण्णा हजारेंच्या पेंशनच्या पैशातून केला जातो. या अभिनव उपक्रमात खालील कल्पना राबविण्यात येतात.

1)ग्राममाता आणि ग्रामपिता चरण पूजन आणि सन्मान- गावात ज्या पुरुषाचे आणि ज्या महिलेचे वय जास्त आहे अशा दोन व्यक्तीची दरवर्षी निवड  केली जाते आणि त्यांचे ग्रामपिता आणि ग्राममाता म्हणून आण्णांच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चरणपूजा करून सन्मान केला जातो.याचा उद्धेश असा आहे कि,गावातील लहान,थोरांना जेष्ठ नागरिकांच्या योगदानाची जाणीव असावी आणि त्यांचा नेहमी आदर केला जावा.

2) गतवर्षात गावात जन्मलेल्या बालकांचा सन्मान - गतवर्षात गावात जी बालके जन्माला आलेली आहेत त्यांचा गावाच्या वतीने अंगडं, टोपडं देऊन सन्मान केला जातो .एकप्रकारे हा मातांचाही सन्मान केल्यासारखेच आहे.याचा उद्धेश असा आहे कि,मुले ही गावाची, देशाची संम्पत्ती आहेत. सन्मानाने गावात त्यांचे स्वागत केले जाते.

3) गतवर्षात गावात ज्या सुना आलेल्या त्यांचा गावाच्या वतीने साडी चोळी देऊन ओटीभरण आणि सन्मान करणे - याचा उद्धेश असा आहे कि,सुन घरात आल्यानंतर तिला जसे घराण्यातील चाळीरिती समजाव्यात,परंपरा आणि संस्कृती कळावी असे वाटते तसेच तिला गावाचा इतिहास आणि संस्कृती कळावी.तिच्या सर्वांशी ओळखी व्हाव्यात.ती गावाची सुन आहे.

4) कर्तृत्ववान नागरिकांचा सत्कार - गावातील ज्या नागरिकांनी ते जिथे असतील तिथे गतवर्षात जर काही विशेष कामगिरी गेली असेल त्यांचा सत्कार केला जातो. याचा उद्धेश असा आहे कि, हे नागरिक गावाचे भूषण आहेत, ते गावाचे नाव मोठं करीत आहेत त्यांची उचित दखल घेणे.यात उद्योजक, अधिकारी,शहरातील नोकरी सोडून गावात परत येऊन शेती करणारा शेतकरी, आधुनिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी, दूध व्यावसायिक, मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळविलेले विद्यार्थी, सैन्यदलात प्रवेश करण्याचे मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक, गावाची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करणारे नागरिक,इ. असे अनेकजण होते.


मी 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान ट्रेनिंगच्या निमित्ताने राळेगण मधेच होतो त्यामुळे या उपक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. मला मनापासून असे वाटते कि महाराष्ट्रातील इतर गावांनीही या संकल्पनेचे अनुकरण करावे.


योगीराज देवकर.

www.motivationacademy.in

हॉटेल चुल मटण

 हॉटेल चुल मटण - नॉस्टॉजिक अनुभव.


हॉटेल चुल मटणची तिसरी शाखा बालगंधर्व चौक,

नॅचरल आईस्क्रीमच्या मागे, जंगली महाराज रोडवर सुरु झालेली आहे. पूर्वीच्या दोन शाखा डी पी रोड म्हात्रे पुल आणि केशवनगर पिंपळे-सौदागर या अगोदरच चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. 


शहरात राहणाऱ्या बहुतेक लोकांना ग्रामीण पार्श्वभूमी  असते. चुलीवरच्या ज्वारी आणि बाजरीच्या फुगलेल्या भाकरी,घरगुती चिकन,

मटण,लाल,काळ्या मसाल्यातील रस्सा ,अळणी चिकन आणि मटण (सुप ), निखाऱ्यावर भाजलेली कलेजी, घडीच्या चपात्या,बुक्की मारून कांदा फोडणे, इ. गोष्टी अनेकांच्या मनात घर करून असतात.

यामुळेच लोकांना हॉटेल मध्ये जाऊनही घरच्या स्वादाचा अनुभव देणारे फूड आवडते.


हॉटेल चुल मटणने याच नॉस्टॉजिक अनुभवाला अधूनीकतेची जोड दिली आहे.त्यामुळेच हॉटेल चुल मटणचा मेनू  शहरी आणि ग्रामीण सगळ्याच लोकांच्या आवडीचा झालेला आहे.


एकदा खाल तर पुन्हा पुन्हा जाल!


शुभेच्छुक.

योगीराज देवकर.

www.motivationacademy.in

वर्गमित्र मेळावा औरंगाबाद

 ऊर्जादायी जुनी मैत्री.

श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर सन 1972 ते 1978 च्या पाचवीच्या पहिल्यावहिल्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे गेटटुगेदर 13 फेब्रुवारी 2013 ला झाले होते. तब्बल 35 वर्षांनी एकावेळी सगळे एकमेकांना भेटत होते.फारच भावुक आणि नॉस्टालजिक दिवस होता तो. गेटटुगेदरची कल्पना सुचल्यानंतर गणेश देशपांडे,सत्यजित गुजर , प्रदीप गारटकर, घनश्याम शहा,पांडुरंग राऊत सगळ्यांनी मनावरच घेतलं होतं की, वर्गातल्या सगळ्यांना जिथं कुठं असतील तिथून शोधून काढायचे. सत्तरच्या दशकात ज्यांचे आई-वडील उजनी धरण प्रकल्पच्या नोकरीत होते ती मुलं,मुली औरंगाबाद,मुंबई,

हैद्राबाद, बेळगाव अशा ठिकाणी गेली होती,नोकरी निमित्त काहीजण पुण्यामुंबईत होते,तर मुली लग्न होऊन कुठे कुठे सासरी गेल्या होत्या. मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका निवृत्त झाले होते आणि त्यातले काही इंदापूर तर काही इतरत्र स्थायिक झाले होते. पण या मित्रांनी सगळ्यांना शोधून काढलेच आणि आमचे गेटटुगेदर जोशात पार पडले. खरंतर मी फक्त पाचवीला एकच वर्ष इंदापूरला होतो.माझं पुढचं सगळं शिक्षण पुण्यात झाले. इथे नवीन मित्रवर्ग निर्माण झाला. पण जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे बालपणीच्या मित्रांचे खास वेगळेच स्थान असते. गेटटुगेदरचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला की आमचा 'मधली सुट्टी ' या आगळ्यावेगळ्या नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार झाला. पुढे सत्यजित गुजरने थेऊरला आणि प्रमिला जाधवने कुंभरगाव -भिगवणला गेटटुगेदर ऑर्गनाईज केले होते. तेव्हा आयोजकांच्या यथायोग्य आदरातिथ्य आणि पाहुणचारासोबत थेऊरच्या गणपतीच्या दर्शनाचा आणि कुंभरगावला उजनी जलाशयात फ्लेमिंगो पक्षी निरीक्षणचा आनंद घेतला होता.


मध्यंतरी मित्र -मैत्रिणींच्या मुला -मुलींची लग्न झाली तेव्हा या भेटीगाठी होत राहिल्या.


21 आणि 22 जानेवारी 2023 ला म्हणजे नुकतच आमचं पहिलं निवासी गेटटुगेदर औरंगाबादला साजरे झाले. आयोजनाची पूर्ण जबाबदारी सत्यजित व स्वाती गुजर आणि डॉ सविता व डॉ मिलिंद पटवर्धन या उभायतांनी घेतली होती.


20 जानेवारीला रात्रीच नियोजनानुसार तिसजण औरंगाबादला पोहोचले. सत्यजित गुजर हा सध्या औरंगाबाद विभागाचा मुख्य वन संरक्षक आहे. त्याने गेस्टहाऊस आणि बंगल्यात सर्वांची निवासाची सोय केली होती. सकाळी नाष्ट्यापासून ते रात्री भोजनापर्यंत खानसामा दिमतीला होता. मग काय ग्रुपच्या गप्पा आणि मज्जा .


पहिल्या दिवशी सकाळी आम्ही घृषणेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो . स्वागताला वन विभागाचे अधिकारी हजर होते. सरळ सगळे मंदिराच्या कार्यालयात गेलो.  मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांची प्राधान्याने दर्शनाची सोय केली. शनिवार,गर्दी असूनही आम्हाला महादेवाचे व्हीआयपी दर्शन घडले. त्यानंतर वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेलो. तिथं गाईड कचरू जाधव आमची वाट पहात उभा होता. त्यांच्या विनोदी, हजरजबाबी आणि तितक्याच अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखाली आम्ही कैलास लेणी पाहण्याचा आनंद लुटला. तिथून चालतच आम्ही महादेव वनात गेलो. बारा जोतिर्लिंगापैकी पाच जोतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. युती सरकारने प्रत्येक जोतिर्लिंगाच्या ठिकाणी महादेवाला आवडणाऱ्या वृक्षांचे वन निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. घृषणेश्वर मंदिर परीसरात सदर महादेव वन निर्माण करण्यात आरएफओ सत्यजित गुजरचे मोठे योगदान आहे. साडेबारा एकरात फुललेल्या नंदनवनात विविध प्रकारचे बेल,रुद्राक्ष,चाफा,अर्जुन सादळा अशा अनेक प्रकारचे वृक्ष पाहताना 

सगळ्यांनाच सत्यजितचा अभिमान वाटत होता. औरंगाबादला परतलो तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. जेवणानंतर तासाभराच्या आंतराने हुरडापार्टी सुरु झाली. एरवी कृषी पर्यटनात हुरडा पार्टी करणारी टीमच सत्यजितने कामाला लावली होती. हुरड्याच्या सोबतीला तीन प्रकारच्या चटण्या आणि आकटीत भाजलेली बेबी कॉर्नची चविष्ठ कणसे पण होती. आकटीच्या शेजारीच लॉनवर गोलाकार खुर्च्या मांडून बसलो मग काय योगीराज देवकरने मनोरंजक खेळांनी सुरुवात केली.सत्यजित गुजरच्या ऍक्टिव्हिटीज् नी सर्वांची मने जिंकली.गणेश देशपांडेने तर तो बॅचलर असताना सत्यजित आणि सविताने त्याला लिहलेल्या पत्रांचे वाचन करून मैत्रीच्या खोलीला उजाळा दिला. मग सविताने पण तिच्याकडील पत्रांचा खजिना काढला आणि काही शिक्षकांची पत्रे वाचून दाखविण्याची विनंती सत्यजितला केली कारण तिला स्वतःला फारच गहिवरून आले होते .श्रीकांत जोशीने बहारदार गायन करून अजूनही मी स्कूल मध्ये होतो तसाच छान गाणी गातो याची प्रचिती दिली. खरी मजा आणली ती पांडुरंग आणि पुष्पा राऊत या पती-पत्नीच्या विनोदांच्या जुगल बंदीने. बालपणीच्या कविता गायन, गाण्याच्या भेंड्या, पासिंग दी बॉल आणि शिक्षा सारख्या खेळांनी रात्रीचे नऊ कधी वाजले ते समजले नाही. हुरड्यानंतर मग रात्री नावाला जेवण आणि भरपेट गप्पा झाल्या.


दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता आम्ही दौलताबाद किल्याच्या पार्किंगला होतो. गाईडच्या मार्गदर्शनाखाली किल्ला पहायला चार तास लागले.वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना पाहताना सगळे आश्चर्यचकित झाले होते.256 एकरांना सुरक्षा भिंत,नागमोडी वळणावरील सात भव्य प्रवेशद्वारे,

पाण्याची व्यवस्था,वॉच टॉवर,खंदक, मेंढा तोफ,भुयारी मार्गातील भुलभूलय्या,निवास आणि मंदिराचे बांधकाम, दुर्गा तोफ असा हा अभेद्य किल्ला तोही मित्रांसोबत पाहणं एक अल्हाददायक अनुभव होता. सगळेजण भुलभूलय्या पार करून वरच्या टप्प्यावर आले खरे पण वेडात दौडलेले फक्त सातच वीर सत्यजित, योगीराज, गणेश, गौतम, रमेश, प्रदीप आणि अर्जुन दुर्गा तोफे पर्यंत पोहोचले. त्यानंतर आम्ही पैठण रोडवर सविताच्या घरी गेलो. तिच्या कॉलनीच्या शेजारीच वाल्मि संस्थेचे कॅम्पस आहे. निसर्गरम्य परिसरात तिचे घर पाहताना खूप छान वाटले. त्यानंतर वाटेत MCED  संस्थेला भेट देऊन  पुन्हा वन विभागाच्या बंगल्यावर पोहोचलो तर खानसामाने पुरणपोळीचा बेत केला होता. खानसामाची पत्नी,आई उत्तम सुगरण आहेत. जेवणानंतर त्यांचे कौतुक केले तर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.जेवणानंतर औरंगाबादच्या तारा पान सेन्टर मधील मगई पानाचा आस्वाद घेतला.


जेवणानंतर गेटटुगेदरच्या समारोपासाठी आम्ही एकत्र बसलो. यात गौतम गुणाजी बेळगांवहुन तर दयानंद काद्रे हैद्राबाद हुन आले होते.त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. उद्योग व्यवसायामुळे बिझी असलेले अविनाश जोशी, संजय सावंत थोडा वेळ का होईना पण गेटटुगेदरला हजेरी लावून गेले. प्रदीप गारटकरची मात्र उणीव भासली.एकएक करून सगळे बोलायला लागले तर सत्यजित म्हणे, " मला सेंडऑफचा फील देऊ नका." पण खरंच सत्यजित, स्वाती आणि सविता, मिलिंद या चौघांनी हे गेटटुगेदर यशस्वी करायला फार मेहनत घेतली. त्यांच्या एनर्जीला सगळ्यांनी दाद दिली. त्यांनी प्रत्येकाकडून जोडीचे फोटो मागविले होते आणि स्कूलच्या इमारतीचा फोटो पण मिळविला होता. स्कूलची इमारत आणि जोडीचा फोटो 'मग' वर छापून प्रत्येकाला भेट द्यायची नावीन्यपूर्ण कल्पना त्यांनी राबविली. समारोपात बोलताना प्रमिला जाधव, प्रशांत कुलकर्णी, संजीवनी यांना अश्रू अनावर झाले होते. तर गौतम गुणाजी, सविता पटवर्धन, गणेश देशपांडे, उज्वला अर्णिकर फारच भावुक झाले होते.घनश्याम शहा,अर्जुन ठोंबरे,राजेंद्र आणि रमेश देवकर, प्रदीप शहा,यांच्या सुंदर सहभागामुळे गेटटुगेदरची रंगत वाढली.

या गेटटुगेदरचे वेगळेपण म्हणजे सगळे मित्र आणि मैत्रिणी जोडीने आल्यामुळे मित्रांच्या बायका आणि मैत्रिणींचे नवरे सगळ्यांचीच एकमेकांशी मैत्री वाढायला मदत झाली. आयोजकांचे, वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे, खानसामाचे आभार मानून पुन्हा लवकरच भेटू असे ठरवून संध्याकाळी सगळे आपापल्या ठिकाणी मार्गस्थ झाले.


आयुष्यात बालपण, शिक्षण, नोकरी, व्यवसाय,प्रोफेशन, छंद, प्रवास,अशा विविध टप्प्यावर लोकं भेटतात परंतु केवळ बालपण आणि शिक्षणाच्या वेळी भेटलेले मित्रच निःस्वार्थ, निखळ, स्वच्छ मैत्री करतात आणि जपतात असा बहुतेकांचा अनुभव असावा.

म्हणूनच जुनी मैत्री खरीखुरी आणि ऊर्जादायी असते.


योगीराज देवकर.

लेखक, प्रेरक, प्रशिक्षक.

www.motivationacademy.in